Shloka7/13: Signs of Knower8-Sthirata

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ८

 

साधकावर दुःखाची झळ येणे ही परमार्थामध्ये अतिशय उपयुक्त घटना आहे. याचे कारण असे की स्वतःवरच्या क्षुल्लक संकटाने मनुष्याला जी जाग येते ती दुसऱ्यांवर कोसळलेल्या महाभयानक आपत्तींनीही येत नाही. हे सत्य संस्कृतमधील ‘परदुःख शीतलम्‌’ या यथार्थ म्हणीत फार सुंदररीत्या व्यक्त केले आहे. आणि शारिरिक संकंटांपेक्षा मानसिक आपदा साधकास अत्यावश्यक आहेत. भगवंताच्या वसतिस्थानाशी जाऊन स्थिर होण्यात शरिराच्या ओढीपेक्षा मानसिक हव्यास प्रतिबंध करीत असतात. शरीराचा काय हट्‍ट असतो? वेळच्यावेळी साधे अन्न पोटात गेले तर ते कधीही आपणास त्रास देणार नाही. त्याच्या इतक्या मामुली गरजांकडेसुध्दा आपल्या दुर्लक्ष करण्यामुळेच आपल्यामागे असंख्या व्याधी लागतात. आणि हे दुर्लक्ष आपण केवळ आपल्या मनाचे चोचले पुरविण्याच्या नादात करतो. लक्षात घ्या की भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाला शारिरिक व्याधी झाली नाही तर मानसिक विषाद झाला आणि त्या त्रासाचे निरसन झाले ते गीतामृत प्राशन करुनच! म्हणून साधकाने आपल्यावर आलेल्या सर्व आपदांकडे साधनेमध्ये साधनेत प्रगती करण्याची संधी अशा सकारात्मक नजरेने पहायला हवे. आम्ही एव्हढी साधना करुनही आमच्यामागे या नसत्या कटकटी कशा लागल्या या भूमिकेमुळे आपण त्या आपदा येण्यामागील भगवंताच्या उद्देश्याकडे दुर्लक्ष करीत आहोत हे लक्षात घेतले तरी पुरेसे आहे. या सात्विक दृष्टीकोणाची परमावधी म्हणजे संत जनाबाई होय. अंगावर आलेल्या संकंटांचे त्या चक्क स्वागत करायच्या आणि त्याबद्दल भगवंताचे धन्यवाद मानायच्या!

मानसिक संकंटांची दुसरी उपयुक्तता म्हणजे साधकाला आपल्या भगवंत भक्तीबद्दलचा विश्वास वाढणे होय. व्यवहारामध्येही आपल्या कौशल्याची खरी कसोटी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन ध्येय गाठण्यातच असते. घरच्या अडचणींमुळे फार अभ्यास न करीताही परिक्षेत उत्तम गुण मिळतात तेव्हा खरी हुशारी ध्यानात येते. त्याचप्रमाणे व्यवहारात सर्वगोष्टी अनुकूल असताना भगवंताचे स्मरण करणे चांगले असले तरी व्यावहारिक विवंचना पाठीशी असतानादेखील परमेश्वरावरचा विश्वास ढळू न देणे ही भक्तीची खरी कसोटी आहे. म्हणूनच भगवंताचे गुण गात, एका ठिकाणी तीन दिवसांपेक्षा जास्त काळ व्यतीत न करणारा संन्यासी म्हणजे भगवद्भक्तीची परिसीमा आहे असे म्हणतात. भगवंतप्राप्तीकरीता सर्व सुखाच्या त्याग करुन जाणूनबुजून स्वतःच्या अंगावर संकटे घेणे यापेक्षा भक्तीचे अजून ठोस उदाहरण दुसरे असू शकेल काय? अशा साधूंचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपण निदान स्वतः न बोलाविता आलेल्या संकंटांकडे तटस्थ नजरेने पहायला हवे. आणि साधकाला जर हा संयम जरुरी असेल तर ज्ञानी माणसात ह्या गुणाची परमावधी हवी. ह्या पैलूचे ज्ञानी माणसातील प्रतिबिंब कसे असेल याचा आपण विचार करु.

८. स्थिरता

 

मनाला शुचित्व प्राप्त झाले असल्याने स्वतःच्या सच्चिदानंद रुपाकडे सतत पहायची सवय ज्ञानी माणसाला लागली की परीक्षा घ्यायला भगवंत त्याच्यावर मानसिक विवंचनेंचे भूत सोडतो. विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास केला आहे की नाही याची जशी परिक्षा होते तशीच ही गोष्ट आहे. अशावेळी आपल्या मनाचे सद्भावावर ठेवलेले आसन न सोडणे म्हणजे स्थिरता होय. पद प्राप्त झाल्यावरच त्याची स्थिरता बघता येते. म्हणून जोपर्यंत साधकाला स्वतःच्या आनंदरुपी अस्तित्वाची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याची स्थिरता बघण्यात अर्थ नाही. शुचित्व प्राप्त झाल्यावर स्थैर्य हा गुण आहे की नाही हे बघायला हवे. ज्याप्रमाणे शाळेत परिक्षा वर्षाअखेरीस असते, सुरुवातीला नसते (कारण विद्यार्थ्याला विषय शिकविल्यानंतरच त्याची परिक्षा घेण्यात अर्थ आहे) तशी ही गोष्ट आहे. याचा एक अत्यंत महत्वाचा अर्थ आपल्या सर्वांच्या साधनेकरीता आहे. तो असा: जेव्हा आपल्यावर आपत्ती येतात तेव्हा सद्‌गुरुंच्या मते आपण त्यांना तोंड द्यायला तयार आहोत! हे संकट माझ्यावर आले याची जेव्हा जाणीव साधकाला होते तेव्हा त्याने अशी खात्री ठेवायला हवी की माझ्यात या संकटाला तोंड द्यायची पात्रता आहे म्हणूनच हे संकट माझ्यावर आले आहे. आलेल्या विवंचनेकडे सकारात्मक बघायचे असेल तर ही खात्री त्या भूमिकेचा पाया आहे. नेहमी लक्षात ठेवा की जर आपण प्रामाणिकपणे साधना करायचा प्रयत्‍न केला असेल तर आपल्यावर कोसळलेली सर्व संकटे सद्‌गुरुंनी स्वतः तयार केली आहेत आणि त्यांद्वारे आपली अध्यात्मिक प्रगतीच होणार आहे. स्थिरता या गुणाचे आपल्या आयुष्यातील साधनारुप हेच आहे. एकदा ही स्थिरता प्राप्त झाली की काय होइल ते बघा:

 

वाहुटळीचेनि बळे । पृथ्वी जैसी न ढळे ।

तैसा उपद्रव उमाळे । न लोटे जो ॥ ४९१:१३ ॥

दैन्यदुःखी न तपे । भयशोकी न कंपे ।

देहमृत्यु न वासिपे । पातिलेनि ॥ ४९२:१३ ॥

तैशा आल्या गेल्या उर्मी । नव्हे गजबज मनोधर्मी ।

किंबहुना धिरु क्षमी । कल्पांतीही ॥ ४९८:१३ ॥

पै स्थैर्य ऐसी भाष । बोलिजे जे सविशेष ।

ते हे दशा गा देख । देखणेया ॥ ४९९:१३ ॥

 

आपल्या समोर आलेल्या सर्व शुभाशुभ घटनांद्वारे प्रत्यक्ष भगवंत आपल्याशी संबंध राखून आहे ही भावना अहोरात्र जागृत ठेवून स्वतःमधील सद्भाव निरंतर नजरेसमोर ठेवणे म्हणजे मनाची स्थिरता होय.

॥ हरि ॐ ॥

Advertisements

One Response to Shloka7/13: Signs of Knower8-Sthirata

  1. Gayatri म्हणतो आहे:

    खूप छान लिहीलंय…inspiring!
    आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर स्थिरता म्हणजे to keep your cool.
    पण त्याच्या अर्थाचं स्पष्टीकरण तुम्ही खूप छान दिलंय, पटतं 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: