(१०८-११२)/६: दैनंदिन जीवनाकडे दुर्लक्ष नको

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

आपणास उपलब्ध असलेल्या अनेक गीताभाष्यांमध्ये श्रीज्ञानेश्वरीचे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य म्हणजे भगवद्गीतेमधील दोन श्लोकांमध्ये श्रीज्ञानेश्वर महाराजांनी संजय व धृतराष्ट्र आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांमधून उभे केलेले नवीन विश्व. ही बाब दुसऱ्या कुठल्याही गीताभाष्यात आढळत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी संजय आणि धृतराष्ट्र यांचा संवाद वर्णन केला आहे तर कित्येकवेळा अर्जुनाने श्रीकृष्णाला केलेली विनवणी, मनधरणी अतिशय सुंदरपणे दर्शविली आहे. गीतेच्या दोन श्लोकांमध्ये जे नाट्य घडले असेल त्याचे वर्णन करताना महाराजांच्या प्रतिभेला बहार येतो. म्हणूनच श्रीज्ञानेश्वरीकडे एक निव्वळ साहित्यिक कृती या दृष्टीकोनातून बघणेसुध्दा शक्य आहे. आणि या अत्यंत संकुचित मानदंडाप्रमाणे बघितले तरीसुध्दा या कृतीसारखा दुसरा प्रतिभेचा आविष्कार विश्वसाहित्यात बघायला मिळत नाही. ज्याप्रमाणे हापुस आंबा दिसायला सुंदर असतो, त्याचा सुवासही वेडावणारा असतो आणि चवसुध्दा सुमधुर असते त्याचप्रमाणे श्रीज्ञानेश्वरी साहित्यिक प्रतिभेचा आविष्कार म्हणून उच्च पदावर आहे, आत्तापर्यंत कधीही न वापरल्या गेलेल्या अर्थपूर्ण आणि नूतन शब्दभांडाराने समृध्द आहे आणि पारमार्थिक अर्थाने नवजीवन देणाऱ्या अमृतासारखी रसाळ आहे. आणि ज्याप्रमाणे हापुस आंब्याची चवच सर्वात महत्वाची असते त्याचप्रमाणे श्रीज्ञानेश्वरीच्या अमृततुल्य गूढार्थातच आपणा सर्वांचे हित दडलेले आहे. म्हणूनच आपण दरवेळी ओव्यांतून ओथंबून बाहेर येणारा साधनेच्या मार्गांचा रस ओरपण्याचा प्रयत्‍न करीत असतो. आजही आपण या दृष्टीकोनातूनच महाराजांच्या दोन श्लोकांमध्ये काय घडले याचे वर्णन करण्यामागील उद्देशाकडे बघू. निव्वळ महाराजांच्या प्रतिभेचा विलास अशा नजरेने या घटनेकडे पाहिल्यास संपूर्ण विषयच संपतो! परंतु माउलींचा इतका सामान्य दृष्टीकोन दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत दिसून येत नाही. म्हणून थोडा खोल विचार करणे आवश्यक वाटते.

भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक म्हणजे आपल्या अध्यात्मिक प्रगतीचे द्योतक आहे, परमार्थाच्या मार्गावरील एक जाणविण्याजोगा टप्पा आहे. प्राचीनकाळी बहुतांशी साहित्य तोंडपाठ असायचे. जवळ मोठमोठी बाडे बाळगून नित्यपठण करणारे ब्राह्मण फार थोडे होते आणि नित्यनियमित श्लोकांचे उच्चारण करुन पाठांतर करणारे विद्यार्थी जास्त होते. म्हणूनच सर्व साहित्य श्लोकरुपी पद्यात लिहीले आहे, जेणेकरुन पाठांतर करण्यास सोयीस्कर होईल. दुसरी बाब म्हणजे आजकाल प्रचलित असलेल्या ‘सेल्फस्टडी’ची पध्दत तेव्हा अस्तित्वातच नव्हती. सर्व शिक्षण गुरुंकडून घ्यायची प्रथा होती. त्यामुळे सर्व गोष्टी पुस्तकात लिहीणे जरुरी नव्हते. तुमचा गुरु दोन श्लोकांमधील गुढार्थ सांगेल असे गृहीत धरले होते. त्यामुळे प्रत्येक छोटी गोष्ट गीतेमध्ये सांगितलेली नाही. गीता म्हणजे जणू परमार्थाच्या मार्गाची ढोबळ रुपरेखा आहे. म्हणून गीतेचे श्लोक म्हणजे साधनेचे टप्पे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गीतेचे श्लोक म्हणजे: ‘साधना व्यवस्थित सुरु आहे आणि दैनंदिन जीवन चालू आहे अशा स्थितीमध्ये अचानक आपल्या आयुष्यात एखादी अनपेक्षीत घटना घडते आणि त्यातून आपणास स्वतःच्या पारमार्थिक ध्येयाचा एक नवीन अर्थ कळतो’ असे आहेत. उदाहरणार्थ, कधी जवळच्या माणसाकडून आपला अपेक्षाभंग होतो आणि कळते की बाह्यदृष्टीने अगदी योग्य वाटणारी अपेक्षा ठेवणेसुध्दा चुकीचे आहे. परमार्थ साधायचा प्रयत्‍न करायचा आणि सामाजिक वा नैतिक दृष्टीने योग्य असलेल्या अपेक्षासुध्दा ठेवायच्या यात मूलभूत विसंगती आहे. ही वस्तुस्थिती स्वसंवेदनांनी जाणविणे म्हणजे आपल्या साधनेमध्ये आपण एक मोठा टप्पा गाठणे होय. आपली साधना म्हणजे आपल्या मनातील भावनांचा गुंता सोडविण्याची आपली धडपड आहे आणि असे एखादे तत्व मनापासून पटणे म्हणजे त्या भयानक गुंत्यातील एखादी कठीण गाठ सुटणे होय! आपण सर्वजण अशा एखाद्या टप्याकडे नजर ठेवूनच आपले नेहमीचे आयुष्य जगायचा प्रयत्‍न करीत असतो. स्वतःच्या साधनेची प्रगती आपण असे किती टप्पे गाठले आहेत यावरच ठेवतो.

दोन श्लोकांमधील संवाद रसपूर्ण रीतीने वर्णन करण्यातून असे वाटते की माउलींना निव्वळ टप्पे गाठण्यात स्वारस्य नाही!! जर गीतेमधील श्लोक आपल्या साधनेच्या टप्प्यांचे रुपक असेल तर महाराजांचे दोन श्लोकांमधील भाष्य म्हणजे एका टप्प्यानंतर दुसरा टप्पा गाठेपर्यंतचे आपले जीवन होय. त्यातही माउलींनी तितकेच प्रेम ओतले आहे हे बघितले तर असे जाणविते की खरी साधना आपले नेहमीचे आयुष्य जगण्यामध्येच आहे! साधनेमधील एका दिव्य अनुभवापासून दुसऱ्या अनुभूतीपर्यंतचे जे आपले नेहमीचे आयुष्य आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. अत्यंत प्रेमाने नेहमीचे आयुष्य जगणे ही खरी साधना आहे. एकदा अशा जीवनात आपण रममाण झालो की आपोआप साधनेचे टप्पे येत राहतील जसे श्रीज्ञानेश्वरीमध्ये श्लोकांवरील भाष्य अगदी सहजरीत्या येते. ज्या साधकांना आपणास कमी ‘अनुभव’ येतात असे वाटते त्यांनी ही बाब स्वतःच्या मनात जाणीवपूर्वक ठेवावी असे वाटते. तेव्हा दोन श्लोकांमधील भाष्यातून आपले दैनंदिन जीवन कसे जगावे याचा सल्लाच माउली आपणास देत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज आपण सहाव्या अध्यायातील श्लोक दहा आणि अकरा यामध्ये महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्यावर विचार करायचा प्रयत्‍न करु.

जो ज्ञानियांचा बाप । देखणेयांच्या दिठीचा दीप ।

जया दादुलयाचा संकल्प । विश्व रची ॥ १०८:६ ॥

जयांचेनि आंगिके तेजे । आवो रविशशींचिये वणिजे ।

म्हणऊनि जग हे वेसजें । वीण असे तया ॥ ११०:६ ॥

हां गा नामचि एक जयाचे । पांहता गगनही दिसे टांचे ।

गुण एकैक तयाचे । कलिशील तूं ॥ १११:६ ॥

म्हणिनि असो हे वानणें । सांगो कवणाचीं लक्षणें ।

दावावी मिषे येणें । कां बोललो ॥ ११२:६ ॥

दहाव्या श्लोकाचा अर्थ सांगून झाल्यावर माउली म्हणत आहे: ‘जो सर्व ज्ञानी माणसांचे उगमस्थान आहे, जो सर्वांच्या नजरेतील प्रकाश आहे, जो इतका समर्थ आहे की त्याच्या संकल्पानेच विश्वाची उत्पत्ती होते (१०८), ज्याच्या सहज तेजाने सूर्याला आणि चंद्राला (तेज प्राप्त झाले आहे आणि म्हणून त्यांना) आपापले व्यवहार करता येतात म्हणून ज्याच्यावीन हे सर्व जग प्रकाशहीन आहे (११०), ज्याच्या नामाचा महिमाच आकाशाहून थोर आहे अशा भगवंताच्या गुणांचे वर्णन तुला कळण्याची शक्यता तरी आहे का?! (१११) म्हणून आता हे सर्व बोलणे पुरे (गीतेच्या सहाव्या अध्यायातील सात, आठ, नऊ आणि दहाव्या श्लोकात योगारुढ माणसाची लक्षणे सांगितली आहेत त्याचा इथे संदर्भ आहे) लक्षणे दाखवावी हे शक्य नाही म्हणून जे बोललो आहोत तेव्हढेच पुरे (११२) (भगवंत आणि योगारुढ मनुष्य एकरुप असल्याने योगारुढाची लक्षणे कळणेही आपणास शक्य नाही असा याचा अर्थ होय).’

श्रीज्ञानेश्वरीमध्ये माउलींनी श्रीकृष्णाला सव्वादोनशेपेक्षा जास्त नावांनी संबोधिले आहे! वरील ओव्यांमध्येच त्यांनी भगवंताला ‘देखणेयांच्या दिठीचा दीप’, ‘ज्ञानियांचा बाप’ या दोन नामांनी पुकारले आहे. ज्याप्रमाणे एखादी प्रेमळ आई आपल्या मुलाला कधी ‘गुंड्या’ कधी ‘शाणा माझा’, कधी ‘मेल्या’ तर कधी पाळण्यात ठेवलेल्या नावाने बोलविते त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना भगवान श्रीकृष्णांबद्दल इतके प्रेम आहे की ते त्याला दरवेळी नवीन नावांनी हाकारतात. जेव्हा आपलेपणा पराकोटीला जातो तेव्हा बाह्य शब्दांना फार महत्व उरत नाही. ज्याप्रमाणे मुलाला नवीन हाक ऐकल्यावरसुध्दा कळते की आपली आई आपणासच बोलवित आहे आणि आईला हा विश्वास असतो की माझ्या मुलाला मी त्यालाच बोलविते आहे हे कळेल त्याचप्रमाणे ही गोष्ट आहे. महाराजांनी अशा रीतीने भगवंताला पुकारलेले बघितले की डोळे भरुन येतात! असो.

सांगायची गोष्ट अशी की दैनंदिन जीवनात आपणास दोन गोष्टी करायला हव्यात असे या ओव्या सांगत आहेत असे वाटते. एक म्हणजे आपल्या भगवंतावरील प्रेम निरंतर जागृत ठेवायला हवे आणि दुसरे म्हणजे स्वतःची प्रगती स्वतःच बघणे शक्य नाही याची जाणीव ठेवणे. माउलींच्या ‘म्हणोनि असो हे वानणे, सांगो नोणो कवणाची लक्षणे’ या पदांवरुन असे स्पष्ट जाणविते की परमार्थाची वाटचाल करीत असताना टप्पे बघायची इच्छा ठेवणे संयुक्‍तिक नाही. इथे लक्षणे सांगणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे साखरेची गोडी शब्दात सांगणे अशक्य आहे त्याचप्रमाणे साधनेने मला काय मिळाले हे सांगणे संभव नाही. साधना करीत असताना दैनंदिन जीवनाकडे दुर्लक्ष न करीता त्याला योग्य तऱ्हेने तोंड अत्यंत शांत मनाने देणे असे जीवन जर आपण जगलो तर आपली साधना निरंतर चालू राहील. आणि परमार्थाचे पैलू नित्यनूतन दिसत राहतील.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे ठीकाण

(बंगलोर, दिनांक १५ नोव्हेंबर २००९)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: