Shloka (58+59)/2: The desireless state of mind

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

यदा संहरते चायं कुर्मोंऽगानीव सर्वशः ।

इंद्रियाणीद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ गीता ५८:२ ॥

 

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।

रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ गीता ५९:२ ॥

 

दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला युध्द कर असा उपदेश करीत असताना भगवान श्रीकृष्ण कर्मफळाची आशा सोडून निर्हेतुकपणे कर्मे करीत असणाऱ्या स्थितप्रज्ञ माणसांचे कौतुक करतात. त्यामुळे अर्जुनाच्या मनात स्थितप्रज्ञ माणसाबद्दल आत्मीयता उत्पन्न होऊन अशा महामानवाला ओळखायचे कसे हा प्रश्न उद्भवला. म्हणून त्याने भगवंताकडे स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे काय असतात अशी पृच्छा केली. तेव्हा भगवंतांनी स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणे अर्जुनास कथन केली. त्यातील वरील दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी असे सांगितले की ‘ज्या माणसाची प्रज्ञा पूर्ण विकसित झाली आहे तो मनुष्य विषयापासून आपले अंग असे काढून घेतो की जसे कासव आपले हातपाय कवचात (आपले संरक्षण करण्यास) ओढून घेते. जो मनुष्य विषयांचे सेवन करीत नाही त्याची इंद्रिये विषयापासून परावृत्त होतात परंतु त्याच्या मनातील भोग उपभोगण्याची इच्छा नाहीशी होत नाही. विषयवासनेला नष्ट करण्यास परब्रह्माचे दर्शन हाच एक उपाय आहे’. श्रीमद्‍ भगवद्‍गीता किती खोल आणि सूक्ष्म विचार आपल्यासमोर सांगत आहे ते बघा. स्थितप्रज्ञ माणूस विषयांपासून आपले अंग दूर काढतो हे खरेच आहे. परंतु जेव्हा एखाद्या मनुष्याच्या वृध्दापकाळी अनंत व्याधी मागे लागतात तेव्हा पथ्य सांभाळण्याच्या निमित्ताने कित्येक विषयांपासून तो दूर राहीला तरी तो स्थितप्रज्ञ झाला असे आपण म्हणत नाही ही वस्तुस्थितीसुध्दा गीता आपल्यासमोर मांडत आहे. विषयांपासून दूर राहिले तर इंद्रियांच्या मागण्या कमी होतात हे खरे असले तरी मनातील वासनांचे निराकरण होत नाही. उदाहरणार्थ, मधुमेहामुळे साखर खाणे सोडले तरी साखरेच्या चवीबद्दलची आत्मीयता जात नाही! तेव्हा स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये हेसुध्दा सांगितले आहे की त्याच्या मनातून विषयवासनांचेही संपूर्ण उच्चाटन त्याच्या ‘अहं ब्रह्मास्मि’ या अनुभूतीमुळे झालेले आहे. या दोन श्लोकांवरील आपल्या गीताभाष्यामधील टीकेत जगद्‍गुरु आदि शंकराचार्य असे म्हणतात की ‘एखादा मूर्ख मनुष्यदेखील आपल्या मनावर जबरदस्ती करुन स्वतःला विषयांपासून दूर ठेवील. पण त्यामुळे तो स्थितप्रज्ञ झाला असे आपण म्हणू शकत नाही’. म्हणजे काय तर विषयांचा लौकीक दृष्टीकोनातून त्याग करणाऱ्याच्या मनातील भोग उपभोगण्याबद्दलची आस्था गेली आहे का नाही यावर लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

या श्लोकांवर माउलींनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्या अशा आहेत.

 

का कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।

नातरी इच्छावशे आवरी । आपुले आपण ॥ ३०१:२ ॥

तैसी इंद्रिये आपैती । जयाचे म्हणितले करिती ।

तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३०२:२ ॥

अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐके कवतिक ।

जे विषयाते साधक । त्यजिती नियमे ॥ ३०३:२ ॥

श्रोत्रादि इंद्रिये आवरिती । परी रसने नियम न करिती ।

ते सहस्त्रधा कवळिजती । विषयीं इंही ॥ ३०४:२ ॥

जैसी वरिवरी पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।

तरी कैसेनि नाश निपजे । तया वृक्षा ॥ ३०५:२ ॥

तो उदकाचेनि बळे अधिके । जैसा आडवेनि आंगे फांके ।

तैसा मानसीं विषय पोखें । रसनाद्वारे ॥ ३०६:२ ॥

येरा इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमू नये रस हटे ।

जे जीवनचि हे न घटे । येणेविण ॥ ३०७:२ ॥

मग अर्जुना स्वभावे । ऐसियाही नियमाते पावे ।

जैं का परब्रह्म अनुभवे । होऊनि जाइजे ॥ ३०८:२ ॥

तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती ।

जैं सोहंभाव प्रतीती । प्रगट होय ॥ ३०९:२ ॥

 

वरील ओव्यांचा शब्दार्थ सांगताना सर्व भाष्यकारांनी ओवी क्रमांक ३०४, ३०६, आणि ३०७ मध्ये आलेल्या ‘रसना’ या शब्दाचा अर्थ जिव्हा असा केला आहे. श्री साखरे महाराज, वेदांतकेसरी बाबाजी महाराज पंडित, बा.अ. भिडे इत्यादिकांनी रसनेंद्रियावर विजय मिळविणे केवळ आत्मज्ञानाने साध्य होते असे सांगितले आहे. या सर्व लोकांचा अधिकार फार मोठा आहे आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास प्रचंड आहे. परंतु तरीसुध्दा माझ्या मतीला असे वाटते की ‘रसना’ या शब्दाचा अर्थ ‘रस घेणे’ वा ‘रस असणे’ अथवा ‘रुचि’ असा लावणे जास्त संयुक्तिक आहे. गीतेमधील ५९व्या श्लोकामध्ये भगवंतांनी ‘निराहारस्य देहिनः’ हे शब्द उच्चारले आहेत त्याचा अर्थ आदि शंकराचार्यांनी विषयांपासून दूर रहाणे असा केला आहे आणि माउलींनीसुध्दा ‘जे विषयाते साधक, त्यजिती नियमे’ असा सांगितला आहे. तेव्हा श्लोकामधील निराहार हा शब्द ‘खाणे’ या क्रियेला उद्देशून नाही हे स्पष्ट आहे. त्यानंतर गीतेमधील श्लोकामध्ये ‘रस’ हा शब्द वापरला आहे त्याचा अर्थ सर्व टीकाकार विषयाबद्दलची आस्था असेच करतात. तेव्हा मूळ श्लोकामध्ये जिव्हेला बाकीच्या इंद्रियांपासून वेगळे केले आहे असे दिसत नाही. ज्ञानेश्वरीतही या श्लोकानंतर आहारावर नियंत्रण ठेवणे आत्मज्ञानाशिवाय अशक्य आहे असे परत सांगितलेले दिसत नाही. आणि ‘रसना’ या शब्दाचा एक अर्थ ‘उपभोग घेण्याची इच्छा’ असा आहे. आणि आपले जीवन रसना काढली तर संपून जाईल असे जे माउलींनी ३०७व्या ओवीत सांगितले आहे ते या अर्थानेही खरे आहे. जरा विचार करुन पहा की आपण जीवन जगतो ते कुठल्या ना कुठल्या विषयाचा उपभोग घेण्याची इच्छा धरुनच जगतो. अगदी तत्वाकरीता जीवन व्यतीत करणारी थोर माणसे बघितली तरी ती त्या तत्वाचा पूर्ण आस्वाद घेण्याकरीताच जगत आहेत असे दिसते. म्हणजे मनात उत्पन्न झालेल्या एका उच्च विचाराचा आस्वाद घेण्यातच त्यांचे आयुष्य गेले आहे असे दिसते. मनाला अकरावे इंद्रिय म्हटले असण्याने अशी समाजसेवी माणसेही इंद्रियांच्या सुखाच्या इच्छेनेच जिवंत आहेत असे दिसते. जर आपल्या जीवनात संसाराखेरीज अन्य कुठली वस्तूच नसेल तर आपले जीवन जगण्याचा हेतू कुठल्या ना कुठल्या इंद्रियाला सुखी करण्यामध्येच असणार हे स्पष्टच आहे. म्हणून विषयांबद्दलची इच्छा पूर्णपणे गेली तर आपले जीवनच संपेल असे महाराज म्हणत आहेत यात विसंगती न दिसता त्यांची अत्यंत प्रगल्भ आणि अलौकिक निरिक्षणक्षमता प्रगट होते! अजून दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात बघितले तर जिव्हेवर ताबा मिळविणे कठीण आहे असे दिसून येत नाही. मधुमेह झाला आहे हे लक्षात आल्यावर कित्येकजण साखर खाणे संपूर्ण थांबवितात असे दिसून येते. किंवा ह्रुदयविकार आहे हे कळल्यावर कित्येकांच्या आहारातील तळकट, तुपकट पदार्थ लगेच नाहीसे होतात असे आढळते. ही माणसे स्थितप्रज्ञ झाली आहेत असे समजणे रास्त आहे असे वाटत नाही.

तेव्हा, वरील विचारमंथनामुळे वरील ओव्यांचा अर्थ असा सांगावासा वाटतो:

ज्याप्रमाणे कासवाच्या मनाला वाटले तर तो आपले अवयव पसरतो आणि पाहिजे तेव्हा आपल्या जवळ आणू शकतो त्याप्रमाने जो मनुष्य आपली इंद्रिये स्वतःच्या कह्यात ठेवतो त्याची प्रज्ञा सर्वात उच्च स्थितीला पोहोचली आहे असे समज (ओ.क्र. ३०१,३०२). पण इथे अर्जुना एक खुबी तुला सांगाविसी वाटते. ती म्हणजे नियमांच्या आधारे जे साधक श्रवणेंद्रियादी इंद्रिये आवरतात पण त्या इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या सुखाबद्दलच्या आस्थेला काढून टाकत नाहीत ते परत हजारबाजूनी विषयांत घुसतात (ओ.क्र. ३०३,३०४). ज्याप्रमाणे वरवरची पालवी खुडून टाकली आणि वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले तर त्या वृक्षाचा नाश न होता अजून आडव्या अंगाने तो फाकतो त्याचप्रमाणे मनुष्याच्या मनात विषयवासनेद्वारे विषयांचे पुनरागमन होते (ओवी क्र, ३०५,३०६). बाकी इंद्रियांपासून विषय दूर करु शकतो तशी विषयसुखाची आस्था आपण मनातून काढू शकत नाही कारण आपले जीवनच त्या आस्थेवर अवलंबून असते. (ओवी क्र. ३०७) परंतु अर्जुना जेव्हा परब्रह्माचा अपरोक्ष अनुभव जेव्हा मिळतो तेव्हा ह्या वासनेवरही आपोआप नियंत्रण होते (ओ.क्र. ३०८). जेव्हा सोऽहं भावाची प्रतीती आपणास मिळते तेव्हा आपण म्हणजे शरीर हा भाव मनातून पूर्ण नष्ट होतो आणि सर्व इंद्रिये विषय विसरतात (मन सुध्दा उपभोगाचे सुख विसरते) (ओवी क्रमांक ३०९).

वरील शब्दार्थ आपणाकडे असलेल्या ‘सार्थ ज्ञानेश्वरी’त सापडला नाही तरी आपण विचार करुन स्वतःला जो अर्थ पटेल तो घ्यावा अशी विनम्र विनंती आहे. प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात प्रतिबिंबित होणारा श्रीज्ञानेश्वरीचा अर्थ ग्राह्य समजावा अशीच माउलींची इच्छा असल्याने आपले मत आपल्या जीवनात योग्यच असणार यात शंका नाही. वरील विवेचनाद्वारे लेखकाच्या आयुष्यात उमटलेला ज्ञानेश्वरीचा नाद आपल्यासमोर आणायचा प्रयत्‍न केला आहे. असो.

आता सोऽहं भावाच्या उदयाने विषयांचे निर्मूलन कसे होते ते आपण बघूया.

 

जेव्हा असते अपूर्णतेची जागृती । उद्भवते मनात विषयांची आसक्‍ती ।

परिपूर्णतेची जेव्हा होय खात्री । वासनाविरहीत नांदाल ‘स्व’संगती ॥

 

कुठल्याही विषयाची आस्था आपल्या मनात उद्भवण्याचे कारण म्हणजे त्या उपभोगाद्वारे आपले जीवन अधिक सुंदर होईल ही आपली खात्री होय. भूक लागल्यावरच उत्कृष्ट भोजन मिळावे अशी इच्छा निर्माण होते. कारण त्यायोगे आपल्या जीवनातील अन्नाची कमतरता निघून जाऊन जीवन आहे त्यापेक्षा जास्त सुखावह होईल ही खात्री आपल्या मनात असते. जरा विचार केला तर असे दिसून येते की आपल्या प्रत्येक इच्छेमागे स्वतःच्या जीवनातील जाणविलेली कुठलीतरी कमतरता आहे. पोटभर जेवण झालेले आहे, सर्व कामे आटोपली आहेत, सुखद हवेची झुळुक येत आहे अशा परिस्थितीत आपण निवांत बसतो, वा झोपी जातो. त्यात अजून काही हवे आहे असा विचारसुध्दा आपल्या मनात येत नाही. तेव्हा मनातील विषयांची आस्था संपूर्णपणे जायला हवे असेल तर आपल्या जीवनात परिपूर्णता यायला हवी. एखादा कर्तबगार मनुष्य आयुष्यभर कष्ट करुन स्वतःचे ध्येय प्राप्त केल्यावर ‘आता मी सुखाने मरायला तयार आहे’ असे मनापासून उद्गारतो त्याप्रमाणे आपली अवस्था झाली तरच आपण विषयवासनेतून मुक्‍त होणार. विषयांचा उपभोग घेऊन मनुष्य विषयांतून का बाहेर येत नाही या प्रश्नाचे उत्तर यात आहे. उपभोग घेऊन झाल्यावर परत आपण कोरडेच असतो. क्षणापूर्वी मनसोक्त उपभोगीलेला विषय परत कधीतरी हवासा वाटणार असतोच. आपल्याला जीवनात अधिक काही नको ही अवस्था बाह्य गोष्टींच्या उपभोगाने मिळत नाही तर मनातील समाधानाने मिळते. ज्या क्षणी आपण परब्रह्माचे एक अंश आहोत या वस्तुस्थितीची प्रचीती येते त्यावेळी मनात इतके समाधान भरुन येते की ‘अजून काही हवे’ ही कल्पनाच आपल्या जीवनातून नष्ट होते. आयुष्यभर ज्या समाधानाकरीता आपण तडफडत होतो ते मानसिक समाधान मिळाल्यावर अधिक काही हवे असे कशाला वाटेल? म्हणून माउली म्हणत आहे की अहं ब्रह्मास्मि हा भाव मनात प्रगट झाला की स्वाभाविकरीत्या रसनेवर, म्हणजे विषयसुखाबद्दलच्या वासनेवर नियंत्रण प्राप्त होते. ते नियंत्रण प्राप्त करण्यास वेगळे साधन करावे लागत नाही. बुध्दीबळामध्ये राजा मारल्यावर आपोआपच सर्व प्याद्यांचे जीवन संपुष्टात येते तशी ही गोष्ट आहे. माउलींनी असा अत्यंत सूक्ष्म विचार आपल्यासमोर मांडला आहे की जोपर्यंत आपण स्वतःला भगवंतापासून वेगळे मानत आहोत तोपर्यंत विषयवासनेपासून आपणास सुटका नाही. म्हणूनच भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे कुठलेही ध्येय परमार्थाचे अंतिम ध्येय होऊ शकत नाही.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक १६ ऑगस्ट २००९)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: