Shloka9/13: Signs of Knower13-Asakti

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १३

 

भगवद्गीतेमध्ये असे म्हटले आहे की भगवंतभक्ताच्या कुळात जन्म येणे हे परमभाग्याचे लक्षण आहे. श्रध्दाळू पालकांचा आदर्श पुढे ठेवून लहानपणापासूनच भक्तीचे धडे गिरवून साधनेला सुरुवात करणाऱ्या साधकांची ‘साधना’ या शब्दाची समज सर्वसाधारण साधकांच्या कल्पनेबाहेरची असते. जन्मापासूनच संतसहवास लाभल्याने त्यांना साधनेला हितकारक अशा अनेक गोष्टींचे ज्ञान सहजरीत्या झालेले असते. परंतु हे भाग्य लाभलेले श्रीसंत एकनाथांसारखे साधक विरळाच. आपण जेव्हा साधनेला सुरुवात करतो तेव्हा आपल्या कुटुंबात साधनेला वाहून घेतलेले आहे अशी आदर्श माणसे दिसत नाहीत. ‘अरे, संसार सांभाळूनच अध्यात्म करावयाचे असते’ असे आपणास वारंवार ऐकावे लागते. या उपदेशामध्ये आपणास काहीच चुकीचे दिसत नसल्याने आपली साधनेची व्याख्या ‘बाकीच्या गोष्टींमधून वेळ मिळेल तेव्हा करायची गोष्ट’ अशी होते यात नवल काय आहे? साधनेच्या प्रथमदशेत आपल्या मनात साधनेबद्दल ही भावना असणे नैसर्गिक आहे. परंतु एकेकाळी माझ्या मनाची ही ठेवण होती म्हणून ती आयुष्यभर जबरदस्तीकरुन तशीच स्थिर ठेवणे अनैसर्गिक आहे. निसर्गामध्ये कुठलीही वस्तू वा प्राणी एकाच अवस्थेत स्थिर रहात नाही मग का म्हणून आपण साधनेबद्दलच्या व्याख्येत निरंतर सातत्य ठेवावे? परंतु आपल्या लक्षात ही गोष्ट येतेच असे नाही. म्हणूनच आपण जेव्हा काही काळाने साधनेत अधिक काळ व्यतीत करावयास लागतो तेव्हा ‘कायरे, आजकाल साधना जरा जास्तच चालली आहे. संसारात काय कमी आहे म्हणून तू साधनेला वाहून घेत आहेस?’ अशी वाक्ये ऐकल्यावर आपण चपापतो. आपण भगवंताच्या नादात वहात तर चाललो नाही या कुशंकेने आपली वृध्दींगत होणारी साधना कुंठीत होते आणि पुढील प्रगतीचा मार्ग दिसेनासा होतो. भक्तकुळात जन्म न घेतलेल्या प्रत्येक साधकाच्या जीवनात ही अवस्था येतेच. साधकाच्या कुटुंबियांनी त्याला भगवंतभक्तीच्या प्रवाहात पूर्ण बुडून जायला आनंदाने परवानगी दिलेली आहे अशी उदाहरणे मिळणे दुर्लभ आहे. आपणा सर्वांना साधनेत एका ठराविक पातळीपेक्षा जास्त प्रगती हवी असेल, साधनेत क्वचितकाळी मिळणाऱ्या सुखापेक्षा शाश्वत आनंद हवा असेल तर ह्या अडथळ्यावर मात करणे अपरिहार्य आहे हे लक्षात घेणे जरुरी आहे. आपल्या पूर्वजन्मांत भगवंताला विसरुन संसारात रममाण झाल्यानंतर ह्याजन्मी साधना सुरु करीत असल्याने (ह्या वस्तुस्थितीचे प्रमाण आपला भक्तकुळात जन्म झालेला नाही हे आहे!) आपली परिक्षा भगवंत ह्या अडथळ्याद्वारे बघत आहे असा दृष्टीकोन आपण ठेवायला हवा. ह्या जन्मी साधकाच्या मनाची कितपत तयारी आहे हे बघण्यासाठी भगवंत आपल्यापुढे कुटुंबियांच्या आकर्षणाचे प्रलोभन ठेवीत आहे. जणू काही परमार्थाच्या मार्गाबाजूलाच मांडलेल्या गृहपुत्रदाराधनरुपी चित्रविचित्र दुकानांत गुंतून आपण मार्गाक्रमण करण्यापासून विचलीत होत आहे की नाही ह्याचे निरीक्षणच भगवंत करीत आहे!

 

१३. असक्ती

 

साधनेचे फळ भगवंतप्राप्ती वाचून दुसरे काही नाही याची पूर्ण जाणीव ठेवून साधना निरंतर चालू ठेवणे म्हणजे असक्ती होय. साधना करुन व्यवहारात फायदा होईल याची खात्री नसूनही जेव्हा आपण साधना चालू ठेवतो तेव्हाच व्यावहारिक जीवनापेक्षा साधनेला आपण जास्त महत्व दिले आहे हे सिध्द होते, संसाराबद्दलची असक्ती प्रगट होते. साधना करुनही घरी मान मिळत नाही, स्वकीय आपल्या भगवंतप्रेमाबद्दल अनास्था दाखवीत आहेत इत्यादी विपरीत घटनांकडे दुर्लक्ष करुन आपले मन साधनेवर केंद्रीत ठेवणे म्हणजे साधकाच्या जीवनातील असक्ती होय. स्वतःच्या लहान मुलाबरोबर खेळ खेळीत असताना आपण जिंकलो का हरलो याची पर्वा पालक करीत नाही कारण त्या खेळाबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते तर मुलाबरोबर वेळ घालविण्याबद्दल आस्था असते. त्याचप्रमाणे व्यवहारात वर्तन करीत असताना त्यातील क्रियांच्या फळाबद्दल निर्लोभी राहून हे जग या भगवंताची लीला आहे ह्या भावनेमध्ये गुंग राहून भगवंताबरोबर वेळ घालविण्यास मिळत आहे या आनंदात निरंतर बुडून जाणे म्हणजे असक्ती होय. सर्वसाधारणपणे आपल्या जीवनाचे ध्येय डोक्यावर छप्पर असावे, भूकेला पोटभर अन्न मिळावे आणि आपल्यावर प्रेम असलेल्या स्वकियांबरोबर काल व्यतीत करावा अशी असल्याने जगाबद्दलची आसक्ती दर्शविण्यास गृह, पुत्र, दारा आणि धन या शब्दांचा वापर करतात. श्री रामकृष्ण परमहंसांच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘कामिनीकांचन’ साधकाच्या अधोगतीचे मूळ आहेत. संपूर्ण संसाराबद्दलची असक्ती, अनास्था दर्शविण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज ह्याच प्रतिकांद्वारे म्हणत आहेत:

 

कां झाडाची साउली । वाटे जाता मीनली ।

घरांवरी तेतुली । आस्था नाही ॥ ५९४:१३ ॥

साउली सरिसीच असे । परि असे हे नेणिजे जैसे ।

स्त्रियेचे तैसे । लोलुप्य नाही ॥ ५९५:१३ ॥

आणि प्रजा जे जाली । तिये वस्ती कीर आली ।

कां गोरुवे बैसली । रुखातळी ॥ ५९६:१३ ॥

एऱ्हवी दारागृहपुत्री । नाही जया मैत्री ।

तो जाण पा धात्री । ज्ञानासि गा ॥ ५९९:१३ ॥

 

संसारातील अमुक गोष्टींची प्राप्ती व्हावी ह्या इच्छेचे समूळ उच्चाटन करुन केवळ साधनेकरीता साधना करीत रहाणे ही अवस्था म्हणजे साधकाच्या जीवनातील असक्तीचे प्रतिबिंब होय. जेव्हा संसारात आणि साधनेत परस्परविरोध निर्माण होतो तेव्हा प्रत्येकवेळी साधनेला प्राधान्य देऊन संसारात रहाणे म्हणजेच असक्ती. साधनेच्या ह्या मार्गावर पदाक्रमण करावयाचे असेल तर प्रथमतः सांसारीक कारणे देऊन साधना न करणे थांबवा. पुढील मार्ग दर्शविण्यास सद्‌गुरु समर्थपणे आपल्या पाठीशी आहेतच!

 

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: