गीता श्लोक २२/५: इंद्रियसुखाची वासना का जात नाही?

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।

आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ गीता २२:५ ॥

 

आपण किती वेळा असे ठरविले असते की आता यापुढे इंद्रियसुखाच्या मागे धावणे बंद करु. परंतु असा ठाम निश्चय घेतल्यानंतर काही दिवसांनी आपण जेव्हा स्वतःच्या आयुष्याकडे बघतो तेव्हा आपण परत विषयांमध्ये गुरफटलेले दिसतो. आपणास हे कळतही नाही की संसाराकडे दुर्लक्ष करावयाचा आपला निर्धार कधी नष्ट झाला. जी गोष्ट स्वतःच्या जीवनात आढळते तीच आपल्या इतर लोकांशी असलेल्या नात्यांमध्येही दिसून येते. एखाद्या व्यक्‍तीशी आपले नाते फक्‍त उच्च पातळीवर ठेवायचे असे ठरविले तरी ते तसे ठेवणे आपणास जमतेच असे नाही. आपण अत्यंत प्रामाणिक आहोत अशी रास्त खात्री असतानाही आपण याबाबतीत तत्वनिष्ठ का राहू शकत नाही याबद्दल आपण विचार करायला लागलो तर उत्तर मिळतेच असे नाही. आपल्यापैकी काहीजणांची बुध्दी हतबल होऊन ‘ही परमेश्वराचीच इच्छा असेल’ या पलिकडे दुसरे उत्तर सुचत नाही. भगवंताची इच्छा या कल्पनेखाली आपली असमर्थता झाकली जाते! परंतु जर भगवंताची जर आपण विषयसुखात रमावे ही इच्छा असती तर विषयभोगानंतरही आपल्या मनात अस्वस्थता राहीली नसती. तेव्हा आपला ‘अजून काही हवे’ हा आपला हव्यासच असे दर्शवितो की भगवंताच्या मनात आपण विषयसुखात रमावे असे नाही. म्हणून हे उत्तर चुकीचे आहे.

अजून काहीजणांना स्वतःबद्दल न्यूनगंड उत्पन्न होऊन असे वाटते की तत्वनिष्ठ रहायची आपली लायकीच नाही. समाजाने स्वतःला भला माणूस असे समजले असले तरी माझ्या विषयसुखातच लिप्त रहाण्यातून माझी खरी प्रवृत्ती किती हीन पातळीवर आहे हे दिसून येत आहे असे त्यांना वाटते. या जीवनामध्ये मला भगवंताचे दर्शन होणे शक्य नाही अशी ठाम समजूत ते करुन स्वतःला पुढील प्रगतीपासून वंचित करतात. कारण ज्या मनात न्यूनगंड आहे तिथे सत्य परिस्थितीचे प्रतिबिंब उमटणे कसे शक्य आहे. स्वतःबद्दल अहंगड नसावा हे खरे असले तरी अहंगंडाला पर्याय म्हणून न्यूनगंड ठेवणेही तितकेच घातक असते. मनाची समतोल स्थिती ठेवणे आपणास जमले पाहिजे तरच सत्यस्थिती जाणण्याची शक्यता आहे. परंतु स्वतःच्या लायकीबद्दल शंका घेणे हे आपल्या प्रश्नाचे उत्तर नाही कारण भगवंत सर्वांना एकसारखाच उपलब्ध आहे असे सर्व संतांनी उच्च स्वरात सांगितलेले आहे. वाल्या कोळ्यासारख्या पापी माणसालाही भगवंत मिळतो आणि भक्‍त प्रल्हादासारख्या सात्विक पुरुषालाही भगवंत मिळतो. तेव्हा आपण भगवंतदर्शनाला लायक नाही म्हणून वारंवार विषयसुखात अडकत आहोत असे मानणेही योग्य वाटत नाही.

तेव्हा मूळ प्रश्न उरतोच की कुठल्या कारणामुळे आपण आपल्या उच्च तत्वांशी प्रामाणिक राहू शकत नाही? आज प्रवचनाला घेतलेल्या श्लोकामध्ये आपल्या या मूलभूत प्रश्नाचे उत्तर आहे असे वाटते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे म्हणत आहेत की ‘ज्यांनी आत्मसुखाची चव चाखली आहे असे पुरुष येणाऱ्या आणि जाणाऱ्या इंद्रियसुखाकडे दुर्लक्ष करतात कारण त्यातून दुःखच निर्माण होणार आहे हे त्यांनी पूर्णपणे जाणलेले असते.’

भगवंतांच्या सांगण्यावरुन आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्या प्रारब्धात वा लायकीमध्ये नसून आपल्या अननुभवामध्ये असे वाटते. का म्हणून आपण विषयसुखात रमतो, तर त्याहून सुंदर आपण काही बघितले नाही म्हणून. जेव्हा विषयसुखाला खरा पर्याय आपणास मिळेल तेव्हा आपण आपोआप त्यामध्ये रमणे थांबवू असे भगवान सांगत आहेत. केवळ बौध्दीक पातळीवर असलेल्या वैराग्यावर वा एखाद्या कटु अनुभवाने निर्माण झालेल्या तात्कालीन अनासक्तीवर विषयसुखाचा त्याग अवलंबून असता तर आपण सर्वजण संतपदाला केव्हाच पोहोचलो असतो. आपणास काय कमी अपेक्षाभंग झाले आहेत? आयुष्यभर आपण अनेक अपेक्षाभंगांचे दुःख सहन केल्यावरच कुठल्यातरी अपेक्षापूर्तीचे सुख मिळविले आहे. तेव्हा अशा क्षणिक सुखामागे धावण्यात अर्थ नाही हे बौध्दीकरीत्या पूर्णपणे कळूनही आपण विषयसुखाच्या लालचेपासून मुक्‍त होत नाही याचे कारण त्याशिवाय अजून दुसरे काही सुख असू शकते यावर आपला पूर्ण विश्वास बसलेला नाही हे आहे. ज्याप्रमाणे आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वागणे कितीही आवडले नाही तरी आपण नाती सांभाळतो (कारण शेवटी अडचणीला तेच उपयोगी पडणार आहेत दुसरे कोणी नाही, याबद्दल आपली खात्री असते) त्याप्रमाणे आपण विषयसुख सांभाळत आहोत असे भगवान म्हणत आहेत. किती स्पष्ट आणि योग्य कारण त्यांनी सांगितले आहे! या उत्तरामध्ये ना तुमच्या प्रारब्धाचा संबंध आहे ना क्षमतेचा. जी गोष्ट आपण अजून बघितली नाही (म्हणजे आपला आत्मानंद) तीच्यावर विश्वास ठेवून सध्या हातात असलेले (क्षणिक) सुख दवडणे आपणास जमत नाही हे सरळ उत्तर अर्जुनाला श्रीकृष्णांनी दिले आहे. अपरोक्ष ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण इंद्रियसुखात अडकलेलो असणार हा जीवनाचा नियम आपण मान्य केले पाहिजे. आपल्या या स्वीकारात स्वतःच्या विषयोपोभागाच्या आवडीतून स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण न होण्याची ताकद आहे.

 

जे सुख असते कारणविरहित । असते तिथेच आत्मरुप प्रतिबिंबीत ।

ठेवा आस्था त्याबद्दल मनात । गोडीत त्याच्या रहा साधनामार्गात ॥

 

इथे आपणास असा संभ्रम उत्पन्न होईल की आत्मानंद मिळाल्याशिवाय विषयसुखाची आस्था जाणार नाही परंतु खरे ज्ञान मिळविण्यास इंद्रियांवर ताबा मिळविणे जरुरी आहे असे आधीच भगवंतांनी सांगितले आहे (पहा श्लोक ३९/४: ‘श्रध्दावाँलभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः’ इत्यादी). तेव्हा ही एकमेकांवर अवलंबून असलेली चक्राकार कारणे भेदणे कसे शक्य आहे? यावर उत्तर म्हणजे आत्मानंदात असणे प्रथम केले पाहिजे. खरे म्हणजे जीवनात आपणास आत्मानंद अनेकवेळा लाभला आहे परंतु आपणच त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्याप्रमाणे वीज क्षणात चमकून नष्ट होते त्याप्रमाणे अनंतवेळा आपण भगवंताच्या सान्निध्यात जाऊन आलो आहोत. ज्याक्षणी आपले मन कुठल्याही दृष्य कारणाशिवाय शांत असते तेव्हा त्या शांत असण्याचे कारण काय असू शकेल याचा आपण कधी विचार केला आहे का? गावातील रहदारीमध्ये आपण गाडी चालवित आहोत आणि अचानक आपले मन आजूबाजूच्या गोंधळातही शांत होते. वा अभ्यास करीत असताना कठीण प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याल त्या प्रयत्‍नांमध्येच आनंद वाटतो (मग उत्तर मिळाले नाही तरी फार दुःख होत नाही) वा स्वयंपाक करीत असताना अचानक मनात आनंद निर्माण होऊन आवडत्या गाण्याचे दोन शब्द गुणगुणले जातात अशा घटनांमागे काय कारण असेल? वरील उदाहरणांमधील प्रत्येक गोष्ट करताना ९९टक्के आपणास कंटाळा येतो. मग मध्येच हे सुख कुठून येते? का येते?

याचे एकच उत्तर आहे की जेव्हा आपण नेहमीच्या गोष्टींचा पूर्ण स्वीकार करतो, तेव्हा आपले मन पूर्णपणे मोकळे होते. हातातील गोष्ट सवयीची असल्याने ती करण्याकडे फार लक्ष द्यावे लागत नाही आणि ही गोष्ट करायचीच आहे हे विनासंदेह मान्य केल्याने अजून काही हवे ही भावना निर्माण होत नाही. आपल्या मनाच्या अस्तित्वाला ज्या दोन गोष्टींची आवश्यकता आहे (काहीतरी हवे ही भावना आणि सध्या जे आहे त्यातील असंतुष्टता) त्या नसल्याने आपल्या मनाचा त्याक्षणी लोप झालेला असतो. देहाने काम करीत असताना मन आपल्या स्वस्थानी म्हणजे आत्मरुपात विलीन झालेले असते आणि त्यातून जो आनंद मिळतो त्याचे दृष्य रुप म्हणजे आपल्या मनातील शांति वा तोंडातून बाहेर पडलेले अस्फुट गुणगुणणे होय. अर्थात, ही अवस्था फारवेळ रहात नाही. स्वयंपाक करणाऱ्या बाईला लहान मूल रडल्याचा आवाज येतो वा गाडी चालविणाऱ्याच्या पुढ्यात अचानक एक रीक्षावाला सर्व नियम तोडून उभा राहतो वा हा प्रश्न सुटला नाही तर आपली नाचक्की होईल हा विचार विद्यार्थ्याच्या मनात येतो. असे जेव्हा होते तेव्हा आपली अचानक लाभलेली संतुलीत अवस्था तुटते. आपण परत मनातील विचारांच्या जंजाळात अडकून सुखाचा शोध घ्यायला लागतो.

परंतु आपल्या मनाच्या या संतुलीत आणि सुखकर अवस्थेची क्षणभंगुरता तीच्या सत्यतेला नाकारु शकत नाही. परंतु स्वतःचे नियंत्रण नसलेल्या या क्षणिक अवस्थेबद्दलची आपली अनास्था अशा अवस्थेचे महत्व कळू देण्यापासून आपणास वंचित करते. तेव्हा इंद्रियसुखाची आस्था मनातून काढायची असेल तर त्याला पर्याय म्हणून विनाकारण मनात उत्पन्न झालेल्या शांतिबद्दल प्रेम उत्पन्न करा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नुसते बसून रहा आणि बघा की मनात काय विचार येतात ते. रविवारी सकाळी पेपर का आला नाही याची चिंता न करीता सोफ्यावर नुसते ठोंब्यासारखे बसून रहायला येते का याचा विचार करा. आयुष्यात पंधरा मिनिटे काही न करता, कुणाचा विचार न करता, आहे त्या स्थितीमध्ये नुसते पडून रहायची तयारी जोपर्यंत तुमच्यात नाही तोपर्यंत विषयसुखापासून तुम्हाला पर्याय मिळाला नाही हे लक्षात घ्या. मग भले तुम्ही भगवंताच्या साधनेत वेळ घालवित असाल वा प्रिय व्यक्‍तीच्या सान्निध्यात गोड बोलत असाल वा शत्रुबरोबर भांडत असाल. कुठलीतरी एखादी बाह्य क्रिया केल्याशिवाय आयुष्य सुखाने जगता येते हे ज्याला कळले त्याला इंद्रियांवर ताबा मिळवायची शक्‍ती प्राप्त झाली असे समजा.

जोपर्यंत आपण हे ‘बेवजह’ निर्माण झालेले सुख बघितले नाही तोपर्यंत काय होईल?

 

जिहीं आपणपे नाही देखिले । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले ।

जैसे रंक का आळुकैले । तुषाते सेवी ॥ ११०:५ ॥

तैसे आपणपे नाही दिठे । जयांते स्वसुखाचे सदा खरांटे ।

तयांसीचि विषय हे गोमटे । आवडती ॥ ११२:५ ॥

ते अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणे घडे ।

सांगे पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥ १२१:५ ॥

पै याते विरक्‍त पुरुष । त्यजिती कां जैसे विष ।

निराशा तयां दुःख । दाविले नावडे ॥ १२८:५ ॥

 

“ज्यांनी स्वतःला बघितले नाही त्यांनाच इंद्रियसुखात आनंद मिळतो ज्याप्रमाणे एखाद्या भुकेल्या गरीब माणसाला कोंडा खाण्यातच सार्थक वाटते (११०). तसेच ज्यांना स्वस्वरुप दिसले नाही, ज्यांना आत्मानंदाबद्दल आस्था नाही त्यांनाच विषयसुखात गोडी वाटते (११२). (खऱ्या आणि खोट्या सुखातील) अंतर त्याना ठाऊक नसल्याने त्यांना (इंद्रियसुख) हेच सुख वाटते. सांग बघू शेणकिड्याला शेणाबद्दल किळस येऊ शकेल का? (१२१) पण जे पुरुष विरक्‍त झाले आहेत ते मात्र इंद्रियसुखाला विषासारखे दूर सारतात, ज्यांच्या मनातून (काही प्राप्त करण्याची) आशा निघून गेली आहे त्यांना या इंद्रियसुखरुपी दुःखाचे दर्शनही आवडत नाही (१२८).” असे माऊली वरील ओव्यांमधून म्हणत आहे.

तेव्हा आत्ता क्षणिक आणि नियंत्रणरहित मिळणाऱ्या कारणविरहित सुखाकडे दुर्लक्ष करु नका. ज्याप्रमाणे राईट बंधूंचे विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण केवळ काही क्षणांपुरतेच टीकले होते (पण त्यामध्येच आज विनाथांबा भारताहून अमेरीकेला जाणाऱ्या विमानांची निर्मिती लपलेली होती) त्याचप्रमाणे आजच्या क्षणभर मिळणाऱ्या सुखातच निरंतर शांतिची गुरुकिल्ली दडलेली आहे. ती सापडल्याशिवाय आपण संसारातून बाहेर येण्याची वार्ता करणे निरर्थक आहे.

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक २० सप्टेंबर २००९)

Advertisements

3 Responses to गीता श्लोक २२/५: इंद्रियसुखाची वासना का जात नाही?

  1. Shripad म्हणतो आहे:

    kharech.halu halu yacha abhyas karayla hava.

  2. shrikantkakirde म्हणतो आहे:

    I like it very much We must think our life”goal” act as per ‘Gita”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: