Shloka8/13: Signs of Knower10-VishayVairagya

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १०

 

विषयांनी प्राप्त केलेले सुख आणि साधनेतील आनंद यांमध्ये तत्वतः काहीही फरक नाही. जो आनंद भुकेल्या पोटी मनपसंद भोजन केल्यावर मिळतो त्याच्यात आणि ध्यान सुंदर झाल्यावर समाधानात काय फरक आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला तर काय उत्तर द्याल? आपल्या मनात साधनेविषयी अत्यादर असल्याने कदाचित आपण असे म्हणू की फरक आहे पण तो शब्दात सांगण्यासारखा नाही. परंतु नंतर खोल विचार केला तरी तुम्हाला तुमच्या ‘या दोहींत फरक आहे’ या भूमिकेवरच्या विश्वासाशिवाय दुसरे कुठलेही कारण सांगता येणार नाही. खरी गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनात आनंदाचे एकच भांडार आहे. विषयांच्या उपभोगाने त्याच भांडाराची किल्ली मिळते आणि साधनेद्वारे तेच भांडार आपण फोडतो. ते भांडार म्हणजे आपले सच्चिदानंदरुपी अस्तित्व होय. या जगातील ब्रह्मदेवापासून दुर्वेच्या अंकुरामध्ये हे भांडार भरलेले आहे. कारण आनंद केवळ पशु-पक्ष्यांनाच होतो असे नाही तर वृक्ष-वेलींनाही होतो हे शास्त्रज्ञांनी सिध्द केले आहे. आनंद हा काही एका दुकानातून वा खाणीतून मिळत नाही. मग तो येतो तरी कुठून? आणि जसा सूर्य उगविताना हळूहळू दिसतो तसा आनंद येताना दिसत तर नाही! तो आल्यावरच जाणवितो की आला. आणि दरवेळी तो तेव्हढाच पूर्ण असतो. आनंदाचे वेगवेगळ्या वेळेचे भिन्नत्व त्याच्या पूर्ण-अपूर्णतेमध्ये नसते तर तो आनंद किती काळ टिकतो यावर असते. काही वेळा क्षणिक टिकणारा आनंद कधी-कधी महिनोंमहिने आपल्याजवळ राहतो. उदाहरणार्थ, विवाहानंतर बऱ्याच काळाने दंपतीला अपत्य झाले तर त्यामुळे झालेला आनंद त्या बाळाने काहीतरी विचित्र ‘कर्तृत्व’ करेपर्यंत राहतो! तेव्हा आनंद वेगळा नसतो. वेगवेगळ्या आनंदाचे भिन्नत्व आहे ते त्याच्या अस्तित्वकाळामध्येच. तुमच्या लक्षात येईल की सुंदर ध्यान झाले की झालेले समाधान दिवसभर राहते आणि पोटभर जेवण झाल्याचे समाधान चार तासानी परत भूक लागेपर्यंतच अस्तित्वात असते. चराचरात भरून असलेल्या ह्या एकाकी स्वयंभू आनंदावर या जगातील सर्वांचा अधिकार आहे. प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार तो आनंद उपभोगतो आणि तो झाला आहे हे दर्शवितो. मोगऱ्याच्या वेलाला झालेला आनंद मोहरलेल्या कळ्यांच्या रुपात दिसतो आणि श्रीमंत माणसाला झालेला आनंद त्याच्या देणगी देण्यातून दिसतो. परंतु या सर्व क्रियांचे मूळ जो आनंद आहे तो एकच आहे आणि तो आपल्यामध्येच सामाविलेला आहे यात संदेह नाही.

असे जर असेल तर विषयांच्या भोगातून मिळणारे सुख का त्याज्य आहे? मादक द्रव्यांचे प्राशन करणे आपणास अमान्य ज्या कारणाने आहे त्याच कारणाने विषयसुख त्याज्य आहे. सिगारेट पिण्याने फुफ्फुसाला कायमचा अपाय होतो आणि त्यामुळे आपली उमेद नष्ट होते हे जेव्हा आपणास कळते तेव्हा त्या सवयीचा त्याग करणे योग्य आहे हे कळते. त्याचप्रमाणे समाजातील प्रतिष्ठा वाढविणे, आपल्या पत्नीच्या सहवासाची जिवापाड ओढ असणे इत्यादी समाजमान्य सवयींमुळे आपल्या मनाला आणि बुध्दीला कायमची इजा होत आहे हे आपण बघितले पाहिजे. शरीराचे आणि मनाचे चोचले पुरविणे अयोग्य आहे कारण त्यामुळे मिळणारा आनंद पुढे दुःख देत असतो. कडवट विषाला मधात बुचकळून गोड करुन प्राशन केले तरी त्यामुळे नंतर येणारे मरण चुकणार आहे का? माउलींच्या भाषेत सांगायचे म्हणजे:

 

कां गोरीचिया भुली । मृग व्याधा दिठी न घाली ।

गळु न पाहता गिळिली । उंडी मीने ॥ ७३९:१३ ॥

 

म्हणून आपण विषयसुखापासून, समाजमान्यतेपासून दूर रहायचे मनाला शिकवले पाहिजे. विषयांतून मिळणारा आनंद चुकीचा नाही, तो आनंद भोगण्याचे दुष्परिणाम भयानक आहेत. ज्ञानी माणसाला याची पूर्ण जाणीव असल्याने त्याच्या मनात विषयभोगांबद्दल अनासक्ती ठासून भरलेली असते.

 

१०. विषयवैराग्य

 

प्रारब्धानुसार येणारे सर्व भोग उपभोगताना त्यांच्या सातत्याची अपेक्षा न बाळगणे म्हणजे विषय-वैराग्य होय. विषयंपासून वैराग्य हवे असेल तर त्यांच्यापासून दूर पळून जाण्यात काही अर्थ नाही. त्यांच्या नजरेला नजर भिडवून त्यांना नामोहरम करणे खरे वैराग्य आहे. मी शरीराचे भोग भोगणारच नाही या आग्रहातून वैराग्य दिसत नाही तर भय प्रगट होते हे लक्षात घ्या. कुठलेही सुख समोर आल्यावर त्याला दूर न सारता त्यातील फोलपणा दिसून येणे हे महत्वाचे आहे. ज्याला चमचमीत भोजनाबद्दल अतिप्रीती आहे त्याने आपले भोजन न बदलता आहार माफक ठेवला पाहिजे. कितीही मनपसंद पक्वान्ने समोर आली तरी पोटात थोडी भूक ठेवून भोजन संपविण्याचा संयम ज्यात आहे त्याने भोजनसुखापासून वैराग्य मिळविले आहे हे ध्यानात घ्या. जर रोचक आहार न खाण्यात वैराग्य असते तर भिक्षा मागणाऱ्या सर्वांना आपण वैरागीच म्हटले पाहिजे! एखाद्या गोष्टीबद्दलचे वैराग्य आणि त्या गोष्टीशी संबंध न ठेवणे या दोन भिन्न घटना आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी कधीही अयाचित आलेल्या सुखाला लाथ मारा असे सांगितलेले नाही तर सुखामागे धावू नका असे सांगितले आहे. विषयांनी मिळणारे सुख अशाश्वत आहे याची जाणीव करुन घ्या आणि खरे शाश्वत सुख आपण मिळवू शकतो यावर विश्वास ठेवा. मग काय होईल?

 

वमिलेया अन्ना । लाळ न घोटी जेवी रसना ।

आंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ॥ ५१३:१३ ॥

धडाडीत लोहरसी । उडी न घालवे जैशी ।

न करवे उशी । अजगराची ॥ ५१५:१३ ॥

अर्जुना तेणे पाडे । जया विषयवार्ता नावडे ।

नेदी इंद्रियाचेनि तोंडे । काहींच जावो ॥ ५१६:१३ ॥

स्वर्गाते मानसे । ऐकोनि मानी ऐसे ।

कुहिले पिशित जैसे । श्वानाचे का ॥ ५२१:१३ ॥

ते हे विषयवैराग्य । जे आत्मलाभाचे भाग्य ।

येणे ब्रह्मानंदा योग्य । जीव होती ॥ ५२२:१३ ॥

 

विषयसुखाचे दुष्परिणाम मनावर बिंबवून त्यांच्या मागे जाण्याच्या आपल्या मनाच्या नैसर्गिक ओढीला ‘सहज’ लगाम जेव्हा लागतो तेव्हा आपणास विषयवैराग्य प्राप्त झाले आहे असे आपण मानू शकतो. मनावर जबरदस्ती करुन त्याला विषयांपासून दूर ठेवण्यातील वैराग्य अध्यात्मात अभिप्रेत नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.

 

॥ हरि ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: