Shloka14/2: Sensual world is imaginary

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

मात्रास्पर्शास्तु कौंतेय शीतोष्णसुखदुःखदाः ।

आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ गीता १४: २ ॥

 

पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाच्या मनात आपल्या आप्तजनांशी युध्द करण्याबाबत संभ्रम उत्पन्न झालेला श्रीव्यासमहर्षींनी कुणालाही पटणाऱ्या मुद्यांचा आधार घेऊन सुंदररीत्या दर्शविला आहे. आपणास कुठेही अर्जुनाच्या म्हणण्यात सकृतदर्शनी विसंगती दिसत नाही. खरे म्हणजे अर्जुनाचा आधार घेऊन आपल्या सर्व साधकांच्या मनातील संभ्रमांचे गुंतेच श्रीव्यासांनी दाखविले आहेत. हे म्हणण्याचे कारण असे की खऱ्या साधनेत केवळ स्वतःचे आत्मरुप जाणण्याचा प्रयत्‍न सुरु असल्याने त्यात जो वेळ जातो तो निव्वळ स्वतःकरीता असतो. साधना वाढविण्यात आपण आपल्या आप्तजनांकडे अधिकाधिक दुर्लक्ष करीत आहोत अशी भावना आपल्या मनात आली नाही तर नातेवाईकांच्या मनात येते आणि आपल्या जीवनात चकमकी उडू लागतात. अशावेळी स्वतःच्या जीवनात साधना महत्वाची आहे का आप्तजनांचे मन सांभाळणे महत्वाचे आहे याचा निर्णय कुरुक्षेत्रावरील अर्जुनाप्रमाणेच आपणा सर्वांना करावा लागतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये जो सल्ला दिला आहे त्याकडे आपण नजर टाकली तर योग्य निर्णय घेण्याबद्दल म्हणजे साधना करण्याबद्दल उत्साह येतो. आपला श्रीज्ञानेश्वरीवरचा अभ्याससुध्दा निव्वळ साधना निरंतर सुरु रहावी याच उद्देशाने सुरु असतो. हा अभ्यास निरंतर चालू ठेवणे जरुरी आहे कारण आपण कितीही ठाम निर्णय घेतला की माझ्या जीवनात भगवंतप्राप्ती हीच महत्वाची गोष्ट आहे आणि बाकी सर्व गोष्टी दुय्यम आहेत तरीसुध्दा व्यावहारिक जगात आपण परत खेचले जातोच. उदाहरणार्थ, कधीनाकधी आपणा सर्वांच्या मनात ‘जीवन इतके सुरळीत चालू असताना साधनेचे कष्ट का करावे?’ हा प्रश्न उद्भवतोच किंवा आपल्या सहकाऱ्याची नोकरीत पटपट झालेली प्रगती बघून आपणपण असेच वर चढावे अशी भावना मनात येतेच. मनात असे विचार येणे म्हणजे परत संसारात गुरफटणे होय. आणि अशावेळी स्वतःला फक्‍त भगवंताच्या अनुसंधानात ठेवणे महाकठीण असते. या पुढे येणाऱ्या आणिबाणीच्या क्षणी मदत म्हणून साधकाने एक ठराविक ग्रंथ दररोजच्या वाचनात ठेवावा. त्यातील चार-पाच वाक्येतरी दररोज वाचणारच असा निश्चय करुन संसारात रहावे. श्रीज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत इत्यादी ग्रंथ नित्य वाचनात असणे म्हणजे श्रीज्ञानेश्वर, रामदासस्वामी आणि श्रीएकनाथांच्या सहवासात नित्य असणे होय. जेव्हा-केव्हा आपल्या मनात संसाराचे प्राधान्य वाढून साधनेबद्दल टाळाटाळ होऊ लागते तेव्हा हे ग्रंथ आपल्यासमोर योग्य वाक्ये आणतातच. या वस्तुस्थितीची प्रचीती आपणा सर्वांना येईलच. फक्‍त त्याकरीता आपल्याकडून सातत्याची मागणी भगवंत करीत आहे.

इथे अजून एक गोष्ट स्पष्ट कराविशी वाटते. ती म्हणजे काही साधकांना असे वाटते की त्यांची साधना फार कमी आहे. ते आपल्या जीवनाकडे प्रामाणिकपणे बघतात आणि त्यांना असे दिसते की खरे म्हणजे दिवसातील अमुक वेळ साधनेत जायला काही हरकत नाही पण प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा अत्यंत कमीवेळ आपण साधना करीत आहोत. ही वस्तुस्थिती दिसल्यावर त्यांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो की आपली साधना पुरेशी नाही. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण साधना कितीवेळ करतो हे महत्वाचे नाही तर किती नियमितपणे करतो हे महत्वाचे आहे. आपण दररोज एकदाच भगवंताचे नाव घेईन एव्हढे जरी ठरविले तरी पुरेसे आहे. तसे बघायला गेलो तर एकदा रामाचे नाव घ्यायला किती वेळ लागतो? पण तेव्हढासुध्दा पुरेसा आहे (जर आपण दररोज नाम घेतले तर!). भगवंताची शक्‍ती एव्हढी प्रचंड आहे की त्याचे एकदा नाव घ्यायला जो एक क्षण लागतो त्या क्षणार्धात तो आपल्याला मोक्ष देऊ शकतो. वेळेचे परीमाण लावून स्वतःच्या साधनेला दोष देण्यात चुकी आहे (परंतु एकदा ठरविलेली साधना नियमितपणे करीत नसाल तर जरुर स्वतःवर कोरडे ओढा!). एकदा ठरविले की सातत्य हवे. आणि आपली परीक्षा बघितल्याशिवाय भगवंत आपले सातत्य मानत नाही. उदाहरणार्थ, आपण दिवसा एकदातरी भगवंताचे नांव घेईल असा पण केला तर आपल्या जीवनात एक दिवस असा येईल की तेव्हढे नाव घेणेसुध्दा मुश्कील होऊन जाईल. त्या दिवशी एकामागोमाग एक अशा घटनाघडतील की त्यातच आपण गुंगून जाऊ आणि भगवंताला विसरु. अशावेळी नाम जो घेतो तो खरा. ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे. आपण कितीवेळ आणि किती कठीण साधना करतो याला महत्व नाही तर किती सातत्याने करतो आहोत त्याला महत्व आहे. म्हणून एखादा ग्रंथ वाचनात ठेवायचा असा पण केल्यावर नियमितपणा हवा. असो.

तर सांगायचा मुद्दा असा की अर्जुनाच्या स्वधर्माबद्दलच्या शंकेचे निरसन करायला भगवंत उभे होते कारण त्याने नियमितपणे त्यांची भक्‍ती केलेली होती! आणि संदेह निवारण करताना सर्वात आधी भगवंत त्याला जगाचे सत्य रुप दाखवित आहेत. मग आपोआपच त्याला असे कळेल की वस्तुस्थिती स्वतःच्या आप्तजनांच्या ममत्वामुळे आलेल्या दुःखाचे फोलपण सिध्द करीत आहे. तेव्हा युध्दाला नकार देण्याचा पायाच चुकीचा असल्याने युध्द न करणे अयोग्य आहे हे पटून तो धनुष्य उचलून लढायला लागेल. म्हणजे साधक आपला संसाराचा मोह सोडून साधनेला लागेल!!

या उद्देशाने वरील श्लोकात भगवंत व्यावहारीक सुख आणि दुःख का उद्भवते याचे कारण सांगत आहेत. ते म्हणत आहेत: ‘इंद्रियांना विषयाचा स्पर्श झाला की सुख आणि दुःख उत्पन्न होते, जसे थंडगार आणि सुखावह कोमट उष्णतेने त्वचेला दुःख आणि सुख मिळते. यांचे येणेजाणे सतत चालू असते आणि ते अनित्य आहेत म्हणून त्यांना तू सहन कर.’ इथे भगवंतांनी ‘तितिक्षा’ हा शब्द वापरला आहे. म्हणजे सहन कर असा उपदेश केला आहे.

परंतु ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकाची उकल करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तितिक्षा या शब्दाचा अर्थ ‘त्याग कर’ असा सांगितला आहे. ते म्हणतात:

हे विषय तरी कैसे । रोहणीचे जळ जैसे ।

कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाती ॥ १२१:२ ॥

देखे अनित्य ते यापरी । म्हणऊनि तूं अव्हेरी ।

हा सर्वथा संग न धरी । धनुर्धरा ॥ १२२:२ ॥

 

याचा अर्थ असा की इंद्रियांद्वारे जे सुख मिळत आहे त्याचा त्याग करताना जे दुःख तुझ्या मनात येईल ते तू सहन कर. म्हणजे सहन काय करायला हवे तर सुख आणि दुःख नव्हे, तर या दोन्हींचा त्याग करताना ज्या वेदना होतात त्या सहन कर असा फार गूढ अर्थ ‘तितिक्षस्व भारत’ या शब्दांचा माउलींनी आपणास सांगितला आहे. खरे म्हणजे गीता ही जणू एखाद्या शिक्षकाने स्वतःकरीता काही मुद्दे लिहून काढावेत तशी लिहीली आहे. त्यांचा आधार घेऊन फक्‍त अनुभवी शिक्षकच शिकवू शकतो. तो मुद्दे लिहीलेला कागद जर एखाद्या नवशिक्या विद्यार्थ्याच्या हातात आला तर त्याला पूर्ण ज्ञान होणार नाही. या दृष्टीकोनातून बघितले तर श्रीज्ञानेश्वरी म्हणजे भगवंतांनी आपणासारख्या कमजोर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले ‘गाईड’ आहे असे म्हणायला हरकत नाही!! आपल्या प्रत्येकाच्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनात जे काही परीक्षेचे क्षण येतात त्यातील सर्व प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे ह्यात आहेत यात शंकाच नाही.

 

इंद्रियसुख आहे असत्य । कुठूनि येणार त्यांत सातत्य ।

म्हणूनि ते असे अनित्य । अव्हेरुनि त्यांसी व्हा उत्तिष्ठ ॥

 

आपल्या भावार्थदिपिकेत ज्ञानेश्वर महाराजांनी वरील श्लोकाचे विवरण करताना केवळ तितिक्षा या शब्दाचेच गूढ रुप स्पष्ट केलेले नाही तर अनित्य या शब्दाचे देखील खरे रुप आपणास दाखविले आहे (‘प्रगट गुह्य बोले/ विश्व ब्रह्मचि केले’ असे त्यांना उगीच संबोधिलेले नाही!). ते कसे हे आपण आता बघू.

इंद्रियांमुळे मिळणारे सुख आणि दुःख येत-जात असतात हे आपण सर्वजण जाणतोच. तरीही आपली त्यांच्याबद्दलची ओढ कमी होत नाही. याचे कारण असे की जोपर्यंत इद्रिंयातर्फे आपणास सुख मिळत आहे तोपर्यंत आपण खरोखर सुखी असतो असे वाटते. ते अनित्य असले तरी त्याच्या असण्याचा काळ जर आपल्या आयुष्याएव्हढा असला तर पुरेसे आहे की ही भावना आपल्या सर्वांच्या मनात सूक्ष्मरुपाने असते. म्हणजे मी एक नवा टी.व्ही. विकत घेतला आहे आणि तो कधीतरी बिघडणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे (म्हणजे तो अनित्य आहे) पण जर तो अजून वीस वर्षे टिकला तर पुरेसे आहे या कल्पनेत आपण सुखी असतो. म्हणजे काय, तर सातत्य नसले तरी जोपर्यंत मिळत आहे तोपर्यंत सुख खरे आहे ही आपली भावना असते. अनित्यतेच्या ह्या व्याख्येमुळे आपण इंद्रियसुखापलिकडे जाऊ शकत नाही. परंतु महाराजांनी आपल्या या व्याख्येवरच प्रहार केला आहे. त्यांनी अनित्य या शब्दाची व्याख्या ज्यात सातत्य नसते अशी न करीता ‘जे अस्तित्वातच नसते’ अशी केली आहे! त्यांनी वर निर्देश केलेल्या ओवींमध्ये असे म्हटले आहे विषयाशी संयोग येण्यामुळे जे सुख मिळते ते एखाद्या मृगजळासारखे किंवा स्वप्नात दिसलेल्या हत्तींच्या कळपासारखे आहे. म्हणजे त्यात मुळातच सत्यता नाही. म्हणून ते अनित्य आहेत आणि त्यांना नाकारण्यात आणि त्यांचा संग सोडण्यातच शहाणपणा आहे. इंद्रियांमार्फत मिळणारे सुख म्हणजे निव्वळ कल्पनेचा खेळ आहे. सशाचे शिंग वा वांझेचा पुत्र यांना जसे अस्तित्व नसते, आपल्या कल्पनेमध्येच ते असू शकतात त्याप्रमाणे विषय आणि त्या विषयाचा उपभोग घेणारे इंद्रिय (सुंदर संध्याकाळ आणि आपली दृष्टी, स्वयंपाक आणि आपली रसना, स्तुती आणि आपला कान, घरी आणलेला नविन टी.व्ही. आणि आपले मन इत्यादी) यांचा संयोग झाल्यामुळे जे सुख मिळते हा आपल्या कल्पनेचा खेळ आहे. त्यात सत्यताच नाही. एखाद्या मादक द्रव्याचे सेवन करुन मनाला सुख लाभलेले आपण खरे मानत नाही तशी ही गोष्ट आहे असे महाराज म्हणत आहेत.

असे बघा, तुम्हाला श्रीखंड-पुरी आवडत असेल म्हणून तुमच्या आईने, वा पत्नीने ती करुन खायला घातली की तुम्ही सुखी होता आणि ते सुख खरे आहे असे म्हणता. परंतु रसना आणि श्रीखंड-पुरी यांच्या संयोगाने सुख मिळत असले तर तीच श्रीखंड-पुरी दररोज करुन घातली तरी सुख मिळायला हवे. कल्पना करा की दररोज श्रीखंड-पुरी तुम्हाला मिळत गेली तर सुख मिळणे बंद होईलच आणि त्या पदार्थाची आवडही निघून जाईल! किंवा पहिल्यांदा खातानाही जर तुमच्या जिवलग मित्राला मोठा अपघात झाला आहे ही बातमी तुमच्या कानावर आली तर भोजनाची चवच निघून जाईल आणि सुख मिळणे बंद होईल. सांगायचा मुद्दा असा की निव्वळ एक ज्ञानेंंद्रिय आणि त्याचा विषय यांच्या संयोगाने सुख आणि दुःख निर्माण होत नाही तर त्यात आपल्या मनाची ओढ लागते. आणि मनाची ओढ हा कल्पनेचा खेळ आहे. स्वप्नातील राजकुमारीशी लग्न करुन मी सुखी होत नाही पण व्यवहारात लग्न केल्यावर सुखाची अपेक्षा मी बाळगतो. पण या दोन्हींमध्ये काय फरक आहे? माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे माझी पत्नी वागली तरच मला सुख मिळणार. म्हणजे कल्पनेवरच सर्वकाही आधारीत आहे. आणि आपले मन एव्हढे चंचल आहे की दरक्षणी त्याला काहीतरी नविन हवे आहे. म्हणून इंद्रियसुख अनित्य आहे असे महाराज म्हणत आहेत. इंद्रियसुखाची अनित्यता स्थूलात नाही तर सूक्ष्मात आहे, मनात आहे. म्हणून ते कधीही स्थिर रहाणारे नाही. आज ज्याने सुख मिळते त्याने उद्या सुख मिळणारे नाही. सुख मिळण्याचे एखादे समीकरण आपण आयुष्यात कधीही मांडू शकणार नाही हे सत्य आहे आणि सुखप्राप्तीचे इक्वेशन मांडण्यातच आपले जीवन व्यतीत होत आहे ही वस्तुस्थिती आहे! यातील स्पष्ट विसंगतीच आपल्या मनाच्या अस्वस्थतेचे मूळ आहे. इंद्रियांवर आधारित सुखाचे समीकरण शोधणे स्वतःच्या आयुष्यात थांबविणे म्हणजेच माउलींनी सांगितल्याप्रमाणे त्यांना अव्हेरणे होय, त्यांचा संग सर्वथा सोडणे होय. मग आपला सुखाचा शोध साहजिकच आपणास भगवंताकडे घेऊन जाइल असे माउली म्हणत आहे.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक २ ऑगस्ट २००९)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: