Shloka7/13: Signs of Knower9-Nigraha

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ९

 

सिंदबाद खलाश्याच्या एका प्रवासात तो अशा बेटावर जातो जिथे एका म्हाताऱ्या माणसाशिवाय दुसरे कोणी नसते. सिंदबादची दया भाकत तो वृध्द मनुष्य त्याला अशी विनंती करतो की मला स्वतःच्या खांद्यावर चढवून तू जवळ असलेल्या अमुक एका ठिकाणी घेऊन चल. गरीब म्हाताऱ्यावर एव्ह्ढेसे उपकार करण्यात काय हरकत आहे असे म्हणून सिंदबाद त्याला आपल्या खांद्यावर बसवितो आणि मग तो म्हातारा खाली उतरायलाच तयार होत नाही. महिनोंमहिने त्याच्या खांद्यावर बसून छळत रहातो. शेवटी सिंदबाद स्वतः मदिरा तयार करुन त्याला पाजतो आणि त्याच्या बेशुध्दावस्थेत स्वतःची सुटका करुन घेतो अशी कथा आहे. ही कथा अर्थातच संपूर्णपणे काल्पनिक आहे. परंतु जर त्या म्हाताऱ्याला आपल्या मनाच्या रुपात बघितले तर स्वतःची अवस्था सिंदबादपेक्षा निराळी आहे असे वाटत नाही. अगदी क्षुल्लक आणि योग्य वाटणाऱ्या मनाच्या मागण्या पूर्ण करण्यास आपण सुरु करतो आणि बघता-बघता मनाच्या आहारी जातो. आपले मन सांगते की आधी समाजात मान्यता मिळव, स्वतःपुरता पैसा-अडका जमव आणि मग भगवंताच्या नादाला लाग. तुझे एव्हढे आयुष्य अजून बाकी आहे, आत्तापासूनच साधना करायची काय गरज आहे? वरकरणी योग्य वाटणाऱ्या आणि सर्वमान्य असणाऱ्या ह्या सूचनांना आपण मान्यता देतो आणि साधना करणे थोडे पुढे ढकलतो. परंतु पैसा जमविणे, समाजात मान्यता मिळविणे, कुटुंबातील व्यक्तिंच्या मनात स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान निर्माण करणे या गोष्टींना एकदा आपण सुरुवात केली की अंत नसतो. आत्तापर्यंत किती संत होऊन गेले आहेत की त्यांनी सेवानिवृत्तीनंतरच साधना सुरु केली होती? इतिहासात जर असे उदाहरण नसेल तर आपण काय इतके जगावेगळे आहोत की आपणास भगवंतप्राप्ती सेवानिवृत्तीनंतर होईल. पण या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे असतो आपल्याकडे! मनाच्या निरनिराळ्या मागण्या, त्यांच्या पूर्ततेकरीता जे वर्तन करावे लागते त्याच्या अनुषंगाने येणारी सर्व बंधने यात आपण इतके गुरफटून गेलेलो असतो की विचार करायला फुरसतच नसते. ज्याप्रमाणे सिंदबादने म्हाताऱ्याला खांद्यावर ठेवूनच स्वतः मदिरा तयार केली. आणि ती म्हाताऱ्याला पाजून स्वतःची सुटका करुन घेतली, त्याचप्रमाणे आपण व्यवहारात राहूनच (सेवानिवृत्तीची वाट न बघता!) स्वतःच्या मनात भगवंतनामाबद्दल प्रेम उत्पन्न केले पाहिजे. त्या प्रेमाच्या धुंदीत आपले मन स्वतःच्या मागण्या आपोआप कमी करेल आणि आपणास स्वातंत्र्य प्राप्त होईल. स्वतःच्या जीवनात भगवंतप्रेमरुपी मादक द्रव्य निर्माण करायची प्रक्रिया कशी असेल हे बघायचे असेल तर ज्ञानी माणसाच्या निग्रहाकडे बघा.

 

९. अंतःकरण निग्रह

 

दैनंदिन जीवनात आपली कर्तव्ये आणि आपल्या इच्छा यांमधील फरक लक्षात घेऊन स्वतःच्या इच्छांना फोफावू न देणे म्हणजे अंतःकरण निग्रह होय. आणि ह्या निग्रहाचे कारण भगवंताच्या सान्निध्याबद्दलची आतुरता असणे म्हणजे या निग्रहाचा सार्थ उपयोग करणे होय. या दोन्ही गोष्टी भगवंतनामाच्या प्रेमाची जागृती करण्यासाठी आवश्यक आहेत. असे बघा, पूर्वी एकत्र कुटुंबात शांतता रहावी, सामंजस्य असावे या भावनेने कितीतरी गृहीणी स्वतःच्या मनाला मारुन कर्तव्यांचे पालन करायच्या. तेव्हा त्यांच्या मनात अंतःकरण निग्रह जागृत होताच. पण त्या निग्रहाचे ध्येय दुसरे असल्याने आयुष्याच्या अंतःकाळी त्यांची आणि भगवंताची भेट व्हायचीच असे दिसून येत नव्हते. म्हणून आपल्यापैकी अनेक साधकांमध्ये हा निग्रह उपजत असेल. स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करणे अनेकांना जमत असेल. पण ह्या दैवी संपत्तीचा सदुपयोग करणे अत्यावश्यक आहे. हाती हजारो रुपये आले आणि ते व्यसनांवर दवडले तर काय फळ मिळणार? स्वतःच्या अंतःकरण निग्रहाचा उपयोग केवळ स्वतःच्या घरात शांतता रहावी याकरीता केला तर तुम्ही सोडून घरातील सर्व माणसांचे जीवन सुसह्य होईल आणि तुमचे जीवन शेवटपर्यंत आहे तसेच राहील! याचा अर्थ असा नव्हे की घरातील शांततेकरीता कुणी त्याग करु नये. परंतु त्यागाचे अंतिम ध्येय कुटुंबाचे सुख ठेवू नये हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज निव्वळ निग्रह करा एव्हढेच सांगत नाहीत तर तो निग्रह करण्यामागे हेतु काय असावा हेही सांगत आहेत.

 

एकलौतिया बालका- । वरि पडौनि ठाके अंबिका ।

मधुविषी मधुमक्षिका । लोभिणी जैसी ॥ ५०२:१३ ॥

अर्जुना जो यापरी । अंतःकरण जतन करी ।

नेदी उभे ठाको द्वारी । इंद्रियांच्या ॥ ५०३:१३ ॥

म्हणे काम बागुल ऐकेल । हे आशा सियारी देखेल ।

तरी जीवा टेकैल । म्हणोनि बिहे ॥ ५०४:१३ ॥

मनाच्या महाद्वारी । प्रत्याहाराचिया ठाणांतरी ।

जो यमदम शरीरीं । जागवी उभे ॥ ५०७:१३ ॥

समाधीचे शेजेपासी । बांधोनि घाली ध्यानेसी ।

चित्त चैतन्यसमरसी । आंतु रते ॥ ५०९:१३ ॥

अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हे जाणिजो ।

हा आथी तेथ विजयो । ज्ञानाचा पै ॥ ५१०:१३ ॥

 

तेव्हा माझा स्वतःच्या मनावर खूप ताबा आहे यावरुन आपण अंतःकरण निग्रह प्राप्त केला असे मानू नये. अंतःकरणनिग्रहाची ही प्रथम पायरी आहे. याशिवाय मनावरच्या ताब्याचा योग्य विनियोग करणे, खऱ्या पुरुषार्थाकरीता करणे अत्यावश्यक आहे. हे आपण केले नाही तर हाती असलेल्या दैवी संपत्तीचा दुरुपयोगच आपल्याहातून होत आहे असे म्हटले पाहिजे.

 

॥ हरि ॐ ॥

Advertisements

One Response to Shloka7/13: Signs of Knower9-Nigraha

  1. Harshad म्हणतो आहे:

    I read you blog regulerly and they are so useful for mumukshus. But this entry needs more explaination on shlokas you written at the end.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: