श्लोक (४ आणि ५)/५: कर्मयोगाची फलश्रुती

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।

एकमेप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्‌ ॥ गीता ४:५ ॥

यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।

एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ गीता ५:५ ॥

चतुर्थ अध्यायात कर्मयोग म्हणजे काय हे विशद करुन झाल्यावर भगवान श्रीकृष्णांनी संन्यासी लोकांचे कौतुक केले. तेव्हा अर्जुनाच्या मनात संदेह निर्माण झाला की मला कर्मयोगाच्या मार्गात ढकलून भगवान बुध्दीयोगी लोकांचे कौतुक का करीत आहेत? म्हणून पंचम अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन भगवंतांना असे सांगतो की माझ्या मनात संदेह निर्माण होईल असे वक्‍तव्य तुम्ही केले तर माझा बुध्दीभ्रंश होणार यात शंकाच नाही. कृपया करुन तुम्ही मला समजेल अशा भाषेत नक्की सांगा की कर्मयोग करणे माझ्याकरीता योग्य आहे का संन्यासधर्माचा अंगीकार करणे मला श्रेयस्कर आहे. यावर भगवान त्याला म्हणतात की कर्मयोग आणि सांख्ययोग (म्हणजे विवेकाने मनात वैराग्य उत्पन्न करुन संसारापासून अलिप्त होणे) हे दोन्ही मार्ग एकाच परब्रह्माची भेट घडवून आणतात. परंतु या दोघांत कर्मयोगच तुला उपयुक्‍त आहे. कर्मयोगाची बाजू घेऊन झाल्यावर ते अधिक स्पष्टीकरण करण्यासाठी असे म्हणत आहेत: ‘केवळ बालबुध्दीची माणसे कर्मयोग आणि बुध्दीयोगाला भिन्न समजतात, शहाणी माणसे नाही. या दोहींपैकी कुठल्याही एका मार्गाला प्रामाणिकपणे चोखाळले तर दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते (श्लोक ४). (कारण) जे फळ सांख्ययोगाने मिळते तेच कर्मयोगानेही मिळते. (हे जाणून) ज्याला सांख्य आणि कर्मयोगाचे एकत्व दिसले त्यालाच या जगात काही दिसले (असे तू निःशंकपणे समज) (श्लोक ५). भगवान अर्जुनाला कर्मयोग कर म्हणून का सांगत आहेत याबद्दल नीट विचार करा. या मार्गाने गेलास तर तूला बाकी मार्गांपेक्षा अधिक काही मिळेल असे प्रलोभन ते देत नाहीत. ते म्हणत आहेत की सर्व मार्ग एकाच फळाची प्राप्ती करुन देणार आहेत. असे असताना समोर असलेल्या मार्गाचा, ज्यावर तू आयुष्यभर चालत आला असल्याने तो तूला ओळखीचा झाला आहे, त्याग करणे योग्य नाही म्हणून तू कर्मयोगाच्या मार्गावर चल. भगवान कुठल्याही एका मार्गाची बाजू न घेता त्याला योग्य उपदेश करीत आहेत. सर्वांनी कर्मयोग करावा असे ते सांगत नाहीत. त्यांचा उपदेश घाउक बाजारासारखा नाही (म्हणजे सगळ्यांना नाही) तर किरकोळ बाजारासारखा आहे (फक्‍त अर्जुनाकरीता, त्याची सद्यपरिस्थिती जाणून घेऊन, केलेला आहे). भागवतामध्ये त्यांनी उध्दवाला केलेला उपदेश अर्जुनाला दिलेल्या सल्ल्यापेक्षा भिन्न भासला तर त्याचे कारण हेच आहे की खरा गुरु आपल्यासमोर आलेल्या शिष्याची योग्यता आणि स्वभाव ओळखून उपदेश करतो. एक ठराविक समीकरण तयार करुन सर्वांना ते सांगत सुटत नाहीत. याचे अत्यंत पराकोटीचे उदाहरण म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस होय. स्वामी विवेकानंदांना त्यांनी सांगितलेला बोध स्वामी अद्भुतानंदांना दिलेल्या उपदेशाहून अतिशय भिन्न होता. प्रत्येक शिष्याचा निसर्गदत्त स्वभाव जाणून घेऊन त्याला सुसंगत असाच मार्ग ते सुचवायचे. खरी गोष्ट अशी आहे की सर्व मार्ग एकाच भगवंताकडे जात आहेत. त्यामुळे कुठला मार्ग चांगला हे वाटकरुच्या क्षमतेवर आणि तयारीवर अवलंबून असते. कुठल्या मार्गाने काही भिन्न, अजून परीपूर्ण मिळण्याची शक्यता असते म्हणून तो मार्ग श्रेष्ठ ठरत नाही. तसे असते तर सर्व लोकांना तोच मार्ग श्रेयस्कर ठरला असता.

वरील श्लोकांवर भाष्य करीत असताना माउली म्हणते:

येऱ्हवी तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा ।

ते सांख्ययोगसंस्था । जाणती केवी ॥ २६:५ ॥

सहजे ते अज्ञान । म्हणोनि म्हणती ते भिन्न ।

येऱ्हवी दीपाप्रति काइ आनान । प्रकाश आहाती ॥ २७:५ ॥

पै सम्यक एके अनुभवें । जिहीं देखिले तत्व आघवे ।

दोहींतेही ऐक्यभावे । मानिती गा ॥ २८:५ ॥

आणि सांख्यीं जे पाविजे । तेंचि योगीं गमिजे ।

म्हणोनि ऐक्य दोहींते सहजे । इयापरी ॥ २९:५ ॥

देखे आकाशा आणि अवकाशा । भेद नाही जैसा ।

तैसे ऐक्य योगसंन्यासा । ओळखे जो ॥ ३०:५ ॥

तयासीची जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिले ।

जया सांख्य योग जाणविले । भेदेंविण ॥ ३१:५ ॥

नेहमीप्रमाणेच माउलींनी भगवंतांच्या बोलण्याचा भावार्थ उघड करुन सांगितला आहे. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत: “ज्या जनांची मति अप्रगल्भ आहे ते सांख्य आणि कर्मयोगांमधील संबंध कसे जाणतील (२६). त्यांच्या अज्ञानामुळे त्यांना या दोहींतील फक्‍त फरकच दिसेल. परंतु एकाच दीपातून निघालेल्या दोन प्रकाशकिरणांमध्ये काही फरक असतो का? (म्हणजे एक किरण पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे गेला म्हणून प्रकाशाच्या गुणधर्मात काहीच फरक नसतो तसे हे दोन मार्ग वरकरणी विरुध्द भासले तरी एकच आहेत) (२७). (निव्वळ तात्विक उहापोह न करीता) या दोहींपैकी एका मार्गाने स्वतः जाऊन ज्याने आपले लक्ष्य गाठले आहे तो या दोघांनाही एकच समजतो (२८). (आणि तुला हे लक्ष्य मिळाले नसले तरी) जे सांख्य योगाने मिळते तेच कर्मयोगानेही मिळते म्हणून या दोघांना तू एकच मान (२९). ज्याप्रमाणे आकाश आणि अवकाश (स्पेस, दोन ग्रहांतील पोकळी) यात फरक नाही त्याप्रमाणेच या दोहींत फरक नाही असे जो जाणतो (३०). ज्याने सांख्ययोग आणि कर्मयोग यांची एकता जाणली त्यानेच या जगात काही जाणले आणि त्यालाच आत्मरुपाचे दर्शन झाले आहे (३१).”

जसे लोहचुंबक आकर्षिते लोखंड । भूतमात्र जाते भगवंताकडे अखंड ।

म्हणून नका बसू ठेवून हातावर हात । एक निवडून रहा चालत मार्गात ॥

सांख्ययोग आणि कर्मयोग या दोहींमधील ऐक्य त्या मार्गांचे फळ एकच आहे यात आहे असे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले पण ज्ञानेश्वर महाराज त्याहून पुढे जाऊन असे म्हणतात की ज्याप्रमाणे आकाश आणि अवकाश एक आहेत त्याप्रमाणे हे दोन मार्ग एक आहेत. आपणास दृष्य असलेले आकाश म्हणजे अवकाशावर प्रकाशाने आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने उत्पन्न झालेल्या वातावरणाने निर्माण झालेली कल्पित वस्तू आहे. वस्तुतः आकाश अशी काही निराळी वस्तू अस्तित्वात नाही. आकाशाचा निळा रंगही जगप्रसिध्द ‘रामण ईफेक्‍ट’ या शास्त्रीय तत्वाने भासत आहे. कुणी कुंचला घेऊन आकाशाला निळे केलेले नाही! त्यामुळे आकाश हे सर्वात जवळ असलेले अवकाशच आहे. त्याप्रमाणेच सांख्ययोगाचे अर्जुनाच्या जीवनातील प्रतिबिंब म्हणजे कर्मयोग आहे. पृथ्वीतल सोडून वरवर गेल्यावर एका ठराविक ठिकाणी हवा इतकी विरळ होते की आपण त्याला वातावरण संपून अवकाश सुरु झाले असे म्हणतो. त्याचप्रमाणे कर्मयोग अंगात भिनल्यावर कर्म करणारी व्यक्‍ती आणि आपले स्वरुप ही दोन अस्तित्वे भिन्न आहेत हे प्रकर्षाने जाणवायला लागल्यावर आपोआपच मनात विवेक जागृत होऊन संसाराबद्दलची आसक्‍ती नष्ट होऊन असक्‍ती निर्माण होते. वैराग्य उत्पन्न होते. म्हणजे सांख्ययोगाचे आपल्या जीवनात पदार्पण होते. जो मनुष्य जन्मापासूनच संसाराच्या गुरुत्वाकर्षणापासून दूर गेलेला आहे त्याला सांख्ययोगाचेच दर्शन होणार. तो पहिल्यापासूनच अवकाशात आहे. आपण अर्जुनासारखे भूमीतलावर राज्य प्राप्त करण्यास आजन्म ललचावलेलो असल्याने आपणास आकाश दिसते आणि त्याला भेदल्यावरच अवकाश दिसणार. तेव्हा माउली असे म्हणत आहे की आपला कर्मयोगच आपोआप सांख्ययोगाच्या संन्यासात रुपांतरीत होणार आहे. पण म्हणून पहिल्यापासून संन्यासाचीच इच्छा धरणे म्हणजे पर्वताच्या पायथ्यावर पाय न ठेवताच माथ्यावर जाण्याची इच्छा धरण्यासारखे आहे. ज्याला पूर्वसुकृताच्या भाग्याने गुरुकृपेचे हेलिकॉप्टर मिळाले आहे त्यांनाच ते शक्य आहे. आपणास नाही!! म्हणून आपण कर्मयोग करण्यातच सध्या धन्यता मानली पाहिजे.

खरे म्हणजे सांख्ययोगाला अवकाशाची उपमा देणे अतिशय समर्पक आहे कारण सर्व ग्रहांवरील आकाशाचा अंत या अवकाशात होत असतो. तुम्ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्‍त व्हा वा मंगळ ग्रहापासून दूर व्हा. तुम्हाला एकाच एकसंध अवकाशात यावे लागणार. सर्व मार्गांचा शेवट विवेक आणि त्यानंतर वैराग्य जागृत होण्यातच आहे. तुम्ही ऐहीक सुखात लोळण्यातच धन्यता मानत असाल आणि इंद्रियसुखाची प्राप्ती करण्यातच आयुष्य व्यतीत करीत असाल तरी तुमच्या आकाशाचा शेवट विवेकाच्या अवकाशातच आहे हे माउलींच्या उदाहरणाने ध्यानात घ्या. आपण सर्वजण आपापल्या मार्गाने अवकाशातच विलीन होणार आहोत. सर्व संतांनी असे ठामपणे सांगितले आहे की यच्चयावत भूतमात्रांना मुक्‍ती मिळणारच आहे. मोक्ष मिळण्यासाठी साधना करायलाच हवी असे नाही. साधना करायला हवी ती याच जन्मात मोक्ष मिळविण्यासाठी. चौऱ्यांशी लक्ष योनी न फिरता मोक्ष हवा असेल तर आत्ताच धडपड केली पाहीजे.

असे बघा, आपल्या गावामध्ये दररोज अन्नछत्रे चालू आहेत हे माहित असूनही आपण स्वतःच्या घरी भोजनाची तरतूद करतोच कारण तिथे केव्हा आणि काय खायला मिळेल यावर आपले नियंत्रण नसते. त्याचप्रमाणे भगवंत मला मोक्ष देणारच आहे या माहितीमुळे आत्ता मिळालेल्या मनुष्यजन्मात साधना न करणे म्हणजे अन्नछत्रात जेवण मिळेल म्हणून आपण काही प्रयत्‍न न करणे होय. भगवान सर्वांची काळजी घेत आहे, माझीपण कधीतरी घेईल असे म्हणून स्वतःहून भगवंताकडे जाण्याचे प्रयत्‍न आपण करीत नाही आणि त्याचवेळी दुसऱ्याच्या मर्जीवर आपले आयुष्य अवलंबून असणे आपणास आवडत नाही यातील विसंगती आपण लक्षात घेतली पाहिजे. फक्‍त परमार्थाच्या मार्गावर चालताना दुसऱ्याच्या खांद्यावर बसून रहायचे आणि संसारात अथक प्रयत्‍न करीत रहायचे यातील विसंगतीकडे लक्ष द्या. विनादांभिक जीवन जगायचे असेल आणि साधना करायची नसेल तर व्यावहारिक जीवनातही जे समोर येईल त्याचा स्वीकार करायला हवा. आपणहून प्रयत्‍न करायचे नाहीत असे ठरविल्यावर आपल्या संपूर्ण आयुष्यातून हव्यास गेला पाहिजे. मग आपल्या मनातील हव्यास घालविणे हाच आपला मार्ग बनतो आणि आपल्या नकळत आपण साधना करायला लागतो!!

सर्व मार्गांचा शेवट भगवंतप्राप्तीमध्येच आहे हे जरी खरे असले तरी त्यामुळे भगवंतप्राप्तीसाठी कुठलाही प्रयत्‍न न करणे योग्य ठरत नाही. आत्तापर्यंत कुणीही निव्वळ साधनेमध्ये नुसते हातावर हात ठेवून आणि संसारात पूर्णपणे लिप्त राहून भगवंताजवळ गेला आहे असे झालेले नाही. इतके संत होऊन गेले, पण त्यातील एकानेही संसाराबद्दलची आसक्‍ती ठेवून भगवंत प्राप्त केला आहे असे दिसून येत नाही. विवेक-वैराग्यरुपी अवकाशाचा ज्या परब्रह्मरुपी ‘ब्लॅक होल’मध्ये लय होणार आहे तिथे जाण्यास आधी सारासार विचाराच्या अवकाशात आपण पदार्पण करणे जरुरी आहे. हे पूर्णपणे जाणून घेऊन आपल्यापरीने आपण साधना निरंतर सुरु ठेवली पाहीजे. साधनेच्या धगीने आपला गरम हवेचा फुगा कधीनाकधी आकाशाला भेदून अवकाशात जाईल आणि आपणसुध्दा स्वानुभवाने म्हणू शकू: ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी’.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक २ ऑक्टोबर २००९)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: