Shloka9/13: Signs Of Knower14-Samatva

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १४

 

व्यावहारीक प्रसंगांना तोंड देताना आपण बुध्दी आणि अंतर्स्फूर्ती या दोन गोष्टींचा आधार घेत असतो. लहानपणी आपण मनात आलेल्या विचारांप्रमाणे वागत असतो त्यावेळी मनातील भावना योग्य आहेत की नाही याची परख करण्याचे सामर्थ्य आपल्या बुध्दीला नसते. परंतु जसे वय वाढत जाईल तसे अनुभवाने शहाण्या झालेल्या बुध्दीला धार येउन तीचे आपल्या जीवनात महत्व येऊ लागते आणि अचानक मनात आलेल्या स्फुरणेला दरवेळी बुध्दीने जोखून बघायची सवय आपणास लागते. याचा अतिरेक झाला की लोकांना एक ठाम निर्णय घ्यायला कठीण वाटू लागते. कुंपणावर बसून निर्णय आपोआप ठरण्याची वाट बघण्यात आपण स्वतःला शहाणे समजू लागतो! आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा साधनेमध्येही उमटत असल्याने निर्णय न घेता येण्याच्या सवयीचा दुष्परिणाम परमार्थातही होतोच. याचे एक उदाहरण म्हणजे, गुरुंशी भेट झाली आहे, मनाला प्रसन्न वाटत आहे आणि गुरुपरंपरेत सामील होण्यास मन उतावीळ आहे अशा परिस्थितीतही ‘काय माहिती, हे बरोबर आहे की नाही. कशाला नसत्या फंदात पडा’ असा विचार करुन स्वतःला आवर घालून आपले अपरिमित नुकसान करुन घेणारे साधक. सद्‌गुरुंशी भेट होणे हा योग जुळून येणे अतिशय दुर्लभ असल्याने ‘पुढच्या वेळी बघू’ असा विचार करुन हाताशी आलेला योग पुढे ढकलण्यापेक्षा अधिक तोटा साधकाच्या जीवनात नाही. अनुग्रह घेतलेल्या साधकांच्या जीवनातही ह्रुदयस्थ सद्‌गुरु अंतर्स्फूर्तीच्या रुपात सामोरे येत असल्याने स्वतःच्या मनातील स्फुरणावर संपूर्ण विश्वास न ठेवणे घातक होते. एका क्षणात मनात आलेल्या विचारांवर नजर टाकून योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे हा गुण केवळ व्यवहारातच नव्हे तर परमार्थातही अतिशय उपयुक्त आहे. ज्या भाग्यवान साधकांच्या मनात संदेहांचा कल्लोळ नसतो त्यांना अंतर्गत साधनेचा मार्ग स्पष्ट गोचर होतो. जसे तलावावर तरंग नसल्यावर तळ सहज दिसू लागतो तशी ही संदेहविरहीत अवस्था आहे. संदेहरुपी अडथळ्याबद्दल माउली म्हणते: ‘मग संशयी जरी पडला । तरी निभ्रांत जाणे नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥ १९९:४ ॥’ मनाच्या संदेहविरहीत स्थितीची पराकोटी म्हणजे ज्ञानी मनुष्य होय. तो काळाच्या सध्याच्या क्षणातच जगत असतो. वृक्षावरुन गळून पडलेले एखादे पत्र ज्याप्रमाणे स्वतःची बुध्दी न वापरता वाऱ्याच्या झोताबरोबर निःशंक भरकटत असते त्याचप्रमाणे तो वर्तमानकाळातील घटनेला भूत आणि भविष्याचे मोजमाप न लावता अंतर्स्फूर्तीने जे सुचेल त्याप्रमाणे तोंड देत असतो.

 

१४. समत्व

 

जेव्हा मन आणि बुध्दी एकरुप होते, अंतर्स्फूर्ती आणि सारासार विचारांचे मीलन होते तेव्हा चित्ताला समत्व प्राप्त झाले आहे असे समजावे. माउलींच्या शब्दात सांगायचे म्हणजे ‘अर्जुना समत्व चित्ताचे । तेचि सार जाण योगाचे । जेथ मन आणि बुध्दीचे । ऐक्य आथी ॥ २७३:२ ॥’ आपली बुध्दी जेव्हा स्वतःच्या मनातील ‘भावांना’ तपासून बघणे थांबवून अंतर्स्फुरणेवर विश्वास ठेवायला लागते तेव्हा समत्व उदयास आले आहे असे समजावे. असे बघा, पूर्वनियोजित ध्येयाची प्राप्ती होत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठीच आपण बहुतांशी बुध्दीचा उपयोग करतो. बुध्दीचा उपयोग करण्यासाठी आपणास काय हवे आहे याची कल्पना असणे जरुरी आहे. आपल्या कल्पनेबाहेरील गोष्टीवर बुध्दी काम करु शकत नाही. भगवंत आपल्या कल्पनाशक्तीच्या पलिकडून येणार असल्याने बुध्दीचे हत्यार खाली ठेवणेच श्रेयस्कर आहे. असे होण्याकरीता जीवनातील सर्व घटनांचा संपूर्ण स्वीकार करणे अपरिहार्य आहे. जेव्हा समोर येणाऱ्या सर्व गोष्टी हितकारकच आहेत याची खात्री मनाला पटते तेव्हाच आपला स्वभाव आपोआप साधाभोळा आणि सरळ होतो. न्यूझीलंड देशामध्ये शिकारी पक्षी आणि इतर शत्रू नसल्याने पक्ष्यांचा स्वभाव इतका साधाभोळा झाला होता की ते उड्डाण करणेही विसरले होते! ज्यांनी कधीही शत्रू बघितला नाही, स्वतःचा घात होऊ शकेल याची कल्पनाही ज्यांच्या मनाला शिवली नाही त्यांची बुध्दी अगदी सरळ असते आणि आपल्यासारख्या व्यवहारात मुरलेल्या सज्जनांची बुध्दी अतिशय वाकडी असते. आणि ती वाकडी आहे याचा अभिमानही आपणास असतो! आपल्या अशा मानसिक अवस्थेत समजा कुठल्याही कारणाशिवाय एखादा विचार आपल्या मनात आला तर त्याबरहुकुम आपले आयुष्य बदलायचा विश्वास आपणास कसा येणार? तो विचार चांगला आहे की नाही, पुढे याचा आपणास कितपत फायदा होणार आहे याची तपासणी करण्यातच आपला इतका वेळ, इतकी शक्ती खर्च होत असते की कृती करण्याचे सामर्थ्यच आपण गमावून बसतो. भोवतालच्या व्यावहारिक जगाच्या मानदंडांनुसार सुख आणि दुःख यांची मोजमाप करण्याचे आपण पूर्णपणे थांबविल्याशिवाय आपल्या बुध्दीचा आणि मनाचा एकोपा होणे शक्य नाही हे लक्षात घ्या. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या मुखातून ‘मनात होते हो, पण त्यानुसार वर्तन करायला वेळ मिळाला नाही’ असे उद्‌गार निघणारच. मनात आले की हातून घडणार अशी अवस्था आपण उपभोगू शकत नाही कारण आपले हात-पाय बुध्दीने जखडले गेले आहेत. समत्व चित्तात यायचे असेल तर आधी बुध्दीपासून सुटका झाली पाहिजे. आपल्यासमोर आलेल्या घटनांची ही सुखद, ती दुःखद अशी वर्गवारी करणे आपण थांबविले पाहिजे. म्हणूनच माउली म्हणत आहे:

 

महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षी सरिसे ।

इष्टानिष्ट तैसे । जयाच्या ठायी ॥ ६००:१३ ॥

कां तिन्ही काळ होता । त्रिधा नव्हे सविता ।

तैसा सुखदुःखी चित्ता । भेदु नाही ॥ ६०१:१३ ॥

जेथ नभाचेनि पाडे । समत्वा उणे न पडे ।

तेथ ज्ञान रोकडे । ओळख तू ॥ ६०२:१३ ॥

 

व्यवहारातील स्वारस्य काढून घेऊन त्यातून उद्भवणाऱ्या सुखद आणि दुःखद घटनांकडे निर्विकारपणे पहायला भगवंताशी मैत्री हवी, सद्‌गुरुबद्दल अतीव प्रेम हवे. चला, साधनेबद्दलचे ममत्व निरंतर मनात ठेवून संसाराला तोंड द्यायला आपण सुरुवात करुया.

 

॥ हरि ॐ ॥

2 Responses to Shloka9/13: Signs Of Knower14-Samatva

 1. shrinivas Deshpande म्हणतो आहे:

  What is Viveka? sant Tukaram said,’our body is a temple of our soal(Aatma)’& as you said,by losing our bodily organs, we do not loose our entity.
  What is Prana? what is Aatma?
  Our body looses it’s Astitva when Prana leaves it.
  Are Prana & Atma are two different things?
  Is it the Viveka budhi which gives direction to our thoughts to enable us to differentiate between all these things?

 2. Shreedhar म्हणतो आहे:

  1. What is Viveka?

  Viveka means discrimination. It is the tool with which we differentiate between `Nitya’ (the unchanging) and `Anitya’ (Not permanent).

  2. What is Prana?

  Prana is the name given to the force of nature which allows us to do work. The most apparent indication of that force is our breathing. It goes on continously without apparent effort. We all share the same force (Prana) and that is the common link between all of us. It is this force that keeps us alive. we have no control over it. When it stops being with us, our body dies.

  3. What is Atma?

  Atma is the personalised version of the formless God. Each one of us has God within us in the form of Self or Soul or Atma. It is the name signifying the only Nitya thing in our life. Apparently it seems that it is `using’ prana. But it is not the case. The atma is unattached to anything of nature and hence it can not use it. It just is.

  4. It should be clear that Prana and Atma are different. The first one comes and goes, the other is ever with us. Hence we are said to be `Atmarupa’. But the Prana is more visible to us and hence we identify ourself with it, instead of Atma.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: