Shloka8/13: Signs of Knower11-Nirahankar

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ११

 

भगवंतप्राप्तीच्या साधनेमध्ये आपण गुंगून या जगाला संपूर्णतः विसरुन जरी गेलो तरी या जगातील अनेक शक्तींशी आपणास सामना करावाच लागतो. मी कुणाचे अहित चिंतित नाही त्यामुळे हे जगही आपणास त्रास देणार नाही असे मानणे वस्तुस्थितीस धरुन नाही. या जगातील दुष्प्रवृत्तींचा जो नैसर्गिक गुण आहे तो त्यांना साधकांना कष्ट देण्यास भाग पाडतो. पूर्वी जंगलातल्या ऋषींना राक्षस कसे त्रास द्यायचे तशी ही गोष्ट आहे. ही या जगाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. हे असे का होते अशी तक्रार न करीता आपणास त्यांना सामोरे जायला हवे. म्हणूनच सर्व संतांच्या जीवनात त्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले होते हे दिसून येते. संतांवर आलेल्या आपत्तींपैकी काही त्यांच्या पूर्वकर्माचे फळ असतात, काही सद्‍गुरुंनी परीक्षा घेण्याकरीता वा एखादा धडा शिकविण्याकरीता समोर आणलेल्या असतात आणि काही दुसऱ्यांचे भोग कमी व्हावे याकरीता त्यांनी आपणहून ओढवून आणलेल्या असतात. परंतु संतपदावर न पोहोचलेल्या साधकावर अजूनही एका प्रकारची संकटे येत असतात. ती म्हणजे त्याच्या सध्याच्या वर्तनाचे परिणाम. संतांसारखे आपले मन संसारातून पूर्णपणे काढून न घेतल्याने त्याच्या दुष्परिणामांनाही त्याला तोंड द्यावे लागते. साधकाने आपल्या प्रगतीसाठी अशा आपत्तींना जीवनातून काढून टाकणे किंवा त्यांना निष्प्रभ करुन टाकणे अत्यंत जरुरी आहे. आपली शक्ती अत्यंत मर्यादीत असल्याने जेव्हढ्या कमी अडथळ्यांशी सामना करावा लागेल तेव्हढे बरे ही भावना सतत जागृत ठेवून आपणहून कुकर्मे करण्याचे साधकाने थांबविले पाहिजे आणि सत्कर्मांत रत व्हायला हवे. ज्ञानी माणसालाही या गोष्टीची पूर्ण जाणीव असल्याने तो स्वतःहून साधनेला प्रतिकूल असलेल्या कर्माचा प्रारंभच करीत नाही. साधनेला घातक असलेल्या जगातील सर्व शक्तींपासून सुटका हवी असेल तर आपले वर्तन कसे हवे हे आपण पाहू.

 

११. निरहंकार

 

स्वतःला एका देहाच्या रुपात मानून, एका नामाने पुकारुन, एका कुटुंबाचा भाग मानून आपण वावरतो तेव्हा आपला अहंकार जागृत होतो. आपल्या देह-मनाच्या युतीमुळे निर्माण झालेल्या क्रियांकडे इतरांकडे जसे पहातो तसेच तटस्थपणे पाहू शकणे म्हणजे मनात निरहंकार जागृत होणे होय. संसारातील सर्व कुकर्मांचे मूळ म्हणजे आपला हा अहंकार होय. ज्याप्रमाणे मूळ काढून टाकल्यावर वृक्षाचा नाश आपोआप होतो त्याचप्रमाणे निरहंकारता प्राप्त झाली की संसारातील सर्व शक्तींपासून सुटका होते, साधनेमध्ये सदासर्वकाळ मग्न होता येते. पसायदानातील “किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनि तिहीं लोकी, भजिजो आदिपुरुखी, अखंडित” या ओवीतून माउलींनी आपल्याकरीता हेच मागणे भगवंताकडे मागितले आहे हे ध्यानात घ्या. तेव्हा निरहंकारता प्राप्त करणे अपरिहार्य आहे. त्याशिवाय साधना करणे म्हणजे हात बांधून समुद्र पोहून जाण्यासारखे व्यर्थ कष्ट आहेत. स्वतःच्या अहंकाराला काबूत आणण्यासाठी प्रथम साधकाने दैनंदिन जीवनामध्ये कर्मांचा आरंभ करीत असताना हे कर्म मी का सुरु केले आहे याचा आढावा घ्यायला सुरुवात केली पाहिजे. कुठली कर्मे आपण स्वतःसाठी करीत आहोत याची एक यादी त्याने तयार केली पाहिजे. मग त्या यादीतील कर्मे करु नयेत असे नाही! यादी तयार करणे एव्हढेच पुरेसे आहे. स्वतःहून आपली कर्मे थांबविणेही अहंकारालाच पुष्टी देते हे लक्षात घ्या!! आपणास फक्त आपली कुठली कर्मे आपल्या देह-मनाचे चोचले पुरविण्याकरीता आहेत हे बघायची सवय लावायची आहे. म्हणजेच, स्वतःच्या बाह्य वर्तनात फरक घडवून आणावयाचा नाही तर बघण्याच्या दृष्टीकोणात परिवर्तन घडवायचे आहे. ही अत्यंत सूक्ष्म क्रिया आहे. स्वतःचा प्रामाणिकपणा इथे अत्यावश्यक आहे. आपला अहंकार कुठली कर्मे करण्यास आपणास भाग पाडीत आहे हे एकदा दिसायला लागले की सद्‌गुरु पुढे येतात आणि योग्य दिशा दाखवितात. निरहंकाराचे प्रमाण आपली कर्मे कमी होण्यात नाही तर सद्‌गुरु पुढे येण्यात आहे ही गोष्ट मनावर बिंबवा!! आपला अहंकार कमी झाला आहे हे सत्य कुठल्यातरी दृष्य घटनेतून बघायचा प्रयत्न करु नका. अहंकार कमी झाला की कर्मे बदलत नाहीत तर कर्ता बदलतो. तुमची सर्व कर्मे सद्‌गुरु करीत आहेत आणि आपण जगासमोर एका नटासारखे कर्मे केल्याचे निव्वळ सोंग करीत आहोत ही परिस्थिती तुम्हाला स्वसंवेदनांनी जाणविणे म्हणजे निरहंकार प्राप्त होणे होय. मग साधकाची जी अवस्था होते तीचे वर्णन म्हणजे:

 

आणि सचाडाचिये परी । इष्टापूर्ते करी ।

परी केलेपण शरीरी । वसो नेदी ॥ ५२४:१३ ॥

वर्णाश्रमपोषके । कर्मे नित्यनैमित्तिके ।

तयांमाजी काही न ठके । आचरतां ॥ ५२५:१३ ॥

परि हे मिया केले । की हे माझेनि झाले ।

ऐसे नाही ठेविले । वासनेमाजी ॥ ५२६:१३ ॥

संबंधेविण जैसी । अभ्रे असती आकाशी ।

देही कर्मे तैसी । जयासि गा ॥ ५३०:१३ ॥

तया पाडे देही । जया मी आहे हे सेचि नाही ।

निरहंकारता पाही । तया नांव ॥ ५३३:१३ ॥

 

साधकाने माझा अहंकार नष्ट झाला आहे हे कुणाला पटवून देण्याच्या फंदात पडू नये. स्वतःची सर्व कर्मे नाथांघरच्या श्रीखंड्यासारखी सद्‌गुरु स्वतः करीत आहेत या जाणीवेत धन्य झाल्यावर आणखी काय हवे?! निरहंकारामध्ये ह्या अवीट सुखाची आणि सद्‌गुरुंबद्दलच्या अपार कृतज्ञतेची गुरुकिल्ली आहे.

 

॥ हरि ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: