Shloka11/13: Signs Of Knower17-AtmadnyanDhyaas

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १७

 

मनाच्या एकाग्रतेची खरी परीक्षा मन विचलित करणाऱ्या वस्तू वा घटना सामोऱ्या आल्यावरच होते. अर्जुनाच्या एकाग्रतेची निशाणी म्हणून ‘पक्ष्याचा फक्‍त डोळा दिसण्याबद्दलची’ गोष्ट आपण ऐकतो त्यातही बाकी सर्व धनुर्विद्येचे शिष्य लक्ष्य सोडून अनेक गोष्टी बघत होते ही बाब मुद्दाम सांगितली जाते. अर्जुनाचे वेगळेपण त्यामुळेच सिध्द होते. संसारातून आपले मन काढून आता परमार्थात घालायचे आहे असे आपण जेव्हा ठरवितो त्याचा दुसरा अर्थ म्हणजे आपण भगवंताकडे मन एकाग्र करायचा प्रयत्‍न करीत असतो. त्यामुळे संसारात येणाऱ्या सर्व सुखदुःखद घटना आपल्या एकाग्रतेची परीक्षा बघत असतात हे लक्षात येते. याची पूर्ण जाणीव संतांना असते. म्हणूनच जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांची किर्ती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मानाची पालखी पाठविल्यावर तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. आणि ‘माझ्या मनातील तुझ्या भक्‍तीची का अजून परीक्षा बघतोस रे?’ असा आर्त आक्रोश विठ्ठलाकडे करुन त्यांनी पालखी परत धाडून दिली. साधकाला संसारातील आकर्षणाबद्दल अत्यंत सावध रहावे लागते. त्यातूनही जेव्हा ते आकर्षण अतिशय सोज्वळ, सात्विक आणि साधनेला हितकारक अशा रुपात सामोरे आले की धोका अधिकच सूक्ष्म रुपात असल्याने बाधक ठरतो. श्री रामकृष्ण परमहंसांच्या अत्यंत जवळच्या शिष्याला त्यांनी हाच संदेश दिला होता. एकदा त्यांना असे कळले की त्यांचीच एक भावूक शिष्या एका शिष्याला स्वतःच्या मुलासारखे मानत होती. त्या शिष्याला बाजूला घेऊन त्यांनी अशी नाती जोडण्याबद्दल सावध केले होते. ते म्हणाले की सुरुवातीला कितीही सोज्वळ, सात्विक नाते असले तरी कालांतराने त्याचे पर्यावसन कुठल्या अतिरेकी भावनेमध्ये होईल हे सांगता येत नाही. विशेषतः नाते जोडणाऱ्या व्यक्‍ती तरुण असतील तर मनात केव्हा विकल्प येतील हे सांगता येत नाही. खरे म्हणजे संसारातून काढून आपले मन भगवंताकडे लावायचे आहे असे ठरविल्यावर नवीन नाती जोडण्यात काय अर्थ आहे हे शाब्दीकरीत्या लगेच पटते पण आपण स्वतः कधी नवीन नाते जोडतो हे कळत नाही! गुरु-शिष्य हे नाते सुध्दा या नियमाला अपवाद नाही. प्रत्येक शिष्याच्या जीवनात अशी वेळ येतेच की त्याला गुरुगृह सोडून आपल्या पायावर उभे रहावे लागते. स्वतःच्या गुरुंबद्दलची आत्मीयता, भावनिक संबंध कमी झालेले नसतात. परंतु तरीसुध्दा साधनेत परिपक्व होण्यास एकांत हा लागतोच. एका झाडाखालच्या छायेत दुसरा वृक्ष उभा रहायला जागा नसते. त्या छायेत आपण रोप लावणे श्रेयस्कर असले तरी ठराविक काळानंतर त्या रोपाच्या संपूर्ण वृध्दीला स्वतःची जागा लागतेच, तशी ही गोष्ट आहे. कालपर्यंत साधनेला हितकारक असणाऱ्या गोष्टी वा व्यक्‍ती आज हितकारक असतीलच असे नसल्याने योग्याला निरंतर सावध रहावे लागते. संतांच्या जीवनात ही सावधता आपण सतत पाहू शकतो. श्री रामकृष्ण परमहंसाच्या देह ठेवण्यानंतर विवेकानंदादी शिष्यांनी काही काळ एकत्र साधना केली आणि नंतर आपापल्या मार्गाने परिव्राजक म्हणून स्वतंत्र भ्रमण केले या घटनेतून त्यांच्या नवीन नात्यांत गुंतून न रहाणेच दिसून येते. सर्वसाधारण साधक संतपदाला न पोहोचण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे साधनेत उत्पन्न झालेल्या नात्यांमध्ये त्यांचे गुंतणे होय. ह्या धोक्यावर ज्ञानी माणसाने कशी मात केली हे बघून आपण स्वतःला ध्येयापासून फारकत घेण्याच्या धोक्यातून मुक्‍त केले पाहिजे.

 

१७. आत्मज्ञानध्यास

 

भगवंताबद्दलचे ज्ञान हेच खरे ज्ञान असून बाकी सर्व अज्ञान आहे असा एक ठाम निर्णय साधकाने साधनेच्या सुरुवातीला घेतलेला असतो तो कधीही न विसरणे म्हणजे आत्मज्ञानध्यास होय. भक्‍तराज अर्जुनासारखेच आपण संसारातील अडचणींमूळेच भगवंतप्राप्तीकडे ध्यान दिलेले असते. नंतर कालओघाने ज्या कारणाने परमार्थमार्गावर पदार्पण केलेले असते ते संकट दूर झाले की आपण साधना कशी करतो यावर आपली खरी प्रगती अवलंबून असते. ज्या साधकाला साधनेची गोडी लागतो तोच अध्यात्मात आयुष्यभर राहू शकतो. साधना हेच जीवन अशी अवस्था ज्ञानी माणसांची असते. त्यामुळे संसारात त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या उत्तम, मध्यम किंवा निकृष्ट व्यक्‍तींबद्दल त्यांच्या मनात एकसारखेच प्रेम असते. देवर्षी नारदांच्या मनात भक्‍त प्रल्हादाबद्दल प्रीती होती हे जसे खरे आहे तसेच वाल्या कोळ्यावरही प्रेम होते हे खरे आहे. त्याने इतकी पापे केली आहेत तरी तुम्ही त्याला माझ्याइतकेच जवळ का करता असा प्रश्न प्रल्हादाने त्यांना विचारला असता तर त्यांनी ‘तो माझ्याजवळ आला यापेक्षा मला अधिक काय हवे?’ असेच उत्तर दिले असते! संतांचे प्रेम प्राप्त व्हायला स्वतः काही करायची गरज नसते पण स्वतःची अध्यात्मिक प्रगती करायला आपण साधना करायची आसते हे सर्व शिष्यांनी जाणून घेतले पाहिजे. माझी साधना, माझा त्याग अमुक एका व्यक्‍तीपेक्षा अधिक आहे म्हणून मला अधिक प्रेम लाभले पाहिजे ही मागणी मनातून संपूर्णपणे काढून आपण संतांजवळ गेले पाहिजे. याचे कारण असे की खरे संत सर्व व्यक्‍तींकडे, घटनांकडे तटस्थ राहून बघत असतात, त्यांचे खरे लक्ष निव्वळ भगवंताकडे असते. त्यांच्या या निरंतर ध्यासामध्येच आपण कुठेही न गुंतायची गुरुकिल्ली आहे आणि त्या असामान्य गुणाबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत:

 

आणि परमात्मा ऐसे । जें एक वस्तू असे ।

ते जया दिसे । ज्ञानास्तव ॥ ६१६:१३ ॥

तें एकवांचूनि आने । जिये भवस्वर्गादि ज्ञाने ।

ते अज्ञान ऐसा मने । निश्चय केला ॥ ६१७:१३ ॥

स्वर्गा जाणे हे सांडी । भवविषयी कान झाडी ।

दे अध्यात्मज्ञान बुडी । सद्भावाची ॥ ६१८:१३ ॥

एवं निश्चय जयाचा । द्वारी अध्यात्मज्ञानाचा ।

ध्रुव देवो गगनींचा । तैसा राहिला ॥ ६२२:१३ ॥

तयाच्या ठायी ज्ञान । या बोला नाही आन ।

जे ज्ञानीं बैसले मन । तेव्हांचि तो ते ॥ ६२३:१३ ॥

 

साधनेत प्रगती झाली की अनेक सुखद घटना, सात्विक व्यक्‍ती सामोऱ्या येतात. मनातील दुःखाची भावना क्षीण होत जाऊन शेवटी नष्ट होते आणि व्यवहारात असतानाही मनात आनंद उस्त्फूर्तपणे ओसंडून वाहू लागतो. अशावेळी साधकाने भगवंताचा ध्यास न सोडणे अत्यावश्यक असते. जो साधक आनंदात रमला तो जणू झोपी गेला. त्या निद्रेतून साधकाला दुःखरुपी जाग येणारच येणार! स्वतःच्या आनंदाकडेही तटस्थपणे बघायची कला आत्मसात करायची असेल तर आपण परमात्म्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही वस्तूत वा व्यक्‍तीत पराकोटीचे गुंतू नये असे माउली म्हणत आहे हे लक्षात ठेवा. बाकी सर्व बघायला सद्गुरुकृपा आहेच!

 

॥ हरि ॐ ॥

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

One thought on “Shloka11/13: Signs Of Knower17-AtmadnyanDhyaas”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s