(१५७-१६०)/६: साधना सदाकाळ चालू असते

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

हा मार्ग जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे ।

रात्रिदिवस नेणिजे । वाटे इये ॥ १५७:६ ॥

चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे ।

आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥ १५८:६ ॥

निगिजे पूर्वीलिया मोहरा । की येइजे पश्चिमेचिया घरा ।

निश्चळपणे धनुर्धरा । चालणें एथींचे ॥ १५९:६ ॥

येणे मार्गे जया ठाया जाइजे । तो गांव आपणचि होइजे ।

हे सांगो काय सहजे । जाणसी तूं ॥ १६०:६ ॥

गीतेच्या सहाव्या अध्यायातील पहिल्या दहा श्लोकांमध्ये भगवंतांनी योगारुढ साधकाचे वर्णन केले आहे. योगमार्गाने भगवंताशी मिलन करुन घेतल्यावर साधकाची अवस्था कशी होते याचे फार बहारीचे वर्णन माउलींनी श्रीज्ञानेश्वरीमध्ये केले आहे. परंतु खरी गोष्ट अशी आहे की पारमार्थिक ध्येय कुठल्याही मार्गाने चालून मिळणारे नसते. माउलींनी वापरलेले योगमार्गाने चालून भगवंताची भेट होणे वगैरे शब्द सांकेतिक आहेत. या वाक्याचा शब्दकोशात्मक अर्थ इथे अभिप्रेत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही कुठल्याही मार्गाने कितीही कष्ट सोसून चालण्याचा प्रयत्‍न केलात तरी तुमचे प्रयत्‍न आणि मिळालेला लाभ या गोष्टींमधील तफावत भरुन येणे शक्य नसते. कावळा बसायला आणि फांदी तुटायला थोडासा कार्यकारण भाव असला तरी मुख्यत्वेकरुन फांदी तुटायचा संयोग जुळून यावा लागतो तसेच आपली साधना करायला आणि आत्मानंदाने जीवन उजळून निघायला सद्‌गुरुकृपेचा वा भगवंतकृपेचा वर्षाव होणे जरुरी असते. त्या अनाकलनीय घटनेशिवाय कितीही परीश्रम केले तरी परमार्थाचे फळ मिळत नाही. म्हणूनच सर्व संत आपल्या सद्‌गुरुंबद्दल सदैव कृतज्ञता बाळगून असतात.

या सर्व विवेचनाचा एक अर्थ असा की आपण काहीही प्रयत्‍न केले नाहीत तरीसुध्दा भगवंताची भेट होण्यात तत्वतः कुठलाही अडथळा नाही. मनामध्ये फक्‍त भगवंताच्या भेटीची इच्छा ठेऊन नुसते हातावर हात ठेवणेसुध्दा पुरेसे आहे. परंतु आपल्याला सतत काहीतरी करायची जी सवय लागली आहे त्याने काहीही न करीता निव्वळ भगवंतभेटीच्या इच्छेत स्वस्थ बसून रहाणे आपणास जमत नाही. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की जर एखाद्या हत्तीला गावातून हिंडवायचे असेल तर त्याच्या सोंडेत एक साखळी देतात आणि त्या साखळीला सांभाळायच्या नादात तो गावातून हिंडताना कुणालाही त्रास देत नाही व त्याला गावाबाहेर विनागडबड नेता येते. त्या हत्तीच्या सोंडेतील साखळीप्रमाणे आपल्या भगवंतप्राप्तीच्या सर्व साधना आहेत. अखंड चंचल असलेल्या मनाला, त्याच्या विनाशाकडे नेताना, कुठल्यातरी गोष्टीत रमवायच्या ह्या क्लृप्त्या आहेत. जेव्हा साधना करायच्या नादात मनाचा संपूर्णरीत्या लय होतो तेव्हा आपोआप भगवंताची आत्मरुपी मूर्ती आपणास गोचर होते.

आज आपण मनात निर्विकल्प स्थिती प्राप्त होऊन विश्वरुपी चलचित्र ज्याच्यावर दिसते तो पट फाटण्याआधी आपली अवस्था कशी होते याचे वर्णन करणाऱ्या ओव्या बघणार आहोत. तन-मन-धन पणाला लाऊन साधना करीत असताना काय होते याबद्दल माउली म्हणत आहे: ‘एकदा या (योग)मार्गाची गोडी लागली की तहान आणि भूक, रात्र आणि दिवस यांचा जणू विसर पडतो (व्यावहारिक जीवनाबद्दल निरीच्छता प्राप्त होते) (१५७). अशावेळी जिकडे आपण जाऊ तिकडे बोधरुपी ज्ञानाची खाण दिसू लागते आणि चुकून (मूळ ध्येय विसरुन) एखाद्या आडमार्गाला जरी लागलो तरी स्वर्गसुख दिसते (१५८). पूर्वीकडे निघून पश्चिमेच्या घराकडे यावे (म्हणजे सबंध पृथ्वीला प्रदक्षिणा घालावी) इतक्या दृढपणे या मार्गावरील चालणे असते (१५९). या मार्गाने जिथे जायचे असते ते ठिकाणच आपण स्वतः व्हायचे असते. पण हे तू सहजरीत्या जाणत असल्याने वेगळे सांगायची गरज नाही (१६०).’ परमार्थाचे ध्येय आपल्यापासून निराळे नाही असे अद्वैत प्रणालीचे मूलतत्व आहे. वरील ओवीमध्ये श्रीज्ञानेश्वर महाराज हेच तत्व स्वतःच्या अलौकिक प्रतिभाशाली शब्दात सांगत आहेत की ‘येणे मार्गे जया ठाया जाइजे, तो गांव आपणचि होइजे.’ इथे कुठल्यातरी एका ध्येयाला प्राप्त करायची गोष्ट होत नाही तर स्वतःच ध्येयरुप व्हायचा बेदरकारपणा दर्शविला आहे. स्वतःचे सामाजिक आणि मानसिक व्यक्‍तिमत्व पणाला लावायची तयारी ज्याची आहे असा साधकच शरीर अस्तित्वात असताना मृत्युचा अनुभव घेऊन भगवंतात विलीन होऊ शकतो.

निरंतर आपण शोधतो आधार । म्हणतो ‘गुरुः देवो महेश्वर’ ।

आत्मरुप होते जेव्हा साकार । लोपून भेदभाव, होते सर्व एकाकार ॥

‘मी जेव्हा गुरुंबरोबर काही वर्षे रहात होते तेव्हा अत्यंत आनंदी होते. आता लग्न होऊन, नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात आल्यावर एकटेपणा जाणवितो. निघताना माझ्या गुरुंनी सांगितले की जे काही शिकायचे होते ते सर्व तुला मिळाले आहे. आता माझ्याकडून काही धडे मिळतील अशी अपेक्षा न ठेवता साधना सुरु ठेव. जर काही कमीपणा आला तर मी आपणहून तुला सांगीन. मला फोन करुन साधना विचारायच्या फंदात पडू नको.’ आता साधना कशी करावी याचा संभ्रम पडलेल्या व्यक्‍तीच्या मुखातून हे शब्द बाहेर येत होते. त्याचवेळी एक चार-पाच वर्षाची लहान मुलगी प्रवचनाला बसलेल्या आईजवळ येऊन कानामध्ये ‘मी आता काय करु?’ असे विचारत होती. आईने उत्तर देऊन तीला बाहेर पाठवीपर्यंत एक अस्वस्थ शांतता खोलीमध्ये होती. बिचाऱ्या मुलीलासुध्दा स्वतःमुळे निर्माण झालेल्या त्या शांततेची जाणीव झाली आणि आईचे उत्तर ऐकून ती पटकन बाहेर गेली.

खरे म्हणजे गुरुंच्या तोंडून असे शब्द ऐकणे शिष्याची तयारी दर्शविते. साधकाच्या जीवनातील हा फार मोठा भाग्याचा क्षण असतो जेव्हा गुरु आपणहून म्हणतात की आता साधनेबद्दल माझ्याशी बोलायची गरज नाही. जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होते तेव्हा प्राचार्य विद्यार्थांना सांगतात की आम्ही तुम्हाला जे काही ज्ञान प्रदान केले आहे त्याचा स्वतःच्या जीवनात योग्य विनियोग करा आणि आपले आयुष्य सुखद बनवा. अशावेळी प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा रहायला उत्सुक असतो. किंबहुना या क्षणाची वाट बघतच तो आपली विद्यार्थीदशा उपभोगत असतो. परंतु जेव्हा परमार्थाच्या वाटेवर असे शब्द ऐकायला मिळतात तेव्हा एक भिती बहुतांशी साधकांच्या मनात निर्माण होते. ज्या समर्थ आधाराची सवय झालेली असते त्या आधाराला सोडताना त्यांचा जीव कासाविस होतो. त्या आधाराने जीवन व्यतीत करीत असताना जो आनंद मिळत असतो त्याची चटक लागली असल्याने तो दुरावण्याची शक्यता निर्माण झाल्याने मन व्याकुळ व्हायला लागते.

इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की परमार्थाचे ध्येय आपल्या मनाला आनंदात ठेवणे हे नाही. परमार्थातून कुठलीतरी गोष्ट, मग ती कितीही ‘उच्च’ दर्जाची असो, अपेक्षित असणे म्हणजे साधनेतही व्यवहार करणे होय. ज्याप्रमाणे पैसे फेकून आपण शारिरीक सुखाची अपेक्षा करतो त्याचप्रमाणे साधना करुन मनाला सतत आनंदात ठेवण्याची अपेक्षा करणे आहे. तत्वतः या दोन गोष्टींमध्ये काहीही फरक नाही. तुम्ही साधना करण्यासाठी जो त्याग केला आहे त्या त्यागाने काहीतरी मिळेल अशी अपेक्षा असेल तर तो त्याग नव्हे तर हव्या असलेल्या गोष्टीची चुकवलेली किंमत आहे. तेव्हा गुरुंकडून मिळालेल्या सूचना पालन करण्यात जो सहज आनंद मिळत असतो त्यात गुंतणेही पारमार्थिक नजरेत योग्य नसते. म्हणूनच गुरु योग्य वेळ येताच स्वतःच्या सहवासाची नाळ तोडून टाकून शिष्याला जगात मोकळे सोडतात. ज्याला आत्मानंदाची ओढ आहे त्याने स्वतःच्या गुरुंच्या सहवासाचे बंधन, जे अतीव सुखाच्या लेपाने हवेहवेसे वाटत असते, तोडायची तयारी ठेवायला हवी. आणि समजा शिष्याची तेव्हढी मानसिक तयारी नसेल तर गुरु आपणहून शिष्याला दूर पाठवितात. ज्याप्रमाणे आईला आपल्या मुलाला काय हवे याची जाणीव असते त्याचप्रमाणे गुरुंना आपल्या शिष्याच्या प्रगतीला काय जरुरी आहे याची जाणीव असते. म्हणूनच अठराव्या अध्यायाच्या गुरुस्तवनामध्ये माउलींनी गुरुंना ‘अकल्पनाप्य कल्पतरो, स्वसंविद द्रुमबीजप्ररो’ असे गौरवयुक्‍त संबोधिले आहे.

‘गुरुंनी असे शब्द उच्चारायला हवे होते हे कळले तरी मी आता काय करु हे अजून कळलेले नाही.’

दुसऱ्या कुणी तुम्हाला काय करावे हे सांगण्याची वेळ आता निघून गेली आहे हे लक्षात घ्या. स्वतः जीवनाच्या परीक्षेला तोंड द्यायला तयार व्हा. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे गुरुंनी ‘मला विचारु नकोस’ असे सांगितले याचा अर्थ असा की स्वतःच्या ह्रुदयातील सद्‌गुरु आता आपणास मार्ग दर्शविणार आहेत. स्वतःबरोबर वेळ घालविणे हा मार्ग आता साधनेचा मार्ग झाला आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा काहीही न करीता शांत बसण्यात स्वतःच्या साधनेचे मूळ तुम्हाला सापडेल. गुरुंनी सांगितलेली साधना प्रामाणिकपणे पार पाडल्याने आता तुम्हाला शांत बसायची शक्‍ती प्राप्त झाली आहे. ज्याप्रमाणे हत्ती गावाबाहेर आल्यावर त्याच्या सोंडेत दिलेला साखळदंड काढून घेतात त्याचप्रमाणे जीवनामध्ये वैराग्य निर्माण झाले की बाह्य साधनेला हळूच सोडावे लागते. स्वतःच्या मनाच्या व्यापाराकडे तटस्थपणे बघायची ताकद निर्माण झाली आहे. याचा फायदा घेण्यासाठी शांत बसायला हवे. कुठल्याही आधाराची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या जीवनाकडे बघण्याची पात्रता निर्माण होणे ही अत्यंत महत्वाची स्थिती आहे. या स्थितीचा उपभोग घेण्यात सार्थक मानणे ही आता साधना झाली आहे. स्वतःच्या मनातील आत्तापर्यंत न पाहीलेल्या कोपऱ्यांतील साचलेल्या गोष्टी आता बाहेर निघणार आहेत आणि जे काही दिसेल त्याकडे ‘चांगले-वाईट’ अशी वर्गवारी न करता निव्वळ बघणे आता जरुरी आहे. मनाच्या सर्व उलाढाली शब्दरुपी असल्याने मनातील विचारांकडे बघणे म्हणजे ते ऐकणे होय. कुठलीही वर्गवारी न करीता जो ऐकायला लागतो त्याची स्थिती योगारुढ आहे असे समजल्यास वावगे ठरणार नाही. माउलींनी चवथ्या अध्यायात म्हटले आहेच ‘तैसा मनाचा मार न करीता, आणि इंद्रिया दुःख न देता, इथे मोक्ष असे आयता, श्रवणाचिये ॥२२४:४॥’.

साधनेची ध्यान, नाम, त्याग इत्यादी बाह्य गोष्टींशी सांगड घालणे ही साधकाच्या जीवनातील प्राथमिक स्थिती आहे. आता तहान-भूक आणि रात्र-दिवस विसरुन स्वतःमध्ये गुंगून जायची वेळ आली आहे. या मार्गात आपण जिथे जाऊ तिथे सत्याच्या उजेडाने निर्माण झालेली प्रसन्नता आहे. आणि समजा आपण ‘आता बस, पुढे नको.’ असे म्हणून बघणे/ऐकणे थांबविले तरी स्वर्गसुखाचे महाद्वार उघडलेले आहे. ही वेळ हताश होऊन पूर्वकाळी मिळालेल्या गुरुंच्या सहवासाच्या आठवणी काढण्याची नाही. ही वेळ आहे सद्‌गुरुकृपेने प्राप्त झालेल्या निर्मळ दृष्टीने स्वजीवनाकडे डोळे उघडून पहाण्याची. तुम्हाला दिसून येईल की आता काहीही करायची गरज नाही. जिथे पोहोचायची आत्यंतिक इच्छा जवळ ठेऊन आयुष्यभर प्रयत्‍न चालले होते ती जागा निरंतर आपल्याजवळच होती. ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी आपली अवस्था होती हे जेव्हा कळते तेव्हा आपले सर्व प्रयत्‍न संपूर्णपणे थांबतात आणि त्या निश्चळपणात स्वतःमध्येच आपली कधीही न संपणारी वाटचाल सहजरीत्या सुरु होते.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे ठीकाण

(बंगलोर, दिनांक २२ नोव्हेंबर २००९)

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. Since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

यावर आपले मत नोंदवा