Shloka32/2: Adversity is Sadguru’s proximity

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम ।

सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युध्दमीदृशम ॥ गीता ३२:२ ॥

 

अर्जुनाच्या मनातील कुरुक्षेत्रावरील युध्द योग्य आहे की नाही या संदेहाची कारणे व्यावहारिक होती, पारमार्थिक नव्हती. त्याच्या मनातील गोंधळाचे मूळ स्वतःच्या नातेवाइकांचा वध करुन राज्य उपभोगणे योग्य आहे का या प्रश्नात होते. आणि हा गोंधळ पशुपक्ष्यांच्या मनात उद्भवलेला दिसत नाही. ‘बळी तो कान पिळी’ हा न्याय त्यांच्या जीवनात अत्यंत निष्ठुरपणे अंमलात आलेला दिसतो. म्हणून असे म्हणायला हरकत नाही की अर्जुनाच्या व्यथेचे कारण तात्कालीन सामाजिक रीतीनियम होते. जर समाजामध्ये आपल्यावर उपकार केलेल्याबद्दल आयुष्यभर ऋणी रहावे अशी प्रथा नसती तर गीतेचे मूळच नष्ट झाले असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यावरुन आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आपली एक ठराविक नैतिक प्रगती झाली तरच आपल्या आयुष्यात गीता येण्याचा संभव आहे. भगवद्गीतेमधील तत्वज्ञान समजण्यास माणसाच्या मूलभूत गरजा पुऱ्या होणे आवश्यक आहे. गीतेमधील ज्ञान हे शाश्वत सत्य असले तरी ते कुणालाही, कधीही हे तत्वज्ञान समजेल असे वाटत नाही. हा एक खूप सूक्ष्म मुद्दा आहे. खुद्द भगवंतांनीसुध्दा अठराव्या अध्यायात कुठल्या साधकांना गीता सांगावी याचे वर्णन केले आहे याचे कारण भगवद्गीतेचे तत्वज्ञान सर्वांच्या पचनी पडेल असे नाही हेच आहे. काही साधकांना स्वतःला झालेले ज्ञान स्वकियांना वाटण्याचा अतिशय उत्साह असतो. परंतु परमार्थाच्या गप्पा मारण्याआधी आपल्या जवळच्या माणसांची मानसिक तयारी कितपत झाली आहे हे बघणे अत्यावश्यक आहे. तर अध्यात्म ग्रहण करण्याची मानसिक तयारी नसेल तर त्यांची बौध्दीक पातळी कितीही उच्च असली तरी आपल्या साधनेबद्दल ते साशंकच रहातात. ‘गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता’ ही म्हण रुढ होण्यास उचित कारणे आहेत या शंका नाही. परंतु कितीही मानसिक तयारी असली तरी अध्यात्माचे सार सहज पचनी पडत नाही. नुसती मानसिक क्षमता असणे पुरेसे नाही. अमूर्त ज्ञानामध्येच स्वारस्य वाटले पाहिजे. अमुक एक गोष्ट कळली, पण त्याचा उपयोग काय? ह्या विचारप्रणालीच्या बाहेर पडून केवळ ज्ञान मिळाले याच्या आनंदात रममाण होण्याची वृत्ती अंगात भिनेस्तोवर आपण संपूर्ण ज्ञानास पात्र होत नाही. ‘तुका म्हणे आम्हा, शब्द हेचि संपत्ती’ असे आपण प्रामाणिकपणे म्हणू शकलो तरच आपली मनोभूमिका तयार झाली असे मानण्यास हरकत नाही. या कारणांमुळे भगवंतभेटीची कितीही उत्कट इच्छा असली तरी सुरुवातीला आपण अडखळतच परमार्थाच्या मार्गावर पाय ठेवतो. याचा आपल्या जीवनातील दृष्य परीणाम म्हणजे साधनेमुळे एखादी गोष्ट कळली की ती बरोबर आहे की नाही हे बघण्याचा आपला सुरुवातीचा निकष व्यावहारिकच असणे ही घटना होय. उदाहरणार्थ, संतांना महत्व द्यायचे आपणा सर्वांचे प्रथम कारण त्यांनी किती लोकांचा उध्दार केला हेच असते. असा विचार करण्यात त्यांचा संतपणा त्यांच्या समोर आलेल्या पतित माणसांवर अवलंबून होतो हे आपल्या ध्यानातसुध्दा येत नाही! साधकाच्या अशा मानसिक स्थितीची कल्पना भगवंतांना नसेल असे होणे शक्यच नाही. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करीत असताना ते व्यावहारिक दृष्टीकोनातून आपल्या भूमिकेचे समर्थन करीत आहेत असे दिसते. स्वर्गप्राप्ती म्हणजे भक्‍तीची अंतिम गती नव्हे ही वस्तुस्थिती असूनही ते अर्जुनाला युध्द केल्यास स्वर्ग मिळेल असे सांगतात याचे कारण अजून अर्जुनाच्या मनाची तयारी निव्वळ ज्ञानाकरीता ज्ञान मिळवायचे अशी झालेली नाही हे आहे. अर्जुनाची साधनेतील पातळी परमार्थाचे तत्व सामाजिक निकषांशिवाय समजायची झाली की मग भगवान श्रीकृष्ण व्यावहारिक उपदेशांची कुबडी फेकून देतात हे गीतेमधील पुढील अध्याय वाचल्यावर ध्यानात येते. असो.

तर, अर्जुनाची सद्यमनस्थिती लक्षात ठेवून भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत आहेत: ‘हे अचानक समोर आलेले युध्द म्हणजे स्वर्गाचे द्वारच तुझ्याकरीता खुले झाले आहे असे समज. अर्जुना, फार थोड्या भाग्यवान क्षत्रियांच्या जीवनात असे युध्द लढायचा शुभप्रसंग येतो.’ भगवंताच्या ह्या उच्चारांचे माउलींनी फारच रसिक भाषेत वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात:

 

अर्जुना जुंझ देख आतांचे । हे हो का दैव तुमचे ।

कां निधान सकळ धर्मांचे । प्रकटले असे ॥ १९१:२ ॥

क्षत्रिये बहुत पुण्य कीजे । तैं जुंझ ऐसे लाहिजे ।

जैसे मार्गे जाता आडळिजे । चिंतामणीसी ॥ १९४:२ ॥

ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटे पडे पीयुख ।

तैसा संग्राम हा देख । पातला असे ॥ १९५:२ ॥

 

‘अर्जुना हे आत्ता समोर आलेले झुंज म्हणजे तुमच्या सकळ धर्मांचे भांडार आहे. क्षत्रियांनी अगणीत पुण्य केल्यावरच असे युध्द त्यांच्या भाग्यात येते. एखाद्याने वाटेत चालताना कशाला ठेच लागली म्हणून बघावे आणि चिंतामणी (एक असे रत्न की ज्याच्या सहाय्याने मनातील कुठलीही इच्छा पूर्ण होते) दिसावा किंवा जांभई देण्याकरीता आ वासावा आणि उघडलेल्या मुखात वरुन अमृत पडावे त्याप्रमाणे हा संग्राम तुझ्यासमोर (तू काहीही सायास न करीता) आला आहे’ असा वरील ओव्यांचा शब्दार्थ आहे. आज यांचा भावार्थ जाणून घ्यायचा आपण प्रयत्‍न करुया.

 

येता सामोरे प्रसंग बिकट । सरते जणू पायतळीची वाट ।

येतात ह्याचक्षणी सद्‌गुरु निकट । चला करुया दुःखाचे स्वागत ॥

 

जेव्हा अचानक आणीबाणीचा प्रसंग उत्पन्न होतो तेव्हाच आपली खरी परीक्षा होते. आपणा सर्वांना बिरबलाने अकबराच्या दरबारातील बहुरुपियाच्या बैलाच्या रुपाची परीक्षा कशी घेतली होती हे माहिती असेलच (अचानक त्याच्या पार्श्वभागावर त्याने छडीचे टोक टोचले. बहुरुपियाने फक्‍त स्पर्श केलेला भागच थरथरविला हे बघून छोटा बिरबल खुश झाला, अशी गोष्ट आहे.). बिरबलाची तीक्ष्ण बुध्दी आणि बहुरुपियाचे खरे कौशल्य या प्रसंगाने बादशहा अकबराच्या लक्षात आले. अचानक आपल्या जीवनात जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा भगवंत बिरबलासारखी आपली परीक्षा घेत आहे असे समजावे. म्हणजे काय तर अशावेळी भगवंत आणि आपल्यात यांमध्ये केवळ एका छडीचे अंतर आहे असे समजून कृतज्ञ व्हावे! आपण आत्तापर्यंत शिकलेल्या सर्व विद्यांचे खरे ज्ञान अशावेळी पणाला लागते. आणि वरील ऐतिहासिक गोष्टीसारख्याच भगवंताच्या परीक्षा फार सूक्ष्म असतात. उदाहरणार्थ, ऑफिसमधून थकून आल्यावर घरी मनासारखे स्वागत होत नाही अशी परिस्थिती निर्माण करुन आपले अध्यात्म किती रुजले आहे याची परीक्षा सद्‌गुरु घेऊ शकतात! परंतु काही भाग्यवान लोकांच्या जीवनात आणिबाणीचे प्रसंगदेखील मोठे असतात. त्यांचे संपूर्ण आयुष्य ढवळून काढणारी आपत्ती त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभी राहते. एका अर्थाने अशी माणसे भाग्यवानच म्हटली पाहीजेत. निदान आता परीक्षेचा क्षण आला आहे हे तरी त्यांना सहजपणे कळू शकते. आणि भोगणाऱ्याची संकटाला तोंड देण्याची तयारी असल्याशिवाय कुठलीही आपत्ती भगवंत आणत नाही. तेव्हा मोठे संकट ज्याच्यावर येते त्याची त्या संकटाला सामोरे जायची क्षमता असते म्हणूनच येते. अर्जुनाने आयुष्यभर केलेल्या कृष्णभक्‍तीचा परीणाम म्हणूनच त्याच्या मनात युध्दाबद्दल संदेह निर्माण झाला. हा संदेह भीम वा युधिष्ठीर यांच्या मनात आला नाही हे लक्षात घ्या! खरे म्हणजे आपली परमार्थात किती प्रगती झाली आहे हे आपल्या अंगावर आलेल्या संकटावरुन कळते. जितके मोठे संकट तितकी मोठी प्रगती असे साधकाने मानायला हरकत नाही. जेव्हा सद्‌गुरुंना पूर्ण खात्री असते की आलेल्या आपत्तीमधून साधक वाट काढू शकेल तेव्हाच प्रामाणिक साधकाच्या जीवनात संकटे येतात. गीतेमध्ये भगवंतांनी माझ्या भक्‍ताची सर्व काळजी मी घेतो असे म्हटले आहे याचा अर्थ त्यांच्या अंगावर संकटे येणारच नाहीत असे नाही, तर सर्व संकटे योग्यवेळी येतील असा आहे.

परंतु स्वतःकडे क्षमता असली तरी त्या क्षमतेचा योग्य उपयोग करायला हवा तेव्हाच फायदा होतो. उदाहरणार्थ, घराबाहेरील गोठ्यात दुभती गाय आहे, दूध काढायची हातोटी आहे पण दूध स्वतः गोठ्यात जाऊन गायीची आचळे पिळल्यावरच मिळते, आधी नाही. त्यामुळे अर्जुनाकडे युध्दाला तोंड देण्याची क्षमता आहे, युध्द केल्याने स्वधर्म पाळला जाणार आहे पण स्वधर्माचे फळ जेव्हा अर्जुन युध्द करेल तेव्हाच मिळणार. म्हणून अर्जुनाला भगवान असे म्हणत आहेत की हे समोर आलेले युध्द तुला स्वतः मध्येच असलेल्या खऱ्या शक्‍तीची ओळख करुन देणार आहे. अंगात मोठी शक्‍ती असली तरी तीचा योग्य विनियोग करण्याची संधी जीवनात आली नाही तर काय उपयोग? सचिन तेंडुलकर आयुष्यभर आपल्या गल्लीतच क्रिकेट खेळत राहीला तर त्याच्या उपजत फलंदाजीच्या गुणांचा खरा उपयोग झाला असता का? दक्षिण आफ्रिकेमधील एकदिवशीय क्रिकेटच्या विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत हिरव्या खेळपट्‍टीवर शोएब अख्तरच्या सुसाट चेंडूंना तोंड देण्याच्या कठीण प्रसंगाचा सामना करुनच त्याने आपले गुण निर्विवादपणे सिध्द केले. तेव्हा अर्जुनासमोर आलेला युध्दाचा प्रसंग एक आपत्ती नव्हती तर स्वतःचे कर्तृत्व ओळखण्याची संधी होती. उच्च तत्वांकरीता आप्तजनांच्या प्रेमाचा धिक्कार करण्याचे धैर्य स्वतःमध्ये आहे हे अर्जुनाला ठाऊक नव्हते. परंतु त्याच्या सद्‌गुरुंना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आपल्या शिष्याबद्दल पूर्ण खात्री होती. म्हणूनच त्यांनी अर्जुनाच्या मनातील संदेहाला अजिबात पुष्टी दिली नाही. त्यांनी त्याच्यामधील सुप्तावस्थेत असलेल्या धैर्याला योग्य शब्दांनी जागृत केले. मग त्याकरीता स्वर्गप्राप्तीचे आमीष दाखवायलासुध्दा त्यांनी ना म्हटले नाही!

आपल्या जीवनात ज्या ज्या वेळी साधना करणे योग्य का व्यावहारिक जगात गुंतणे योग्य यांत संदेह निर्माण होतो त्या त्या वेळी आपली अवस्था जणू कुरुक्षेत्रावरील अर्जुनाप्रमाणे झालेली असते. अशावेळी आपण कुणाकडे सल्ला विचारायला वळतो हे फार महत्वपूर्ण आहे. अर्जुनाप्रमाणे जर आपण आपल्या सद्‌गुरुंशी आपलेपणाचे नाते जोडलेले असेल तरच मोक्याच्या क्षणी त्यांच्याकडे आपण जाणार. म्हणून आयुष्य सुरळीत चाललेले असताना साधना अत्यंत निष्ठेने करणे आपणास जरुरी आहे. साधनेचे प्राथमिक ध्येय जीवन सुरळीत असावे असे जरी असले तरी मनाप्रमाणे घडल्यावर साधनेला न विसरणे आणि तीच्याबद्दल आत्मीयता वाढविणे ज्याला जमले तो प्रगतीच्या पुढच्या पायरीवर पोहोचण्यास पात्र होतो आणि त्याच्यासमोर आपत्ती येतात.

आपण साधना सोडून दिली तरी आपत्ती येतात आणि चालू ठेवली तरी आपत्ती येतात. संकटे येणार हे आपल्या जीवनातील शाश्वत सत्य आहे. साधना सोडल्यामुळे येणाऱ्या आपत्तींमुळे परमार्थात प्रगती होत नाही आणि साधना निष्ठेने चालू असताना आलेल्या संकटांमुळे साधनेत प्रगती होते हा महत्वाचा फरक आलेल्या संकटांमध्ये आहे. जर साधना सुरु असेल तर आलेल्या आपत्ती म्हणजे पुढील प्रगतीच्या स्वर्गाचे द्वार आपल्यासाठी खुललेले आहे असे साधकाने समजल्यास चुकी नाही. भगवंतांनी हे वचन अर्जुनामार्फत आपणा सर्वांनाच दिलेले आहे असे वाटते.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक ९ ऑगस्ट २००९)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: