(१०३ते१०५)/१०: बुध्दीने जाणणे प्राथमिक अवस्था आहे

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

ऐसेनि हें विश्व येथें । मीचि विस्तारिलोंसे निरुतें ।

परी भावाचेनि हातें । मानें जया ॥ १०३:१० ॥

यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती ।

आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें जग ॥ १०४:१० ॥

म्हणोनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावेरी ।

मींवाचूनि दुसरी । गोष्टीच नाही ॥ १०५:१० ॥

भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण भक्‍तराज अर्जुनाला चराचरात मी कसा भरुन राहिलो आहे हे स्पष्ट करुन सांगतात. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे ही गोष्ट खरी मानून आयुष्य जगणे परमार्थ नव्हे कारण कुठल्याही गोष्टीचा परम अर्थ मानून-सवरुन स्पष्ट होत नाही. बरे तळहातावरील वस्तू दिसावी असा परमेश्वर दिसला पाहीजे असे म्हटले तर भगवंताचे रुप आधी आपणास माहिती असावयाला हवे. नाहीतर जे दिसले आहे ते भगवंताचे रुप आहे हे कसे कळणार. म्हणजे भगवंताला सगळीकडे पहायच्या आधी तो दिसला पाहीजे आणि आपल्या आठवणीतला देवच सगळीकडे दिसला पाहीजे. परंतु असे म्हटले तर भगवंताला एका ठराविक रुपातच राहण्याचे बंधन आपण घातले आहे असे होते. आपण भगवंतावर बंधन घालायला समर्थ आहोत असे कोण मानणार? त्यामुळे सर्व विभूतींमध्ये मी भरुन आहे हे भगवंताचे सांगणे साधकाला कसे कळून येणार हा एक मोठा यक्षप्रश्न आहे. या मूलभूत संदेहाचे निराकरण करण्यास माउलींनी वरील ओव्या उच्चारल्या आहेत असे वाटते. या ओव्यांतून श्री ज्ञानेश्वर महाराज असे म्हणत आहेत की: ‘हे सर्व विश्व मीच प्रसविलो आहे हे अगदी स्पष्ट आहे. पण हे ‘भावाने’ इथे जाणणे आवश्यक आहे (१०३). खऱ्या भावानेच गोष्टीमधील माझा अंश ओळखता येतो आणि मग मी सर्व जग व्यापिले आहे हे दिसून येते (१०४) (एकदा खरा भाव प्रगट झाला की) ब्रह्मदेवापासून छोट्या मुंगीमधील माझे अस्तित्व जाणविते आणि या जगात माझ्यावाचून दुसरी कुठलीही गोष्ट नाही हे दिसून येते (१०५).’

जर भाषा ठराविक भावना व्यक्‍त करण्यास वापरली असेल तर त्यातील काही शब्दांचे संदर्भानुसार वेगळे अर्थ निघायला लागतात. उदाहरणार्थ, प्रत्येकजण आपल्या तात्कालीन मनस्थितीनुसार ‘आनंद’ या शब्दाचा लावतो. भूक लागली असेल तर भोजन मिळाल्यावर आनंद होतो, विरहिणीला प्रिय व्यक्‍ती दिसल्यावर आनंद होतो इत्यादी. वरील ओव्यांतील माउलींनी वापरलेला ‘भाव’ हा शब्द तसाच आहे. श्रीज्ञानेश्वरीचा भावार्थ उलगडून सांगताना काही जण या शब्दाचा अर्थ ‘विश्वास’ असा लावतात असे दिसून येते. वरील ओव्यांचा अर्थ त्यामुळे असा निघतो: ‘सुरुवातीला गुरुंच्या शब्दांवर विश्वास ठेवून मान्य कर की जगात मीच भरलेलो आहे. या विश्वासाच्या जोरावर तुला ब्रह्मापासून मुंगीपर्यंत माझे अस्तित्व दिसेल.’ परंतु काय खरे आहे याबद्दलचा निर्णय सुरुवातीलाच (पूर्ण खात्री करुन घ्यायच्या आधीच) ठरवून गोष्टीकडे बघितले तर जे हवे आहे तेच आपण बघणार यात संदेह नाही. त्यामुळे सगळीकडे भगवंत भरलेला आहे यावर पूर्ण विश्वास ठेवून जगाकडे बघितले तर भगवंत दिसणारच हो!! कावीळ झालेल्या माणसाला सर्व जग पिवळे दिसते त्याचप्रमाणे पूर्वग्रहदूषित नजरेला जे ठरविले आहे तेच दिसून येते. जर एखाद्या घटनेमागील सत्य जाणून घ्यायचे असेल, खरे काय आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर आपले मन त्या गोष्टीबाबत संपूर्णरीत्या साफ असायला हवे, पूर्वग्रहांपासून मुक्‍त असायला हवे. उदाहरणार्थ, तुम्ही एकदा ठरविले की एखादी व्यक्‍ती दुष्ट आहे की तीच्या सत्कर्मांमागेसुध्दा तुम्हाला भयानक हेतू दिसतो आणि व्यक्‍तीने केलेल्या त्या सत्कर्मांना बघून तुम्ही स्वतःची धारणा न बदलता आहे तशीच ठेवता आणि ‘काय नाटके करतो आहे’ असे म्हणता. आपण एकदा वाईटच बघायचे ठरविले तर आपणास कोण अडविणार? त्यामुळे ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की परमार्थात सत्य काय आहे हे शोधायचे असेल तर आधीच भगवंत सगळीकडे आहे यावर ‘विश्वास’ ठेवणे शास्त्रीय नजरेतून योग्य नाही. खऱ्या अध्यात्मामध्ये स्वतःला जबरदस्तीने कुठल्यातरी तत्वांना मान्य करायचे नसते तर जे ‘आहे’ त्याची स्पष्ट जाणीव करुन घ्यायची असते. अध्यात्मामध्ये खरा शोध लावायचा असतो. त्यामुळे माउलींच्या मनात भाव या शब्दाचा अर्थ ‘विश्वास’ असा नसणार असे वाटते. आज आपण भाव या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्‍न करु या.

परमार्थातही आपण करीतो हाव । मनाला लावतो साधनेचा ठाव ।

परंतु जेव्हा थांबते प्रयत्‍नांची धाव । उत्पन्न होतो तेव्हाच भाव ॥

एकदा आपल्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल पक्की भावना निर्माण झाली की आपण त्या गोष्टीला मुकतो आणि भावनेला धरुन बसतो. उदाहरणार्थ, माझ्या जीवनात अमुक एका व्यक्‍तीचे असणे जरुरी आहे असे आपण मानले की त्या व्यक्‍तीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलतो. ज्या कारणास्तव त्या व्यक्‍तीचे आपल्या आयुष्यात असणे महत्वाचे असते त्या कारणाशिवाय त्या व्यक्‍तीला दुसरे अस्तित्वच रहात नाही. म्हणजे झाले काय, तर ती व्यक्‍ती बाजूला होऊन ते कारण महत्वाचे ठरते. एकदा पु.ल. देशपांड्यांना एकाने विचारले की तुम्ही एव्हढे विनोदी आहात तर तुमच्या घरात नेहमी हास्यविनोदच होत असणार. प्रश्नकर्ता एका बँकेचा कॅशियर आहे हे कळल्यावर त्यांनी असे प्रत्युत्तर दिले की ‘तुमची मजा आहे कारण तुमच्या घरात तर सगळे नेहमी नोटाच मोजत असणार!’ पु.ल. म्हणजे विनोद हे समीकरण त्या माणसाच्या मनात पक्के झाल्याने त्याने वरील उद्‌गार काढले होते. मनुष्य म्हणजे त्याच्यातील काही गुण आणि अवगुण यांचा समुदाय असे समीकरण एकदा आपल्या मनात ठसले की त्या मनुष्याला बदलण्यास आपण परवानगी देत नाही. परत नवे गणित मांडायला कुणाला वेळ आहे?! आपल्या मनाचा कठीण गोष्टींना सोपे करुन समजून घेण्याचा जो प्रयत्‍न सतत चालला आहे त्याचा हा परीणाम आहे. परंतु जी गोष्ट कठीण आहे ती सोपी कशी होईल? सवयीने ती करायला अवघड होणार नाही पण म्हणून ती सोपी झालेली नाही. इथे आपल्यापैकी कुणाला दुसऱ्या व्यक्‍तीला संपूर्णपणे समजून घ्यायला फुरसत आहे आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे कुणाची तशी इच्छा आहे? प्रत्येकजण समोर आलेल्या प्रसंगातून वा व्यक्‍तीमधून ‘आपल्याला काय मिळेल’ या दृष्टीकोनातूनच बघत आहे. निव्वळ ज्ञानाकरीता ज्ञान प्राप्त करण्याचा ना कुणाचा प्रयत्‍न आहे ना कुणाची इच्छा.

परमार्थात या गोष्टीचे एक प्रमुख उदाहरण म्हणजे आपले स्वतःच्या गुरुंशी असलेले नाते होय. त्या व्यक्‍तीला गुरु या नात्यात एकदा बघायला सुरुवात केली की आपण तीला फक्‍त परमार्थाच्या नजरेनेच पहायला लागतो. त्या व्यक्‍तीकडून आपणास या भूमिकेमुळेच फायदा होणार असतो. मग आपल्या भूमिकेच्या अनुषंगाने ज्या गोष्टी येतात त्याचा स्वीकार आपणास करावाच लागतो. त्यामुळे बाकी सर्वसामान्य लोकांसारखे काही गुण वा अवगुण त्या व्यक्‍तीमध्ये असतील ही कल्पनासुध्दा आपणास सहन होत नाही, मग त्या भावना ठेवण्याचे स्वातंत्र्य गुरुंना देणे तर दूरच राहीले. म्हणजे आपले गुरु आपण समोर नसतानासुध्दा गुरुला लायक असेच वागले पाहिजेत ही आपली मागणी आपण अजिबाट चुकीची समजत नाही. पण दुसऱ्या व्यक्‍तीने ‘मी समोर नसताना देखील मी समोर आहे तसेच वागा’ असे आपणास सांगितले तर ते अयोग्य वाटते. या दोन भावनांतील विसंवाद आपणास दिसतसुध्दा नाही कारण आपण योग्यच वागत आहोत हा आपला पूर्वग्रह आपली नजर झाकत असतो. पूर्वग्रहांचा पगडा सत्य बघण्यासाठी फार घातक असतो. आता, भगवंत म्हणजे सर्वांचे रक्षण करणारा असा आपला ठाम समज असल्यामुळे सर्वगोष्टींमध्ये भगवान आहे या विचाराकडेही आपण असे बघतो की ‘माझ्या जीवनात जे काही घडत आहे तेसुध्दा भगवंताच्या इच्छेने होत असल्याने चांगलेच असणार.’ काही काळाने जे घडले ते चांगलेच असणार असे ‘मानण्या’मध्येच आपण परमार्थ बघतो. कितीतरी साधक असे फार गर्वाने म्हणतात की ‘सगळ्यामध्ये आनंद ‘मानायला’ आम्हाला जमते हो.’ असे मानून-सवरुन खरा अर्थ (म्हणजे परमार्थ) हातात येत नाही. जे सत्य आहे त्याला तुमच्या मानण्याची मोहर लावायची गरज नसते. ते स्वयंभूरीत्या उत्पन्न झालेले असते आणि हजारो जणांनी मानले म्हणून ते जास्त खरे होत नाही वा कुणीच विश्वास ठेवला नाही तरी असत्य ठरत नाही. पूर्वी गॅलिलियोने पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे असे सांगितले त्यावर कुणाचा विश्वास बसला होता? पण गॅलिलियोला तुरुंगात घातले म्हणून ती घटना असत्य बनली नाही!

सांगायचा मुद्दा असा आहे की आपण भगवंताला या जगात सगळीकडे बघायचा ‘प्रयत्‍न’ करतो म्हणजे काय करतो? आधी भगवंत म्हणजे काय याची व्याख्या तयार करतो आणि त्या व्याख्येप्रमाणे सर्व जग चालले आहे की नाही हे बघतो. उदाहरणार्थ, भगवंत सगळ्यांचे भलेच करतो या व्याख्येमुळे ‘जे घडते ते चांगलेच असते’ असे समजणे. मग एखादी गोष्ट चांगली नाही असे लक्षात आले तरी ‘आपणास कळत नाही, ही घटना पुढे चांगलीच ठरेल’ अशी स्वतःची समजूत घालून आपण तीच्यात भगवंत बघायचा प्रयत्‍न करतो. म्हणजे आत्ता न दिसलेला भगवंत भविष्यात दिसेल या काल्पनिक समजुतीला आपण परमार्थ म्हणतो. अहो, पुढच्या क्षणाला आपण जिवंत असू याची खात्री आपण देऊ शकत नाही तर आजची घटना पुढे चांगलीच ठरेल हे कुठल्या विश्वासावर मानतो? खरे म्हणजे भगवंत नेहमी चांगलेच करतो हे कुणी ठरविले? शिशुपालाला वा कंसाला वा रावणाला या गोष्टीची जाणीव झालेली होती का?!! असो.

मूळ प्रश्न असा आहे की भगवंत म्हणजे काय हे आधी ठरविल्याखेरीज चराचरात भगवंत कसा दिसेल? आणि ‘जे दिसेल ते भगवंतच आहे’ अशी भगवंताची व्याख्याच केली तर सगळीकडे भगवंत आहे हे वेगळे अर्जुनाला सांगायची भगवंतांना गरजच काय होती? या भगवंताच्या व्याख्येने गीतेचे उद्दिष्ट्यच नष्ट झाले की!! अशा विचारांमध्ये गुरफटले की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. म्हणून परमार्थ जाणून घेण्यास बुध्दी वापरुन चालत नाही. आणि आपला आंधळा विश्वास हीसुध्दा (नकारात्मक) बुध्दीच असल्याने उपयोगी नाही. आपली जाणीवपूर्वक वापरलेली बुध्दी आणि जाणीवपूर्वक बुध्दी न वापरण्याची बुध्दी (म्हणजे विश्वास) या दोन्ही गोष्टी आपण बाजूला ठेवल्या तर काय राहते? जे काही राहते त्याला ‘भाव’ असे माउलींनी म्हटले आहे असे वाटते. आपणास स्वतःच्या या अस्तित्वाचा अजून पत्तासुध्दा नाही! आजपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीवर एकतर विश्वास ठेवलेला आहे वा खात्री करुन घेतलेली आहे. विश्वासही नाही आणि खात्री करुन घ्यायची इच्छाही नाही अशा अवस्थेमध्ये जी जाणीव उत्पन्न होते तो भाव होय. ही आपली सहज स्थिती आहे. स्वतःच्या बुध्दीचे संपूर्ण विस्मरण होऊन जेव्हा नवजात बालकासारखे आपले मन होते तेव्हा भाव निर्माण होतो आणि हा भाव सर्व घटनांमध्ये एकसारखाच असतो. जीवनातील प्रसंगा-प्रसंगामधील फरक बुध्दीशिवाय कळत नाही. सर्व प्रसंगामागे जी एक समानता आहे ती जाणण्यास प्रयत्‍न थांबवावे लागतात.

आपल्या जीवनातील संपूर्ण स्तब्धतेमध्ये जे अस्तित्व असते ते भगवंताचे प्रतिबिंब आहे आणि हे सगळीकडे भरुन राहीले आहे असे माउली म्हणत आहे. आपल्या मनात घट्‍ट बसलेल्या कुठलातरी भगवान सर्व चराचरात भरुन राहीला आहे असे दिसेल ही कल्पना सशाच्या शिंगासारखी काल्पनिक आहे. जेव्हा या सत्याची संपूर्ण जाणीव आपणास होईल तेव्हाच आपण आपल्या मनातील साचे टाकू शकू आणि मग जी स्वच्छ मनोभूमिका तयार होईल तिथेच आत्मरुपी देवाचे अधिष्ठान होईल असे माउली म्हणत आहे असे वाटते.

आपला भाव जागृत कसा करावा हा प्रश्न विचारणे भाव या शब्दाचा अर्थ न जाणणे होय. निरंतर अस्तित्वात असलेल्या भावामध्ये रममाण व्हायचे असेल तर मन आणि बुध्दीच्या चाळ्यांना सोडावे लागेल. बाकी काही करायची गरज नाही.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे ठिकाण

(बंगलोर. दिनांक ६ डिसेंबर २००९)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: