Shloka7/13: Signs of Knower4-Kshama

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ४

 

परमार्थात प्रगती होण्यासाठी शाब्दिक ज्ञानाची वा बुध्दीची आवश्यकता नसते. हे, इंद्रियांमार्फतच जाणता येणारे, जग नश्वर आहे आणि अतींद्रिय ईश्वर शाश्वत आहे हे वाक्य कळायला फार पांडित्याची जरुरी नाही. निरंतर सुख केवळ भगवंतप्रेमात आहे हे तात्विकरीत्या स्पष्ट झाले तरी दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग कसा करावा हे केवळ अनुभवानेच कळते. इंजिनीयरींगची पदवी प्राप्त करुन नोकरीला नव्याने रुजू होण्याऱ्या नवशिक्या उमेदवाराला सर्व पुस्तकी ज्ञान असते पण त्याचा प्रत्यक्षात उपयोग कसा करावा हे तो अर्धी पदवी असलेल्या पण अनुभवांनी पिकलेल्या फोरमनकडून शिकतो तसे बौध्दीक ज्ञान झालेल्या साधकाला साधनेत परिपक्व झालेल्या संतांचा सहवास अत्यावश्यक आहे. आणि संतांचा सहवास म्हणजे निव्वळ शारिरिक जवळीक नव्हे तर त्यांना ज्या गोष्टीची आत्मीयता आहे त्या गोष्टींना आपलेसे करणे होय. एखाद्या मनुष्याशी आपले संबंध केव्हा जुडतात? तर आपली आणि त्याची आवड जुळते तेव्हा. नुसत्या शारिरिक जवळीकीने प्रेम वाढत असते तर जगातील कुठल्याही पति-पत्‍नीत मानसिक दुरावा निर्माण झाला नसता! तेव्हा संतांचा खरा सहवास हवा. त्यांच्या सहज, नैसर्गिक आवडींचा अभ्यास करुन त्यांच्याबद्दलची ओढ वाढविणे हा खरा संतांचा सहवास होय. त्यांच्याशी जवळीक साधून हवे तेव्हा आपल्या प्रापंचिक समस्यांचे निवारण करुन घेण्यात आपण आपल्या आवडीमध्ये त्यांना ओढत असतो, त्यांच्या प्रिय गोष्टींमध्ये स्वतःला जिरवत नसतो हे आपल्या ध्यानात येत नाही हे आपले दुर्दैव आहे. असो. ज्ञानी माणसाच्या लक्षणांचा अभ्यास करुन आपण संतांच्या नैसर्गिक आवडींची ओळख करुन घेऊ शकतो. आणि ही ओळख झाल्यावर त्याप्रमाणे आपल्या आयुष्याला वेगळे वळण देण्याने आपण त्यांच्या सहवासात येत असल्याने ही सर्व लक्षणे म्हणजे साधनेचे महामार्गच आहेत यात शंका नाही.

 

४. क्षमा

 

आयुष्यातील प्रत्येक घटना भगवंताच्या योजनेबरहुकूम घडत आहे आणि त्या घटनेला प्रत्यक्ष आकार देणाऱ्या व्यक्‍ती निव्वळ निमित्तमात्र आहेत या वस्तुस्थितीचे विस्मरण कदाकाळी न होणे म्हणजे मनात क्षमा जागृत होणे होय.

कुणी अपराध केला आणि आपण त्याला माफ केले यामधील जी क्षमा आहे ती अर्धवट क्षमा आहे. कारण या क्षमेमध्ये दोन त्रुटी आहेत की ज्या आपणास या व्यावहारिक जगातच गुंतवून ठेवतात. पहिला अवगुण म्हणजे त्या व्यक्तीने अपराध केला आहे ही आपणास झालेली जाणीव. ही जाणीव होण्यात एकतर आपण संसारातील योग्य-अयोग्य या वर्गवारीतून बाहेर आलेलो नाही हे सिध्द होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्‍तीला संपूर्णपणे जबाबदार ठरविण्यात आपण परमेश्वराच्या इच्छेला विसरलो आहोत हे दिसते. क्षमेच्या व्यावहारिक व्याख्येतील दुसरी त्रुटी म्हणजे आपण क्षमा केली आहे ही जाणीवही आपल्या अहंकारात वृध्दी करते. मला अमुक एक शिक्षा करता आली असती पण मी असा निर्णय घेतला की त्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करणे बरे या भावनेत ‘मी’पणा आहे आणि त्यातच अहंकाराची वृध्दी आहे. संतांची क्षमा त्यांना भगवंताजवळ घेऊन जाते आणि आपली व्यावहारिक क्षमा आपणास भगवंताचे विस्मरण करवित असते. वरील दोन दुष्परिणामांशिवाय क्षमा करायची असेल तर कुणी अपराध केला आहे ही भावनाच आपल्या मनातून गेली पाहिजे. क्षमा करायची पाळीच आणू न देणे ही क्षमा करण्याची पराकोटी आहे आणि केवळ हीच क्षमा साधनेचा मार्ग आहे. बाकी कुठलीही क्षमेची व्याख्या म्हणजे भगवंताला विसरुन स्वर्गाच्या आडवाटेला जाणे आहे. संतांच्या या स्थितीचे वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत:

 

स्वशिखरांचा भारु । नेणे जैसा मेरु ।

धरा यज्ञसुकरु । ओझे न म्हणे ॥ ३४७:१३ ॥

 

घेउनी जळाचे लोट । आलिया नदिनदांचे संघाट ।

करी वाड पोट । समुद्र जेवी ॥ ३४९:१३ ॥

 

तैसे जयाच्या ठायी । न साहणे कांहीचि नाही ।

आणि साहतु असे ऐसेही । स्मरण नुरे ॥ ३५०:१३ ॥

 

आंगा जे पातले । ते करुनि घाली आपुले ।

येथ साहतेनि नवले । घेपिजेना ॥ ३५१:१३ ॥

 

हे अनाक्रोश क्षमा । जयापाशी प्रियोत्तमा ।

जाण तेणे महिमा । ज्ञानासि गा ॥ ३५२:१३ ॥

 

भगवंताला आत्मरुपात पाहून स्वतःभोवती घडणाऱ्या सर्व घटनांना मूळात मीच जबाबदार आहे या जाणीवेची विस्मृती झाली तरच आपण दुसऱ्यांच्या कपाळावर अपराधीपणाचा शिक्का मारतो. संसारातील यच्चयावत गोष्टींना आपलेच रुप समजले की कुठे आला अपराध आणि कुठे आली क्षमा. खरी क्षमा अपराधाचेच उच्चाटन करते. याहून सुंदर काय असू शकेल?

 

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: