Shloka7/13: Signs of Knower6-Gurubhakti

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ६

 

६. गुरुभक्ती

 

परमार्थात सद्‍गुरुंचे महत्व अनन्यसाधारण आहे. स्वतः साधना केल्याशिवाय भगवंत प्राप्त होत नाही हे जरी खरे असले तरी साधनेचा मार्ग गुरुकृपेच्या सावलीतच सापडतो, त्या मार्गावर निरंतर चालत राहण्याचे धैर्य सद्‍गुरुंच्या सान्निध्यामुळेच प्राप्त होते आणि साधनेच्या मार्गामध्ये वेळोवेळी येणाऱ्या अडथळ्यांचेही गुरुवाक्यांनेच निरसन होते. अशारीतीने मार्गाच्या उगमापासून ते अंतापर्यंत गुरुंच्या पाठबळावर आपण उभे असतो. असे असल्यावर गुरुभक्‍ती सर्व साधकांचा गुण असला पाहिजे. गुरुभक्‍ती हे ज्ञानी माणसाचेच वैशिष्ट कसे हा प्रश्न आपल्या मनात उद्भवू शकतो. त्याचे उत्तर शोधायला गेलो तर असे आढळते की शब्द म्हणजे आपल्या मनातील अमूर्त विचारांचे मूर्त स्वरुप आहे. उच्चारलेला प्रत्येक शब्द वक्त्याच्या मनातील भावनांना आपल्यामध्ये सामावून श्रोत्याच्या कर्णांवर आदळतो आणि श्रोता आपल्या पूर्वायुष्यातील अनुभवाचा संदर्भ घेऊन त्याचा गाभा बघतो. त्यामुळे एकाच शब्दाचे निरनिराळ्या व्यक्‍तींच्या मनात भिन्न प्रतिबिंबे उठतात. उदाहरणार्थ, ‘काय सुंदर सूर्यास्त होता’ हे शब्द ऐकले की प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या कल्पनेप्रमाणे तो सूर्यास्त कसा असेल याचे चित्र उमटते. त्यामुळे प्रत्येक साधकात गुरुभक्ती हा गुण असला तरी ज्ञानी माणसाचे वैशिष्ट्य म्हणून जी गुरुभक्ती आहे ती आपल्यात असेल असे नाही. खुद्द ज्ञानेश्वर महाराज स्वतःबद्दल म्हणतात की

 

जिये गुरुसेवेविखी । माझा जीव अभिलाखी ।

म्हणोनि सोयचुकी । बोली केली ॥ ४५५:१३ ॥

एऱ्हवी असता हाती खुळा । भजनावधानी आंधळा ।

परिचर्येलागी पांगुळा- । पासूनि मंदु ॥ ४५६:१३ ॥

गुरुवर्णनी मुका । आळशी पोशिजे फुका ।

परि मनी आथी निका । सानुरागु ॥ ४५७:१३ ॥

 

जेव्हा ज्ञानेश्वर महाराजच आपल्या गुरुभक्तीबद्दल साशंक आहेत तेव्हा आपण कधीही स्वतःच्या गुरुभक्तीची खात्री देऊ नये. माउलींच्या संजीवन समाधीदिनी प्रत्यक्ष श्रीनिवृत्तीनाथांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते म्हणाले की ‘ह्याने कधीही माझी अवज्ञा केली नाही. अशा शिष्याचा शारिरिक सहवास सोडावा वाटत नाही.’ असा पराकोटीचा गुरुभक्तही स्वतःच्या गुरुभक्तीला परिपूर्ण मानत नाही हे आपण सतत ध्यानात ठेवले पाहिजे. एकदा ही गोष्ट ध्यानात आली की दुसऱ्याच्या गुरुभक्तीचे मूल्यमापन करणे आपण थांबवू. तेव्हा गुरुभक्ती या गुणाचे पहिले साधनारुप म्हणजे आपल्या गुरुकुळातील भक्तांची त्यांच्या गुरुभक्तीनुसार वर्गवारी करणे थांबविणे हे होय!

साधकाची गुरुभक्ती तीन प्रकारची असते. ह्या तीन प्रकारांचे वर्णन करण्यासाठी बौध्द धर्मामध्ये ‘बुध्दं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी, धर्मं शरणं गच्छामी’ असे म्हणतात. श्रीसंत आचार्य विनोबा भावे यांनी याचे फार छान विश्लेषण केले आहे. ते म्हणतात की नैसर्गिकरीत्या पहिल्यांदा आपण व्यक्‍तीपूजा करतो. म्हणजे आपली साधना एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर भाळून सुरु करतो. ती अवस्था म्हणजे ‘बुध्दं शरणं गच्छामी’. बुध्दाच्या प्रभावाखाली येऊन साधना सुरु करणे. किंवा प.पू. दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर आपले आयुष्य उधळणारे साधक. त्यानंतर येतात आपल्यावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीने तयार केलेल्या संस्थांच्या प्रगतीकरीता आयुष्य वेचणारे साधक. हे ‘संघं शरणं गच्छामी या भक्‍तीचा आधार घेतात. प.पू. दादासाहेब भेटले नाहीत तरी यांना विश्वपंढरीचे कार्य करुन यांना तेव्हढेच समाधान मिळते. यानंतरची अवस्था म्हणजे धर्मं शरणं गच्छामी. आपल्या गुरुने जो उपदेश केला आहे त्यानुसार आपले वर्तन करणे यातच अशा साधकांच्या जीवनाची इतिकर्तव्यता असते. आपल्या सद्‍गुरुंच्या साधनेचा आदर्श समोर ठेवून आपले जीवन निव्वळ साधनेकरीता व्यतीत करायचे आहे हा निर्धार ज्या साधकांच्या मनात झालेला असतो ते कोल्हापूरला येतीलच असे नाही. अशा साधकांची गुरुभक्ती एकलव्यासारखी असते, पावसच्या श्री स्वामी स्वरुपानंदांसारखी असते. एकलव्याची धनुर्विद्येतील प्रगती अर्जुनापेक्षाही कांकणभर सरसच होती या घटनेमागील रहस्य जाणून घ्या. गुरुभक्तीचा हा क्रम जाणून घ्या. आपण बुध्दाला शरण जात आहोत की संघाला शरण जात आहोत की धर्माला शरण जात आहोत हे तटस्थ नजरेने बघा. गुरुभक्तीची पराकोटी गुरुंच्या धर्माला शरण जाण्यात आहे. आपल्या जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टीत त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे आपले जीवन जगणे ही गुरुभक्तीची पहिली पायरी आहे. असे वर्तन करीत असतानासुध्दा जर अपार आनंद मिळत असेल तर कल्पना करा की अमूर्त भक्तीत किती सुख असेल. प.पू. दादासाहेब नेहमी म्हणायचे की तुम्ही साधना केलीत यातच मला सर्वकाही मिळते. कारण आपली साधना अत्यंत प्रेमाने, प्रामाणिकपणे, निव्वळ साधनेकरीता म्हणून साधना करणे यापेक्षा गुरुभक्तीचे वेगळे साधनारुप असू शकेल काय? ज्याक्षणी आपण साधनेच्या विश्वातून बाहेर पडून व्यावहारिक जगात रममाण होतो त्याचक्षणी आपली गुरुभक्ती थांबली असे समजा. या कठोर मानदंडावर आपल्या गुरुभक्तीचा निकष लावला की कळेल की आपली गुरुभक्ती आणि ज्ञानी माणसाची गुरुभक्ती यात किती फरक आहे. जो साधक सहज-समाधीत स्थित राहून आपले आयुष्य निरंतर सद्‍गुरुंच्या सेवेत गुजारत आहे त्याच्या गुरुभक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली साधना चालू ठेवणे श्रेयस्कर आहे.

 

॥ हरि ॐ ॥

Advertisements

One Response to Shloka7/13: Signs of Knower6-Gurubhakti

 1. Vikrant म्हणतो आहे:

  hats off to you sir !!!
  I have read your selected blogs on “Bhavtarang” & “echoes of mind”.
  Felt like finding a treausre…….
  The pure spiritual thoughts you are spreading are of great benefit to readign community…
  “Sadguru madhavnatahy namah”… who is this Maharaj? Does he belongs to Nath Sampraday??

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: