Ovi1to5/4: ऐकण्यावर आपले आयुष्य उभे आहे

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

आजी श्रवणेंद्रियां पाहलें । जे येणें गीतानिधान देखिलें ।

आतां स्वप्नचि हे तुकलें । साचासरिसें ॥ १:४ ॥

आधींचि विवेकाची गोठी । वरि प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी ।

आणि भक्तराज किरीटी । परिसत असे ॥ २:४ ॥

जैसा पंचमालाप सुगंध । कीं परिमळ आणि सुस्वाद ।

भला जाहला विनोद । कथेचा इये ॥ ३:४ ॥

कैसी आगळिक दैवाची । जै गंगा जोडिली अमृताची ।

हो का जे तपें श्रोतयांची । फळा आलीं ॥ ४:४ ॥

आतां इंद्रियजात आघवें । तिंहीं श्रवणाचे घर रिघावें ।

मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥ ५:४ ॥

 

भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोग म्हणजे काय हे विषद केले आणि सांगितले की ‘तू कर्मयोगालाच पात्र आहेस.’ आता चतुर्थ अध्यायात कर्मयोगाचे महत्व सिध्द करीत असताना ते म्हणतात की मी पूर्वी विवस्वानाला हा योग सांगितला आणि त्यानंतर तो सर्वश्रुत झाला. परंतु विषयांचा उपभोग घेण्याची वासना जनांमध्ये प्रबळ झाल्यावर ह्या योगाकडे साहजिक दुर्लक्ष झाले आणि आता फारच विरळा लोकांना कर्मयोग म्हणजे काय हे माहित आहे. असे सांगून चतुर्थ अध्यायात भगवान श्रीकृष्ण कर्मयोगाचे गुह्य अर्जुनाला प्रगट करुन सांगतात. जे गुह्य संसारातील बहुतांशी जनांना उपयुक्‍त आहे ते या अध्यायात भगवंतांनी उघडपणे सांगितले म्हणून या अध्यायाची सुरुवात करीत असताना श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत: ‘आज श्रवणेंद्रिय असल्याचा खरा उपयोग झाला आहे कारण त्यायोगे मी गीतेमधील दडलेला (साधनेचा) ठेवा बघितला, जणू माझे स्वप्नच इथे प्रत्यक्षरीत्या साकार झाले आहे. परमार्थामधील अत्यंत महत्वाची गोष्ट इथे साक्षात जगनियंता श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे आणि एक अत्यंत पराकोटीचा भक्‍त अतिशय प्रेमाने ते बोलणे ऐकत आहे. हा सर्व प्रसंग म्हणजे गायक सुंदररीत्या कोमल पंचम गात असताना सुगंधाच्या लहरी याव्यात, किंवा उत्तम स्वादाच्या भोजनात पक्वांनांचा सुवासही यावा असा दुर्मिळ आहे. जणू अमृताची गंगाच हातात यावी अश्या या दुर्लभ योगाने सर्व श्रोत्यांनी जन्मोजन्मीं केलेली तपें फळाला आली आहेत. आता बाकी सर्व इंद्रियांचा विसर पाडून श्रीकृष्णार्जुनांचा संवाद मनापासून ऐकून ह्या गीताख्यानाचे सुख भोगण्यातच आपले खरे हित आहे.’

माऊलींच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा प्रत्यय श्रीज्ञानेश्वरीमध्ये आपणास वारंवार येतो. वरील ओव्यांमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की परमार्थाची गोष्ट सांगणारी भगवान श्रीकृष्णांसारखी एक सर्वसमर्थ व्यक्‍ती आहेच पण ऐकणारा श्रोताही कोणी ऐरागैरा नसून भक्‍तराज अर्जुन आहे. माऊलींना इथे मुद्दा असा मांडायचा आहे की ऐकणाऱ्याची ग्रहणशक्‍ती किती आहे यावर उत्तम वक्त्याचे भाषण अवलंबून असते. फार थोड्या लोकांना या वस्तुस्थितीची जाणीव असते. आपण सर्वजण एखाद्या लोकप्रिय वक्त्याला ऐकायला जातो आणि नंतर असे म्हणतो की आजचे भाषण खास झाले नाही. बहुतेक वक्‍त्याचा ‘मूड’ नसावा. अथवा एखादा गायक आज चांगला गायला नाही असे आपण म्हणतो तेव्हा आपल्याला या वस्तुस्थितीची जाणीव नसते की आपणसुध्दा त्यांच्या सुमार कामगिरीला जबाबदार आहोत! उदाहरणार्थ, ऐकणाऱ्याने चुकीच्या ठिकाणी मान हलविली तर गायकाच्या उत्साहाचा भंग होतो आणि गायन उत्तम होत नाही आणि श्रोत्यांनी चुकीच्या ठिकाणी हशाटाळ्या दिल्या तर वक्ता लिहून आणलेल्या भाषणामध्ये कुठलाही उत्स्फूर्त बदल न करीता यांत्रिकपणे बोलतो व त्यामुळे भाषण सर्वसाधारण होते. म्हणून गीताख्यान हा अतिशय दुर्मिळ योग आहे असे सांगताना माऊलींनी अर्जुनाचे महत्व नजरेआड केलेले नाही यात त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्‍ती दिसून येते असे म्हटल्यास वावगे होणार नाही. असो.

 

वक्तव्य अतिशय सहज फुलते । समर्थ श्रोत्याची जेव्हा एकाग्रता असते ।

ऐकावे कसे हे ज्याला कळते । त्याला साधनेचे सार गंवसते ॥

 

आमच्याकडे भांडी घासणाऱ्या आणि जमीन झाडून-पुसून काम करणाऱ्या बाईने काही वर्षांपूर्वी स्वतःची जागा घेण्याकरीता पैसे गोळा केले होते. आज तीला त्या जागेसंबंधी विचारले असता ती म्हणाली की ‘ मी अमुक एका किंमतीला घेतली आणि आता त्या जागेची किंमत खूपच वाढली आहे. पण सहा महिन्यापूर्वी जेव्हढी होती तेव्हढी आता नाही. कारण अमेरीकेत म्हणे नोकऱ्या मिळणे कमी झाले आहे. तिथे लोकांना नोकऱ्या मिळणे सुरु झाले की इथल्या जमिनीची किंमत परत वाढेल’ जेव्हा मी तीला म्हणालो की बंगलोरमध्ये घरकाम करुन तूला जगाची बरीच माहिती आहे की तेव्हा ती म्हणाली ‘मी ऐकते की!’. कुठलेही उच्च शिक्षण न घेतलेल्या एका घरकाम करणाऱ्या बाईला जगामध्ये सध्या चाललेल्या आर्थिक घडामोडींची इतकी पूर्ण जाणीव स्वतःचे कान उघडे ठेवण्यामुळे होती. त्यामुळे स्वतःच्या नशिबाला दोष न देता आपल्यावर आलेल्या आर्थिक स्थितीमागील खरे कारण ती ओळखू शकली. खरोखर, मनुष्याच्या जीवनात खरा फरक पडत असेल तर ऐकण्याने पडतो. आपले सर्व विश्व शब्दांवर आधारीत आहे. आयुष्यात आपण कुठलीही गोष्ट पाहिली, अथवा हुंगली, चव घेऊन बघितली वा स्पर्शिली तरी त्या सर्व क्रियेंच्या शेवटी आपल्या मनात एक शब्द उमटतो (सुंदर वा कुरुप, सुगंध वा दुर्गंध इत्यादी) आणि आपले त्या क्रियेमुळे झालेले ज्ञान त्या शब्दात जणू सामावले जाते. ज्या बुध्दीवर आपले सर्व जीवन आधारीत आहे त्या बुध्दीचे एकमेव खाद्य म्हणजे शब्द होय. आणि शब्दाचा नाद मनावर उमटला तरच तो शब्द कळतो. तेव्हा आपले सर्व अस्तित्व जणू शब्दांवर म्हणजेच ऐकण्यावर आधारीत आहे असे आपण म्हणू शकतो. आपण प्रत्येकजण जीवनात हजारो गोष्टी ऐकतो आणि त्या सर्वांचे एक वैयक्‍तिक मिश्रण करुन आयुष्य जगायचे कसे याचे समीकरण मांडतो. आपण काय ऐकले आहे यावर आपले संस्कार अवलंबून असतात. म्हणूनच एकाच घरात राहणाऱ्या दोन व्यक्‍तींचे जीवन जगण्याचे ध्येय अतिशय भिन्न असू शकते. आपण बघतोच की एकाच घरात नांदणाऱ्या भावांमधील ध्येय भिन्न असल्यामुळे निर्माण झालेल्या तणावांचा उपयोग करुन दूरदर्शनच्या अनेक मालिका तयार केल्या जातात!! हा विनोदाचा भाग सोडला तरी हे ध्यानात घ्या की स्वतःच्या जीवनात आमूलाग्र फरक घडवून आणायचा असेल तर आपणास दुसऱ्या कोणाकडून काहीतरी शिकले पाहिजे, ऐकले पाहिजे आणि स्वतःला जो बोध झाला आहे त्यावर अंमल केला पाहिजे. आपले ज्ञान कृतीमध्ये उतरवून दाखविले पाहिजे. साहजिकच असे स्पष्ट होते की जो मनुष्य मनापासून ऐकतो त्याने योग्य गोष्ट ऐकली तर त्याचे आयुष्य सर्वसामान्यांपेक्षा चांगले असायला हवे. तेव्हा नुसती ऐकण्याची वृत्ती असून आपले भागणार नाही, तर दैववशाने आपण काय ऐकतो यावर आपल्या जीवनाची नौका तरते का बुडते हे ठरत असते.

आज निरुपणाला घेतलेल्या वरील ओव्यांमध्ये माऊलींनी चांगले ऐकण्याच्या क्रियेची पराकोटी काय आहे याचे वर्णन केले आहे असे वाटते. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की मी ऐकू शकतो याचा उपयोग आत्ता कुठे झाला आहे. ‘श्रवणेंद्रियां पाहले’ म्हणजे श्रवणेंद्रियांची रात्र संपून पहाट झाली. म्हणजे आत्तापर्यंत मी जे काही शब्द ऐकले होते ते सर्व जणू स्वप्नातील बडबड होती. माझी जागृत अवस्था गुरुमुखातून गीता ऐकल्याने सुरु झाली आहे असे ते म्हणत आहेत. महाराजांच्या या रुपकामध्ये आपण कसे ऐकावे याचा फार मोठा धडा दडलेला आहे. गीता ऐकणे म्हणजे झोपेतून उठणे आहे असे म्हटले की असा साहजिक निष्कर्ष निघतो की ज्याप्रमाणे निद्रेतून उठल्यावर स्वप्नामध्ये आपण कोण होतो यावर आपण आपले जागृत अवस्थेमधील वर्तन ठेवीत नाही त्याप्रमाणे गीता ऐकण्यापूर्वी आपली सामाजिक परिस्थिती काय होती याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे. म्हणजे काय?

भगवद्गीतेमध्ये रस उत्पन्न होण्याआधी तुम्ही नावाजलेले शास्त्रज्ञ असा वा अनपढ असा. खूप श्रीमंत असा वा महिन्याच्या शेवटी जमाखर्च कसा मिळवायच्या याच्या विवंचनेत असा. एकदा गीता ऐकली की आपले आयुष्य नव्याने सुरु होते. स्वतःच्या पूर्वायुष्यात जमा केलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन जो साफ मनाने गीता ऐकतो तो खरा ऐकतो! ऐकणारा कोण आहे याचा विसर पडून आपण ऐकले पाहिजे. ऐकलेल्या शब्दांचा पूर्वायुष्यातील घटनांशी ताळमेळ जमतो का याचा विचार करीत जो ऐकतो तो नवीन काहीच ऐकत नाही. आजचे प्रवचन स्वामी विवेकानंदांच्या सांगण्याप्रमाणेच आहे का नाही याचा विचार करीत ऐकणाऱ्याला नवीन काही ऐकायला मिळाले तर संभ्रमच उत्पन्न होतो, बोध होत नाही. त्याचे आयुष्य नवीन वळण घेत नाही तर पूर्वायुष्यात आखलेल्या मार्गावरच चालत राहते. खरोखर, ऐकावे कसे हे ज्याला कळले, त्याला सर्व जग साधनेत मदत करायला येते. रस्त्यावरील त्रयस्थाच्या मुखातूनसुध्दा त्याला असे शब्द ऐकू येतात की त्यामुळे त्याचे जीवन बदलू शकते. आणि जो नीट ऐकू शकत नाही त्याला प्रत्यक्ष भगवंतांनी उपदेश केला तरी तो समाधानी होत नाही. पूर्वी गुरुगृही रहायला लावून गुरुमुखातून निघालेल्या प्रत्येक वाक्याला महत्व कसे द्यावे ही कला शिकवायचे ते उगीच नाही. त्या खडतर विद्यार्थीदशेमध्ये आपला अहंकार नष्ट करुन मनात कुठलाही विकार न येता ऐकावे कसे हे शिकवायची शक्‍ती असते ती आजकालच्या पाश्चिमात्य शिक्षणपध्दतीत नसते. (अर्थात, याचा अर्थ पाश्चिमात्य शिक्षणपध्दत बाद आहे असा नव्हे! पूर्वी दुसऱ्याचे बोलणे संशयरहित ऐकावे कसे हे शिकवायचे आणि आज कुणावरही विश्वास न ठेवता स्वतंत्र विचार कसे करावे हे शिकवितात. या दोन्हींचा मेळ करुन जो स्वतंत्र विचार करण्याची क्षमता ठेवून दुसऱ्याचे ऐकतो तो खरा विद्यार्थी. या दोन परस्पर विरोधी गोष्टी एकदम शिकविणारी एखादी पध्दत असू शकेल असे वाटत नाही.)

तर सांगायची गोष्ट अशी की आपल्या मनाचा असा निश्चय झाला पाहिजे की आत्तापर्यंत मी जे काही ऐकले, जे काही प्राप्त केले ते सर्व जणू स्वप्नींच्या राज्यात मिळविले. परमार्थाखेरीज कुठल्याही कृतीत सत्यता नाही. दैववशाने आज माझ्या हातात श्रीज्ञानेश्वरी आली आहे आणि माझे शिक्षण आत्ता कुठे सुरु झाले आहे. गीता जे सांगते आहे ते माझ्या अनुभवांशी सुसंगत आहे का याचा विचार न करीता माझ्या अनुभवांना मी गीतेद्वारे नवीन अर्थ देण्याचा प्रयत्‍न करीन अशी मनोभूमिका ज्याची आहे त्याला गीतेतील ज्ञानाचे निधान सापडेल असे माऊली म्हणत आहे. विश्वास ठेवायची शक्‍ती आपण विसरलो आहोत याचे कारण म्हणजे आत्ता जे आपल्याजवळ आहे त्याला सांभाळायचा आपला जीवापाड प्रयत्‍न सतत सुरु आहे. जेव्हा भगवंतावर विश्वास बसेल तेव्हा स्वतःजवळ असलेले काहीच सांभाळायची गरज नाही अशी आपली भूमिका होईल आणि तेव्हाच आपणांमध्ये दुसऱ्याचे बोलणे ऐकायची क्षमता येईल. अशावेळी श्रीज्ञानेश्वरी हातात आली तर मानवी आयुष्य लाभल्याचे सार्थक होईल. भगवंतावर विश्वास आणि गीतेचा अभ्यास या दोन चाकांवर साधनेची गाडी एकदा सुरु झाली की साध्य दूर नाही.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक ३० ऑगस्ट २००९)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: