Shloka10/13: Signs Of Knower15-Bhakti

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १५

 

भगवंताची प्राप्ती करण्याकरीता साधना करायची हे ठरले की त्यानंतर आपले ध्येय साध्य झाले की नाही हे समजायचा मानदंड कुठला हे ठरविले पाहीजे. ही गोष्ट जरा कठीण आहे कारण भगवंताला आपल्याकडे आणायचे आहे या ध्येयामध्ये आणि जगात काही मिळवायचे आहे या ध्यासात मूलभूत फरक आहे. व्यवहारातील गोष्टी एकदा प्राप्त केल्या की त्या सतत आपल्याकडेच असतात. उदाहरणार्थ, एकदा द्विपदवीधर झालो की नावापुढे पदव्या आयुष्यभर रहातात. खरे म्हणजे, आत्ता बारावीच्या परिक्षेला बसलो तरी नापास होऊ ही अवस्था असतानादेखील आपण बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो आहोत असे ठामपणे सांगतो किंवा एकदा घरात टी.व्ही. आला की ठेवल्या ठिकाणी तो कायमचा असतोच. परंतु भगवंतप्राप्ती अशी एकदाच भोज्याला हात लावून मोकळे होण्यासारखी नाही. आयुष्यभर त्याला सतत प्राप्त करावे लागते. ही अवस्था म्हणजे जणू आयुष्यभर दहावी-बारावीच्या परिक्षा देत रहाण्यासारखी बिकट परिस्थिती आहे असे वाटून घेऊ नका. या निरंतर चाललेल्या साधनेमध्येच अपार, अनिर्वचनीय आणि अवीट आनंद आहे. त्याचा उपभोग घेण्यास आतुरतेने तयार व्हा!

इथे एक गोष्ट लक्षात घ्या की भगवंत केवळ स्वतःला दुष्प्राप्य ठेवण्यासाठी निरंतर प्राप्तीची मागणी आपल्याकडे करीत नाही. ज्याप्रमाणे साखरेला गोडी देण्याखेरीज दुसरा पर्याय नाही त्याचप्रमाणे निरंतर साधना ही भगवंताच्या अस्तित्वाची एक अंगभूत मागणी आहे. कारण जी वस्तू नित्यनूतन असते तीच्या प्राप्तीसाठी नित्यप्रयत्न करायलाच हवे. व्यवहारातही आपण आपल्या पत्नीचे मन सांभाळायला नित्य प्रयत्‍न करीत असतोच ना! काल ती माझ्यावर प्रसन्न होती म्हणून आज असेलच याची खात्री आपण देऊ शकतो का? आपल्या आजच्या वर्तनावरच मंडळींचा ‘मूड’ अवलंबून असतो. हो ना? या उदहरणात निदान एकच व्यक्‍ती पत्‍नी म्हणून उभी आहे. कल्पना करा की रोज एक नवीन व्यक्‍ती आपल्यासमोर भार्या म्हणून सामोरी आली तर काय अवस्था होईल. कालच्या व्यक्‍तीशी काडीमात्र संबंध नसलेल्या आजच्या व्यक्‍तीला काय हवे आहे हे कळण्यातच आपला दिवस जायचा आणि उद्या परत अजून एका नवीन व्यक्‍तीमत्वाला सामोरे जायचे आहे ही जाणीव!! अशा वेळी आपली काय कठीण परिस्थिती होईल याची कल्पना यायला तुम्हाला वेळ लागणार नाही. भगवंताच्या बाबतीत अशाच अवस्थेला आपणास तोंड द्यावे लागते. आत्मरुपी भगवंत आणि ‘सत्य’ यात काहीही फरक नाही आणि सत्य हे नित्यनूतन, स्वयंभू (म्हणजे कशावरही अवलंबून नसलेले) आणि उत्स्फूर्त असते. कालच्या अंतर्स्फूर्तीरुपी भगवानावर आज समोर आलेला देव अवलंबून नसतो. आपल्या आजच्या भावना भूतकालातील भावनांशी सुसंगत असतातच असे नाही. म्हणूनच काल आईच्या रुपात दिसलेला देव कदाचित आज भिकारणीच्या स्वरुपात आपल्यासमोर येईल आणि उद्या आपल्या लहानशा मुलात दिसेल. आणि भक्‍तीची परिसीमा झाली की चराचरात ईश्वर आहे याची जाणीव होते. म्हणजे एकमेकांशी विसंगत असणाऱ्या गोष्टींत भगवान एकाचवेळी स्थित आहे हे दिसायला लागते! ही गोष्ट ‘एकावेळी एकच गोष्ट सत्य असते’ या आपल्या बाळबोध कल्पनेपलिकडील आहे. लक्षात घ्या की पारंपारीक पद्धतीच्या ध्यानसाधनेची, भक्‍तीची फलश्रुती म्हणून ज्या भगवंताची प्राप्ती आपणास होणार आहे तो भगवंत एकदाच मिळून मग आयुष्यभर बाहेरच्या खोलीत ‘शोकेस’ मध्ये ठेवण्यासारखा नाही. आपला भगवान सतत आपले रुप बदलून शेवटी सर्व जगामध्ये मिसळून जाणारा आहे. असे बघा, जर निव्वळ इष्टदेवतेशीच सान्निध्य असणे हेच साधनेचे ध्येय असते तर श्रीसंत नामदेवांना सद्गुरु श्री विसोबा खेचरांकडे जायची काय जरुरी होती? ज्ञानी माणसाच्या जीवनात वरील सत्य परीस्थितीचे पडलेले प्रतिबिंब म्हणजे त्याची भक्‍ती.

 

१५. भक्‍ति

 

ज्ञानेश्वर महाराजांनी भक्‍तीचे वर्णन अनेक अध्यायात केले आहे. दरवेळी शब्द वेगळे वापरले असले तरी प्रत्येक वर्णनात समान असलेले गुण म्हणजे १). भक्‍ताच्या मनात भगवंताबद्दल असलेली जीवापाड आस्था आणि २). देवाची प्राप्ती झाल्यावरही स्वतःच्या जीवनात अजून दुसरे काही न बघण्याची भक्‍ताची वृत्ती. साधकाला या दोन गोष्टींपैकी पहिली गोष्ट प्राप्त होणे संभव आहे परंतु दुसरी अतिदुर्मिळ आहे. तात्कालीन दुःखाने दिलेल्या झटक्याने भगवंताबद्दलची अनन्य आस आपणास लागू शकते परंतु त्या तळमळीमध्येच आपण आयुष्यभर रहायचे आहे ही कल्पना करणे आपणास अशक्य आहे. आपल्या मनात कुठेतरी भक्‍तीच्या शेवटी भगवंत मिळेल ही खात्री आणि त्यानंतर आपण सदासुखी राहू ही अपेक्षा सुप्त रुपात असतेच असते. ज्याप्रमाणे परीकथेतील राजकन्या स्वप्नातील राजकुमाराची जीवापाड वाट पहात असते त्याप्रमाणे आपण फारतर देवाची वाट बघू. परंतु वाट पहाण्याच्या शेवटी भगवंत शुभ्र अश्वावरुन येईल आणि आपली भवरोगापासून सुटका करील ह्या अपेक्षेला काढून टाकणे गुरुकृपेशिवाय अशक्य आहे. खरे म्हणजे वाट पहाण्यातच जीवनाचे सर्वस्व आहे, भक्‍तीमध्येच भगवंत आहे. व्यवहारातील एखाद्या वस्तूसारखा भगवंत नाही. जगात एक गोष्ट मिळाल्यावर थोड्याच वेळात आपल्याला दुसऱ्या वस्तूचे वेध लागतात. कधीकधी तर आत्ता मनपसंद भोजन करीत असतानाच आपण पुढच्या जेवणात काय हवे याचा विचार करीत असतो! आपल्या भक्‍तीलासुध्दा हाच नियम लावून आपण ही संपली म्हणजे काय होईल याचा विचार कळत-नकळत करीत असतो, भक्‍तीतून काहीतरी प्राप्त होत आहे की नाही हे बघत असतो. परंतु भगवंतभक्‍ती हीच जीवनाची अंतिम अवस्था आहे असे मानून जो भक्‍ती करतो तो खरा धन्य होय. ज्ञानी माणसाची भक्‍ती अशी पराकोटीची असते. त्या भक्‍तीबद्दल तेराव्या अध्यायात माउली म्हणत आहे:

 

आणि मीवांचूनी कांही । आणिक गोमटे नाही ।

ऐसा निश्चयोचि पाही । जयाचा केला ॥ ६०३:१३ ॥

शरीर वाचा मानस । पियाली कृतनिश्चयाचा कोश ।

एक मीवांचूनी वास । न पाहती आन ॥ ६०४:१३ ॥

मिळोनि मिळतचि असे । समुद्री गंगाजळ जैसे ।

मी होऊनि मज तैसे । सर्वस्वे भजती ॥ ६०७:१३ ॥

जो अनन्य यापरी । मी जाहलाही माते वरी ।

तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पै गा ॥ ६१०:१३ ॥

 

भगवंताच्या अव्यभिचारी भक्‍तीचे ‘भगवंताबद्दलची अनन्य आस’ आणि ‘भगवंतप्राप्तीनेसुध्दा भक्‍तीचा न होणारा अंत’ हे वरील वर्णन केलेले दोन भाग वरील ओव्यांतही अगदी स्पष्ट दिसत आहेत. आपल्या भक्‍तीचे ध्येय भगवान न ठेवता भगवंतभक्‍तीच ठेवावी अशी भावपूर्ण सूचना माउली आपणास यातून देत आहे असे वाटते.

 

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: