Shloka14/7: Bhakti, the base of all Sadhana

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।

मामेव ये प्रपद्यंते मायामेतां तरन्ति ते ॥ गीता अ.७, श्लोक १४॥

 

अर्जुनाच्या मनातील युध्दाच्या संयुक्ततेबद्दल असलेला संभ्रम मिटविण्यास सांगितलेल्या गीतेमधील सातव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत: ‘माझी (दैवी) त्रिगुणात्मकी माया जीवाला तरुन जायला फार कठीण आहे. जे मला संपूर्ण शरण येतात त्यांनाच ती तरता येते.’ रेशीमाचा किडा ज्याप्रमाणे स्वतःभोवती कोष निर्माण करुन त्यात निवांत बसतो, त्याचप्रमाणे भगवंतांनी आपल्याभोवताली मायेचे जाळे निर्माण केले आहे. त्या जाळ्याला छेदून आत बसलेल्या आदिपुरुषाचे दर्शन घेणे सर्वसामान्य साधकांना अशक्य आहे. जे साधक स्वतःच्या अहंकाररुपी कुबडीचा त्याग करुन माझ्यावर संपूर्णपणे अवलंबून राहतात त्यांनाच माझे दर्शन होते असे भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत.

ह्या श्लोकाचे विवरण करण्यास माउलींनी मायेला पहाडात उत्पन्न झालेल्या नदीची उपमा दिली आहे आणि तीच्या पैलतीरावर भगवान आहेत अशी कल्पना करुन साधकांच्या भगवंतप्राप्तीच्या प्रयत्‍नांना नदीपार करण्याचे रुप दिले आहे. मायानदीचे हे अतिशय समर्पक रुपक वाचकांनी प्रत्यक्ष वाचावे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या असीम प्रतिभेचा लाभ उठवावा. महाराज म्हणत आहेत:

 

जिये ब्रह्मचळाचा अधाडा । पहिल्या संकल्पजळाचा बुडबुडा ।

सवेंचि महाभुतांचा बुडबुडा । साना आला ॥ ६९:७॥

 

अचळ (म्हणजे पर्वत) असे निर्गुण परमेश्वराला संबोधून त्यामध्ये उठलेल्या ‘अहं बहुस्याय प्रजायेय’ ह्या आदिसंकल्पाला त्या पर्वतातील कधीही पायरव न झालेल्या दुर्गम कड्यावर अचानक उसळलेल्या झऱ्याची उपमा दिली आहे. मग निर्माण झालेले जीवजंतू म्हणजे या जळातील भरपूर बुडबुडे आहेत असे दिसते!

 

जे सृष्टीविस्ताराचेनि वोघें । चढत काळकलनेचेनि वेगे ।

प्रवृत्तिनिवृत्तीची तुंगे । तटे सांडी ॥ ७०:७॥

जे गुणघनाचेनी वृष्टीभरे । भरली मोहाचेनी महापुरे ।

घेऊनि जात नगरे । यमनियमांची ॥ ७१:७॥

 

हा झरा सृष्टीविस्ताराच्या ओघाने, कालाच्या गतिने, प्रवृत्ति आणि निवृत्ती ही दोन उंच तटे सांडून नदीरुपाने वाहू लागला. मग सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या वृष्टीमुळे तीला मोहरुपी महापूर येऊन जीवांच्या यम आणि नियमरुपी संस्कृतीला (म्हणजे भगवंताकडे जाण्याच्या प्रयत्‍नांना) उध्वस्त करु लागली असे महाराज म्हणत आहेत. काय सुंदर वर्णन केले आहे पहा: ‘यमनियमांची नगरे’! ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात ‘ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागरचि होइजे ।’ असे महाराजांनी म्हटले आहे. नगरात राहील्याने आपोआप माणूस सुसंस्कृत होतो. त्याशिवाय त्याला दुसरा पर्यायच रहात नाही. याउलट खेड्यात रहाणारा मनुष्यास समाजात कसे वागावे याचे भान असतेच असे नाही. तिथे सर्वजण एकमेकांना संपूर्णपणे ओळखत असल्याने बाह्य वर्तणुकीमुळे फार मोठा गैरसमज होत नाही. परंतु शहरात लाखो लोक रहात असल्याने आपल्याला अनोळखी माणसांशी संपर्क ठेवावा लागतोच आणि मग कसेही वागून चालत नाही. म्हणून शहरी लोकांच्या वागण्या-बोलण्यात दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार असतो. आणि आपल्याआधी दुसऱ्याचा विचार करावा ह्यालाच संस्कृती म्हणतात. त्याचप्रमाणे यम आणि नियम आचरणात आणणारे साधक स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळविण्याचा निरंतर प्रयत्‍न करीत असतात. त्यांची जीवनपध्दती आपोआपच विषयासक्‍तीपासून दूर होत जाते. आणि विषयांपासून दूर असे ‘भगवंतचरणकमळ’ हे एकच स्थान आहे. हा एवढा गर्भित अर्थ निव्वळ ‘यमनियमांची नगरे’ या दोन शब्दात प्रगट करण्यात ज्ञानेश्वर महाराजांची दैवी प्रतिभा स्पष्ट दिसून येते! खरोखर ज्ञानेश्वरीच्या एकेक शब्दात फार मोठा अर्थ भरलेला आहे. असा विचार केल्यास प्रा. के. वि. बेलसरे यांनी ज्ञानेश्वरीवर दर रविवारी सकाळी अशी जवळ-जवळ ३५ वर्षे प्रवचने दिली याबद्दल कुणास आश्चर्य वाटायला नको. स्वतःच्या दररोजच्या वाचनातील प्रतीतील त्यांना भावलेल्या ओवीखाली ते निळ्या शाईने रेघ मारायचे. शेवटी-शेवटी त्यांची सर्व ज्ञानेश्वरीच निळी झाली होती असे त्यांचे सुपुत्र श्री. के. बेलसरे म्हणतात. याचे कारण असे की आधी साधी वाटणारी ओवीसुध्दा काही काळाने महत्वाची वाटू लागते. म्हणूनच ‘ज्ञानेश्वरी मला समजली’ वा ‘मी ज्ञानेश्वरी वाचून संपविली, आता पुढे काय वाचू?’ असे म्हणणारे साधक भेटले की त्यांच्या धाडसाचे फार नवल वाटते. प्रा. बेलसरे म्हणतात की ‘साधकाने एखादा ग्रंथ घट्‍ट धरुन ठेवावा. आयुष्यभर त्याला सोडू नये. त्यातील वाक्यांचा शाब्दीक अर्थ आणि दररोजच्या जीवनात वापरता येईल असा अर्थ नित्य शोधत रहावे. नाहीतर आपल्या गुरुंच्या कथनावर, चरित्रावर निरंतर लक्ष ठेवावे.’ साधनेची ही एक गुरुकिल्ली आहे असे वाटते. साधकाला फार वाचन करण्याची जरुरी असते असे नाही. एका योग्य ठिकाणीच खोलवर खणल्यावरच जीवन (पाणी) लाभते हे आपण कधीही विसरु नये! पंचवीस स्थानांवर छोटे खड्डे खणून आपली भगवंतप्राप्तीची तहान शमणारी नाही. आपण अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्या मातृभाषेत ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, हरिपाठ, गोंदवलेकर महाराजांची प्रवचने इत्यादी साहित्य निर्माण झाले आहे. यापैकी कुठल्याही एका ग्रंथाला आयुष्यभर भगवंतप्राप्तीचीच प्रामाणिक इच्छा धरुन पकडून ठेवले तर आपले कल्याण होईल यात शंका नाही. असो. तर सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वर महाराजांनी नदीच्या रुपकाचा आधार घेऊन भगवंताच्या मायेचे अत्यंत सुरेख वर्णन केले आहे ते वाचकांनी स्वतः बघून आनंद घ्यावा. वर्णन करुन झाल्यानंतर महाराज म्हणतात:

 

येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो ।

तो तो अपावो । होय तें ऐक ॥ ८२:७॥

एक स्वयंबुध्दीच्या बाही । रिगले तयांची शुध्दीचि नाही ।

एक जाणिवेचे डोही । गर्वेंचि गिळिले ॥ ८३:७॥

 

‘इथे एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. ती म्हणजे या मायानदीला तरुन जाण्याचे जे जे उपाय आहेत ते सर्व अपायकारकच आहेत. जो कुणी स्वतःच्या बुध्दीवर विश्वास ठेवून मायानदीत उतरला तो कुठे गेला हे आम्हाला कळलेच नाही! कुणी एक स्वतःला जाणविणाऱ्या भावनांवर विसंबला तो गर्वाने गिळिला’ असे महाराज म्हणत आहेत. भगवान श्रीकृष्णांनी उपरीनिर्दिष्ट श्लोकात मला अनन्यभावाने भजणारेच तरतात असे म्हटले आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज या निवेदनाचे स्पष्टीकरण देत आहेत. शरणागतीशिवाय दुसरा कुठला मार्ग घेतला तर काय होईल याचे सविस्तर वर्णन महाराज करीत आहेत. माउलींच्या ‘एक स्वयंबुध्दीच्या बाही …’ या ओवीवर आज आपण विचार करु.

 

परमार्थ म्हणजे ‘आत्म’विश्वास । म्हणूनि रिघता ‘स्वसंवेद्या’ मार्गास ।

परी नसता भगवंताचा नित्यध्यास । शिराल अहंकाराच्या चक्रव्यूहात ॥

 

खरे म्हणजे आपल्या आत्मरुपी स्थित असलेल्या देवाकडे जाण्याचा अपरोक्ष ज्ञान हा एकच उपाय आहे. ज्ञानेश्वरीतील पहिल्याच ओवीत महाराजांनी म्हटले आहे की ‘…जयजय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥’. परंतु हा स्वसंवेदनांचा मार्ग चालण्यास साधकाच्या मनाची वृत्ती अत्यंत समजदार असली पाहिजे. स्वतःच्या मनात स्फुरणाऱ्या कुठल्या भावना आपल्या इच्छा-आकांक्षांमुळे निर्माण झाल्या आहेत आणि कुठल्या भावना भगवंताकडे नेणाऱ्या आहेत हे कळणे आधी आवश्यक आहे. मनातील भावना स्वतःवर ‘मी भगवंताकडून आलेली आहे’ असे लेबल घेऊन येत नाही! त्यामुळे मला जे दिसले आहे तेच सत्य आहे या मार्गावर चालणाऱ्यांची दिशाभूल कधी होईल हे कळत नाही. म्हणूनच जे ‘स्वयंबुध्दीच्या ठायी रिगले’ ते नक्की कुठे गेले हे कळत नाही. आता बुध्दीच्या पलिकडे आपली अंतर्स्फूर्ती असते. तीच्यावर जे विश्वास ठेवतात ते स्वसंवेदनांवर विश्वास ठेवतात असे म्हणायला हरकत नाही. स्वसंवेदना म्हणजे अचानक, बुध्दीचा वापर न करता, जे स्फुरण आपणास होते ते होय. पहिल्याच भेटीत कुणाबद्दल आपले मत तयार होते. वा कुणाच्या बोलण्याचा, वागण्याचा अर्थ अचानक आपल्या लक्षात येतो आणि डोक्यात प्रकाश पडला असे आपण म्हणतो ही सर्व स्वसंवेदनांची लक्षणे आहेत. परंतु यातही काही संवेदना आपल्या नकळत चाललेल्या विचारांवर अवलंबून आहेत हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे संगणकात अनेक क्रिया (प्रोसेसेस्‌) सतत चालू असतात आणि आपणास प्रत्यक्षात त्या दिसत नाहीत, त्याचप्रमाणे आपल्या डोक्यात विविध विचारांचे मंथन निरंतर चालू असते आणि त्याची जाणीव आपणास असतेच असे नाही. या मंथनाचे परिणाम म्हणून मग अचानक एक साररुपी नवनीत आपल्यासमोर येते तेव्हा आपण ते बुध्दीपलिकडून आले आहे असे समजणे चुकीचे आहे. आपल्या नकळत आपली बुध्दी कार्यरत होती आणि म्हणुनच तो विचार आपणासमोर आला आहे ही वस्तुस्थिती आहे. आता अशा भावनेला अंतर्स्फूर्ती मानून वर्तन केले तर आपण आपल्या बुध्दीलाच खतपाणी देत आहोत असे होते. त्यामुळे आपली बुध्दी (म्हणजे आपला अहंकार) आपल्या नकळत बळाविते. म्हणून महाराज म्हणत आहेत की जे निव्वळ अंतर्स्फूतीवर विसंबले ते अहंकारामध्ये गुरफटले. स्वतःच्या स्फुरलेल्या भावनांवर विश्वास ठेवायचा असेल तर आधी हे बुध्दीचे निरंतर काम करणे आपण थांबविले पाहिजे. एका परीकथेतील ब्रह्मराक्षसाला सतत काम हवे असायचे. नाहीतर तो ज्याचा सेवक असतो त्यालाच खाऊन टाकायचा. ही गोष्ट आपल्या बुध्दीला संपूर्णपणे लागू होते! बुध्दीला थांबविणे अशक्य आहे, पण तीला असे काम देणे शक्य आहे की त्यात गुंगून बाकी कुठला कुतर्क काढण्यास वेळच शिल्लक राहणार नाही. हे काम म्हणजे भगवंताचे निरंतर भजन होय. म्हणून भगवंताचा निजिध्यास स्वसंवेदनांचा मार्ग चालणाऱ्या साधकासही अत्यावश्यक आहे! तुम्हाला कुठली भावना भगवंताकडून आली आणि कुठली आपण निर्माण केली ही शंका मिटवायची असेल तर फक्‍त भगवंताचेच विचार डोक्यात ठेवायची सवय लावा. बुध्दीला भक्तीचे खाद्य द्या आणि स्वतः निःशंक व्हा! म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की जो मला शरण येतो (म्हणजे माझेच विचार सतत डोक्यात ठेवतो) त्यालाच मायानदी पार करता येईल. तुमचा साधनेचा मार्ग कुठलाही असू दे. जगातील सर्व साधनांचा पाया भगवंताबद्दलची अनन्य आस्था आहे. त्या पायावर तुम्ही कुठली इमारत बांधता हे तुमच्या सद्‌गुरुंवर अवलंबून आहे. ज्याप्रमाणे आपण निरनिराळा स्वयंपाक करतो पण त्या सर्व पाकक्रियांचा पाया आपणास लागलेली भूक असते त्याचप्रमाणे ही गोष्ट आहे! भगवंत म्हणत आहेत की मला शरण आल्याखेरीज माझी प्राप्ती नाही. परंतु शरण गेल्यानंतरही साधना असतेच हे आपण विसरु नये. नाहीतर मी सद्‌गुरुंना शरण गेलो आहे तरी मी ब्रह्मरुप का झालो नाही हा विकल्प आपणास येईल. शरणागती ही सर्व साधनांचा पाया आहे. हा पाया नीट बांधणे साधनेकरीता जरुरी आहे हे आपण वरील श्लोकावरुन जाणले की पुरेसे आहे.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक १९ जुलै २००९)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: