श्लोक ३/१०: पापांपासून सुटका करण्याचा मार्ग

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्‌ ।

असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ गीता ३:१० ॥

भर दुपारी आमच्या कचेरीच्या समोरील हिरवळीला पाणी घालण्याच्या नळातून थेंब-थेंब पाणी ठिबकत होते. नळदुरुस्तीच्या कामाला नेमलेल्या माणसाची अकार्यक्षमता सिध्द करणाऱ्या त्या घटनेचा फायदा पक्ष्यांना जरुर होत होता! नळाखाली साचलेल्या छोट्याशा डबक्यात अनेक छोटे पक्षी आपली चोच बुडवून तहान भागवीत होते. त्यांच्याबरोबर ओळीत बसून मधमाशा पाणी पित होत्या. बरेच दिवस नळ गळत असल्याने नळाशेजारचे गवतही भर उन्हाळ्यात जोमाने वाढले होते. या सर्व जीवांची तहान भागविण्याचे आणि गवताला जीवन प्रदान करण्याचे श्रेयसुध्दा त्याच माणसाला आहे की ज्याने आपले काम नीट न करण्याचे पाप केले आहे. आपल्या आयुष्यात पुण्य आणि पाप यांची इतकी भेसळ झाली आहे की निव्वळ पुण्य मिळण्यासारखी एकही गोष्ट शिल्लक राहीली नाही ना कुठली गोष्ट संपूर्ण चुकीची आहे. जेव्हा एका माणसाच्या मनाप्रमाणे आपण वागतो तेव्हा दुसऱ्या एका व्यक्‍तीच्या मनाला दुःख देण्यास आपण कारणीभूत होतो. एखाद्या उच्च तत्वाचा पाठपुरावा करताना अनेक जीवांना त्रास देण्याचे काम करीत असतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण साधनेला बसतो तेव्हा सद्‌गुरु प्रसन्न झाले तरी आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्‍ती त्या क्रियेने सुखी होतातच असे नाही. तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा घरातील सर्वजणांनी आपापले व्यवहार सोडून शांत रहावे वा प्रार्थनेत सहभागी व्हावे असा आग्रह जर तुम्ही ठेवला असेल तर त्या देवपुजेने आपण पुण्य मिळवितो का पाप हे ठरविणे कठीण होते. बरे जवळच्या मंदिरात जाऊन नमस्कार करावा असे म्हटले तर देवळातील मूर्तीला भक्‍तीपूर्वक प्रदक्षिणा घालताना असंख्य जीवजंतूंना आपण पायदळी चेंगरुन जीवे मारत असतो! अशा रीतीने आपण पुण्यात्मक ठरविलेल्या प्रत्येक गोष्टीत पापाची भेसळ असतेच यात शंका नाही. अशा वस्तुस्थितीमध्ये भूतकाळात घडलेल्या पापांचा संपूर्ण नाश होणे कसे शक्य आहे असा संभ्रम साधकाला भेडसावणे नैसर्गिक आहे. आज निरुपणाला घेतलेला भगवद्गीतेचा श्लोक या संदेहाचे फार सुंदररीत्या निरसन करीत आहे. भगवंतांनी दिलेले उत्तर आपल्या कल्पनेच्या बाहेरील आहे (आणि म्हणूनच ते खरे आहे!). भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की: ‘ज्या मनुष्याला माझा (म्हणजे भगवंतांचा) कधीही जन्म झालेला नसून मी अनादि आहे आणि सर्व लोकांचा शास्ता आहे या वस्तुस्थितीची संपूर्ण जाणीव झालेली असते त्यालाच ज्ञान झालेले आहे आणि त्याच्या सर्व पापांचा विनाश झाला आहे असे समज.’

कृतकर्मांची आहे जाणीव । तोपर्यंत राहील स्वतःत उणीव ।

नव्हे आपण देह पार्थिव । या खात्रीत सुटका मिळीव ॥

असे बघा, भौतिक जगात घडलेल्या पापांचा संपूर्ण नाश त्या जगातच राहून होणे शक्य नाही हे स्पष्ट आहे. एका ठिकाणची घाण जर काढायची असेल तर आधी स्वच्छ जागा पाहून तिथे उभे राहून घाण काढावी लागते. घाणीमध्येच उभे राहून साफसफाई होत नाही. अशा क्रियेने घाणीचा नाश न होता तीचे स्थान बदलण्याखेरीज दुसरे काही होत नाही. आपल्या देहाने वा मनाने जी पापे केली आहेत त्याचा विनाश स्वतःला देह-मना पलिकडे नेऊनच करावा लागणार आहे. असे केल्याशिवाय आपण एखादी क्रिया केली तर काय होईल याचे वर्णन करण्यासाठी समर्पक उदाहरण म्हणजे नवजात बालकाने स्वतः केलेल्या घाणीला तिथेच बसून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणे होय. स्वतः केलेली पापरुपी घाण आपल्यापासून दूर न होता अजून सगळीकडे पसरली जाईल व दुर्गंधी जास्त दूर पसरली जाईल. आधीच्या क्रियांच्या परिणामाबरोबर आता केलेल्या नवीन ‘पुण्य’क्रियांच्या परिणामांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. म्हणजे काय, तर नको असलेला परिणाम नष्ट न होता सध्या हवासा वाटणारा दुसरा परिणाम तयार होईल. एका आर्थिक घडामोडीतील झालेला तोटा दुसऱ्या यशस्वी गुंतवणुकीने नष्ट होत नाही. नंतर हिशेब मांडताना तोटा लिहायचा असतोच. फक्‍त त्याच्या जोडीला नफा असल्याने शेवटची गोळाबेरीज जमेत बसते. त्यामुळे मी आहे तसा राहीन पण पूर्वक्रियेच्या विरुध्द क्रिया करुन आधी केलेल्या क्रियांना नष्ट करीन हे म्हणणे संयुक्‍तिक नाही.

स्वक्रिया ज्या पातळीवर आहेत, त्यापेक्षा दुसऱ्या पातळीवर जाणे कर्माच्या नियमांपासून मुक्‍त होण्यास जरुरी आहे. जे कर्म झालेले आहे ते घडून गेलेले आहे, त्याच्या फळांपासून मुक्‍त व्हायचे असेल तर स्वतःची अशी खात्री झाली पाहिजे की ते कर्म करणारा मी नव्हतो तर माझ्याव्यतिरीक्‍त दुसरी एक व्यक्‍ती होती. ज्याप्रमाणे आपण मुंबईत झालेल्या आतंकवादी हल्याच्या क्रियेपासून वा सचिन तेंडुलकरने केलेल्या विश्वविक्रमांपासून अलिप्त समजतो त्याचप्रमाणे स्वतःच्या देहानी वा मनानी केलेल्या कर्मांपासूनसुध्दा जेव्हा आपण भिन्न आहोत असे बघतो तेव्हाच आपल्या पापकर्मांचा विनाश सहजरीत्या होतो. आपले असे अस्तित्व शोधायला हवे की जे सर्व कर्मांच्या कर्त्यापासून भिन्न आहे. ज्या अस्तित्वाच्या जोरावर आपण उभे आहोत तिकडे आपण जायला हवे.

इथे काही सज्जन अशी शंका घेतील की भगवंतांनी त्यांचे अजन्मत्व व अनादित्व पहायला सांगितले आहे, आपले स्वतःचे नाही. हे कसे? या शंकेचे उत्तर म्हणजे एखादी गोष्ट आपण जाणतो म्हणजे काय? तर त्या गोष्टीला आपल्या पूर्वज्ञानाशी सांगड घालून बघतो. उदाहरणार्थ, लहान बालक या शब्दाचा अर्थ ज्याने कधी आयुष्यात लहान मुलाचे चित्रसुध्दा बघितलेले नाही असा माणूस समजूच शकत नाही. ज्याने साखर कधी खाल्लीच नाही तो ‘गोड’ या शब्दाचा अर्थ कसा लावू शकणार? भगवंत अज आणि अनादि आहे हे कोणाला पटणार? ज्याने आधीच अजन्मा आणि अनादी वस्तू पाहिली आहे त्यालाच! या जगामधील प्रत्येक गोष्टीला वा घटनेला जन्म आहे, वृध्दी आहे आणि शेवटी मरण आहे. तेव्हा या जगातील कुठलेही ज्ञान प्राप्त करुन भगवंताच्या अमूर्त रुपाची ओळख होणे शक्यच नाही. या जगाबाहेरील निव्वळ एकाच वस्तूची आपणास जाणीव आहे. ती म्हणजे आपण जिवंत आहोत याची खात्री. श्वास घेतो म्हणून जिवंत आहोत असे म्हणायलासुध्दा आपणास जागा नाही कारण प्राणवायूवर नियंत्रण करुन कुंभक करतानाही आपल्या अस्तित्वाला आपण नाकारु शकत नाही. जेव्हा आपले लक्ष ज्या आधारावर आपण स्वतःचे अस्तित्व उभारले आहे त्या निराकार, अमूर्त आणि अतींद्रिय पायाकडे जाते तेव्हा आपल्या पापकर्मांचा विनाश व्हायला सुरुवात झाली आहे असे समजले पाहिजे.

इथे एक गंमतीची गोष्ट म्हणजे जेव्हा आपणास पूर्ण खात्री होते की पापकर्मे करणारी व्यक्‍ती आपल्या स्वरुपाहून भिन्न आहे तेव्हा पुण्यकर्मे करणाऱ्या व्यक्‍तिमत्वापासूनही आपली सुटका होते. म्हणजे आपण जेव्हा पापापासून मुक्‍ती मिळवितो तेव्हा आपोआप आपल्या डोक्यावरचे पुण्याचे ओझेही नाहीसे होते. बहुतांशी साधकांच्या मनात आपल्या जीवनातील पापयुक्‍त तापांपासून मुक्‍तीची अभिलाषा असते पण स्वतःच्या आयुष्यातील असलेला पुण्याचा ओलावा सोडायचा विचारसुध्दा त्यांच्या डोक्यात आलेला नसतो. आपल्या पूर्वकर्मांमधील पापांपासून मुक्‍तीच्या हव्यासात स्वतःची पुण्ये आहेत तशीच राहतील हे आपण अध्यारुत धरलेले असते. मला एकही शत्रु नको असे म्हणताना सध्या आहेत ते मित्र तसेच राहू दे ही भावना असतेच. सर्व शत्रू जातील पण त्याचबरोबर एकसुध्दा मित्र राहणार नाही असे सांगितले तर कितीजणांना आवडेल? शत्रूंशिवाय आयुष्य सुखमय होईल या कल्पनेमागे ‘मग फक्‍त मित्रच राहतील’ या इच्छेचा पाया आहे. आपण तोंडाने मागतो एक पण मनात खरे दुसरेच असते. भगवंताला आपणास खरे काय हवे आहे याची कल्पना असल्याने तो आपल्या मुखातून आलेल्या शब्दांकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच आपल्या प्रार्थनांची पूर्तता होत नाही. असो. सांगायचा मुद्दा असा की आपणास फक्‍त पापांपासून मुक्‍ती हवी असते, पुण्यापासून नाही. परंतु भगवंत म्हणत आहेत की एकतर सर्व कर्मफलांपासून मुक्‍ती मिळेल किंवा सर्व कर्मांचे फल भोगावे लागेल. एकतर तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात वा परतंत्रात अडकलेले आहात. स्वतःच्या निर्गुण रुपाच्या निःसंदेह जाणीवेत आपल्या देह-मनाच्या संकुलातून मुक्‍तता आहे आणि त्या स्वतंत्रामध्ये आपणांस एका झटक्यात सर्व कर्मफलांपासून स्वातंत्र्य मिळते. मग आपण भगवंत कोण अशी पृच्छा केली तर उत्तर मिळते की भगवंत आपल्यासारखाच अनादि, अजन्म आहे आणि सर्व चराचरावर त्याची सत्ता आहे. आपण आणि भगवंत यामधील फरक जाणविण्यास स्वतःच्या मनाची, बुध्दीची आवश्यकता असते. जेव्हा आपल्या हातातून ही दोन उपकरणे संपूर्णपणे सुटतात आणि आपली अवस्था नवजात अर्भकासारखी निर्मळ होते. अशा वेळी आपण जे बघतो ते स्वतःच होतो. भगवंताचे निर्गुण रुप जाणून घ्यायचे असेल तर आधी स्वतःकडे बघून निर्गुण, निराकार रुप म्हणजे काय हे अपरोक्ष अनुभवाद्वारे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय आपले ज्ञान म्हणजे निव्वळ ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ या म्हणीप्रमाणे कल्पनात्मक होईल. आणि कल्पनेतील जेवणाने भूक शमत नाही तर अधिक प्रज्वलित होते, त्याचप्रमाणे निव्वळ बौध्दीक ज्ञानाने समाधान प्राप्त न होता संशय वृध्दींगत होतो. जो संशयरुपी भोवऱ्यात सापडला तो ‘बोंबेही सकट निमाला’ यात भ्रांती नाही!

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे स्थान

(बंगलोर, दिनांक २५ डिसेंबर २००९)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: