श्लोक ७/६: स्वतःचे अस्तित्व संपविणे पुरेसे आहे

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।

शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ गीता ७:६ ॥

सहाव्या अध्यायातील सातव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की ‘जो स्वतःच्या अंतःकरणावर ताबा मिळविण्याने सदा प्रसन्नचित्त असतो त्याला आत्मरुपी भगवंताचे दर्शन होते व त्यानंतर शीत-उष्ण, सुख-दुःख, मान-अपमान इत्यादी द्वंद्वांना तो समान नजरेने पाहतो.’

याचा अर्थ असा की आयुष्यातील द्वंद्वांतून मुक्‍त होणे हे साधनेचे अंतिम ध्येय नाही. अंतःकरणावर नियंत्रण मिळविल्यानंतर आपण आपोआप द्वंद्वातीत होऊ. ज्ञानी माणसाच्या जीवनातून अपमान नष्ट होत नाहीत तर यदाकदाचित भोगाव्या लागणाऱ्या दुःखांचा त्याच्या स्वानंदमयी वृत्तीवर परिणाम होत नाही असे भगवान आपणास सांगत आहेत. साधना केल्याने दृष्य जीवनाची पातळी उंचावेल असे कुणी मानू नये. साधनेमुळे बदलते काय तर जीवनाकडे बघण्याची दृष्टी.

परमार्थामध्ये आत्मानंद मिळविणे हे परमध्येय मानले आहे. भगवंताचे दर्शन आत्मरुपात घेणे म्हणजेच आत्मानंदात मग्न होणे होय. इथे स्वप्रयत्‍नांनी काही निर्माण करायचे नसते तर जे सतत, स्वयंभू अस्तित्वात आहे त्यासमोरील असलेला पडदा काढून टाकायचा असतो. एखाद्या सार्वजनिक मूर्तीचे उद्‌घाटन होण्याआधीच मूर्तीची स्थापना झालेली असते पण ती झाकून ठेवलेली असते आणि सुमुहुर्तावर प्रतिष्ठीत मंडळीद्वारे ते आवरण दूर करुन सर्वजनांना त्या मूर्तीचे दर्शन होते. त्याचप्रमाणे आपल्या ह्रुदयात अनादीकालापासून तयार असलेल्या भगवंताच्या मूर्तीला आपण स्वतःच्या संकुचित व्यक्‍तिमत्वाच्या आवरणाखाली झाकले आहे. सांगायची गोष्ट अशी आहे की मूर्तीच्या अस्तित्वाबद्दल संदेह नाही, तर तीच्या दिसण्यामध्ये अडथळा आहे. जेव्हा आपण सद्‌गुरुंसारखा प्रतिष्ठीत माणसाला आपल्या ह्रुदयात आसन ठेवण्यास आमंत्रित करु तेव्हाच त्यांच्या परम दयाळू वृत्तीने आपणास भगवंताच्या आत्मरुपी मूर्तीचे दर्शन होईल! आपणास स्वतःचे संकुचित अस्तित्व, जे आपल्या देहावर आणि मनांच्या विकारांवर अवलंबून आहे, नष्ट करायचे आहे. काही निर्माण करायचे नाही तर अज्ञानाने निर्माण झाले आहे असे भासणाऱ्या स्वप्नील वस्तूंपासून दूर व्हायचे आहे! बाकी काही करायची आवश्यकता नाही.

‘मी जे काही घडते आहे ते भगवंताच्या इच्छेनुसार घडते आहे असे मानते. जे आहे त्यातच आनंद मानायचा प्रयत्‍न करते. हाच परमार्थ आहे ना?’ असे एका बाईंनी मला विचारले. आयुष्याच्या उत्तरार्धात पोहोचल्यावर बऱ्याच विचारांती हे तत्व शोधून काढल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांच्याबरोबर असलेल्या तरुणमंडळींच्या चेहऱ्यावर काय उत्तर मिळते याची उत्सुकता होती. जर मनाच्या अवस्थेला एक ठराविक दिशा देऊन परमार्थ साधणार असता तर तो आपल्या प्रयत्‍नांवर अवलंबून आहे हे स्पष्ट होते. व्यवहारामध्येही आपले आयुष्यभर प्रयत्‍न सुरु असल्याने आपणास परमार्थाला प्रयत्‍नांच्या आधारे कवटाळण्यामध्ये चूक दिसत नाही. परमार्थामधील आनंद ‘मानायचा’ नसतो तर ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ या न्यायानुसार तळहातावरील आवळ्यासारखा स्पष्ट बघायचा असतो. एखादी गोष्ट मानण्यामध्ये तीच्या अस्तित्वाला आपल्या संमतीची जरुरी लागते. उदाहरणार्थ, मी चांगला मनुष्य आहे की नाही याची सत्यता न पडताळता तुम्ही ‘मी चांगला आहे’ असे मानू शकता. मानणे ही आपल्या मनाची एक धारणा आहे आणि ती आपल्या प्रयत्‍नांनी निर्माण झालेली आहे. जेव्हा आपल्या प्रयत्‍नांमागील शक्‍ती क्षीण होईल तेव्हा ती नष्ट होणार आहे यात शंका नाही. मग तुम्ही म्हणाल ‘मला वाटले तसे तुम्ही नाहीत!’ भगवंताचे अस्तित्व जर आपल्या मानण्यावर अवलंबून असते तर त्याला भगवंत का म्हणावे?

‘पण परमार्थाची सुरुवात म्हणून असे वागण्यात काय बिघडते?’ आपणास ज्या मार्गाने जायचे नाही त्या मार्गाची माहिती काढण्याने आपणास काही फायदा होतो का?

‘पण सर्व संत असेच सांगतात की जे आहे त्यात समाधान माना आणि जे नाही त्याच्या अपेक्षेत राहू नका.’ आहे त्यात समाधान मानण्यामध्ये आत्तापर्यंत ठेवलेल्या पूर्वग्रहांना झुगारुन देण्याची धमक आहे. जेव्हा मनाप्रमाणे घडते तेव्हा आनंद प्रगट होतो आणि याउलट समाधानात मनाचा लय होत असतो. संतांच्या सांगण्याचा अर्थ असा आहे की जे घडले आहे त्याचा पूर्ण स्वीकार करा आणि पुढे काय होणार आहे याच्या काळजीत राहू नका. जेव्हा तुमच्या मनाविरुध्द घटना घडते तेव्हा मनाकडे दुर्लक्ष करणे हा साधनेचा मार्ग होऊ शकतो. आपली मानसिक स्थिती पूर्वग्रहांच्या संदर्भाने पडताळून पहायची जी सवय आपणास लागली आहे तीचा प्रभाव दुर्लक्ष करण्याने कमी होतो. मनाकडे दुर्लक्ष करण्याने आपल्या स्वभावातील पूर्वग्रहांचे महत्व कमी होते. एखाद्या नवजात अर्भकाच्या मनाची पाटी जशी कोरी असते तशी आपली ठेवली की त्यावर भगवंताची अक्षरे उमटू लागतात. ते अतिशय सुंदर साहित्य बघत बसणे म्हणजे आत्मानंदात रममाण होणे. अशावेळी आपण स्वतःच आनंदमय झालेलो असल्याने आनंद ‘मानायची’ गरजच उरत नसते. हा परमार्थ आहे.

दुःखाचे कारण आहे द्वैतात । आत्मानंदात नसते कुणी साथ ।

सर्वदृष्टीने रहा एकांतात । डुंबत परिपूर्णतेच्या स्वानुभवात ॥

‘म्हातारपणी फार एकटे वाटते बघा. ज्या मुलाबाळांकरीता आयुष्यभर खस्ता काढल्या ती सर्व मोठी होऊन आपापल्या संसारात मग्न झाली की आयुष्यात एक पोकळी निर्माण होते. वेळ घालविण्याकरीता बरीच साधने आहेत पण त्यासर्वांमध्ये कुठेतरी कमीपणा जाणवितो. नक्की काय कमी पडत आहे हे कळत नाही पण सतत न्यून जाणविते.’ आपण सर्वांनी हे शब्द कधीनाकधी ऐकलेले आहेत. स्वास्थ्य ठीक असताना आणि आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असतानादेखील आयुष्याच्या संध्याकाळी मनाचा अस्वस्थपणा जात नाही ही वस्तुस्थिती आहे. काय कारण असेल याचे?

प्राथमिक कारण म्हणजे ‘आपल्या मतांचे इतरांच्या जीवनातील महत्व कमी झाले आहे’ याची जाणीव होणे. परंतु अशी बरीच माणसे आहेत की ज्यांनी आपणहून जबाबदारींचा त्याग केला आहे आणि नवीन पिढीला त्यांच्या मताप्रमाणे जगायचे स्वातंत्र्य दिले आहे. अशा लोकांकडे बघितले तर त्यांच्या मनात अपार शांति भरलेली आहे असे दिसून येत नाही. म्हणजे हे कारण मूळ कारण नव्हे.

मूळ कारण हे आहे की आपण सतत कुठल्यातरी व्यक्‍तीच्या वा शक्‍तीच्या वा तत्वाच्या सान्निध्यात राहणे पसंत करीत असतो. आपल्या सर्वांचा अशा गोष्टीचा शोध चालू आहे की जी आपल्याजवळ सतत राहील आणि जीच्या जवळीकीत आपल्या सध्याच्या अपूर्ण जीवनाला पूर्णता येईल. उदाहरणार्थ, तरुणपणी आपल्या मुलांना चांगले वळण लावून त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणे हे तत्व आपण जवळ बाळगिले होते आणि त्याच्या सान्निध्यात आत्तापर्यंतचा काळ व्यतीत केला होता. तेव्हा स्वतःच्या जीवनाला अर्थ देण्याकरीता हे तत्व पुरेसे होते. परंतु आता मुले स्वतःच्या पायावर उभी राहील्याने जेव्हा आपले कार्य पुरे झाले असे वाटते तेव्हा या तत्वाचा सहवास सुखद वाटत नाही. त्यामुळे आपला स्वजीवनाला अर्थ देण्याचा शोध परत सुरु होतो. या शोधाचा अंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपले मन अस्वस्थ असते. कुठल्याही गोष्टीला, मग ती कितीही सामाजिकदृष्टीने भली असेल, आपल्याजवळ न ठेवता स्वतः संपूर्णपणे एकटे असावे असा विचारसुध्दा आपल्या डोक्यात येत नाही. ‘सेवानिवृत्तीनंतर वेळ मिळाला म्हणून समाजसेवा सुरु केली’ असे आपण फार गर्वाने इतरांना सांगतो. आपल्या दृष्टीने स्वतःच्या मुलांच्या संसारात नाक न खुपसता असे वागणे ही सर्वात उच्च अवस्था आहे. परंतु समाजसेवा करणे म्हणजे परक्यांच्या आयुष्यात लक्ष देणे नव्हे काय?! स्वतःच्या मुलांच्या संसारात न डोकावणे योग्य असेल तर परक्यांना आपणहून जाऊन मदत करणेही तितकेच अयोग्य आहे. अर्थात, आपण न बोलाविता कुणाला मदत करण्याची संधी जवळ आली तर वेगळी गोष्ट आहे. पण इथे अशा लोकांबद्दल बोलणे चालले आहे जी समाजसेवा करण्यामध्येच स्वतःच्या जीवनाचे सार्थक मानत आहेत. ज्यांच्या जीवनाचे ध्येयच दुसऱ्या कुणाला मदत करणे हे आहे. म्हणजे परक्यांच्या आयुष्यातील कमीपणावर यांचा संपूर्णपणा अवलंबून आहे. ही विसंगती त्यांना मानसिक सुख उपभोगण्यापासून वंचित करते.

खरी गोष्ट अशी आहे की आपण तरुणपणीही चुकीचे वागलो होतो आणि आत्ताही चूकच करीत आहोत. आपण ‘आपले आयुष्य कुठल्यातरी तत्वाकरीता जगणे’ असे चुकीचे ध्येय ठेवल्यामुळे आपल्या जीवनात सतत दुःख लिहीलेले आहे. असे म्हणण्याचे कारण असे की जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा आधार न घेता संपूर्णपणे एकटे असतो तेव्हाच आपण सुखी असतो. उदाहरण म्हणून बघायचे झाले तर जरा विचार करा, सहजपणे, चालता चालता, नजर वर उचलून आकाशाकडे बघितल्यावर सुंदर संध्याकाळ दिसते तेव्हा आपल्या मनात कोण बरोबर असते? त्या विहंगम दृष्याकडे बघताना स्वतःचे नावसुध्दा बरोबर नसते. फक्‍त ‘आपण’ आणि ‘दृष्य’ याची एकात्मता असते. पोटभर भोजन झाल्यावर मनाचे समाधान होते तेव्हाही हीच अवस्था असते. आयुष्यामध्ये जेव्हा आपणास खरा आनंद झाला होता तेव्हा प्रत्येकवेळी आपले भान संपूर्णपणे हरपले होते इकडे दुर्लक्ष करु नका. अर्थात आपली ही भान हरपलेली, विदेही अवस्था फारवेळ टीकत नाही. सूर्यास्ताकडे बघताना परत ‘अरे, आपला जिवलग मित्र बरोबर असता तर बरे झाले असते’ हा विचार मनात येतो आणि त्याचक्षणी आपला आनंद संपलेला असतो!!!

अशा रीतीने जरा डोळे उघडून पाहीले तर असे स्पष्ट दिसून येईल की आपल्या जीवनातील सर्व दुःखांचे मूळ द्वैतात आहे. जर जगात आपण सोडून दुसरे कुणीही नसते तर जीवनातील दुःखे जणू नष्टच झाली असती!

याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही जबरदस्ती करुन एकटे रहा. जबरदस्ती करणे म्हणजे हिंसा करणे होय आणि हिंसेवर उभारलेला आनंद कधीही शाश्वत नसतो. पण या विवेचनाचा असा अर्थ आहे की जर तुमच्या जीवनात सहजपणे एकटे रहायची परिस्थिती निर्माण झाली तर तो एकटेपणा भरुन काढण्याच्या फंदात न पडता त्या एकाकी अवस्थेचा उपभोग घ्यायला आपण सुरुवात केली पाहिजे. म्हातारपणी स्वतःमध्ये मग्न राहण्यात काय चुक आहे? जो मनुष्य सकारात्मक दृष्टीकोनातून एकटा रहायला तयार असतो त्याचा स्वतःच्या अंतःकरणावर ताबा असतो आणि सतत अध्यात्मात रममाण असतो. भगवंताचे अर्जुनाला हेच सांगणे आहे.

॥ हरि ॐ ॥

प्रवचनाची फाईल

(बंगलोर, दिनांक ८ नोव्हेंबर २००९)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: