(३१ ते ३६)/६: सर्व साधना अंतिमतः एकरुप होतात

॥ ॐ श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

…….

आतां सांगेन काय श्रीरंगे । निरोपिले जे ॥ ३१:६ ॥

तें बुध्दीही आकळितां सांकडे । म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे ।

परी श्रीनिवृत्तिकृपादीप उजियेडें । देखेन मी ॥ ३२:६ ॥

जे दिठीही न पविजे । तें दिठीवीण देखिजे ।

जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥ ३३:६ ॥

नातरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरे सांपडे ।

जरी दैवयोगे चढे । परिस हाता ॥ ३४:६ ॥

तैसी सद्‌गुरुकृपा होये । तरि करीता काय आपु नोहे ।

म्हणऊनि ते अपार माते आहे । ज्ञानदेव म्हणे ॥ ३५:६ ॥

तेणेंकारणें मी बोलेन । बोली अरुपाचे रुप दावीन ।

अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥ ३६:६ ॥

ज्ञानेश्वर महाराज सहाव्या अध्यायात योगसाधनेवर भाष्य करतात. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अतिशय सांकेतिक शब्दांमधून योगसाधनेचे जे गूढ दर्शविले होते ते भगवद्गीतेच्या श्लोकांमधून संपूर्णपणे प्रगट होत नाही. गीतेमधील ही उणीव भरुन काढण्यासाठी माउलींनी आपल्या असीम दयाळू स्वभावानुसार अनुभवी साधकाला कळेल अशा शब्दांत योगसाधनेचे टप्पे सांगितले आहेत. स्वतः श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भाष्याबद्दल असे म्हटले आहे की ‘पिंडे पिंडाचा ग्रास। तो हा नाथसंकेतींचा दंश। परि दाऊनि गेला उद्देश। श्री महाविष्णु ॥२९१:६॥, तया ध्वनियाचे केणे सोडुनी। यथार्थाची घडी झाडुनी। उपलविली म्यां जाणुनी। ग्राहीक श्रोते॥२९२:६॥’.

आज निरुपणाला घेतलेल्या ओव्या योगसाधनेवरील टीकेला सुरुवात करायच्या आधी प्रस्तावनेप्रत आहेत. यामध्ये महाराज अतिशय आत्मविश्वासाने म्हणत आहेत: ‘… आता श्रीकृष्ण काय म्हणाले ते मी सांगतो (३१) खरे म्हणजे बुध्दीने कळण्यासारखी ही गोष्ट नाही, म्हणून भगवंतांच्या मनातील उद्दीष्ट्य शब्दांत पकडणे शक्य नाही तरीसुध्दा श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपादीपकाच्या उजेडात मला काय सांगायचे हे दिसेल अशी मला खात्री आहे (३२) एकदा ज्ञानाला इंद्रियांच्या पलिकडे जाण्याची शक्‍ती मिळाली की सर्वसामान्य दृष्टीला दिसत नाही अशा गोष्टीही दिसतात (उदा. जमिनीत पुरलेले धन इत्यादी) (३३) किंवा सोन्याला कृत्रिमरीत्या तयार करणे शात्रज्ञांना अनेक प्रयोगांनंतरही शक्य झाले नसले तरी हातात परीस आल्यावर ते लोखंडापासूनही तयार होऊ शकते (३४) त्याचप्रमाणे सद्‌गुरुकृपा झाली तर प्रयत्‍न केल्यावर मिळणार नाही अशी कुठली गोष्ट आहे? म्हणून ज्ञानदेव असे म्हणत आहे की माझ्याजवळ (भगवंताचे बोलणे स्पष्ट करुन दाखवायची) अपार शक्‍ती आहे (३५) त्या शक्‍तीच्या जोरावर मी असा बोलेन की ज्यायोगे ज्याला रुप नाही त्याच्या रुपाचे वर्णन तुम्हांस ऐकवीन आणि जे इंद्रियांच्या संवेदनांपलिकडे आहे त्याला इंद्रियांच्या पातळीवर आणून तुमच्या इंद्रियांतर्फे तुम्हांला उपभोगवीन(३६)’

असतात आपल्या जशा भावना । शोधतो आपण तशाच साधना ।

स्वनिर्मित साधनेत स्वतःला विसरताना । होऊ पात्र भगवंतदर्शना ॥

गीतेवर भाष्य करणे प्रचंड अवघड आहे कारण या सहाशे श्लोकांच्या छोट्याशा ग्रंथामध्ये अनेक प्रकारच्या पारमार्थिक साधना उलगडून दाखविल्या आहेत. स्वतः एखादा दृष्टीकोन न घेता त्या सर्व साधनांबद्दल तटस्थ राहून भाष्य करणे अतिशय अवघड आहे. बहुतांशी भाष्यकार एखाद्या साधनामार्गाला प्राधान्य देऊन सर्व गीता समजाऊन सांगतात. म्हणूनच लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यात कर्मयोगाचा बडेजाव आहे तर वैष्णवांच्या भाष्यात भक्‍तीयोगाला महत्व आहे. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की आत्महत्या करण्यास एक लहानशी सुरीसुध्दा पुरेशी असते. परंतु महायुध्दात जय मिळवायचा असेल तर सर्व शस्त्रसामग्री जवळ असणे अपरिहार्य असते. त्याचप्रमाणे, परमार्थात स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी आपणास अगदी मोजक्या माहितीची जरुरी असते परंतु माउलींसारखी विश्वाला ज्ञान देण्याची उत्स्तुकता जवळ बाळगायची असेल तर अनेक साधनामार्गांबद्दल संपूर्ण माहिती असणे जरुरी असते. श्रीज्ञानेश्वरी वाचताना महाराजांच्या अगाध ज्ञानाची जाणीव क्षणोक्षणी होते. ज्या आपुलकीने माउली भक्‍तीबद्दल बोलते त्याच प्रेमाने कर्मयोगाचे महत्व विशारद करते आणि तेव्हढ्याच उत्कटतेने योगसाधना स्पष्ट करते. खरे म्हणजे कुठलाही एक साधनामार्ग महत्वाचा नसतो, त्या मार्गाबद्दलची साधकाच्या मनात असलेली आत्मीयता महत्वाची असते. साधनेवरील प्रेमाने साधकाच्या आयुष्यात पारमार्थिक साधनेव्यतिरीक्त ज्याकाही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलची मनातील ओढ कमी व्हायला लागते. जणू साधकाच्या मनातील सर्व प्रेमाचे एकमेव शिल्लक राहीलेले मूर्त रुप म्हणजे त्याची साधना होते. ज्याप्रमाणे घरातील केर काढताना आपण निरनिराळ्या खोल्यांतून कचरा काढून एका ठिकाणी गोळा करतो त्याचप्रमाणे स्वतःच्या प्रेममयी रुपाला आपण ज्या अनेक वस्तू, घटना आणि व्यक्‍तींमध्ये विखुरले आहे ते ‘स्वतःची साधना’ या एका रुपात एकत्र करतो. एकदा ही घटना साधकाच्या आयुष्यात घडली की साधनेचे काम पूर्ण होते. अशावेळी साधनेलाही सोडून द्यायची गरज असते. एकत्र केलेला कचरा आपण घराबाहेर टाकून देतो तशी ही घटना आहे. नाहीतर गोळा केलेला कचरा परत हळूहळू घरभर विखुरला जातो!! साधनासुध्दा द्वैतात असल्याने ते गोळा केलेले प्रेम अजूनही सांसारिक पातळीवरच आहे. ते परत गुरुतुल्य व्यक्‍तींच्या सहवासाच्या ओढीमध्ये आणि बाकी व्यक्‍तींच्या दुस्वासामध्ये वाटले जाण्याची शक्यता अजून शिल्लक आहेच.

निव्वळ अमूर्त प्रेमामध्ये जो साधक रमला तो भगवंताच्या सान्निध्यात निरंतर राहीला असे समजावे. सांगायचा मुद्दा असा की साधनेमुळे भगवंत मिळत नाही. साधनेमुळे काय होते तर स्वतःच्या जरासंधासारख्या अनेक ठिकाणी वाटल्या गेलेल्या आनंदमयी स्वरुपाला एकसंध होणे शक्य होते. या एकवटलेल्या प्रेमाच्या जोरातच साधकाची भगवंताकडे जाण्याची शक्‍ती साठलेली असते.

आपला साधनामार्ग कुठला आहे याचे महत्व नाही हे लक्षात घ्या. साधनेमुळे काय मिळते तर स्वतःच्या प्रेमाला व्यक्त करण्यास एक निर्भेळ स्थान. साधनेखेरीज कुठल्याही ठिकाणी स्वतःला गुंतविणे स्वरुपानुसंधानाच्या दृष्टीने धोक्याचे आहे. साधनेच्यासुध्दा स्वतःच्या मागण्या असतातच आणि त्या मागण्यांमुळे आपण स्वरुपानुसंधानापासून दूर होत असतो यात शंका नाही. परंतु साधनेखेरीज आपल्यासमोर असलेल्या दुसऱ्या कुठल्याही पर्यांयाप्रमाणे साधनेच्या मागण्या पूर्ण करण्याने आपल्या मनाचा बडेजाव वाढत नाही आणि भावनांचे आपल्या जीवनावर असलेले वर्चस्व कमी होते. अंतर्स्फूर्तीवर जीवन जगायचे असेल तर मनात स्फुरलेल्या भावनांकडे निर्मळ नजरेने पहायची ताकद असणे जरुरी आहे. स्वतःच्या मनात तटस्थपणा जागृत होणे म्हणजे सद्‌गुरुकृपा गोचर होणे होय.

वरील ओव्यांतील सर्वात महत्वाचे शब्द म्हणजे ‘श्रीनिवृत्तिकृपादीप उजियेडे’ होय. माउली म्हणत आहे की मला जे दिसत आहे ते निव्वळ गुरुकृपेने शक्य आहे. समोर आलेल्या घटनांमागील सत्यता किती लोकांना कळते? प्रत्येकजण आपापल्यापरीने अर्थ शोधण्याचा प्रयत्‍न करीत असतो. जे खरे आहे ते कळण्यास गोष्टींमधील ‘स्वतः’चा सहभाग काढून घेणे अत्यावश्यक आहे. स्वतःच्या संकुचित व्यक्‍तिमत्वाला बाजूला सारुन तटस्थपणे बघणे जरुरी आहे. हा तटस्थपणा कुठल्याही प्रयत्‍नांनी निर्माण होत नसतो तर आपला बाकी गोष्टींबद्दलचा अट्‍टाहास नष्ट झाल्यावर आपोआप उत्पन्न होत असतो. म्हणून महाराज या अवस्थेला श्रीनिवृत्तीमहाराजांच्या कृपेचा परिणाम म्हणत आहेत. साधनेचा प्रयत्‍नही आपणास तटस्थपणापासून दूर नेत असतो. स्वप्रयत्‍नांशिवाय स्वयंभूरीत्या उत्पन्न होणारी अवस्था प्राप्त झाल्याखेरीज भगवंत काय म्हणत आहेत हे कळणे अशक्य आहे. श्रीज्ञानेश्वर महाराज निरंतर या अवस्थेत असल्याने त्यांना अशी खात्री आहे की भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश ते आपणा सर्वांना सांगू शकतील. सद्‌गुरुकृपेच्या दिव्याचा उजेड आपल्याभोवतालीही आहे. फक्‍त आपणास त्याची अजून जाणीव झालेली नाही. ती जाणीव उत्पन्न होण्यास भगवंतांनी अर्जुनाला जे मार्ग सांगितले आहेत त्यापैकी एक सुनिश्चित करुन मार्गक्रमण करणे आपल्या हातात आहे. चला, निघूया आपापल्या मार्गाने.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे स्थान

(बंगलोर, दिनांक १३ डिसेंबर २००९)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: