श्लोक ३९/४: श्रध्देला पर्याय नाही

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

श्रध्दावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।

ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९:४ ॥

 

भगवद्गीतेच्या चतुर्थ अध्यायात कर्मयोगाचे गूढ उकलून सांगितले (पहा श्लोक १३, १४ आणि १५) अणि नंतर कर्मयोगाद्वारे काय मिळते हे सांगण्यास प्रारंभ केला. निव्वळ कर्मयोग करण्यामध्ये मनुष्याचे आयुष्य सार्थक होत नाही, त्यातच साधनेचा अंत होत नाही. प्रामाणिकपणे केलेल्या कर्मयोगाने मानवाचे चित्त निर्मल होऊन त्याच्या प्रज्ञाचक्षूला मनःपटलाला प्रज्वलित करणारा ज्ञानाचा प्रकाश गोचर व्हायला सुरुवात होते. स्वतःच्या जीवनात कर्मयोगाचे काबाडकष्ट करण्याचे प्राथमिक ध्येय अज्ञानाचा अंधकार नाहीसा करुन ज्ञानाची पहाट उगविणे हे आहे. एकदा ज्ञानप्रबोधनाची पहाट झाली की कालांतराने जेव्हा तो ज्ञानसूर्य मध्यान्हीस येऊन डोक्यावर तळपतो तेव्हाकुठे आत्मबोध होण्याची शक्यता असते. त्यानंतर अजून काही करायची आवश्यकता नसते. परंतु ही अंतिम घटना घडण्यासाठी पहिल्यांधी अज्ञानाची रात्र संपणे जरुरी आहे. आपल्या कर्मयोगरुपी साधनेद्वारे आपण जणू पहाटेच्या दरवाज्यावर दस्तक देतो. भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोग करायला सांगितला परंतु त्याचबरोबर त्याच्यापुढेही तुला जायचे आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. अर्जुनाच्या साधनेची सर्वांगीण प्रगती त्यांना हवी होती. त्यामुळे कर्मयोग विशद केल्यानंतर त्यांनी लगेच ज्ञानाचे महत्व सांगायला सुरुवात केली. तेहतीसाव्या श्लोकामध्ये ते म्हणतात: ‘सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥’. ज्ञानाचे महत्व, म्हनजेच या संसाराचे खरे रुप कळण्याचे महत्व विशद केल्यावर ते प्राप्त करायचे असल्यास साधकाला काय तयारी करावी लागते याबद्दल विवरण करताना भगवंत आज प्रवचनाला घेतलेल्या श्लोकात म्हणत आहेत: ‘ज्याच्या मनात अपार श्रध्दा आहे आणि ज्याने आपल्या इंद्रियांवर संयम मिळविला आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होऊ शकते. ज्ञानप्राप्तीनंतर मनात पराकोटीची शांति उत्पन्न होऊन आत्मबोधाचा मार्ग मोकळा होतो.’

 

बुध्दीमंतांनी साधनेत सावध रहावे । ज्ञान हे जीवनाचे सर्वस्व नव्हे ॥

 

इथे बहुतांशी साधकांच्या मनात एक संशय उत्पन्न होण्याचा संभव आहे. तो म्हणजे ज्ञानप्राप्ती हीच साधनेची अंतिम अवस्था का नाही? एकदा ज्ञान मिळाले की आयुष्याचे सार्थक झाले असे का होत नाही? या प्रश्नामागे आपली अशी भूमिका आहे की एकदा ज्ञान मिळाले की ते परत कुठे जात नाही. अंधारात क्षणभर काजवा चमकून जातो तसे ज्ञान आपल्याला होईल असे कुणीही समजत नाही. अथवा अंगावर लक्षावधी रुपयांचे कर्ज असताना लॉटरीत अचानक मिळालेले पैसे संपून जातात तसे आपले ज्ञान आपल्या विचारसरणीवरील पूर्वसंस्काराचा नाश करता-करता नष्ट होईल असे कुणाला वाटत नाही. परंतु वास्तवात आपले ज्ञान काजव्यासारखे वा तात्पुरत्या हातात आलेल्या पैशासारखेच असते. अहो, या जीवनात सर्व काही अशाश्वत आहे, पराधीन आहे आणि यातून खरे सुख मिळणे असंभव आहे हे आपणा सर्वांना कधीनाकधी कळलेले आहेच की! हेचतर ज्ञान आहे. पण म्हणून आपण स्वतःला परिपूर्ण समजतो का? आपल्या मनात कधीही न ढळणारी शांति आहे का? ‘नाही’ असेच उत्तर या दोन्ही प्रश्नांचे आहे. तेव्हा तात्कालीन दुःखदायक प्रसंगाने उत्पन्न झालेले ज्ञान मिळणे साधनेची अंतिम अवस्था नाही हे स्पष्ट होते. आणि आत्ता मिळालेले ज्ञान क्षणिक आहे का कायमचे आहे हे कसे कळणार? असा काही निकष नाही की अमुक एका काळाने ज्ञान आपोआप शाश्वत होईल. विश्वामित्रांनी एवढी तपश्चर्या केली ते संसाराच्या व्यर्थतेचे ज्ञान मिळाल्यावरच. परंतु वर्षोनुवर्षे साधना करुनही शेवटी मेनकेच्या जाळ्यात ते फसलेच. म्हणजे त्यांना झालेले ज्ञान अचल नव्हते. तेव्हा आपण असे कधीही म्हणू शकत नाही की आता माझे ज्ञान स्थिर झाले आहे. ज्ञानाची स्थिरता पहायला आपणास ज्ञान आणि अज्ञान या दोन्हींपासून दूर गेले पाहिजे तरच त्यांचे निरीक्षण करता येईल. अज्ञानाचे निरसन म्हणजे ज्ञान असेल तर निरसन करण्यास ज्ञानाचा संपर्क अशा गोष्टीशी आला पाहिजे जी अज्ञानाने भरली आहे. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी एकाच पातळीवर आल्या की! तेव्हा नुसते ज्ञान होणे आपली अंतिम अवस्था होणे शक्य नाही हे आपण जाणून घेतले पाहिजे. ज्ञान आणि अज्ञान या द्वैतापलिकडे आपली जी तटस्थ अवस्था आहे तिकडे आपले लक्ष अखंड केंद्रित होणे म्हणजे आत्मबोधाची सुरुवात होणे आहे. जोपर्यंत मनात ज्ञान मिळविण्याची इच्छा आहे तोपर्यंत मनात अशांति आहे. भले हा अस्वस्थपणा चांगल्या गोष्टीच्या हव्यासाने आलेला असो, अशांति ही अशांतीच असते. तुम्ही मित्राशी गप्पा मारण्यामुळे आगगाडी चुकवा वा शत्रूशी भांडल्यामुळे चुकवा, शेवटी तुमची गाडी चुकली हेच सत्य आहे!! त्याचप्रमाणे संसारात पुढे येण्यासाठी जी धडपड आपण करीत आहोत त्यामुळे अशांति येऊ दे वा परमार्थाचे ज्ञान मिळविण्याच्या आशेने व्यथा येऊ दे, आपण अशांत आहोत ही वस्तुस्थिती बदलत नाही. तेव्हा निव्वळ ज्ञानप्राप्तीमध्येच आपल्या जीवनाची सांगता होत नाही हे माहिती करुन घेणे अत्यावश्यक आहे. आपण भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायातील बारावा श्लोक बघितला तर ज्ञानाचे खरे महत्व काय आहे हे कळेल आणि ज्ञानप्राप्तीनंतर मनात शांति उत्पन्न होण्यासाठी साधक कुठल्या मार्गाने जातो याचे ज्ञान होईल. (त्या श्लोकामध्ये अभ्यास, ज्ञान, ध्यान, त्याग आणि शांति असा साधकाच्या प्रगतीचा क्रम दिला आहे) तेव्हा निव्वळ ज्ञानप्राप्तीने सर्वकाही प्राप्त होईल असे आपण कधीही मानू नये.

खरे म्हणजे कुठल्याही साधनाने स्वतःची अचल स्थिती आपणास दिसू शकत नाही. कुठल्या एका साधनेमुळे जर ती दिसली असती तर ती ठराविक साधना त्या अवस्थेला कारणीभूत ठरली असती आणि आपल्या स्वरुपावस्थेचे स्वयंभूत्व फोल ठरले असते. आपली मूल अवस्था आहे ती आहेच. आपण तीला जाणले किंवा नाही यावर तीचे अस्तित्व अवलंबून नाही. एखादी सुंदर संध्याकाळ आपण बघितली नाही म्हणून कमी सुंदर होत नाही की बघितली म्हणून जास्त सुंदर होत नाही! ती आहे तशीच असते परंतु तीला बघण्याने आपले जीवन अजून सौंदर्यपूर्ण होते तशी आपले स्वरुप बघणे ही घटना आहे. सध्या आपण ज्या अवस्थेला आपले मूलरुप समजत आहोत ते अज्ञान आहे आणि आपली समज चुकीची आहे हे कळणे ज्ञान आहे. यात फक्‍त काय चुकीचे आहे ते कळते. त्यामुळे आपणास काय बरोबर आहे हे अजून कळलेले नाही हे लक्षात घ्या! ‘नेति, नेति’ करुन काय नाही हे कळले तरी काय आहे हे कळायला काहीतरी असायला हवे. काहीच नसले तर बुध्दधर्माप्रमाणे शून्यवाद निर्माण होईल. आणि अद्वैतवादामध्ये शून्यत्व नसून पूर्णत्व आहे. सांगायची गोष्ट अशी की सावधानी साधकाने ज्ञानप्राप्तीमध्येच स्वतःच्या साधनेचे अंत मानू नये.

 

श्रध्दा जीवनात मूर्त होणे । म्हणजे संतवचनी विश्वास बसणे ॥

 

आत्तापर्यंत न दिसलेल्या, कल्पनेबाहेरील एखाद्या गोष्टीवरील विश्वास म्हणजे श्रध्दा होय. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची कल्पना करु शकतो, तेव्हा तीच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रध्दा नव्हे तर आशा आहे. श्रध्दा ठेवण्यास आपणास कठीण जाते कारण आपल्या कल्पनेबाहेरील गोष्टीवर विश्वास ठेवणे आपणास कमीपणाचे वाटते. विशेषतः त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात काही पूर्वनिष्कर्ष असतील तर त्यांच्या विरुध्द कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणे अशक्य होते. भगवंत म्हणजे काय, त्याला प्राप्त करण्याची साधना कशी असायला हवी इत्यादी गोष्टींबद्दल आपल्या मनात काही निर्णय घेतलेले असतात. संतांची वचने आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपली मनोभूमिका त्यांच्या सांगण्याची सांगड आपण आपल्या पूर्वग्रहांशी होत आहे की नाही हे बघण्याची असते. एखादा मुद्दा आपल्या मतांविरुध्द असला तर त्यामध्येच आपण इतके अडकतो की संतवचनाला संपूर्ण ऐकण्याची क्षमता आपण गमावून बसतो. जे बोलणे आपण व्यवस्थित ऐकलेच नाही त्यावर आपला विश्वास कसा बसणार? ज्ञान प्राप्त करण्यासाठी लागणारी श्रध्दा कशी वृध्दींगत होणार? आपली ज्ञानवृध्दीसाठी आवश्यक अशी श्रध्दा वाढायला हवी तर पहिल्यांदी आपल्या मनात स्वतःच्या निष्कर्षांविषयी अनास्था उत्पन्न झाली पाहिजे. खरे म्हणजे आपली जी मते ठाम होणे हासुध्दा श्रध्देचाच भाग आहे! परंतु ही श्रध्दा ‘स्व’वर अवलंबून असल्याने आपल्यातील अहंकाराची वाढ होते, भगवंताजवळ जाणे होत नाही. याउलट संतवचनी श्रध्दा बसल्यावर आपल्यातील अहंकाराला वाढायला मूळच मिळत नाही. कारण दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात आपला मोठेपणा दिसून न येता स्वतःच्या आकलनशक्‍तीचे मर्यादित्व प्रगट होत असते. म्हणून गुरुवाक्यावर विश्वास बसणे ही श्रध्दा साधकाला तारुन नेते आणि स्वमतीने काढलेल्या जीवनमूल्यांवर भरंवसा ठेवणे विनाशकारी होते. आपली मूल्ये अगदी संतांसारखीच असली तरी ती मी स्वतः शोधून काढली आहेत ही भावना अहंकारवृध्दीस कारणीभूत होते. एकदा श्रीसंत गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारले की स्वतः रामनामाचा जप सुरु करणे आणि गुरुंकडून ऐकून रामनाम घेणे यात काय फरक आहे? तेव्हा ते म्हणाले की गुरुंच्या मुखातून रामनाम घेणेच श्रेयस्कर आहे. दोन्ही क्रियांचा शेवट मुखातून रामनाम येण्यातच होतो परंतु साधनेत प्रगती गुरुंकडून रामनाम घेऊनच होते कारण त्यातून आपल्या अहंकाराची वृध्दी होण्याचा धोका नष्ट झालेला असतो. खरे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर आधी स्वतःची धडपड थांबविणे जरुरी आहे. जेव्हा आपण हात टेकतो आणि सर्व भगवंतावर सोडून देतो तेव्हाच आपल्या मनात ज्ञानाचा उदय होतो. परंतु इथे स्वप्रयत्नांचा फोलपणा निःसंदेह जाणविणे जरुरी आहे. हात टेकणे या शब्दांमध्ये स्वतःच्या प्रयत्‍नांनी काही मिळणे अशक्य आहे हे कळणे अध्यारुत आहे. जोपर्यंत आपल्या मनात साधनेमध्ये मी काही करु शकतो ही भावना आहे तोपर्यंत आपणांस शुध्द ज्ञान होणे अवघड आहे असे भगवान म्हणत आहेत. विश्वास ठेवा की आपल्या जीवनाची सूत्रधार एक अशी अज्ञात शक्‍ती आहे की ती आपल्याकडून सर्व कर्मे करवून घेत आहे. कर्म करणारा आपला देह आणि त्यात अपेक्षेंची भर टाकणारे आपले मन यांहून एक वेगळे असे आपले अस्तित्व आहे आणि तेच अस्तित्व खरे आहे. बाकी सर्व कल्पनेचा खेळ आहे. सर्व संतांनी एकमुखाने सांगितलेली ही बाब सत्य आहे याबद्दल विनासंदेह खात्री होणे म्हणजे श्रध्दा बसणे होय. एकदा अशी श्रध्दा बसली की आपोआप आपल्या इंद्रियांचा आपल्यावर असलेला ताबा कमी होईल आणि स्वतःची इंद्रिये आपल्या कह्यात येतील. आपल्या हातात ही श्रध्दा वाढवून इंद्रियांना संयमात ठेवणे आहे. खरे ज्ञान मिळते की नाही हे आपल्या हातात नाही. भगवंतांच्या मर्जीने ते आपणास गोचर होते. आपण आपल्या मनाचा आरसा धुवून-पुसून स्वच्छ ठेवू सकतो. मग त्यात कशाचे प्रतिबिंब पडेल हे भगवंत ठरवितील. परंतु आज निरुपणाला घेतलेल्या श्लोकातून ते आपणास अशी ग्वाही देत आहेत की अशा श्रध्दावान माणसाला मी जरुर ज्ञान प्रदान करीन आणि साधनेत त्याची अधिकाधिक प्रगती करवून घेऊन आत्मबोधाच्या ध्येयाची आणि त्याची गाठभेट घडवून आणिन. खुद्द भगवान श्रीकृष्णांनी हे वचन दिल्यावर आपणास अजून काय हवे?

 

॥ हरि ॐ ॥

 

( बंगलोर, दिनांक १३ सप्टेंबर २००९ )

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: