श्लोक ५५/११: जीवनाचे ध्येय एकमेव असावे


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्‍त संगवर्जितः ।

निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव ॥ ५५:११ ॥

गीतेमधील दहाव्या अध्यायात सर्व भूतांमध्ये मी स्थित कसा आहे याचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केल्यावर अर्जुनाच्या मनात असा मोह निर्माण झाला की भगवंतांचे विश्वरुप आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघावे. श्रीकृष्णांचे अर्जुनावर एव्हढे गाढ प्रेम होते की त्याने विनंती केल्यावर त्यांनी स्वतःचे गूढरुप पार्थासाठी प्रगट केले. या प्रसंगाचे वर्णन गीतेमधील अकराव्या अध्यायात केले आहे. त्यावरील श्री ज्ञानेश्वरांचे फार सुंदर भाष्य आपण प्रत्यक्ष वाचावे ही आपणा सर्वांना विनंती आहे. सुरुवातीला अर्जुनावरील प्रेमाच्या भरात भगवान त्याला अतिंद्रिय दृष्टी न देताच स्वतःचे रुप दाखवायचा प्रयत्‍न करतात. तो प्रसंग म्हणजे तयारी न करता शिष्याने गुरुंजवळ परमार्थाच्या गूढ तत्वांबद्दल स्पष्टीकरण मागण्यासारखे आहे. आपल्या मनातील संदेहाचे निराकरण न होता सद्‌गुरु जे उत्तर देतात ते खरे कसे हा नवीन संभ्रम मनात उत्पन्न होतो. सद्‌गुरुंचे बोलणे कळणारी फारच थोडी भाग्यवान माणसे जन्माला आली आहेत. जेव्हा श्री. तात्या केतकर यांच्यामार्फत श्री गोंदवलेकर महाराजांनी ‘वाणीअवतार’ घेतला तेव्हा त्यांना प्रश्न विचारायला जे साधक यायचे ते श्री. बाबा बेलसरे (प्रा. के.वि.बेलसरे) यांच्याकडून मिळालेल्या सल्याचा खरा अर्थ माहित करुन घ्यायचे. कारण संतांची वाणी कळणे ही सहजसाध्य गोष्ट नव्हे. असो.

अर्जुनाची कुचंबणा पाहून जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्यदृष्टी प्रदान करुन स्वतःच्या विश्वरुप दाखवितात तेव्हा सुरुवातीला अतिशय रम्य वाटणारे रुप नंतर एकदम अक्राळविक्राळ अवतार धारण करुन सर्व भूतमात्रांना खात आहे असे अर्जुनाला दिसून येते. ज्याने एकट्याने अकरा अक्षौहिणी सैन्याचा पराभव केला होता अशा धैर्यशाली अर्जुनाच्या मनातही प्रचंड भय निर्माण व्हावे असे ते महाभयानक रुप होते. भगवंतांचे ते रुप बघितल्याने विस्मित होऊन कुठून आपणास विश्वरुप बघायची बुध्दी झाली असे अर्जुनाला वाटले आणि त्याने श्रीकृष्णांना आपले चतुर्भुज रुप परत धारण करायची विनंती केली. अर्जुनाची पालटलेली बुध्दी बघून भगवंतांनी असे म्हटले की आत्तापर्यंत अनेक थोर योग्यांनी आणि भक्‍तांनी माझे हे विश्वरुप बघण्याकरीता अथक प्रयत्‍न केले तरी त्यांना जे दिसले नाही ते तुझ्यासमोर मी आपणहून उघड दाखविले आणि तू त्याला अव्हेरतोस कसे?! केवळ माझ्या या रुपाची सवय तुला नाही म्हणूनच तुझ्या मनात विश्वरुपाबद्दल भिती उत्पन्न झाली आहे. माझ्या पीतांबर नेसलेल्या चतुर्भूज रुपाबद्दल तुला कितीही आस्था वाटली तरी ते माझे खरे रुप नाही ही वस्तुस्थिती तू कधीही विसरु नकोस. केवळ या रुपावरच पूर्ण श्रध्दा ठेवून तू या जगात रहा. असे करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. आपला हा उपदेश अर्जुनाच्या मनावर बिंबविताना ते वरील (अकराव्या अध्यायाच्या अंतिम) श्लोकात असे म्हणत आहेत: “अर्जुना, जे स्वतःसमोर आलेली सर्व कर्मे माझी (म्हणजे श्रीकृष्णांची) आहेत असे समजून करतात. केवळ मलाच (म्हणजे विश्वरुपी मला) गाठायचे ध्येय ठरवितात आणि बाकी गोष्टींबद्दल आकर्षण ठेवीत नाहीत. त्यांच्या मनात त्यायोगे यच्चयावत भूतमात्रांबद्दल साहजिक असलेल्या चढाओढीच्या भावनेचा नाश होतो. असे भक्‍त माझ्यात विलीन होऊन पावन होतात.” विश्वरुपदर्शनयोगाचा हा अंतिम श्लोक आहे, पूर्णविराम आहे. भगवंतांचे निर्गुण रुपाची आस्था ठेवून जगात कसे वर्तन करावे हे सांगून मगच हा अध्याय समाप्त होतो यात गीतेचा उद्देश आपण सर्वांनी परमार्थात मिळालेले ज्ञान दैनंदिन जीवनात वापरावे असा आहे हे स्पष्ट होते! असो.

आणखी एक गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा हा उपदेश अर्जुनाच्या त्यावेळच्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. वस्तुतः त्यांनी सर्व अध्यायांमध्ये एकच तत्व प्रतिपादन केले आहे. त्या तत्वाचे दृष्य रुप विभिन्न झाले आहे ते अर्जुनाच्या तात्कालीन मनोविकारांमुळे. त्यामुळे वरील बोधवचनाचा भावार्थ लक्षात घेण्यासाठी आपणास अर्जुनाच्या मनाच्या अवस्थेची ओळख करुन घेणे आवश्यक आहे. दहाव्या अध्यायातील ‘विभूती’दर्शनाने त्याच्या मनात कुतुहल निर्माण झाले आणि निरागसपणे त्याने विश्वरुपदर्शनाची इच्छा प्रगट केली. ही गोष्ट म्हणजे आपण सहज म्हणून एका प्रवचनाला जावे आणि त्याद्वारे मनात भगवंताच्या दर्शनाची आस निर्माण होण्यासारखी ही अवस्था आहे. आपणा सर्वांना कित्येकवेळा कुणा व्यक्‍तीच्या प्रभावाखाली आल्याने परमार्थाच्या उच्च तत्वांबद्दल आत्यंतिक आकर्षण निर्माण झालेले आहे. कधी एखाद्या संताच्या लिखाणामुळे आपण प्रभावित होतो, वा अत्यंत भावपूर्ण अवस्थेत गायलेल्या भजन ऐकून आपण स्वतःचे व्यावहारिक प्रगतीचे ध्येय विसरतो तर कधी कुणाच्या प्रभावपूर्ण वक्‍तव्याच्या शक्‍तीत आपण वहात जातो. अशा प्रत्येकवेळी स्वतःच्या जीवनाचे ध्येय भगवंतप्राप्तीच आहे याबद्दल आपल्या मनात निःसंदेह विश्वास असतो. परंतु प्रत्यक्ष जेव्हा परमार्थाच्या मार्गात चालायची वेळ येते तेव्हा सध्या प्रिय असलेल्या बाकी ध्येयांना सोडावे लागेल अशी शक्यता निर्माण होते आणि आपण भांबावून जातो. आपल्या नकळत आपली अशी भावना झालेली असते की भगवंतप्राप्तीसाठी सद्यजीवनातील फक्‍त वाईट गोष्टींचाच त्याग करावा लागेल आणि चांगल्या वस्तू सोडणे आवश्यक नाही. उदाहरणार्थ, मला खूप संताप येतो या अवगुणाचा त्याग करायला आपण तयार होतो पण स्वतःच्या स्त्रीपुत्रांवर जीवापाड प्रेम करतो या गुणाला सोडून देणे बरोबर आहे हे आपणास पटत नाही. त्यामुळे जेव्हा साधनेकरीता वारंवार त्यांच्या रास्त इच्छा अपूर्ण ठेवाव्या लागतात तेव्हा त्यांच्या उदास मनस्थितीमुळे आपण विषण्ण होतो. मग साधनेत झोकून देण्याआधी आपले जीवन खूपच साधे होते असे वाटून आपण त्या जीवनाला आयुष्यात परत आणायला सुरुवात करतो.

अर्जुनाच्या मनात असलेली भगवंतांच्या विश्वरुपाबद्दल भिती आपल्या या अवस्थेचे दृष्य रुप आहे असे वाटते. त्याला ज्याप्रमाणे परत सावळ्या श्रीकृष्णाचे दर्शन प्रिय वाटते त्याचप्रमाणे आपणास संसारातील योग्य गोष्टींना धरुन ठेवणे रास्त वाटते. तेव्हा भगवंतांच्या वरील श्लोकातील बोधाचा खरा उपयोग अशा साधकांना आहे ज्यांना साधनेत प्रगती झाल्यावर आप्तजनांना गमाविण्याची भिती वाटत आहे. ज्यांनी अजून साधनेच्या मार्गावर प्रामाणिकपणे पायसुध्दा ठेवला नाही त्यांना काय कळणार की स्वतःपुढे आलेले कर्म भगवंताचे आहे आणि त्याच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली आहे की ते आपल्याकडून व्हावे. त्यांनी अकराव्या अध्यायातील भगवंतांचे बोलणे न ऐकता पहिल्या अध्यायातील अर्जुनाचे किंवा द्वितीय अध्यायातील भगवंतांचे बोलणे पहावे!

जीवनाचे ठेवा एकच ध्येय । होईल त्यामुळे आयुष्य सुखमय ।

स्वजीवनात शोधा असे परम तत्व । जाणवेल आपोआप भगवंताचे अस्तित्व ॥

आपण दुःखी केव्हा असतो? जेव्हा आपण एकाच गोष्टीत मग्न नसतो तेव्हाच. ज्यावेळी एक गोष्ट करीत असताना दुसऱ्या अजून परिपूर्ण वस्तूबद्दल वा परिस्थितीबद्दल मनात विचार येतो तेव्हाच आपण कष्टी होतो. आपल्या मनातील दुःख बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते तर त्या परिस्थितीला कुठल्यातरी आदर्श स्थितीशी पडताळून पहाण्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, ज्या व्यक्‍तीला कधी कुणी आयुष्यात चहा करुन दिला नाही तीला कुणी आपणहून चहा आणून दिला तर ती त्या चहाच्या चवीचा विचार न करीता खूश होईल तर दुसरा एखादा मनुष्य, ज्याला सेवा करुन घ्यायची सवय आहे, त्या चहातील साखरेच्या प्रमाणावर नाखूश होईल! अशा रीतीने एकच चहा दोन भिन्न व्यक्‍तींना एकाचवेळी दिला तरी वेगवेगळे परीणाम दिसून येउ शकतात. चहा मिळण्यात सुख वा दुःख नसते तर आपल्या चहाबद्दलच्या अपेक्षेंवर ते अवलंबून असते हे यातून सिध्द होते. त्यामुळे आपल्या मनातील असंतुष्टता जीवनात आधी घडलेल्या वा पुढे कधीतरी घडून येण्याची शक्यता असलेल्या घटनेत नाही तर आपल्या मनाच्या द्विविध अवस्थेत आहे. सामोऱ्या आलेल्या वर्तमानकाळाला मनात भूतकाळातील अनुभवांमुळे घट्‍ट झालेल्या पूर्वग्रहांतून बघण्यात आहे. जेव्हा एकाचवेळी दोन परस्पर विरोधी लक्ष्ये गाठायची असतात तेव्हाच दुःख निर्माण होते हे कळल्यावर आपण जीवनाचे लक्ष्य फक्‍त एकच ठेवणे उचित आहे हे स्पष्ट होते.

आपणास आता असा विचार करायला हवा की कुठले लक्ष्य आपण स्वतःचे एकमेव ध्येय ठरवू शकतो. समजा खूप कष्ट करुन कल्पतरुखाली पोहोचल्यावर जर असे कळले की आपली एकच इच्छा पुरी होईल तर तुम्ही काय मागाल? आपल्यापैकी बहुतांशी लोकांना सांगता येणार नाही की ते अशी वेळ आली तर काय मागतील. त्या सर्व लोकांनी अजून स्वजीवनामध्ये नक्की काय प्राप्त करावयाचे आहे हे निश्चित केलेले नाही. अजून त्यांना एकाचवेळी अनेक गोष्टींबद्दल कुतुहल वाटत आहे. जसे अर्जुनाला युध्द जिंकून राज्य प्राप्त करावयाचे आहे आणि त्याचवेळी विश्वरुपही बघावयाचे आहे तशी यांची अवस्था आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अर्जुनासारखेच भय आहे, दुःख आहे. या अवस्थेतून सुटका होण्यासाठी भगवंत म्हणत आहेत की कुठल्यातरी एकाच गोष्टीचा अनन्य ध्यास धर. यातच तुला परमसुखाची प्राप्ती होणार आहे. आणि कुठले ध्येय निवडायचे? या प्रश्नाचे एक आणि एकच उत्तर त्यांनी दिले आहे. ते म्हणजे भगवंताच्या अमूर्त, निर्गुण रुपाची भक्‍ती. स्वतःच्या आत्मरुपाची संपूर्ण ओळख करुन घ्यावयाची इच्छा हेच ध्येय आपण सर्वांनी ठरविले पाहिजे. त्याशिवाय दुसरे कुठलेही लक्ष्य संसारातील एखाद्या वस्तूची प्राप्ती करणेच असणार आणि त्या वस्तूला विरोधी अशी वस्तू डोळ्यासमोर आली की दुःख होणारच. उदाहरणार्थ, खूप पैसे मिळवायचे ध्येय ठरविले की त्याकरीता कौटुंबिक जीवनाकडे दुर्लक्ष करावा लागण्याचा दुःखाला सोसावे लागते, स्वतःच्या बायकोमुलापासून मानसिक फारकत होण्याच्या शक्यतेला तोंड द्यावे लागते. तुम्ही अगदी भगवंताच्या एका सगुण रुपाची प्राप्ती करण्याचा निश्चय केलात तरी त्या रुपाविरुध्द असलेल्या शक्‍ती जवळ नकोत ही भावना तुम्हाला कधीनाकधी दुःखात लोटणारच आहे. वैष्णवांचा शैवभक्‍तांशी संबंध येणारच आहे किंवा त्यांच्या वाटेलासुध्दा जायला नको या अतिरेकी भूमिकेला तोंड द्यावे लागणार आहे. आपण जरा विचार केला तर असे सहज कळेल की शाश्वत सुख हवे असेल तर भगवंताच्या निर्गुण रुपाबद्दल आत्मीयता बाळगून आपले आयुष्य व्यतीत करण्यातच हित आहे. बाकी कशात नाही.

जेव्हा बाकी कुठल्याही गोष्टीबद्दल असलेले आकर्षण नष्ट होते तेव्हा का म्हणून कुणा एकाबद्दल प्रीती आणि कुणा दुसऱ्याबद्दल द्वेष उत्पन्न होईल? आपण आपोआप ‘संगवर्जित’ आणि ‘निर्वैर सर्वभूतेषु’ होऊ. आपली कर्तव्ये पार पाडत असताना सतत भगवंताचे अनुसंधान ठेवणे ज्याला जमले तो भगवंतामध्ये विलीन झाला असे म्हणायला हरकत नाही आणि हीच गोष्ट भगवान अर्जुनाला समजावून सांगत आहेत.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक ११ ऑक्टोबर २००९)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: