Shloka7/13: Signs of Knower7-Shucitv

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ७

 

आपण जेव्हा समाज, व्यावहारिक जग असे शब्द उच्चारतो तेव्हा आपल्याला अभिप्रेत हे सर्व विश्व असले तरी आपली विचारपध्दती फक्‍त स्वतःच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्‍तींवर वा आपल्यासमोर आलेल्या घटनांवर आधारित असते. उदाहरणार्थ, एखाद्याला नोकरीत वरीष्ठांबद्दल कटु अनुभव आला की सर्व वरीष्ठांबद्दल त्याचे मत कडवट होते. आपली आई खूप प्रेमळ, सहनशील आणि शांत असली की आपल्या आई ह्या शब्दाच्या प्रतिमेत हे गुण सामाविष्ट होतात. परंतु आपली विचारसरणी एवढी सापेक्ष, व्यक्तिगत, असूनही आपण असे मानतो की या जगातील शाश्वत सत्य आपण सांगत आहोत. एखाद्या गृहस्थाचे व्यक्तिगत अनुभव भिन्न असले तरी आपले तत्वज्ञान त्याला उपयुक्त आहे की नाही याबद्दल कधीही आपण शंका काढत नाही. आदिवासी जमातीत वा पाश्चात्य समाजात शारिरिक संबंधांना फारसे महत्व दिले जात नाही तेव्हा तेथील स्त्री-पुरुषांचा याबाबतीत संपूर्ण वेगळा दृष्टीकोण असेल हे माहित असूनही आपण त्यांच्या चारीत्र्याबद्दल शंका घ्यायला कचरत नाही. आपले नैतिक नियम आपण सर्व जगाला लागू करतो आणि त्यांचा चष्मा डोळ्यावर ठेवूनच जगाकडे बघतो. सर्वसाधारण तत्ववेत्याची परिस्थिती अशी असते. या पार्श्वभूमीवर भगवद्गीता आणि श्रीज्ञानेश्वरी बघितली की या अवगुणांचा संपूर्ण अभाव आपणास जाणवितो. वेदांताचे महत्व हजारो वर्षांनतरही कमी झाले नाही यावे कारण म्हणजे ते निर्विवाद सत्याचा पुरस्कार करीत आहेत हे आहे. मूळ वेदातील पर्जन्ययागादी क्रियांचे महत्व कालानुसार कमी झाले असले तरी उपनिषदांचे सार अजूनही आपणाकरीता तितकेच उपयुक्त आहे. सत्य हे नित्यनूतन असल्याने कालातीत असते. आपली विचारसरणी असत्य आहे हे जर पटवून घ्यायचे असेल तर काळाचा आपल्या विचारपध्दतीवर परिणाम होत आहे का हे पहा. तुमच्या लक्षात येईल की आत्ता महत्वाचे मानलेले तुमचे सर्व विचार काही काळापूर्वी महत्वाचे नव्हते. जी गोष्ट काळानुसार बदलते ती मायावी आहे कारण तीचे रुप क्षणोक्षणी बदलत आहे. आपला देह आणि मन, एव्हढेच नव्हे तर आपले तत्वज्ञान, आपल्या धार्मिक रिती हे सर्व सर्व काळानुसार बदलत आहे आणि म्हणूनच असत्‌ आहे. आणि ह्यांच्या आधारावर उभ्या असलेल्या सर्व गोष्टी (म्हणजे आपले सर्व जीवन!) मायावी आहेत, निरर्थक आहेत. अशा नित्य बदलणाऱ्या मायावी जगाच्या प्रवाहात असहाय्यपणे वहात जात असताना जो आधार आपण पकडायला जातो तोसुध्दा प्रवाहीतच असतो! त्यामुळे आपणास व्यवहारात बुडण्यावाचून पर्याय नाही असे मनावर बिंबायला लागते. या हताश परिस्थितीतच शरणागति उत्पन्न होते आणि मग भगवंत ज्ञानी माणसाच्या सत्संगाद्वारे आपणास आधाराचा हात देतात! हे ज्ञानी मनुष्य कुठून निर्माण झाले? ज्याप्रमाणे भगवान शंकरांमध्ये स्वर्गाहून आवेगाने येणाऱ्या गंगेचा प्रवाह झेलायची शक्ती होती त्याचप्रमाणे स्वयंभू ज्ञान प्रगट झाल्यावर त्याला झेलायची ताकद ज्याच्यात असते त्याच्यात सत्याचे ज्ञान उद्भवते. ज्याप्रमाणे जमिनीतील सुप्त पाण्याचा प्रभाव विहीर खणल्यावर प्रगट होतो (खणण्याच्या क्रियेने आपण ते पाणी निर्माण केलेले नसते!) त्याचप्रमाणे मन स्वच्छ, पूर्वग्रहविरहीत झाल्यावर ज्ञान प्रगट होते व तो साधक ज्ञानी होतो. अशा ज्ञानी माणसाच्या लक्षणांचा अभ्यास करुन आपण स्वतःला काळनदीच्या प्रवाहात एक शाश्वत आधार प्राप्त करुन घेऊ शकतो. म्हणूनच गीतेच्या बहुतांशी अध्यायात साधनेची पराकोटी करुन ज्ञान प्राप्त करुन घेतलेल्या साधकांच्या गुणांचे वर्णन केले आहे. चला आपण आपले बुडते चैतन्य तारावयाचा प्रयत्‍न करु.

७. शुचित्व

कालानुसार बदलणाऱ्या बाह्य जगाकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन स्वतःच्या ह्रुदयात अहर्निश स्फुरणाऱ्या ‘मी आहे’ या भावनेकडे सतत लक्ष ठेवणे म्हणजे शुचित्व होय. एखाद्या श्वानाच्या मुखातून पडलेली अस्वच्छ वस्तू टाळण्यात आपण शुचित्व मानतो त्याचप्रमाणे आपल्यासमोर प्रसूत झालेल्या सर्व व्यक्‍ती वा घटना काळाच्या मुखात पडलेल्या आहेत म्हणून अस्वच्छ आहेत ही भावना जागृत ठेवणे म्हणजे शुचित्व. स्वतःच्या देहाला आणि मनालाही ही गोष्ट लागू होत असल्याने आपण स्वतःच्या देह-मनाच्या संकुलापासूनही अलिप्त व्हायला हवे. स्वतःच्या सच्चिदानंदरुपी अस्तित्वात मुरुन राहण्यात जीवनाचे सर्वस्व आहे हे जेव्हा आपणास संपूर्णपणे, निःसंदेह पटते तेव्हा आपणास शुचित्व प्राप्त झाले असे म्हणण्यास हरकत नाही. माउलींच्या शब्दात सांगायचे म्हणजे:

म्हणोनि सद्भाव जीवगत । बाहेरि दिसती फांकत ।

ते स्फटिकगृहीचे डोलत । दीप जैसे ॥ ४७५:१३ ॥

विकल्प जेणे जेणे उपजे । नाथिली विकृति निपजे ।

अप्रवृत्तीची बीजे । अंकुर घेती ॥ ४७६:१३ ॥

ते आइके देखे अथवा भेटे । परि मनी काहीची नुमटे ।

मेघरंगे न कांटे । व्योम जैसे ॥ ४७७:१३ ॥

पाणिये हिरा न भिजे । आधणी हरळु शिजे ।

तैसी विकल्पजाते न लिंपिजे । मनोवृत्ती ॥ ४८२:१३ ॥

तया नांव शुचित्वपण । पार्था गा संपूर्ण ।

हे देखसी तेथे जाण । ज्ञान आहे ॥ ४८३:१३ ॥

बाह्यदेहाचे शुचित्व अंतर्गत ज्ञानावर उभारलेले नसेल तर केवळ दंभ आहे. प.पू. दादासाहेबांच्या सुगंधवेडाचे, बाह्य शुचित्वाचे अनुकरण त्यांच्या अंतर्गत स्थिरतेचे अवलोकन केल्याशिवाय करणे म्हणजे साधनेचा मार्ग नव्हे. याउलट त्यांच्याप्रमाणेच आपले मनसुध्दा स्वतःच्या निर्गुण रुपाकडे लावण्याच्या प्रयासात जरी स्वतःची देहशुध्दी राहीली तरी ते शुचित्वच होय.

॥ हरि ॐ ॥

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

One thought on “Shloka7/13: Signs of Knower7-Shucitv”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s