Shloka8/13: Signs of Knower12-DehadoshDarshan

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १२

 

अठराव्या अध्यायात भगवंतांनी कर्माचा प्रारंभ कसा होतो याची पाच कारणे आणि का होतो याची पाच कारणे सांगितली आहेत (पहा: अध्याय १८,श्लोक १४ आणि १५). मानवाचे शरीर हे या दोन्ही पंचकांच्या प्रथम स्थानी आहे! आपला देह आहे याची जी शाश्वत जाणीव आपणास आहे त्याच्या अधिष्ठानावर आणि शरीरसौख्यप्राप्तीच्या हेतूने कर्म उभारते असे भगवंतांनी सांगितले आहे. खरे म्हणजे आपला देह एक निर्जीव वस्तू आहे. परंतु देहाद्वारेच आपण विषयभोग घेऊ शकतो हेही तितकेच खरे आहे. सहवासाने प्रेम वृध्दींगत होते असा आपल्या मनाचा स्वभाव असल्याने आपणास विषयसुख देणाऱ्या स्वतःच्या देहाबद्दल त्यास अतीव आत्मियता आहे. आणि प्रेमळ आई ज्याप्रमाणे आपल्या लाडक्या लेकावरचे प्रेम दर्शविण्यासाठी त्याच्या आवडीची पाकक्रिया करते त्याचप्रमाणे आपल्या देहाचे लाड करण्यासाठी कर्मे करण्यास आपण उद्युक्त होतो. परंतु प्रेमळ आईसुध्दा आपल्या लाडक्या लेकाचे घराबाहेरील ‘प्रताप’ ऐकून त्यास शिस्त लावण्यास कठोर होते त्याचप्रमाणे आपणास सध्या अतिप्रिय देहाला शिस्त शिकवायची असेल, साधनेला अनुकूल करुन घ्यायचे असेल तर देहाच्या दोषांचे यथासांग दर्शन होणे जरुरी आहे. देहाला काबूत आणण्यासाठी उपयुक्‍त अशा शमदमादी उपायांचे महत्व नुसते बुध्दीला पटून साधकास उपयोग होत नाही. त्यांचा उपयोग करायलाच हवा अशी खात्री मनाला पटली पाहिजे. याकरीता आपल्या देहाच्या दोषांचे दर्शन होणे अत्यावश्यक आहे. भगवंताची प्राप्ती ही आपल्या आयुष्यातील एकमेव सकारात्मक गोष्ट आहे. आणि देहाच्या दोषांचे दर्शन ही नकारात्मक गोष्ट आहे. तेव्हा नकारात्मक गोष्टीने भगवंताची सकारात्मक प्राप्ती कशी होईल ही शंका या ठिकाणी काही सूज्ञ साधकांच्या मनात उद्भवू सकते. साळीचे बी पेरुन गहू मिळतील का असे त्यांना वाटते. या शंकेचे उत्तर असे की आपल्या सध्याच्या देहभरणरुपी सर्व क्रिया नकारात्मक आहेत. त्यांचे निराकरण करण्यास देहदोषदर्शनासारखी नकारात्मक क्रियाच हवी. मगच साधनेची सकारात्मक क्रिया खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात सुरु होईल. आपल्या मनाची देहाच्या पलिकडे जाण्यास पूर्ण तयारी होणे यासाठी आपल्या देहामुळे होणारे तोटे दिसलेच पाहिजेत. म्हणूनच साधकाच्या मनात स्वतःच्या देहाबद्दल प्रखर वैराग्य जागृत होणे ही साधनेमध्ये एक महत्वाची पायरी मानली जाते. भगवंतांनी ज्ञानी माणसाच्या लक्षणांमध्ये या जाणीवेला अंतर्भूत केले आहे यामागील कारण हेच आहे.

 

१२. देहदोष दर्शन

 

शरीराचे कोडकौतुक केल्याने पुढे दुःख वाढून ठेवले आहे ही जाणीव सतत जागृत असणे म्हणजे देहदोष दर्शन होय. परंतु स्वतःच्या देहाकडे पहायची ही नजर फार थोड्या साधकांजवळ दिसते. याचे कारण असे की आपणास तात्पुरत्या सुखामध्ये रमायची सवय लागली आहे. जोपर्यंत दुःख अंगावर आदळत नाही तोपर्यंत आपण स्वतःला सुखी मानतो. सिगारेट पिण्याच्या, पैसे जमविण्याच्या नादाचे दुष्परिणाम बौध्दिकरीत्या पटले तरी आपण स्वतःला या छंदांतून संपूर्णपणे अलिप्त करीत नाही. कारण जोपर्यंत पैसे मिळणे थांबत नाही, वा धूर सोडताना ठसका लागत नाही तोपर्यंत आनंद आहेच की. पुढच्या गोष्टीची काळजी आत्तापासून करण्यात काय अर्थ आहे? भगवंत आपल्या पाठीशी आहे, तो आपले संरक्षण करील या आधारात आपण स्वतःला फसवित असतो. तेव्हा एका पातळीवर देहदोषांचे दर्शन आपणा सर्वांस आहे. ज्ञानी माणसांच्या ज्ञानात आणि आपल्या जाणीवेत महत्वाचा फरक हा आहे की आपणास देहाचे दोष व्याधी आल्यावर जाणवितात आणि त्यांना निरोगी अवस्थेत दिसतात. ज्यांना अनित्यतेबद्दल तिटकारा आहे तेच देहाकडे तटस्थ नजरेने बघू शकतात. आपण सर्व सध्या वहात असलेल्या गंगेत हात धुवून घेणारी सर्वसामान्य माणसे आहोत. समोर गंगा वहात असताना स्वतः विहीर खणून मग हात धुवायचे कष्ट कोण करतो? सद्‌गुरु आपल्याबरोबर आहेत याची जाणीव झाली तरी स्वतःची साधना चालू ठेवणारे कितीजण असतात? तेव्हा देहदोषांचे दर्शन हा गुण आत्मसात करावयाचा असेल तर आधी अनित्य गोष्टींबद्दलचा अतीव तिटकारा मनात भिनला पाहिजे. मग आपला देह ‘माशी पांख पाखडी, तव हे सरे’ असा आहे हे तुम्हाला इतक्या प्रकर्षाने जाणवेल की देहाबद्दलचे सर्व ममत्व आपोआप निघून जाईल. म्हणूनच माउली म्हणत आहे:

 

आणि जन्ममृत्युदुःखे । व्याधिवार्धक्यकलुषे ।

इये आंगा न येता देखे । दुरुनि जो ॥ ५३५:१३ ॥

म्हणे आजिच्या अवसरी । पुष्टी जे शरीरी ।

ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥ ५५५:१३ ॥

पद्मदळेसी इसाळे । भांडताती जे हे डोळे ।

ते होती पडवळे । पिकली जैसी ॥ ५५९:१३ ॥

ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणी ।

देखे मग मनी । विटे जो गा ॥ ५७५:१३ ॥

म्हणोनि वृध्दाप्याचेनि आठवे । वृध्दाप्या जो नागवे ।

तयाच्या ठायी जाणावे । ज्ञान आहे ॥ ५८६:१३ ॥

 

स्वतःच्या देहममत्वाचे संपूर्ण निरसन करण्यास साधकाने तेराव्या अध्यायातील ५३५ ते ५९० ह्या ओव्या आणि आठव्या अध्यायातील पंधराव्या श्लोकावरील निरुपणाच्या ‘मग क्लेशतरुची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी । जे मृत्युकाकासी कुरोंडी । सांडिली आहे ॥ १४०:८ ॥’ इत्यादी ओव्या नित्यवाचनात ठेवाव्यात. मग श्री ज्ञानेश्वरमहाराजांच्या असीम दयामय कृपेमुळे साधकाच्या मनात देहाबद्दल वैराग्य उपजेल यात संदेह नाही!

 

॥ हरि ॐ ॥

One Response to Shloka8/13: Signs of Knower12-DehadoshDarshan

 1. Shriniwas Deshpande म्हणतो आहे:

  Shridhar,
  I have stared a new journey while on the path of VARI.
  I have been fortunate eneough to have company of people like you.
  I am not well versed in writing so as to communicate
  my thoughts in a good way,but I will try to let you know the difficulties in the attempt of understanding
  Dhnyneshwri.
  I will be regularly in touch with your litreture.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: