श्लोक (१३ ते १५)/४: सगुण रुपाची आवश्यकता

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ १३:४ ॥

 

न मां कर्माणि लिंपंति न मे कर्मफले स्पृहा ।

इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बद्ध्यते ॥ १४:४ ॥

 

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मूमुक्षुभिः ।

कुरु कर्मेव तस्मात्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्‌ ॥ १५:४ ॥

 

कर्मयोगाचे खरे गुह्य भगवंतांनी गीतेच्या चतुर्थ अध्यायातील वरील श्लोकांतून प्रगट केले आहे असे वाटते. बुध्दीयोगाने म्हणजे निव्वळ विवेकाने आपले जीवन जगून भगवंताकडे जाणारे लोक अतिशय विरळा असतात. आपल्यापैकी कुणामध्ये भगवान रमणमहर्षी वा जे.कृष्णमुर्तींसारखी क्षमता आहे? आपल्या साधनेची सुरुवात स्वतःच्या मनाला शुध्द करण्यापासून होत असते आणि ही माणसे जन्मतःच संसारापासून अलिप्त असतात. कर्मयोग म्हणजे आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी अत्यंत उपयुक्‍त असलेला साबण होय. त्यामुळे बहुतांशी लोकांना कर्मयोगाच्या मार्गानेच भगवंताची प्राप्ती होणार असल्याने ह्या श्लोकांचे महत्व आपल्यासारख्यांना अनन्यसाधारण आहे. कदाचित असा विचार करुनच माऊलींनी चतुर्थ अध्यायाची सुरुवात ‘आजी श्रवणेंद्रियां पाहले’ अशी केली आहे आणि समारोप करीत असताना ‘तैसा मनाचा मारु न करीता । आणि इंद्रियां दुःख न देता । इथे मोक्ष असे आयता । श्रवणाचिमाजी ॥ २२४:४ ॥’ असा केला आहे. भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो आपण मनापासून ऐकला तर आपले कल्याण होणार आहे अशी ग्वाहीच जणू माऊलींनी या अध्यायात आपणास दिली आहे! अशा रीतीने आपणास अत्यंत उपयुक्‍त असलेल्या वरील श्लोकांमध्ये भगवान असे म्हणत आहेत:

‘समाजाची विभागणी चतुर्वणात मीच सत्व-रज-तम या त्रिगुणांच्या आधारे केली आहे. ह्या क्रियेचा कर्ता मी आहे असे जरी भासले तरी या सर्वांत मी अकर्ता आणि अविनाशी आहे असे जाण. (माझ्या)कुठल्याही कर्माचा लेप मला लागत नाही आणि केल्या कर्माच्या फळाची मला अजिबात इच्छा नाही. मला असे जाणून जो आपले कर्म करतो तोही स्वतःच्या कर्मांच्या बंधनात अडकत नाही. मला असे पूर्ण जाणून मगच भूतकाळातील मोक्षाची आस्था असलेल्यांनी कर्मे केली (आणि त्यायोगे ते मुक्त झाले). तेव्हा तूसुध्दा पूर्वकाळच्या मूमुक्षुंनी केलेल्या कर्माप्रमाणे कृती कर (आणि स्वतःचे भले करुन घे).’

कर्मयोग म्हणजे काय याचे इतके स्पष्ट विवरण दुसरीकडे कुठेही आढळत नाही. गीतेमधील द्वितीय अध्यायातील पन्नासाव्या श्लोकात भगवान म्हणतात ‘योग: कर्मसु कौशलम्‌’ म्हणजे काय तर कर्मे करण्यातील कुशलता म्हणजे खरा भगवंताशी योग होय. परंतू इथे कुशलता म्हणजे नक्की काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. द्वितीय अध्यायातील या शब्दांचा आधार घेऊन स्वतःसमोर आलेली कर्मे आपली सर्व शक्‍ती पणाला लावून, मनापासून, करावीत हाच कर्मयोग आहे असे कुणी म्हणतात. परंतु तसे जर असते तर पाश्चात्य संस्कृतीत आणि पौर्वात्य संस्कृतीत काहीच भिन्नता दिसली नसती. समाजात पुढे जाण्यासाठी कर्मे कुशलतेने करणारे आणि भगवंताच्या जवळ जाण्याकरीता कर्मे करण्यात मन लावणारे यांत काय फरक दिसला असता? जीवाचा आटापिटा करुन नोकरीत पुढे जाण्याच्या धडपडीला ‘मी देवाने सांगितल्याप्रमाणे कर्मातील कुशलता आचरणात आणत आहे’ असे म्हणणारे लोक उच्च साधक ठरले असते. त्यांची भगवंताशी जवळिक दिसली असती. आणि अशा संसारामधील प्रगतीबद्दल आसक्‍ती ठेवून कर्मे करणाऱ्यांमध्येही त्यांच्या मनाच्या योगस्थितीचे दृश्य रुप म्हणजे मनाची अखंडित शांतता दिसली असती. परंतु ही शांतता नोकरीत पुढे जाण्याची इच्छा धरणाऱ्यांच्या जीवनात तीच्या अभावानेच जाणविते, तीच्या अस्तित्वाने नाही!! तेव्हा कर्म करण्यातील कुशलता म्हणजे हातातील कर्म तन-मन पणाला लावून पार पाडण्याची वृत्ती नाही हे स्पष्ट होते.

अशा नकारात्मक वर्णनाचा तोटा म्हणजे ते आपणास आचरणात आणण्यासाठी उपयुक्‍त नसते. आपणास काय करायचे नाही हे कळले तरी काय करायचे हे कळण्यासाठी सकारात्मक वर्णनाची आवश्यकता असते. म्हणून भगवंतांनी पूर्वकाळच्या जनकादिक मूमुक्षुंनी कशी कर्मे केली याचे सकारात्मक वर्णन इथे केले आहे. आपणास कर्मयोग आचरणात आणण्यासाठी हे श्लोक उपयुक्‍त आहेत असे म्हणण्याचे कारण हेच आहे. म्हणूनच कर्मयोगाचे खरे गुपित इथे प्रगट केले आहे असे वाटते. या श्लोकांतून भगवंत असे म्हणत आहेत की स्वतःची पारमार्थिक उन्नती कर्मयोगाने मिळवायची असेल तर सर्वात आधी माझ्या स्वरुपाचे ज्ञान प्राप्त कर. म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या आयुष्यात जी सर्व कर्मे केली आहेत ती त्यांनी केली नाहीत ना त्यांना त्या कर्मांच्या फळांची इच्छा होती हे स्वतःला पटवून घे आणि मग या ज्ञानाची निरंतर जाणीव ठेवून स्वतःची कर्मे कर. कर्मयोगाचे मर्म असे भगवान अर्जुनाला उघडपणे सांगत आहेत. हा अतिशय दुर्लभ योग इथे भगवंतांच्या मनातील अर्जुनाबद्दलच्या अतीव प्रेमाने जुळून आला आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांना या गोष्टीची पूर्ण जाणीव असल्याने या अध्यायाच्या सुरुवातीला ते संजयाच्या मुखातून असे म्हणतात:

 

ते वेळीं संजयो रायाते म्हणे । अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे ।

जे अतिप्रीती श्रीनारायणे । बोलिजत असे ॥ ७:४ ॥

जें न सांगेचि पितया वसुदेवासी । जें न सांगेची माते देवकीसी ।

जें न सांगेचि बंधु बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंसी बोलत ॥ ८:४ ॥

हो का जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्‍ती ।

मज एकवंकी यांची स्थिती । आवडत असे ॥ १२:४ ॥

हा त्रैलोक्यपटाची घडी । आकाराचि पैलथडी ।

कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥ १५:४ ॥

 

जी गोष्ट स्वकियांनाही सांगितली नाही ती बाब भगवान अर्जुनाला सांगत आहेत म्हणजे अर्जुन स्वतःच्या आई-वडिलांपेक्षाही श्रीकृष्णांना जवळचा वाटला अशी भावना मनात येऊन संजयाला ते दोघे एकरुपच वाटले! माऊलींनी काय सुंदर लिहीले आहे ते बघा. या ओव्यांतून भक्‍त आणि भगवंत एकरुप होतात याचा अर्थ काय तर जे गुह्य दुसऱ्या कोणालाही सांगत नाहीत ते गुपित भगवान आपल्या भक्‍ताला उघडपणे सांगतात असा कळतो! म्हणजे ‘अनन्य भक्‍तीने भगवान प्राप्त होतो’ या वचनाची एक व्याख्याच जणू माऊलींनी आपणास या ओवींतून दिली आहे. फारच छान!!

तर सांगायची गोष्ट अशी की वरील श्लोकांचे महत्व माऊलींनी अनेकरीत्या स्पष्ट केलेले आहे. कर्मयोग म्हणजे नुसते समोर आलेले कर्म अतिशय कुशलतेने करायचा प्रयत्न करणे नव्हे, तर स्वतः आधी परोक्ष ज्ञान प्राप्त करुन (भगवंतांची कर्मापासूनची अलिप्तता जाणून) मग ते ज्ञान दैनंदिन आचरणात आणून अपरोक्ष ज्ञान प्राप्त करायचा (म्हणजे मीसुध्दा कर्मांपासून अलिप्त आहे हे जाणणे) यत्‍न करणे म्हणजे कर्मयोग होय. ‘योगः कर्मसु कौशलम्‌’ मधली कुशलता काय, तर दररोजच्या जीवनात भगवंताचे अनुसंधान न सोडणे होय. मग तुमच्या हातून घडणारी कर्मे कमीजास्त झाली तरी ती परिपूर्णच असतात हे जाणून कर्मे करणे म्हणजे कर्मयोग होय.

 

जेव्हा दृष्यादृष्याची गाठ भासते । तेव्हा दृष्यातूनच अदृष्य जाणविते ।

सगुणरुप अत्यावश्यक असते । त्यावीण निर्गुण कसे दिसते? ॥

 

आता आपण भगवान श्रीकृष्णांचे खरे रुप कळल्याने आपल्यामध्ये कसा फरक होऊ शकतो या प्रश्नावर विचार करु. बंगलोरमध्ये पाणी घालून जैसलमेरच्या वाळवंटातील एका झाडाला पाणी मिळणे जसे असंभव आहे तसेच परव्यक्‍तीबद्दलचे ज्ञान स्वतःला जाणून घेण्यास अनुपयोगी आहे असे आपणास वाटण्याची शक्यता आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. स्वतःचे आत्मस्वरुप निःसंदेह जाणून घेणे हे परमार्थाचे अंतिम ध्येय आहे यात शंका नसली तरी ते आत्मरुप जाणून घेण्यामध्ये आपल्या वासनांचा अडथळा होत असतो. आपल्या मनात स्वतःबद्दलच्या इतक्या प्रतिमा दृढ झाल्या आहेत की स्वतःचे सत्यरुप गोचर होणे अतिशय कठीण आहे. कळत नकळत आपण कुठेनाकुठे स्वतःला एका आदर्श साच्यात बसविण्याचा प्रयत्‍न करीत असतोच. साधनेची प्रगती म्हणून जे काही मानदंड आपण ठरविले असतील तेसुध्दा आपल्या कल्पनेचेच फळ आहे. वास्तवात आपल्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही तरी आपली प्रगती झाली नाही असे आपण म्हणू शकत नाही. स्वतःकडे अपेक्षेविरहित नजरेने बघायची क्षमता फार थोड्या भाग्यवान लोकांमध्ये असते. अशा महामानवांनी आपली सर्व साधना जणू पूर्वजन्मींमध्येच संपूर्ण केलेली असते आणि या जन्मात ते फक्‍त राहीलेली बाकी चुकती करण्याकरीता आलेले असतात वा भगवंताच्या आज्ञेने समाजोध्दारासाठी अवतरलेले असतात. परंतु आदीशंकराचार्य, श्री रामकृष्ण परमहंस, श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखी थोर मानवांखेरीज आपणा सर्वांना स्वतःच्या कल्पनेला तोंड द्यावे लागतेच. म्हणून अत्यंत दुर्मिळ जन ‘जय जय स्वसंवेद्या’ या मार्गावर चालण्यास पात्र असतात. बाकी सर्वांना हळूहळू आपली श्रध्दा दृढ करीत आणि दोन पावले पुढे तर दीड पावले मागे अशा गतीने साधना करावी लागते. त्यामुळे स्वतःचे आत्मरुप जाणून घ्यायचे आहे हे कळले तरी लगेच आपण ते जाणून घ्यायच्या मार्गावर चालण्याच्या पात्रतेचे होत नाही. पूर्वतयारी करुन, स्वतःमध्ये अध्यात्मिक बळ आणून मगच आपण परमार्थाच्या उच्च मार्गावर जाऊ शकतो.

आत्मरुपाला जाणून घेण्याला आपण योग्य आहोत की नाही हे बघण्यास एक अत्यंत सोपी चाचणी अशी आहे: जर आपणास आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधीतरी आत्यंतिक दुःख वा आत्यंतिक सुख झाले असेल तर आपणात योग्यता नाही. कुठल्या कारणाने सुख वा दुःख झाले ते महत्वाचे नाही. सुख वा दुःख झाले असेल तर आपणात कुठलीतरी एक वासना प्रबळ होती असे मानायला पाहिजे (कारण अपेक्षेविना ना सुख आहे ना दुःख) आणि एकदा वासनेचा मनात प्रवेश झाला की आपणात त्रुटी निर्माण झाली. ती कधी आपला घात करेल हे सांगता येत नाही.

आपणा सर्वांना अतिशय सुख आणि दुःख दोन्ही भोगावे लागले असल्याने आपण सर्व आत्मरुपाला जाणण्यासाठी सांख्ययोगाचा उपाय करु शकत नाही. आपणास कर्मयोगच बरा. ज्याप्रमाणे अर्जुनाला युध्द करुनच मोक्ष मिळाला त्याप्रमाणे आपल्याला जीवनाला तोंड देऊनच परमार्थ करावा लागणार आहे. स्वतःच्या इच्छा-आकांक्षांवर जर अंकुश लावायचा असेल तर आपणास अशा स्थितीचे दर्शन होणे आवश्यक आहे की ज्याचा आपण आदर्श ठेवू शकतो. भगवान श्रीकृष्णांनी आपल्यासमोर आलेली सर्व कर्मे यथोचित पार पाडून अवतारसमाप्ती केली हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या कर्मापासून अलिप्त असण्याचा निर्वाळा आपण देऊ शकलो तर आपल्या मनात स्वतःचे जीवन कसे जगावे याबद्दल एक नवीन साचा तयार होईल. असा साचा की जो स्वतःच्या कल्पनेवर आधारीत नसून वस्तुस्थितीवर आधारित आहे. त्यानुसार वर्तन करण्याचे धैर्य जर आपल्यात असेल तर मग आपले स्वतःचे अस्तित्वही एका अंगाने भगवंतांसारखेच निर्लेप, निर्मोही आणि अविनाशी आहे असे दिसेल आणि मग आपल्या वासना एका वेगळ्याच स्तरावर आहेत आणि आपण दुसऱ्या स्तरावर आहोत हे गोचर होईल. आत्मरुप जाणून घेण्यास आपण पात्र होऊ. तेव्हा सांगायचे म्हणजे असे की स्वतःबद्दल निरपेक्ष विचार करता येत नसेल तर भगवंताबद्दल निरपेक्ष विचार करा. एकदा मनाला दुसऱ्या कोणाकडे वासनारहित बघण्याची सवय झाली की आपली नजर स्वच्छ होईल व स्वतःकडेही कुठलाही पूर्वग्रहरुपी चष्मा न घालता आपण बघू शकू. खुद्द जनक राजादेखील काही वर्षे एकांतात राहून ज्ञान प्राप्त करुन आला आणि मग राज्य चालवित असतानाच सहज अवस्थेत आयुष्य जगत होता असे दिसून येते. त्याचप्रमाणे कर्मयोगाच्या मार्गावर पदार्पण करण्याआधी आपण भगवंताबद्दल स्नेह, भगवंताच्या खऱ्या रुपाची ओळख करुन घेतली पाहिजे. मग आपण जे काही करु तो सर्व कर्मयोगच होईल.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक ६ सप्टेंबर २००९)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: