ओवी(४४ ते ४७)/६: कर्मबंधनांतून सुटका कशी होईल?

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जैसी मही हे उद्भिजे । जनी अहंबुध्दीविण सहजे ।

आणि तेथींची तिये बीजें । अपेक्षीना ॥ ४४:६ ॥

तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें ।

जें जेणें अवसरें । करणें पावे ॥ ४५:६ ॥

तें तैसेंचि उचित करी । परी साटोप नोहे शरीरीं ।

आणि बुध्दीही करोनि फळवेरी । जायेचिना ॥ ४६:६ ॥

ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसी ।

तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वर ॥ ४७:६ ॥

गीतेच्या चतुर्थ आणि पंचम अध्यायात भगवान कर्मयोगी आणि बुध्दीयोगी साधकांचे एकत्व दर्शवितात. कर्मे करीत असताना भगवंताचे अनुसंधान सतत ठेवून समोर आलेली कर्मे करणे हा कर्मयोग आहे आणि स्वतःच्या आत्मरुपाची जाणीव निरंतर जागृत ठेवून स्वतःवर कर्तृत्वाच्या अहंकाराचा लेप न देणे हा बुध्दीयोग वा सांख्ययोग वा संन्यास आहे. या दोन्ही क्रियांतून स्वतःच्या व्यावहारिक जीवनातील रुपापासून सुटका होऊन निर्गुण आत्मरुपाबद्दल आपुलकी आपल्या मनात निर्माण होते. मग आपल्या जीवनाचे ध्येय संसारात पुढे येण्याऐवजी स्वरुपानुसंधानात मग्न रहाणे होते. म्हणून हे मार्ग एकच आहेत असे भगवान म्हणतात. सहाव्या अध्यायाची सुरुवातही या दोन तऱ्हेच्या साधकांची एकात्मकता दाखविण्यानेच होते:

श्रीभगवानुवाच-अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।

स संन्यासी च योगी च न निरग्निर्य चाक्रियः ॥ गीता १:६ ॥

‘अर्जुना, जो कर्माच्या फळाची इच्छा सोडून विहित कर्मे करतो तोच संन्यासी आणि (कर्म)योगी होय. निव्वळ कर्म सोडून वा अग्नी नष्ट करुन (अग्निहोत्री ब्राह्मणाचे नित्यकर्म सूर्योदयाच्या वेळी अग्नी प्रज्वलित करणे असते. ते विहित कर्म सोडण्याचा इथे संदर्भ आहे) कुणी संन्यासी होतो असे नव्हे.’ अशी गीतेच्या सहाव्या अध्यायाची सुरुवात आहे. या श्लोकावर भाष्य म्हणून ज्या ओव्या आहेत त्यातील उपरनिर्दिष्ट ओव्यांमध्ये श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत: “ज्याप्रमाणे पृथ्वी ‘माझ्यामुळे हे उत्पन्न झाले’ हा अभिमान न बाळगता स्वतःच्या अंगावर सहज पडलेल्या बीजांमधून मोठमोठे वृक्ष निर्माण करते, आणि त्या वाढलेल्या झाडांच्या फळांची आशा धरीत नाही (४४). त्याचप्रमाणे स्वतःच्या या जन्मातील वा पूर्वजन्मांतील कर्मांमुळे (म्हणजे अन्वयाने) वा सद्य सामाजिक परिस्थितीने जी कर्मे समोर येतात (४५). ती सर्व स्वशक्‍तीनुसार पार पाडण्याचा प्रयत्‍न करीत असताना कर्म करणारे माझे शरीर म्हणजे मी नव्हे या वस्तुस्थितीची जाणीव ठेवून स्वकर्मांपासून मिळणाऱ्या फळांकडे जो संपूर्ण दुर्लक्ष करतो (४६). तोच संन्यासी आहे आणि निश्चित त्यालाच (कर्म)योगीश्वर म्हणतात असे अर्जुना लक्षात ठेव (४७).”

वरील ओव्यांतून माउली फार सुंदरपणे आपल्या समोर येणाऱ्या कर्मांची कारणे सांगत आहे आणि कर्मबंधनांतून स्वतःची सुटका करण्याचा मार्गसुध्दा दर्शवित आहे. ‘अन्वय’ आणि ‘जात (म्हणजे सामाजिक बांधिलकी)’ या दोन गोष्टींमुळे आपणास कर्मे करावीशी वाटतात ती केली पाहिजेत असे त्यांनी लिहिले आहे. या दोन कारणांशिवाय इतर कुठल्याही कारणाने उत्पन्न झालेली कुठलीही कर्मे करण्याची गरज नाही असे इथे अध्यारुत आहे. आणि आपले हे वर्तन कर्मबंधनांतून सुटकेचा मार्ग आहे असे आश्वासनही आहे!

अन्वय म्हणजे बेरीज. व्यतिरेक म्हणजे वजाबाकी. भूतकाळात केलेल्या कर्मांचा, इच्छांचा अन्वय आपल्यासमोर येतो त्याचा व्यतिरेक कसा करायचा? विहित कर्मे करणे म्हणजे पूर्वकर्मांच्या बंधनातून सुटणे होय. आणि त्या कर्मांच्या फळांबद्दल संपूर्ण विरक्‍ती ठेवणे म्हणजे नवा अन्वय तयार न करणे होय. ज्या हाताला रंग लागलेला आहे अशा हाताने जमीन स्वच्छ करायला घेतली तर आधीचा रंग जाऊन आपल्या हाताचा रंग जमिनीला लागतो त्याप्रमाणे आपल्या पूर्वकर्मांच्या अन्वयाचे निराकरण करतानाच कर्मफळांच्या वासनेने एक नवीन बंध निर्माण होत असतो. जेव्हा हात स्वच्छ करुन जमीन ओल्या हाताने पुसतो तेव्हाच ती निर्मळ होते त्याप्रमाणे वर्तमानकाळात केलेल्या कर्मांपासून भविष्यात लाभ बघणे सोडल्याने आपल्या संचिताचा व्यतिरेक होतो. कर्मांच्या दरबारात आपली थकबाकी चुकती करुन हिशेब संपवायचा असेल तर पूर्वकर्मांमुळे उत्पन्न झालेल्या कर्मांकडे दुर्लक्ष करुन उपयोग नाही. जन्म घेतलेला आहे पण आई-वडिलांची काळजी घेणे सोडून दिले तर आपण परमार्थी होत नाही तर स्वार्थी ठरतो आणि नवीन बंधनांत अडकतो. ‘निष्क्रिय होणे’ या शब्दांचा अर्थ कर्म थांबविणे असा नव्हे तर कर्मात फलाभिलाषेने अडकलेले आपले मन मोकळे करणे असा आहे. कुठल्याही कर्माची सुरुवात मनातील अभिलाषेमुळे होत असेल तर आपली बाकी तर चुकती होत नाहीच आणि उलट एक नवीन खाते उघडले जाते! म्हणूनच बाराव्या अध्यायात खऱ्या भक्‍ताचे वा चौदाव्या अध्यायात गुणातीताचे वर्णन करीत असताना भगवान ‘सर्वारंभ परित्यागी’ (म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणे सोडून देणारा) हे विशेषण वापरतात.

यानंतर ‘परी साटोप नोहे शरीरीं’ या शब्दांतून कर्मफलत्यागाचे रहस्य महाराजांनी उलगडलेले आहे. निव्वळ आपला देह हेच आपले अस्तित्व नव्हे याची जाणीव सतत ठेवणे जरुरी आहे. देहाला नाकारणे चुकीचे आहे यात शंका नाही, परंतु देहालाच सर्वस्व मानणेही तितकेच चुकीचे आहे असे माउली ‘साटोप नोहे शरीरीं’ या शब्दांतून सांगत आहे. स्वतःला देहापुरतेच सीमीत न करणे म्हणजे साटोप नोहे शरीरीं होय. फलाभिलाषेतून मुक्‍त होण्यास आधी कर्मफळाची अपेक्षा ठेवणारे आपले देह-मनाचे अस्तित्व म्हणजेच आपले अस्तित्व नव्हे याची खात्री पटवून घेणे जरुरी आहे. एकदा ही गोष्ट पटली की मगच आपण कर्मयोगी होण्यास पात्र होऊ. समोर आलेली कर्मे उत्तमरीतीने करण्यात कर्मयोग नाही तर स्वकर्मांचा कर्ता आपण नाही हे बघण्यात कर्मयोग आहे.

वह बचपनके दिनभी क्या दिन थे । जीनेका बोझा छोड आनंदमे हम रहते थे ।

लेकीन जबसे ली कर्तृत्वकी डोर अपने हाथ । बैठे है रोते हम सब साथ साथ! ॥

देह-मनाव्यतिरीक्‍त आपले अस्तित्व आहे हे कसे जाणून घ्यायचे यावर आता विचार करु. जन्मापासून असलेल्या सहवासाने आपणास स्वतःच्या देहाबद्दल आणि मनाबद्दल ममत्व निर्माण झाले आहे. कारण एखादी व्यक्‍ती वा घटना आपल्या जीवनात महत्वपूर्ण कशी होते? जेव्हा आपण त्याबद्दल निरंतर विचार करतो, सहवासात राहतो तेव्हाच. यातून मुक्‍तता हवी असेल तर सध्या आवडणाऱ्या गोष्टींचा सहवास आपण कमी केला पाहिजे. परंतु आत्तापर्यंत महत्वाच्या मानलेल्या गोष्टींचा वियोग आपणहून करणे आपणास कठीण वाटते, अशक्य वाटते.

याउलट लहानपणी आपली अवस्था कशी होती? कालपर्यंत अत्यंत जवळीक असलेल्या मित्राची दोस्ती आई-वडिलांनी जागा बदलण्याने तुटली तरी आपण हताश न होता नवीन मित्र शोधून काढत होतो. याचे कारण असे की आता तो मित्र आपल्याला भेटणार नाही या गोष्टीचा संपूर्ण स्वीकार आपण केलेला होता. भगवंताने का असे केले वगैरे गोष्टींचा विचार न करता, ‘ठीक आहे, आता परत पहिल्यापासून दोस्त शोधायला सुरुवात करायला हवी’ असे आपल्या डोक्यात येते. परंतु आता आपल्या हातात नसलेल्या शक्‍तीमुळे जर हवीशी वाटणारी गोष्ट जीवनातून निघून गेली तर आपली उमेद नष्ट होते. आपण गुरुंच्या शोधात निघतो! बहुतांशी लोक गुरु स्वतःला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळतील (वा असलेल्या तशाच राहतील) याची खात्री ठेवण्यासाठी गुरु करतात. या सर्व भावनांचा पाया आपणास स्वतःसाठी काय चांगले आहे याची पूर्ण जाणीव आहे हा आहे. लहानपणचे आपण आणि आत्ताचे आपण यांमधील मूलभूत फरक हा आहे की तेव्हा स्वतःसाठी काय चांगले आहे याचा निर्णय आपण पालकांवर सोपवीत होतो आणि आत्ता स्वतः ठरवितो. परंतु हे लक्षात घ्या की ज्याक्षणी आपणास काय हवे याची पूर्ण खात्री आपणास असते त्याक्षणी आपण ‘शरीरी साटोप’ झालो आहोत हे ध्यानात घ्या.

देहभावातून मुक्‍तता हवी असेल तर माझ्यासाठी काय चांगले आहे हे मला माहित नाही अशी अवस्था स्वतःच्या जीवनात निर्माण करा. काय हवे ते माहित नाही असे जीवन जगण्यात कमीपणा आहे हे आपल्या मनावर वर्षोनुवर्षे बिंबवले गेले आहे. उदाहरणार्थ, सध्याच्या शाळकरी मुलांनाच मोठेपणी काय बनायचे आहे हे कळलेले असते! आणि त्याबद्दल आपण त्यांचे फार कौतुक करुन जीवनात हा यशस्वी होणार असे सर्वांना सांगत सुटतो. या पार्श्वभूमीवर आपण कसे होणार ‘माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे हे मला माहित नाही’ या भूमिकेत मग्न?

इथे परत लहानपणच्या आपल्या अवस्थेकडे आपण बघितले पाहिजे. स्वतःच्या लहानपणी आपल्या जीवनातील सर्व महत्वाच्या गोष्टींचा निर्णय आपण आपल्या पालकांच्या हाती सोपवून आपण बिनमहत्वाच्या गोष्टींचा निर्णय घेत असतो. उदाहरणार्थ, कुठल्या शाळेत जायचे हे पालक ठरवितात आणि स्वतःच्या वाढदिवसाला काय भोजन हवे हे आपण ठरवितो! कुणाशी मैत्री ठेवावी याचा सल्ला आई-वडिल देतात आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचे का लपाछपी हे आपण ठरवितो. ह्याक्षणी जर आपल्याला अशी व्यक्‍ती मिळाली की तीच्यावर आपल्या आयुष्यातील सर्व महत्वाच्या गोष्टींचा निर्णय घेण्याची जबाबदारी टाकता येईल तर आपण परत स्वतःच्या जीवनात निर्धास्तपणे जगू शकू. स्वतःला काय हवे याबद्दल आपण अजाण होऊ. त्या व्यक्‍तीलाच विचारु की माझ्यासाठी काय योग्य आहे हो?

म्हणून स्वतःच्या देहभावनेतून मुक्‍तता हवी असेल तर काय करायला हवे तर दुसऱ्या कुणावरतरी श्रध्दा ठेवायला हवी. मग ती श्रध्दा एखाद्या गुरुतुल्य व्यक्‍तीवर असो वा परमेश्वराच्या एखाद्या अवतारावर असो वा अशा एखाद्या अमूर्त शक्‍तीवर असो जी सर्व जगाचे नियंत्रण करीत आहे. अशी श्रध्दा ठेवणे पळवाट आहे का असा विचार न करता श्रध्दा ठेवा. जर एखाद्या कडू औषधाने रोग दूर होत असेल तर आपण ते त्याच्या चवीचा विचार न करता घेतो त्याप्रमाणे आंधळी श्रध्दा ठेवणे मनाला पसंद पडले नाही तरी त्यातून मनाला जडलेल्या स्वाहंकाराच्या कर्करोगावर मात होणार आहे म्हणून तुम्ही श्रध्दा वाढवा. आपल्या जीवनातील महत्वाचे निर्णय दुसरा कोणी घेणार आहे या जाणीवेत आपण जेव्हा निर्धास्त होतो तेव्हा समोर आलेली कर्मे करीत असताना आपण कर्ता नाही याची जाणीव होते. तेव्हाकुठे आपली कर्मफळाच्या आशापाशातून सुटका होते. अठराव्या अध्यायात म्हणूनच माउली म्हणते ‘जय जय देव श्रीगुरो, अकल्पनाप्य कल्पतरो’. गुरुकृपेवाचून आपली कपोलकल्पित देहभावनेतून सुटका होत नाही याचा अर्थ असा आहे की आपली गुरुकृपेवर जेव्हढी श्रध्दा वाढते तेव्हढे समाधान आपल्या जीवनात सतत राहते. आपल्या कल्पनेबाहेरील फळ मिळणार आहे हे जाणून घेतल्यावर कर्मफळाच्या कल्पनेचे महत्व शिल्लकच राहणार नाही, अपेक्षा उरणार नाही. संन्यासी वा कर्मयोगी होण्यासाठी काय करावयाचे आहे याचे उत्तर म्हणजे: स्वतःच्या कल्पनेनी निर्माण केलेल्या फळांबद्दलची आपुलकी हळूहळू नष्ट करावयाची आहे. स्वकर्मांच्या कल्पित फळांबद्दल असलेला आपलेपणा घालविण्यास कुणाएकावर श्रध्दा ठेवून आपण त्यांच्याबद्दल विचारसुध्दा न करणे हा एक सोपा उपाय आहे. यातच परमार्थ साधण्यास गुरुंची आवश्यकता का आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे.

॥ हरि ॐ ॥

(प्रवचनाची mp3 फाईल)

(बंगलोर, दिनांक १८ ऑक्टोबर २००९)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: