ओवी (१ ते ९)/६: आत्मसंतुष्टी हाच परमार्थ होय

 

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

 

मग रायाते संजयो म्हणे जो । तोचि अभिप्राय अवधारिजो ।

श्रीकृष्ण सांगती आतां जो । योगरुप ॥ १:६ ॥

सहजे ब्रह्मरसाचे परगुणे । केले अर्जुनालागी नारायणे ।

कीं तेंचि अवसरी पाहुणे । पातलो आम्हीं ॥ २:६ ॥

कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसे तान्हेलिया तोय सेविजे ।

कीं तेंचि चवी करुनी पाहिजे । तंव अमृत आहे ॥ ३:६ ॥

तैसें आम्हां तुम्हां जाहाले । जें आडमुठी तत्व फावलें ।

तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । हे न पुसो तुते ॥ ४:६ ॥

तया संजया येणे बोले । रायाचे ह्रुदय चोजवले ।

जे अवसरी आहे घेतले । कुमरांचिया ॥ ५:६ ॥

हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहे नाशिला ।

येऱ्हवी बोल तरी भला जाहला । अवसरीं इये ॥ ६:६ ॥

परी आपण चित्ती आपुला । निकियापरी संतोषला ।

जे तो संवाद फावला । श्रीकृष्णार्जुनांचा ॥ ८:६ ॥

तेणे आनंदाचे धालेपणे । साभिप्राय अंतःकरणे ।

आता आदरेंसी बोलणे । घडेल तया ॥ ९:६ ॥

 

गीतेवर अनेक भाष्ये लिहिली गेली आहेत. बहुतांशी संतांनी आपल्या विचारसरणीला पुष्टी म्हणून गीतेमधील श्लोकांचा आधार घेतला असल्याने गीतेवर भाष्य लिहिले आहे. या सर्व मार्मिक टीकेंमध्येही श्रीज्ञानेश्वरीचे महत्व वेगळे आहे याला जी कारणे आहेत त्यामध्ये एक महत्वाचे कारण म्हणजे माऊलींनी कुठल्या एखाद्या विचारसरणीची पुष्टी म्हणून गीतेवर टीका लिहिली नाही तर भगवंतांचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गुरुआज्ञेने, एक कर्तव्य म्हणून लिहिली आहे. अशा रीतीने मूळ हेतूच भिन्न असल्याने माउलींची निर्मिती वेगळी झाली आहे. त्यात आणि परत महाराजांच्या अलौकिक साहित्यिक प्रतिभेचे तेज पडल्याने श्रीज्ञानेश्वरी जणू एखाद्या नवीन सोन्याच्या दागिन्यासारखी झळाळून उठली आहे! माऊलींच्या देवदत्त प्रतिभेचे एक उदाहरण म्हणजे त्यांनी आपल्या भाष्यामध्ये आणलेली संजय आणि धृतराष्ट्र ही दोन पात्रे होय. बाकी कुठल्याही भाष्यामध्ये या दोन माणसांचा उल्लेखही गीतेमधील श्लोकांखेरीज दिसत नाही. पण श्रीज्ञानेश्वरीत वारंवार या दोघांच्या संवादाच्या माध्यमाद्वारे महाराज गूढ संदेश आपणास देतात. आज प्रवचनाला घेतलेल्या ओव्यांमधून हे फार प्रकर्षाने जाणविते. वरील ओव्यांचा शाब्दीक अर्थ असा आहे:

मग संजय राजाला असे म्हणतो की श्रीकृष्ण अर्जुनाला जो योगमार्ग सांगणार आहेत ते लक्ष देऊन ऐका (१). भगवान नारायणांनी अर्जुनाकरीता ब्रह्मविद्येची ठेव उघडी करुन ठेवली आहे आणि त्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा प्रसंगी आपण दोघे न बोलविलेल्या पाहुण्यासारखे उपस्थित झालो आहोत (२). ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या माणसाने समोर मिळेल ते पाणी प्यावे आणि ते साक्षात अमृत निघावे त्याप्रमाणे आपणा दोघांना अकल्पित परमार्थ तत्व मिळाले आहे. हे ऐकून धृतराष्ट्र संजयाला म्हणाला की ह्या नसत्या गोष्टी तू मला सांगू नकोस (३,४). संजयाने हे बोल ऐकून राजाचे हृदय ओळखले की आत्ता ह्याला आपल्या मुलांखेरीज दुसरे काहीही महत्वाचे वाटत नाही (५). हे कळल्यावर तो मनातच हासून असा विचार करतो की हा म्हातारा मोहात पडल्यामुळे स्वतःचा घात करुन घेत आहे. नाहीतर या वेळी जो संवाद होत आहे तो अतिशय सुंदर आहे (६). परंतु राजाच्या अनास्थेमुळे आपण नाउमेद न होता तो आपल्या भाग्यावर अत्यंत संतुष्ट झाला की आज मला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांमधील संवाद ऐकायला मिळत आहे (८). या आनंदाच्या परिपूर्णतेमध्ये आणि संवादातील गूढार्थाबद्दल संपूर्ण जागृत राहून तो आता पुढे बोलेल (९).

 

परमार्थ म्हणजेच राहणे आत्मानंदात । कधीही नको तडजोड या ध्येयात ।

यामुळे जर झालात वेगळे समाजात । नका होऊ जमा परत सर्वसामान्यात ॥

 

ज्ञानेश्वर महाराजांनी धृतराष्ट्र हे सर्वसामान्य माणसाचे रुपक म्हणून वापरले आहे असे वारंवार वाटते. गीतेच्या सुरुवातीलाच जेव्हा धृतराष्ट्र संजयाला विचारतो की कुरुक्षेत्रावरील घडामोडी मला सांग तेव्हाच महाराज म्हणतात की ‘ पुत्रस्नेहे मोहितु, धृतराष्ट्र असे पुसतु’. आपण कुठलीही गोष्ट करण्याआधी त्यामधून आपणास काय मिळवायचे आहे याची जाणीव ठेवणे योग्य समजतो त्याचेच प्रतिबिंब माउलींनी इथे दाखविले आहे. समोर आलेल्या घटनेकडे कुठलीही पूर्वभूमिका न ठेवता बघणे आपल्याला धृतराष्ट्रासारखेच अशक्य आहे. मग त्या घटनेमध्ये आपल्या मनोभूमिकेशी संबंध नसलेले पैलू बघण्यात आपणास स्वारस्य नसते. मग त्या प्रसंगातील सध्या नको असलेल्या अंगांतून पुढे आपला फायदा होणार आहे असे कुणी सांगितले तरी त्यावर आपला पूर्ण विश्वास बसत नाही. संजय आपणहून धृतराष्ट्राला सांगत आहे की श्रीकृष्ण आणि अर्जुन यांमधील हा संवाद आपल्याला परमसुख देऊ शकतो तरी धृतराष्ट्राचा त्यावर विश्वास बसत नाही. सुखाची ‘आपल्या मुलांचा युध्दात जय होऊन त्यांचे राज्य अढळ होणे’ ही व्याख्या त्याने आधीच आपल्या मनात ठरविली होती आणि त्यापलिकडे काही असू शकेल या शक्यतेची जाणीवही त्याला नको होती. म्हणून तो संजयाला म्हणत आहे की नसत्या गोष्टी तू मला सांगू नकोस.

संजयाची भूमिका काय आहे? तो गुरुकृपेद्वारे प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीचा उपयोग करुन आपले काम करीत आहे. कुरुक्षेत्रावरील युध्दाबद्दल त्याचा स्वतःचा काही एक हव्यास नाही. प्रत्येक गोष्ट जशी घडत आहे तशी निरपेक्ष रीतीने वर्णन करुन सांगणे यापलिकडे त्याला या युध्दात काही स्वारस्य नाही. आणि त्याच्यावर श्री व्यासमहर्षींची गुरुकृपा झालेली आहे. या दोन गोष्टींचे फळ म्हणून तो गीतेचे खरे महत्व ओळखू शकतो. संजयाद्वारे माउलींनी एका उच्च साधकाची अवस्था कथित केली आहे असे वाटते. साधकाच्या जीवनात परमार्थातून काही व्यावहारिक फायदा व्हावा अशी इच्छा नसणे जेव्हढे महत्वाचे आहे तेव्हढीच महत्वाची सद्‌गुरुकृपा आहे. आपल्या निरपेक्ष वृत्तीमुळे जे दिसेल त्यातून खरा अर्थ आपणास मिळू शकतो परंतु आपल्या नजरेला काय पडेल यावर आपले नियंत्रण नसते. स्वतःच्या घरात योग्य ठिकाणी ठेवलेली नेहमीची वस्तूदेखील कधीकधी आपणास दिसत नाही तर जीवनाच्या समरांगणात ज्या चित्रविचित्र घटना सतत घडत आहेत त्यातील कुठल्या आपणास दिसाव्या यावर आपले काय नियंत्रण असणार? संजयाने स्वतःच्या साधनेने आपले मन निरीच्छ केलेले असले तरी त्याला गीताश्रवणाचे भाग्य गुरुकृपेने दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यावरच मिळाले या घटनेकडे आपण दुर्लक्ष करु नये. तेव्हा संजयाद्वारे महाराज समर्थ साधकाचे वर्णन करीत आहेत असे वाटते. तेव्हा संजय म्हणजे उच्च साधक आणि धृतराष्ट्र म्हणजे सर्वसामान्य मनुष्य या रुपकांतून अतिशय उच्च साधकालाही ‘आपल्याला झालेला बोध सर्वांना वाटावा’ ही इच्छा होते असे ज्ञानेश्वर महाराज सुचवित आहेत असे वाटते. आणि या वरकरणी योग्य वाटणाऱ्या इच्छेचे फळ काय होते?

सामान्य मनुष्याला या अचानक मिळालेल्या सत्संगतीबद्दल काहीही गम्य वाटत नाही. एखाद्या जन्मांधाच्या हातात वाटोळा मोती दिला तर तो त्याचा वास घेऊन टाकून देतो त्याप्रमाणे मिळालेल्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यात काहीच उपयोग नाही असा विचार करुन आपण परमार्थाला दूर सारतो. जोपर्यंत मनुष्याच्या जीवनात दुःखरुपी दाह निर्माण होत नाही तोपर्यंत तो अध्यात्माचे शीतल जल आपलेसे करीत नाही. संजयाची सर्व धडपड मूळातच व्यर्थ आहे. अगदी याप्रमाणेच आपणापैकी कुणाला भगवंतप्राप्तीबद्दल आत्मीयता वाटली म्हणून ते ज्ञान आसपासच्या लोकांना सांगायचा प्रयत्‍न केला तर निराशाच पदरी येते. संसारात बहुतांशी लोक आपले ध्येय सुनिश्चित करुन त्याच्या प्राप्तीमध्येच धन्यता मानणारे आहेत. अचानक अजून भव्य ध्येय नजरेसमोर आले तरी ते त्याचे मूल्य आपल्या संकुचित दृष्टीतर्फेच करणार. त्यांच्या सर्वसामान्य नजरेचे दिव्यदृष्टीत रुपांतर करणे संजयाला शक्य नाही, फक्‍त व्यासमहर्षींनाच शक्य आहे. सद्‍गुरुंनाच शक्य आहे. भगवंताची कृपा झाल्याशिवाय भगवंताबद्दल आस्था निर्माण होत नाही हे शाश्वत सत्य इथे माउलींनी अत्यंत नाट्यमय प्रसंगातून समोर मांडले आहे! श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की रामनाम घ्यावेसे वाटते हीच आधी घेतलेल्या रामनामाची कृपा आहे याचा अर्थ धृतराष्ट्राने संजयाच्या आनंदाला नाकारण्यातून पुढे येतो. असो.

परंतु ज्ञानेश्वर महाराज इथेच थांबत नाहीत! जेव्हा संजयाला कळते की राजाला आपल्या मनाच्या हर्षभरीत अवस्थेची काहीच कदर नाही तेव्हा तो काय करतो याचे वर्णनही माउलींनी केले आहे. जेव्हा उच्च साधकाला अशी जाणीव होते की सर्वसामान्य माणसापासून आपण भिन्न होत चाललो आहोत तेव्हा त्याने काय करावे याची सूचनाच जणू त्यांनी दिली आहे. असे कित्येक साधक आहेत की त्यांना खऱ्या परमार्थाबद्दल रुची आहे. परंतु साधना करीत असताना जेव्हा ते स्वकीयांपासून भिन्न व्हायला लागतात तेव्हा त्यांच्या मनात एक भिती उत्पन्न होते आणि ते साधना सोडून देतात. श्रीसंत गोंदवलेकर महाराजांकडे एक शिष्य खूप काळ आले नाहीत. जेव्हा त्यांचे दर्शन झाले तेव्हा कारण विचारल्यावर ते म्हणाले की ‘तुम्ही दिलेले रामनाम मी प्रामाणिकपणे घेत होतो पण त्यामुळे संसाराबद्दल विरक्‍ती उत्पन्न होत आहे हे जाणविल्यावर मी ते सोडले. म्हणून मी येत नव्हतो.’ संजयाने काय केले? आपल्या राजाला आपल्या ज्ञानात स्वारस्य वाटत नाही हे जाणविल्यावर तो मनात हसला व काही न बोलता परत श्रीकृष्णांचा बोल ‘अर्थ जाणून घेऊन’ सांगू लागला. माउली म्हणते ‘साभिप्राय अंतःकरणे’!!! फार सूक्ष्म गोष्ट इथे सूचित केली आहे. संजय संवाद केवळ सांगायचा म्हणून सांगत नाही तर त्या बोलांचा अभिप्राय जाणून घेऊन सांगत आहे. याचा अर्थ असा की उच्च साधकाने आपली साधना कधीही जवळच्या लोकांचे मन राखण्यासाठी सोडू नये. उगाच सगळ्यांना उपदेश करायला जाऊ नये हे खरे असले तरी आपली साधना सोडू नये हेही तितकेच खरे आहे. अगदी सर्वात जवळ असणारी व्यक्‍तीसुध्दा साधनेतून व्यावहारिक फायदा बघत असली तरी आपण आत्मानंदातच राहणे उचित मानले पाहिजे. माउली म्हणते की ‘परी आपण चित्ती आपुला, निकियापरी संतोषला’ स्वतःच्या चित्तात निर्माण झालेल्या अनाकलनीय आनंदातच आपण मग्न राहिले पाहिजे. तो आनंद दुसऱ्यांना वाटू शकत नाही म्हणून खिन्न न होता स्वतः आत्मानंदात मग्न राहणे हेच आपले साधक म्हणून कर्तव्य आहे. परमार्थाचे ध्येय जवळ असलेल्या व्यक्तींना सुख देणे नसून आपण मनात सदा आनंदी असणे हे आहे यामध्ये कधीही आपण तडजोड केली नाही पाहिजे.

याचा अर्थ असा नव्हे की दुसऱ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे. महाराज म्हणत आहेत की ‘आता आदरेंसी बोलणे, घडेल तया’. स्वतःला आनंद मिळाला आहे म्हणून संजय आपले बोलणे थांबवित नाही. त्याचप्रमाणे आत्मानंदाची प्राप्ती हेच ध्येय ठेवले तरी त्याच्या सुखात स्वतःचे कर्तव्य आपण चुकणे योग्य नाही. खरे म्हणजे आपण आनंदात असणे ही एक फार मोठी मदत आपण सगळ्यांकरीता करीत आहोत. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा इतका छंद आपणास लागला आहे की स्वतः आनंदी राहणे ही दुसऱ्यांना मदत होऊ शकते यावर आपला विश्वास बसत नाही. लक्षात घ्या की दुसऱ्याच्या कष्टावर जेव्हा आपला आनंद उभा नसतो तेव्हा तो आनंद दुसऱ्यालासुध्दा सुखी करतो. आत्मानंद कुणाच्या चांगल्या स्वयंपाकावर वा नोकरीतील बोनसवर वा दुसऱ्याच्या यश वा अपयशावर अवलंबून नसल्याने आपण स्वरुपी मग्न राहणे सर्वांनाच सुखकर होणार आहे. आज एवढेच!

 

॥ हरि ॐ ॥

 

(बंगलोर, दिनांक २७ सप्टेंबर २००९)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: