श्लोक ५/६: आपणच आपले मित्र आणि शत्रू असतो

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

उध्दरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌ ।

आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैवरिपुरात्मनः ॥ गीता ५:६ ॥

भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला योगारुढ पुरुषाचे वर्णन केले आहे. जेव्हा साधकाला स्वतःच्या निर्गुण रुपाचे विस्मरण होणे थांबते तेव्हा तो योगस्थानावर आरुढ झाला आहे असे समजले पाहिजे असे भगवान अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात. अर्थात इथे ‘कधीही विस्मरण न होणे’ या शब्दांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की एखाद्या कोऱ्या कागदावर शाईने एका सरळ रेषेत जवळ-जवळ ठिपके काढले तर दुरुन बघितल्यास सलग एक रेष दिसते तसे आपले भगवंताबद्दलचे अनुसंधान सतत असले पाहिजे. म्हणजे काय, तर काही काळ समोर आलेल्या कर्मांमध्ये आपले लक्ष गुंतले तरी ते कर्म करीत असताना मधून मधून आपण कर्ता नाही याची जाणीव होणे म्हणजे निरंतर स्वतःच्या निर्गुण अस्तित्वाचे स्मरण असणे होय. असे होण्यास हातातील कर्माच्या फलाची अपेक्षा नसणे अत्यंत जरुरी आहे. त्याकरीता स्वतःच्या इंद्रियसुखांबद्दल निरीच्छ राहणे आवश्यक आहे.

भौतिक सुखाबद्दल निरीच्छ राहण्याकरीता इंद्रियसुख चांगले नाही अशी कल्पना करुन जो त्यांचा त्याग करतो तो साधक इथे अभिप्रेत नाही हे ध्यानात घ्या. ‘कल्पना करुन’ जो त्याग होतो तो कुठल्यातरी साच्यात बसण्याच्या प्रयत्‍नाने झालेला असतो आणि त्यामुळे त्याचे अस्तित्व सत्यावर अवलंबून नसते. जोपर्यंत साचा अस्तित्वात राहतो तोपर्यंतच त्यामुळे उत्पन्न झालेला त्याग राहतो. खरी गोष्ट अशी आहे की साधकाच्या मनातून अमुक एक चांगले आणि अमुक एक वाईट या भावनांचा समूळ नायनाट होणे जरुरी असते. सध्याचे संकुचित ध्येय सोडून कुठल्यातरी उच्च ध्येयामध्ये रममाण होणे म्हणजे परमार्थ नव्हे. म्हणून इंद्रियसुखापासून दूर का व्हावे, कर्मफलांच्या वासनांचा त्याग का करावा तर त्यांचे खरे रुप दिसल्यामुळे. बाकी कुठल्याही कारणाने नव्हे.

आपले गुरु सांगत आहेत वा सर्व संतांनी इंद्रियसुखापासून दूर व्हा हाच उपदेश केला आहे म्हणजे ते खरेच असणार असा विश्वास ठेवून आपण आपल्या त्यागाची सुरुवात करु शकतो पण ही स्थिती योगारुढ स्थिती नव्हे. योगारुढ अवस्थेत स्वतःच्या अपरोक्ष ज्ञानाने शास्त्रात सांगितलेल्या तत्वांवर सत्यतेची मोहर लावली आहे हे गृहीत धरले आहे. अशा योग्याने केलेला इंद्रियसुखांच्या त्याग आपल्यासारख्या प्रामाणिक साधकांच्या जीवनातील त्यागापेक्षा भिन्न असतो. त्याचा त्याग स्वसंवेदनांवर अवलंबून असल्याने शाश्वत असतो आणि आपला त्याग स्वतःच्या गुरुंवरील श्रध्देवर, वा एखाद्या तत्वावर अवलंबून असल्याने तात्पुरता असतो. समजा आपल्या गुरुंमध्ये आपल्या दृष्टीकोनातून काही न्यून दिसले तर आपली श्रध्दा कमी होण्याचा संभव असतो आणि मग त्या श्रध्देवर उभारलेल्या सर्व गोष्टी कोलमडण्याचा धोका असतो. किंवा आत्ता महत्वाचे वाटणारे तत्व काही कालाने बदलले तर त्यागाचा पायाच निघून जातो. अशा रीतीने स्वतःची सद्यमनस्थिती अशाश्वत आहे याची जाणीव सूक्ष्मरुपात आपल्याला असतेच. आणि त्यामुळे आहे ती स्थिती जपून ठेवण्याचा आपला प्रयास सुरु असतो. उदहरणार्थ, आपल्या सहवासातील जी माणसे आपल्या गुरुंना मानत नाहीत त्यांच्यांशी संबंध तोडणे वगैरे गोष्टी आपल्या मनातील ‘गुरुंवरच्या श्रध्देला तडा जाईल’ या भितीलाच दर्शवितात. आणि एकदा मनात भय उत्पन्न झाले की आपण आत्मानंदाशी असलेल्या योगाला वंचित होतो. म्हणून दुसऱ्या व्यक्‍तीच्या प्रभावाने आपणामध्ये आत्मानंद निर्माण होणे अशक्य आहे. निव्वळ स्वतःच्या प्रयत्‍नांनीच आपण साध्य गाठण्याची शक्यता निर्माण करणार आहोत.

आपल्या मनातील ‘स्वप्नातील राजकुमाराला’ (जो शुभ्र अश्वावरून भरधाव येऊन आपल्याला सध्याच्या अवघड अवस्थेतून सोडवील) शोधायच्या इच्छेचा अजून एक दूरगामी परिणाम म्हणजे स्वप्रयत्‍नांचा अभाव. एकदा दुसरी व्यक्‍ती वा तत्व आपणास मुक्‍ती देणार आहे अशी कल्पना झाली की आपल्या प्रयत्‍नांची दिशा अशी व्यक्‍ती वा तत्व शोधणे अशीच होते. समोर आलेल्या प्रसंगांना तोंड देत असताना ‘काय करु हो, आम्हांपाशी समर्थ गुरु नाहीत’ असा विचार आपल्याला दुर्बल करीत असतो. आपले सर्व लक्ष एखादे विश्रातिस्थळ शोधण्यात असल्याने स्वतःहून प्रयत्‍न करणे थांबते. इथे आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की जर आपण प्रामाणिकपणे भगवंताच्या निकट जायचे प्रयत्‍न करीत असलो तर आपोआप आपले सद्‌गुरु जवळ येतात. अजून गुरु मिळाले नाहीत याची खंत बाळगित असताना अजून आपण शिष्य व्हायला तयार नाही याची जाणीव ठेवा. मग तुमचे प्रयत्‍न गुरु शोधायला भटकण्याऐवजी स्वतःमधील शिष्यत्व कसे जागृत करावे इकडे वळतील. स्वप्रयत्‍नांना सुरुवात होईल. असो.

साधनेच्या या मार्गात स्वतःच्या इच्छांवर स्वतःच ‘आपोआप’ नियंत्रण (म्हणजे सूर्य उगविल्यावर अंधार आपोआप निघून जातो तसे) ठेवणे जरुरी असल्याने आज निरुपणाला घेतलेल्या श्लोकातून भगवान असे म्हणत आहेत की: “आपणच आपला उध्दार करुन घेतला पाहिजे आणि अधःपात नाही केला पाहिजे. अशा रीतीने (आत्मानंद मिळविण्याच्या दृष्टीने पाहिल्यास) आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू होत असतो.”

जाऊन स्वगुरुंच्या सान्निध्यात । रहा साधनेच्या मार्गात ।

करुन साधना सतत । व्हाल मनोबलाने समर्थ ।

होता समर्थ झेलाया स्वभावनांना । दिसेल ध्येय स्वसंवेदनांना ॥

जर कुठल्याही व्यक्‍तीच्या सान्निध्यात वा ध्येयाच्या ध्यासात राहून परमानंद मिळणार नाही हे स्पष्ट असले तरी गुरुंची आवश्यकता का आहे याबद्दल आपण विचार करु. व्यवहारातील उदाहरण बघितले तर कदाचित ही गोष्ट स्पष्ट होईल. असे बघा आपण आपल्या जीवनाची कमीतकमी पंधरा वर्षे पाठशाळेत आणि महाविद्यालयात व्यतीत करतो. नंतर जेव्हा नोकरीला सुरुवात होते तेव्हा कळते की आत्तापर्यंत प्राप्त केलेल्या पुस्तकी ज्ञानाने काही होत नाही. प्रत्यक्ष व्यवहारातील कुठलीही घटना पुस्तकी साच्यात बसत नाही आणि स्वतःचे डोके लढवूनच समोर आलेल्या कर्माला पार पाडले पाहिजे. याचा अर्थ आपण असा समजत नाही की इतकी वर्षे आपण आयुष्य फुकट घालविले आहे. आपणास कल्पना असते की पुस्तकी ज्ञानाने समोरील प्रश्न सुटला नाही तरी त्याला सोडविण्यासाठी काय करायला हवे हे कळण्यास ते ज्ञान उपयुक्‍त असते. अगदी याचप्रमाणे संतांची पुस्तके वाचून स्वतःचे जीवन जगण्यास प्रत्यक्ष मदत होत नसली तरी त्यांच्या उपदेशाने स्वजीवनातील प्रसंगांना तोंड कसे द्यावे याची माहिती नक्कीच होते. मग तुमच्या वैयक्‍तिक जीवनात निघालेली तोड कुठल्याही संताने स्वतः काढली नसली तरी तुमच्या त्या उपायाचे उगमस्थान संतोपदेशातच आहे. तेव्हा निव्वळ गुरुंच्या सान्निध्यात राहून आपणास परमार्थ प्राप्त होणार नाही हे खरे असले तरी गुरुपोदेशाशिवाय पर्याय नाही हेही तितकेच खरे आहे. संसारातून उत्पन्न होणाऱ्या भावनांच्या वादळापुढे उभे राहून शांत विचार करणे ही सोपी गोष्ट नाही. असा विचार करण्याची शक्‍ती येण्यासाठी सद्‌गुरुंचे पाठबळ अत्यावश्यक आहे. सद्‌गुरुंची कृपादृष्टी आपल्यावर झाली की आपल्यातील सारासार विचार करण्याची शक्‍ती जागृत होते.

परंतु गुरुकृपा इथेच थांबत नाही. आपल्यावरील परमप्रेमाने आपले गुरु आपणास साधनेचा मार्गही दर्शवितात. त्यांच्यासमोर गेल्यानंतर प्राप्त झालेल्या कृपाकटाक्षाने जी शक्‍ती जागृत झाली आहे तीचे संगोपन करण्याची ताकद त्यांनी सांगितलेल्या साधनेमध्ये असते. गुरुपोदिष्ट साधना प्रामाणिकपणे नियमित साधकाने करणे अत्यंत जरुरी आहे कारण त्यायोगे मनात आलेला विचार कृतीत आणण्याची क्षमता त्यामध्ये उत्पन्न होते. जीवनात काही कारणांने निर्माण झालेल्या भावनांच्या वादळापुढे उभे राहून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बघणे ही प्राथमिक गोष्ट आहे. त्यानंतर जर दिसलेल्या मार्गावर चालण्याचे धैर्य तुमच्यात नसेल तर तो मार्ग दिसून काय उपयोग? उदाहरणार्थ, मधुमेह झाल्यावर रक्‍तामधील साखरेवर नियंत्रण ठेवले पाहिजे हे सर्वांना कळते परंतु प्रत्यक्षात गोड खाणे कमी करुन, स्वतःची बसक्या जीवनशैलीला अधिक कार्यरत करणे कितीजणांना जमते? आपण ‘कळते पण वळत नाही’ असे म्हणतो! ही म्हण आपली दुर्बल अवस्था दाखविते. आपली अशी स्थिती होऊ नये असे वाटत असेल तर नियमितपणे साधना करणे आपले कर्तव्य आहे. तेव्हा गुरुंकडे जाणे आवश्यक आहे आणि त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमितपणे करणेही जरुरी आहे. पण निव्वळ त्यामुळे परमानंद प्राप्त होईल असे नाही. साधनेमुळे उत्पन्न झालेल्या तटस्थ मानसिक अवस्थेचा दैनंदिन जीवनात प्रभावी उपयोग करणे अजून बाकी आहे. ही शेवटची गोष्ट प्रत्येकाने आपापल्या पध्दतीने करायची आहे. इथे कुठले समीकरण लागू पडत नाही.

आपल्या या गुरुनिष्ठेने स्वतःमधील ताकदीला आपली शक्‍ती दाखविण्याचे सामर्थ्य येईल. आपण आपले मित्र बनण्याची क्षमता आपणामध्ये उत्पन्न होईल. नाहीतर इंद्रियसुखाच्या सोप्या मार्गावर चालण्यातच आपण धन्यता मानू. हा मार्ग आपल्या तारुण्यावस्थेत सध्या सोपा वाटत असला तरी यात कारणविरहीत नैराश्यरुपी शत्रू टपून बसलेले आहेत. सर्व जीवन सुरळीत चाललेले असूनही मनातील अस्वस्थता न जाणे ही त्यांची करणी आहे. या गोष्टीला कसे तोंड द्यायचे याचे शिक्षण हवे असेल तर चला सत्संगती करायला. ज्या गृहस्थाने स्वतः जीवनातील भावनांच्या वादळांना यशस्वीपणाने तोंड दिले आहे त्याच्या पायाशी बसून आपण काही गोष्टी शिकू आणि स्वतःच्या जीवनात त्यांचे अनुकरण न करीता नवीन उपाय शोधून काढू. भगवान श्रीकृष्णांच्या ‘आपण आपले मित्र आहोत’ या वक्‍तव्याचा अर्थ असा आहे असे वाटते. याव्यतिरीक्‍त आपले दुसरे वागणे म्हणजे पारमार्थिक दृष्टीकोनातून आपणच आपला घात करुन घेणे आहे.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक ३१ ऑक्टोबर २००९)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: