Shloka7/13: Signs of Knower5-Arjav

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ५

 

व्यावहारिक जगात आपले ध्येय गाठण्यासाठी जो मार्ग आपण सुनिश्चित केलेला असतो त्या मार्गावरच राहण्याचे आपले सर्व प्रयत्‍न असतात. जोपर्यंत आपण मार्ग सोडत नाही तोपर्यंत आपण योग्य दिशेने चाललो आहोत याची खात्री आपणास असते कारण प्रगती म्हणजे काय याचे मानदंड आपल्या मनात स्पष्ट असतात. उदाहरणार्थ, जेव्हा मी बंगलोरहून कोल्हापूरला यायचे ठरवितो तेव्हा गाडी चालविताना बघत असतो की बंगलोर-मुंबई महामार्गावर मी आहे की नाही आणि वाटेत लावलेल्या अंतराच्या पाट्यांनी मला कळत असते की कोल्हापूर आता किती दूर आहे. लहानपणापासून ध्येय ठरविणे आणि त्याच्या प्राप्तीकरीता आपणास योग्य आणि सुखदायक असा मार्ग निवडून त्यावर मार्गक्रमण करणे आणि वेळोवेळी आपली किती प्रगती झाली आहे हे बघणे याची इतकी सवय आपणास लागली आहे की असे वागणे नैसर्गिक जाहले आहे. जेव्हा परमार्थात साधनेच्या मार्गावर चालण्याचे आपण ठरवितो तेव्हा ही सवय घातक ठरते कारण परमार्थामध्ये मार्ग आखीव नसतो. जास्तीतजास्त आपण कुठे जायचे आहे याची मुख्यत्वे दिशा ठरवलेली असते परंतु त्या दिशेने जाणारा मार्ग नित्यनूतन असतो कारण आपल्या स्वभावातील सर्व गुण-दोष आधीपासून आपणास माहिती नसतात. ही गोष्ट स्पष्ट करण्याकरीता पुढील उदाहरण पहा. नदीपार जाण्याकरीता नाव वल्हविताना मार्ग आखलेला नसतो. पलिकडे जायचे आहे हे निश्चित असले तरी एका सरळ रेषेत आपण पैलतीराला कधीच जात नाही. नदीच्या प्रवाहातील न दिसणारे अडथळे क्षणोक्षणी आपणास मार्ग बदलायला लावतात. याशिवाय नदीचा स्वतःचा प्रवाह आपल्याला पल्याडहून दूर ओढून नेत असतो त्यामुळेही आपणास पुढे जाण्याकरीताच नव्हे तर योग्य दिशेकडे तोंड ठेवण्यातही शक्‍तीचा अपव्यय करावा लागतो. अगदी असेच स्वतःच्या नैसर्गिक प्रवृत्ती भवसागराला पार करण्यापासून आपल्याला दूर वाहवत नेत असतात. पैलतीरावरचे, भगवंतसान्निध्याचे, शाश्वत सुख जवळ येत आहे की नाही हे दर्शविणाऱ्या पाट्या ठीकठीकाणी रोवलेल्या नसतात. आणि नदीच्या प्रवाहाचा जोर वाढला तर त्याबरोबर वाहत जाण्याशिवाय पर्याय आपल्याकडे नसतो, मग आत्ता जवळ दिसणारा किनारा परत लांब दिसायला लागतो. अशावेळी नाव वल्हविण्याचे कष्ट परत पहिल्यापासून सुरू करावे लागतात! वल्ही फिरविण्याचे जेव्हढे निरनिराळे प्रकार आपणास माहित असतात त्यासर्वांचा उपयोग करुन शेवटी पैलतीरावर पोहोचायचे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच स्वतःला एकाच साधनेच्या वर्गवारीत घालून (मी भक्‍त आहे, वा ज्ञानमार्गावर चालणारा आहे किंवा योगासामर्थ्य वाढविणार आहे इत्यादी) बाकी मार्गांकडे दुर्लक्ष करणे वा उपहासाने पाहणे साधकाला अतिशय धोकादायक ठरते. म्हणूनच आत्मरुपी निर्गुण परमेश्वराबद्दल आत्मीयता बाळगणारे श्रीज्ञानेश्वर महाराज तेव्हढ्याच प्रेमाने हरिपाठ म्हणतात आणि कुंडलिनी जागृत करुन योगबळाद्वारे जीव-शिवाचे मिलन घडवून आणतात. ज्ञानी माणसाच्या लक्षणांद्वारे आपण साधनेचे निरनिराळे प्रकार बघत आहोत कारण या सर्व मार्गांचे मिश्रण करुन आपणास स्वतःचा एक नवीनच मार्ग तयार करायचा आहे. विविध प्रकारचे जिन्नस एकत्र शिजवून चविष्ट अन्न आपण तयार करतो त्याचप्रमाणे हे सर्व मार्ग बघून त्यांचे स्वतःच्या प्रवृत्तीरुपी जिव्हेला चविष्ट वाटेल असे एक योग्य मिश्रण आपल्याला तयार करायचे आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलीला स्वयंपाक करायला हळूहळू शिकविते त्याचप्रमाणे आपल्या ह्रुदयात स्थित असलेले सद्‍गुरु आपल्याजवळ उभे राहून ही पाकक्रिया कशी करायची हे शिकविणार आहेत. सध्याच्या तरुणींसारखा पाकशाळेत जायचा कंटाळा करु नका म्हणजे झाले!

 

५. आर्जव

 

अत्यंत जवळच्या बालमित्राशी बोलताना त्याच्या स्वभावाबद्दल जो समजुतदारपणा आपल्या मनात असतो तीच सामजंस्याची भावना सर्वांभूती ठेवणे म्हणजे आर्जव होय. आपल्या शाळेपासून असलेल्या मित्राचे सर्व बोलणे आपण ग्राह्य धरीत नाही. परंतु त्याच्याबद्दलचे उत्कट प्रेमही कधीच सोडत नाही. त्याचप्रमाणे या जगातील कुठलीही व्यक्‍ती जेव्हा आपल्या संपर्कात येते तेव्हा तीच्याद्वारे आपलेच गुण-अवगुण आपल्याला दिसत आहेत ही भावना ज्याच्या मनात जागृत आहे तो त्या व्यक्‍तीला आपल्यापासून भिन्न मानूच शकत नाही. प्रत्येक व्यक्‍ती, प्रत्येक घटना अशा साधकाला आरशासारखे भासत असतात. आपलेच प्रतिबिंब त्याला दिसत असते. स्वतःचे पैलू दाखविले म्हणून तो सर्व घटनांबद्दल आणि यच्चयावत व्यक्‍तींबद्दल कृतज्ञ राहतो. त्या कृतज्ञतेच्या पोटी त्याचे जे वर्तन होते त्याला आर्जव हे नाव आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत:

का तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवी चंडाशु ।

जगा एकुचि अवकाशु । आकाश जैसे ॥ ३५६:१३ ॥

जे जगचि सनोळख । जगेसि जुनाट सोयरिक ।

आपपर हे भाख । जाणणे नाही ॥ ३५७:१३ ॥

दिठी नोहे मिणधी । बोलणे नाही संदिग्धी ।

कवणेसी हीनबुध्दी । राहाटीजे ना ॥ ३६४:१३ ॥

तो पुरुष सुभटा । आर्जवाचा आंगवठा ।

जाण तेथेचि घरटा । ज्ञाने केला ॥ ३६७:१३ ॥

आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्‍तींशी आपली जन्मोजन्मींपासून ओळख आहे ही भावना मनात ठेवा. आणि फार काळाने भेटलेल्या बालमित्राशी बोलता तसे वर्तन त्यांच्याशी करा. आर्जवाचे साधनारुप अजून वेगळे काय असू शकेल?

॥ हरि ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: