Shloka7/13: Signs of Knower2-Adambhitv

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — २

ज्याप्रमाणे घराच्या उघड्या दारातून प्रकाश बाहेर येतो तेव्हा त्याचमार्गाने प्रकाशाला आत जायला मोकळीक मिळते, त्याचप्रमाणे संतांच्या ज्या वर्तनलक्षणांवरुन त्यांचे संतत्व जगासमोर प्रगट होते त्याच लक्षणांचा अभ्यास केला असता साधकाला संतांजवळ जायची संधी मिळत असते. श्रीमद्भगवद्गीतेत भगवंताशी निरंतर सान्निध्य प्राप्त झालेल्या सिध्दांची लक्षणे ठिकठिकाणी आढळतात याचे कारण म्हणजे ही लक्षणे साधकांना व्यक्तीगत साधनेत मार्गदर्शन करणाऱ्या दीपस्तंभासारखी आहेत हे होय. तेराव्या अध्यायातील ज्ञानी मनुष्याच्या लक्षणांबरोबर जर दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ साधूची लक्षणे, वा बाराव्या अध्यायातील अव्यभिचारी भक्‍ती करणाऱ्या भक्‍ताची लक्षणे, चौदाव्या अध्यायातील गुणातीत झालेल्या मानवाची लक्षणे वा पंधराव्या अध्यायातील पुरुषोत्तमाची लक्षणे बघितल्यावर एक गोष्ट नजरेस येते. ती म्हणजे सर्व लक्षणे व्यावहारिक जगात अशा मानवाचे वर्तन कसे होते याचे वर्णन करणारी आहेत. आत्मरुपी भगवंताची प्राप्ती झाली की नाही याची खात्री करुन घ्यायची असेल तर बाह्य जगात आपले वर्तन कसे होत आहे हे बघायला आपण शिकले पाहिजे ही पहिली समज आपण भगवद्गीतेमधून घ्यायला हवी. स्वतःच्या सहज, नैसर्गिक वर्तनाकडे तटस्थपणे पहायला शिकणे हा कुठल्याही साधनेचा पाया आहे. ही निरपेक्ष नजर ज्या साधकात उपजत असते त्याच्या थोरवीचे वर्णन करणे अशक्य आहे. असा साधक कुठल्याही मार्गाने भगवंताची उपासना करु शकतो! असो. ज्ञानी माणसाच्या लक्षणांकडे आपण आता वळूया.

२. अदंभित्व

जगातील ज्या माणसांशी आपला सबंध येतो त्यासर्वांच्या मनात आपली कुठलीतरी एक आदर्श प्रतिमा असावी ही इच्छा मनातून पूर्णपणे जाणे म्हणजे अदंभित्व होय. सर्व मानवांमध्ये सात्विक, राजसीक आणि तामसिक वृत्तींची भेसळ झालेली असते. हिंदू धर्मातील इंद्रादी देवसुध्दा कामादी षडरिपुंपासून मुक्‍त झालेले नाहीत तर आपल्यासारख्यांची काय अवस्था असेल हे सांगायचा खटाटोप करण्याचीसुध्दा आवश्यकता नाही. परंतु तरीही आपल्या मनात समाजाने आपल्याकडे आदर्श नागरिक म्हणून पहावे ही इच्छा असते. आपल्या मनाप्रमाणे मान मिळण्याकरीता आपण साहजिकच आपल्या हातून घडलेल्या सात्विक वृत्तीशी सुसंगत असणाऱ्या गोष्टींचे प्रदर्शन करायला लागतो. लोकांनी चांगले म्हणावे, आपण सुप्रतिष्ठीत असावे या भावनेचा हा एक नैसर्गिक परिणाम आहे. विष प्यायल्यावर ज्याप्रमाणे मृत्यू अटळ आहे त्याचप्रमाणे स्वतःचे स्थान समाजात, मित्रमंडळीत उच्च असावे ही इच्छा मनात आली की केलेल्या चांगल्या गोष्टीचे प्रदर्शन आलेच. म्हणजेच दंभाचा प्रवेश झालाच. ज्या मनुष्याने आपले लक्ष संपूर्णपणे भगवंताकडे लावले आहे त्याच्या मनात सामाजिक प्रतिष्ठेची वासना शिरायला जरासासुध्दा वाव नसतो. केवळ असाच महानुभाग अदंभित्व गुणाची प्राप्ती करु शकतो आणि त्याला ही प्राप्ती अनायास, सहज होते. भगवंताकडे लक्ष लावल्याचा एक परीणाम म्हणून अदंभित्व त्याच्याकडे आपणहून येते. सामाजिक प्रतिष्ठेची बेडी पायात पडल्यावर साधनेच्या अथांग अवकाशात भरारी मारणे अशक्य आहे हे ध्यानात आल्यावर ज्ञानी मनुष्य केवळ सामाजिक प्रतिष्ठेला केवळ ताज्य मानत नाही तर तीला आपल्या जवळपाससुध्दा फिरकून देत नाही. त्यामुळे तो केवळ आपले सत्कर्म स्वतःच्या तोंडाने सांगत नाही असे होत नाही तर तो आपले सत्कर्म दुसऱ्या कुणीही लोकांना सांगू नये अशी इच्छा मनात ठेवतो. तो आपली सत्कर्मे लपवितो. काय गंमत आहे बघा. आपण स्वतःची दुष्कर्मे लपवितो आणि ज्ञानी मनुष्य स्वतःची सत्कर्मे झाकतो. माउलींच्या समर्पक आणि अद्वितीय भाषेत सांगायचे झाले म्हणजे:

ना ना कृषीवळ आपुले । पांघुरवी पेरिले ।

तैसें झाकी निपजले । दानपुण्य ॥ २०७:१३ ॥

 

परोपकार न बोले । न मिरवी अभ्यासिले ।

न शके विकू जोडले । स्फीतीसाठी ॥ २०९:१३ ॥

तेव्हा अदंभित्व या शब्दाची व्याख्या केलेल्या कर्मांचा बडेजाव न मांडणे अशी नकारात्मक नाही तर केलेली सत्कर्मे लोकदृष्टीपासून झाकून ठेवणे अशी सकारात्मक आहे. आता स्वतःकडे बघितल्यावर असे लक्षात येते की मी जी काही सत्कर्मे केली आहेत त्या सर्वांचे फळ आपल्याला का मिळत नाही याच्या विवंचनेतच माझे आयुष्य जात आहे. घरी सर्वांच्या उपयोगी पडलो तरी त्यानुसार मला मान का मिळत नाही, मित्रांना प्रत्येक अडि-अडचणीला मदत करायला धावून गेलो तरी माझ्या मदतीला मोजकीच माणसे का आली अशा विवंचनांमध्ये आपला इतका वेळ, इतकी शक्‍ती खर्च होते की भगवंताची साधना करण्याची ताकत आपल्यात उरत नाही. सारांश असा की आपल्या जीवनाचे ध्येयच आपण केलेल्या कर्मांचे योग्य फळ प्राप्त करुन घेणे असे असल्याने अदंभित्व हा गुण आपल्यापासून फार दूर राहीला आहे. अदंभित्व गुणातर्फे भगवंताजवळ जायचे असेल तर आधी समाजात पुढे व्हायची आपली धडपड थांबली पाहिजे. भगवंतालाच आपल्या जीवनाचे सर्वस्व बनविणे हा एकच उपाय आपल्या हातात आहे. ही आत्यंतिक भगवंत-आस हवी असेल तर त्याकरीता प्रयत्‍न छोट्या गोष्टींपासून सुरू करायला हवेत. ज्याप्रमाणे शिडीच्या पायऱ्या एकेक करीत चढून आपण वरील पातळीवर पोहोचतो त्याचप्रमाणे पहिल्यांदा आपण जीवनातील कमी महत्वाच्या गोष्टींना काढून टाकून त्यांच्या जागी भगवंताबद्दलची ओढ ठेवली पाहिजे. तेव्हा थांबवा ते उगीचच वर्तमानपत्राचे दीर्घकाळ वाचन, दूरचित्रवाणीवरील कंटाळवाण्या कार्यक्रमांबद्दलचे विवेचन आणि करा नामस्मरण. अदंभित्वाची पहिली पायरी हीच आहे!

॥ हरि ॐ ॥

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

यावर आपले मत नोंदवा