Shloka10/13: Signs Of Knower16-EkantaPrem

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १६

 

शास्त्रीय दृष्टीकोनाचा पाया म्हणजे घटना घडण्यामागचे नियम शोधणे. उदाहरणार्थ, ओवा खाल्ला की पोटदुखी कमी होते ही घटना देश-काल-व्यक्‍तीवर अवलंबून नाही हे एकदा सिध्द केले की दरवेळी पोटशूळावर ओवा खावा असे आपण मानतो. असे वागणे शास्त्रानुसार आहे. मनुष्याचा स्वभाव घटनेमागील नियम जाणून घेण्याचा आहे. नियम जाणून त्यानुसार वर्तन केले की दरवेळी आपणास बुध्दीचा वापर करावा लागत नाही. विचार करण्यास प्रचंड मानसिक शक्‍ती खर्च होत असल्याने आपण जीवनातील शक्य तितक्या गोष्टी नियमित करायचा प्रयत्‍न करीत असतो. अगदी आपली साधनासुध्दा ठराविकवेळी आणि ठराविक रुपातच करायचा प्रयत्‍न करतो. या सवयीचा एक दुष्परीणाम म्हणजे साधना म्हणजे काय, ती कशी करायची असते वगैरे गोष्टींबद्दलचा आपला एक ठाम निर्णय होणे. एका साच्यात साधनेला आणि साधकाला घालून आपण प्रगतीची अपेक्षा करतो. त्यामुळेच व्यवहारात राहूनच साधना करायची आहे असा निश्चय केल्यावरही साधकाला तो वर्तनात आणता येतोच असे नाही. आपल्यावर अन्याय करणाऱ्याकडेही सहिष्णुतेने बघावे वगैरे पुस्तकी नियम आचरणात आणायला किती कठीण आहेत हे त्याला स्वानुभवाने कळायला लागते. खरी गोष्ट अशी आहे की परमार्थाला अध्यात्मशास्त्र असे नाव असले तरी साधना हे शास्त्र नाही तर कला आहे त्यामध्ये नियम पाळण्याएवढेच ते केव्हा आणि कसे तोडावे हे जाणणेही आवश्यक आहे. त्यानेच नियमांचा खरा अर्थ लक्षात येतो. उदाहरणार्थ, सहिष्णुता म्हणजे अन्याय करणाऱ्याला जाब न विचारणे असे नव्हे तर जाब विचारल्यावर त्याने स्वतःच्या वागण्याबद्दल जे स्पष्टीकरण दिलेले आहे ते मन साफ ठेवून ऐकणे आहे. ते स्पष्टीकरण पटले नाही तर त्यावर परत आपले मत त्याला निर्भिडपणे सांगायचे स्वातंत्र्यही सहिष्णुतेमध्ये आहे. संतचरीत्रांचा अभ्यास केला की अध्यात्मातील पुस्तकी नियम आचरणात कसे आणायचे याचे धडे आपणास मिळतात. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘तेही प्राणापरौते । आवडती हे निरुते । जे भक्‍तचरित्राते । प्रशंसिती ॥२२७:१२॥’. साधनेला साचेबध्द न ठेवता सर्वजीवनव्यापक बनवायची असेल तर सत्संगाशिवाय पर्याय नाही. संतांंच्या व्यवहारातील वर्तनामागे काय हेतू आहे, त्यांची स्वतःची इच्छा काय आहे हे ज्याला कळले त्याने बाजी मारली! जरा विचार करा की लोकांशी संबंध ठेवण्यामागे संतांचा काय हेतु असेल?

 

१६. एकांतप्रेम

 

आपण एखादे कर्म करतो ते त्यामुळे आपणास आनंद होणार आहे म्हणूनच. कितीही उदार दृष्टीकोन ठेवून काम केले तरी शेवटी ते पूर्ण झाल्यावर आपणास समाधान मिळतेच. उदाहरणार्थ, एखादी आई खूप दिवसांनी घरी आलेल्या मुलाला त्याच्या मनासारखे जेवण तयार करण्यासाठी कष्ट करीत आहे हे बघून भरुन आले, तरी मुलाच्या मनापासून जेवण्यात तीला समाधान मिळते हेसुध्दा खरेच आहे. समजा मुलाने असे सांगितले की मी येताना बाहेर खाऊन आलो आहे, मला तू केलेले जेवण नको, तर आईला काय वाटेल? मुलाचे समाधान हाच हेतु असता तर तीला काहीही वाटायला नको. कारण मुलाचे समाधान झालेले आहेच. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. आपल्या हातचे जेवण त्याने खाल्ले नाही म्हणून तीला वाईट वाटते. म्हणजे घेतलेले कष्ट निव्वळ मुलाकरीता नसून आपल्यामुळे त्याला आनंद व्हावा या भावनेकरीतासुध्दा आहे. अर्थात, असे म्हणून आईच्या प्रेमाबद्दल इथे अविश्वास उत्पन्न करावयाचा नाही, तर एव्हढेच सांगायचे आहे की सर्वात उदात्त समजल्या जाणाऱ्या प्रेमातही कुठेतरी स्वतःला आनंद मिळावा या भावनेचे गालबोट असतेच. याचे मूलभूत कारण असे की आपण स्वतःच्या मनात आनंद ‘उत्पन्न’ करावयाचा प्रयत्‍न करीत असतो. मग तो आनंद कधी परक्या माणसाला दुःख देऊन निर्माण करतो तर कधी आपल्या माणसाकरता कष्ट घेऊन. आनंद शोधायची आपली खटपट आपणास स्वार्थी बनविते. संतांच्या मनात आनंद सतत असतो आणि त्याची जाणीव त्यांना सतत असते (आपल्याही मनात नित्यआनंद असतोच पण आपणास त्याची जाणीव नसते!). त्यामुळे त्यांना आनंद निर्माण करायची गरज भासत नाही आणि त्याकरीता कुठलेही कर्म करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही कार्यामागे त्यांचा स्वतःचा असा हेतू असत नाही. प्रारब्ध म्हणून जे काही समोर आले आहे ते अत्यंत निरपेक्ष बुध्दीने करीत रहाणे हा त्यांच्या कृतींचा पाया आहे. ह्या भावनेमुळे परमार्थातील नियम पाळायचे बंधन त्यांना पदत नाही. साधनेची पराकोटी झाली की नियमांची कुबडी दूर होते. प्रत्येक क्षणी ‘सहज’ अवस्था निर्माण होऊन ते समोर आलेल्या परिस्थितीला फक्‍त उत्तर देत असतात. ते फक्‍त ‘रीऍक्‍ट’ करतात, कधीही स्वतःहून ‘ऍक्‍ट’ सुरु करीत नाहीत. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे ते ‘सर्वारंभपरित्यागी’ झालेले असतात. त्यामुळे त्यांना समाजात स्वतःहून पुढे यायची गरज भासत नाही. ते स्वतःमध्ये आत्मरुपात स्थित असलेल्या भगवंताशी नित्य संबंध ठेऊ इच्छितात. भाग्यवशात जे काही भोग सामोरे येतात त्यांना भोगीत असताना त्यांच्या मनात भगवंताकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव असते आणि म्हणून ते जनपदापासून दूर रहाणे पसंद करतात. क्वचित्‌काळी त्यांच्यासारख्याच मनःस्थितीचा मनुष्य भेटला की त्यांना नातेवाईक भेटल्याचा आनंद होतो पण त्याव्यतिरीक्‍त ते व्यवहारामध्ये निव्वळ बाकी चुकती करण्यासाठी रहात असतात. त्यांच्या ह्या अंतर्गत स्थितीचे वर्णन करीत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत:

 

आणि तीर्थे धौते तटे । तपोवने चोखटे ।

आवडती कपाटे । वसवू जया ॥ ६११:१३ ॥

शैलकक्षांची कुहरे । जळाशय परिसरे ।

अधिष्ठी जो आदरे । नगरा न ये ॥ ६१२:१३ ॥

बहु एकांतावरी प्रीती । जया जनपदावरी खंति ।

जाण मनुष्याकारे मूर्ती । ज्ञानाची तो ॥ ६१३:१३ ॥

 

खरा परमार्थ व्यवहारातून पळून जायला लावीत नाही हे जरी खरे असले तरी सामाजिक प्रगतीबद्दलची साधकाची आवड तो निश्चित कमी करतो. मनातून जनलोकात यायची खंत असूनही प्राप्तकर्मे उचित रीतीने यथायोग्य फळाला न्यायचा प्रयत्‍न ज्ञानी मनुष्य करीत असतो. एखादी दाई मालकाच्या मुलाला प्रेमाने वाढविते पण तीचे मन आपल्या स्वतःच्या मुलावरच जडलेले असते तशी ही गोष्ट आहे. एकांतावरची प्रीती ज्ञानी माणसाला निष्क्रिय न बनविता त्याला स्वतःच्या भोगांतून अंतिम सुटका देते. हे लक्षात घेऊन आपण स्वतःला अंतर्मुख बनवायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या जीवनातील खऱ्या आणि परिपूर्ण एकांताची हीच सुरुवात आहे!

 

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: