Shloka 7/13: Signs of Knower3-Ahinsa.

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ३

 

साधना आणि व्यावहारिक जीवन यांमध्ये सर्वसामान्य जन फार मोठा फरक मानतात. ‘तुमची साधना वगैरे ठीक आहे हो, पण आम्हांला या सर्व गोष्टी करायला वेळ सापडत नाही. आणि समाजात जर संतांसारखे वगायला लागलो तर आमच्या जबाबदाऱ्या आम्ही सांभाळू शकणार नाही. तेव्हा तुमचे अध्यात्म चांगले असले तरी सध्या आम्हाला परवडणारे नाही.’ हे शब्द आपण सर्वांनी ऐकलेले आहेतच. कधीकधी आपण स्वतःदेखील हेच शब्द उद्‍गारतो! असे शब्द ऐकले की श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ‘रामबरोबर जाणे शक्य नसले तर म्हणून श्यामबरोबर जायलाच पाहिजे असे नाही!’ साधनेची पराकोटी करुन संतपदाची प्राप्ती करुन घेणे अशक्य असले तरी आपल्यापरीने परमेश्वराची साधना (निव्वळ त्याच्याप्राप्तीकरीता, समाजात काहीतरी मिळावे म्हणून नाही) करायला काय हरकत आहे? अहो, मला सचिनसारखी फलंदाजी कधीही करता येणार नाही म्हणून मी काय फलंदाजीच करु नये की काय?! साधना म्हणजे केवळ बारा वर्षे नदीत उभे राहून रामनामाचा जप करणे, वा हिमालयात जाऊन तपश्चर्या करणे नव्हे तर दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या घटनांमध्ये ‘योग्य’ वर्तन करणे होय. ज्ञानी माणसाची लक्षणे बघितली की ही गोष्ट प्रकर्षाने जाणविते. संपूर्ण गीतेमध्ये असे कुठेही म्हटले नाही की साधकाच्या साधनेची फलश्रुती म्हणजे व्यावहारिक जगापासून निवृत्ती. उलट भक्‍तराज अर्जुनाला कुरुक्षेत्रावरील महारणात भाग घ्यायला उद्युक्‍त करायला, म्हणजेच जीवनात योग्य वर्तन करण्यास, भगवंतांनी गीता सांगितली अहे. म्हणूनच संतांचे संतपण ते या जगापासून भौतिक दृष्टीकोणातून किती दूर गेले आहेत यावर सिध्द होत नाही तर जेव्हा त्यांचा जगाशी संपर्क येतो तेव्हा ते कसे वागतात याच्यावरुन होते. साधना केल्यामुळे व्यावहारिक जीवनापासून फारकत होत नाही तर ते आहे तसे स्वीकारायची ताकद आणि म्हणून त्याच्यापासून खरा आनंद मिळवायची शक्‍ती प्राप्त होते. तेव्हा आपण सर्वांनी जमेल तसे भगवंताच्या जवळ जाण्यास प्रयत्‍न सुरू केले पाहिजेत. साधनेतून पुढे कधीतरी फायदा होईल म्हणून नव्हे तर आवड म्हणून, एखाद्या छंदासारखी, साधना करायला शिकले पाहिजे. या करीता साधनेचे नित्यनूतन प्रकार आपण जीवनात आणले पाहिजेत आणि म्हणूनच आपण ज्ञानी माणसाच्या लक्षणांकडे साधनेचे प्रकार या दृष्टिने पहात आहोत.

३. अहिंसा

लोकशाही या आदर्शावर संपूर्ण विश्वास ठेवून जगातील सर्व माणसांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे वर्तन करण्यास संपूर्ण अनुमती देणे म्हणजे अहिंसेचे आपल्या जीवनातील साधनारुप होय. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसा या गुणाचे वर्णन करायला शंभराहून अधिक ओव्या लिहिल्या आहेत. त्यातील अनेक ओव्या अहिंसा या शब्दाची सर्वसामान्य जनांमध्ये काय व्याख्या आहे ती कशी चुकीची आहे याचे स्पष्टीकरण करण्याकरीता आहेत. त्यांच्या अतिमार्मिक आणि परखड विवेचनावरुन हे सिध्द होते की सर्वसाधारणपणे अहिंसा अंमलात आणण्याकरीता आपण हिंसेचाच उपयोग करीत असतो! आपण सर्वांनी श्रीज्ञानेश्वरीतील हे विवरण स्वतः बघावे ही इच्छा असल्याने याबाबतीत अधिक लिहीत नाही (बघा ओव्या २१६ ते २४५, अध्याय १३). स्वतःच्या व्याख्येबद्दल महाराज म्हणत आहेत:

 

तंव करणेयाचाचि अभावो । परि ऐसाही पडे ठावो ।

तरि हाता हाचि सरावो । जे जोडिजती ॥ २८६:१३ ॥

ऐसा मने देहे वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।

जाहला ठायी जयाचा । देखशील ॥ ३१०:१३ ॥

तो जण वेल्हाळ । ज्ञनाचे वेळाऊळ ।

हे असो निखळ । ज्ञानचि तो ॥ ३११:१३ ॥

कुणीही कसाही वागत असला तरी त्याला शासन करुन त्याचे वागणे बदलविण्याचा अजिबात यत्न न करणे म्हणजे अहिंसा होय. या जगात फारच विरळा लोक केवळ दुसऱ्याला दुःख होईल म्हणून कर्मे करीत असतात. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांच्या जीवनात असे लोक दिसतसुध्दा नाहीत. जर कुणाच्या हातून कुकर्मे घडत आहेत असे आढळले तर त्यामागील हेतू स्वतःला सुख मिळावे हाच तुम्हाला दिसून येईल. सुख मिळावे याकरीताच सर्वजण धडपडत आहेत. आणि या जगात केवळ एकच सुख आहे. जेव्हा मनाची हालचाल थांबते तेव्हा आणि तेव्हाच सुख मिळते. तेव्हा सुखात असणे म्हणजे मनाचा लोप करणे होय. ही वस्तुस्थिती ज्ञानी माणसाला स्वसंवेदनांनी कळली असल्याने तो अशा भरकटलेल्या माणसाला खरे सुख दाखवून देतो. मग त्या माणसामध्ये जो बदल होतो तो आपोआप आणि वेदनाविरहीत होतो. स्वतः दुसऱ्यांना बदलविण्याचा आयास न करणे आणि स्वतःच्या आनंदात मग्न असणे यात बाकी सर्व लोकांना आपले जीवन हवे तसे जगू देण्याची मुभा आहे. त्यांच्या सध्याच्या आयुष्याला मोडीत न काढता नवे वळण देण्याची ताकद, शक्‍ती अहिंसेत आहे. कृमीकीटकांपासून ते ब्रह्मादी जीवांना त्यांचे जीवन त्यांच्या मताप्रमाणे जगू देण्याच्या मुभेत त्यांना बदलविण्याची शक्‍ती आपल्यात येते, हिंसेशिवाय आयुष्य तोडायची ताकत येते. याचे कारण असे की एकदा तुमच्या मनात जगाबद्दल सहनुभूतीचा प्रवेश झाला की लोकांना तुमच्या चांगुलपणाबद्दल विश्वास वाटू लागतो आणि तुमचे सहज बोलणे ते आदरयुक्‍त ऐकून अंमलात आणावयाचा प्रामाणिक प्रयत्‍न करु लागतात. तेव्हा अहिंसा हा साधनामार्ग चोखाळायचा असेल तर जगात जे काही चालले आहे ते सर्व योग्य आहे, खुद्द भगवंतानेच तसे घडावे ही योजना आखली आहे हे स्वतःच्या मनावर बिंबवा. ही अहिंसेची प्रथम पायरी आहे.

॥ हरि ॐ ॥

One Response to Shloka 7/13: Signs of Knower3-Ahinsa.

  1. santhosh म्हणतो आहे:

    अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..?
    रीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला ” क्विलपॅड ” /
    आप भी “क्विलपॅड” http://www.quillpad.in यूज़ करते हे क्या…?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: