(२२ ते २७)/१: विवेक आणि आत्मज्ञान

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

मज ह्रुदयी सद्‌गुरु । जेणे तारीलो संसारपुरु ।

म्हणऊनि विशेषे अत्यादरु । विवेकावरी ॥ २२:१ ॥

जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळी दृष्टीसी फांटा फुटे ।

मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ॥ २३:१ ॥

कां चिंतामणी आलिया हातीं । सदा विजयवृत्ती मनोरथीं ।

तैसा पूर्णकाम श्रीनिवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ॥ २४:१ ॥

म्हणोनी जाणतेनें गुरु भजिजें । तेणे कृतकार्य होईजे ।

जैसे मूळसिंचने सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ २५:१ ॥

कां तीर्थे जियें त्रिभुवनीं । तिये घडती समुद्रावगाहनीं ।

ना तरी अमृतरसस्वादनीं । रस सकळ ॥ २६:१ ॥

तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।

अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥ २७:१ ॥

श्रीज्ञानेश्वरीमधील सद्‌गुरुस्तवनपर ओव्या अतिशय सुंदर आणि भावपूर्ण आहेत. विशेषतः उत्तरार्धातील अध्यायांतील स्तवने म्हणजे श्रीज्ञानदेवांच्या प्रतिभेचा पूर्ण विकास आहे असे वाटते. महाराजांनी आपल्या अनंत शब्दसामर्थ्याला आणि साहित्यिक अलंकारांना पणाला लावून केलेल्या गुरुस्तवनांची गोडी प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे उपभोगू शकतो. त्यामुळे कुणाला स्तवनांतील अनुप्रासादीक अलंकारांबद्दल कौतुक वाटेल तर कुणाला गणेशादीक रुपकांबद्दल आस्था वाटेल आणि बाकी कुणाला वापरलेल्या शब्दांचा मोह पडेल. परंतु आपण सर्वांनी स्वतःच्या इच्छेने रसस्वाद घेताना एक गोष्ट कधीही विसरु नये की या स्तवनांतील प्रत्येक शब्द सत्याच्या कसोटीवर उतरलेला आहे. श्रीज्ञानेश्वरीतील एकही स्तवन ‘आजच्या मुख्य पाहुण्यांची ओळख करुन देणे म्हणजे सूर्याला ओवाळण्यासारखे आहे’ अशा ओशाळवाण्या, परावलंबी आणि निरर्थक स्तुतीसुमनांप्रमाणे नाही. गुरुकृपेचा प्रत्येक गुण स्वतःच्या अपरोक्ष ज्ञानाच्या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतरच महाराजांनी गौरविला आहे. कदाचित म्हणूनच जसजशी श्रीज्ञानेश्वरी पूर्ण होत गेली तसतशी त्यांच्या कृतज्ञतेला अधिकाधिक भरती येत गेलेली दिसते. अठराव्या अध्यायातील गुरुस्तवन म्हणूनच फार वेगळे आहे. असो. आज प्रवचनाला पहिल्या अध्यायातील सद्‌गुरुस्तवनातील ओव्या घेतल्या आहेत. आत्मरुपी देवाला, गणेशाला आणि सरस्वतीला वंदन केल्यानंतर महाराजांनी आपल्या गुरुंना नमस्कार केला आहे. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत: ‘या संसाररुपी महापुरातून ज्याने मला सोडविले तो सद्‌गुरु माझ्या ह्रुदयात अखंड वास करीत आहे आणि त्याच्या अस्तित्वामुळेच माझ्या मनात विवेकाबद्दल विशेष आणि पराकोटीचा आदर आहे (२२). ज्याप्रमाणे डोळ्यात विशिष्ट अंजन घातल्यावर नजरेची कुवत वाढून भूमित पुरलेले गुप्तधनही स्पष्ट दिसू लागते (२३). किंवा चिंतामणी रत्न हाती आल्यावर सर्व मनोकामना पूर्ण होतात, त्याचप्रमाणे माझ्याजवळ श्रीनिवृत्तीनाथ असल्याने माझ्या इच्छा पूर्त झाल्या आहेत (२४). म्हणून शहाण्या माणसाने जाणीवपूर्वक गुरुंना भजून आपल्या सर्वकर्मांपासून सुटका करुन घ्यावी, जसे मूळाला पाणी घातल्यावर फांद्यांना आणि पानांना वेगळे पाणी द्यायच्या कर्मांपासून सुटका होते (२५). किंवा एका समुद्रात स्नान केल्याने पृथ्वीवरील सर्व तीर्थांत स्नान केल्याचे पुण्य मिळते वा एका अमृताची चव चाखली की सर्व चवींची ओळख होते तशी ही गोष्ट आहे (२६). म्हणून परतपरत मी एकाच श्रीगुरुंना वंदन करीत आहे जो माझी सर्व मनोगते जाणून त्या इच्छा पूर्ण करील (२७).’

प्राथमिक ध्येय होता पूर्त । नका शोधू नवे उद्दीष्ट ।

त्याच ध्येयाचा दिसेल नूतन अर्थ । तोवरी रहा पूर्ण स्वस्थ ॥

विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची बुध्दी. परंतु कुठली गोष्ट योग्य आहे आणि कुठली अयोग्य हे ठरवितानाही विवेक लागतो, मनावर ताबा जरुरी असतो. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की परमार्थाला गवसणी घालण्याचा प्रयत्‍न करण्याची सुरुवात करायला जेव्हा साधक उत्सुक असतो तेव्हा त्याच्या मनात एक इच्छांची यादी तयार असते. उदाहरणार्थ, कुणाला हे सर्व जग समाधानाने भरायचे असते तर कुणाला आत्मिक शांती हवी असते. कुणी आपल्या सद्यपरिस्थितीवर एवढा खूश असतो की आहे तीच अवस्था कायम रहावी याकरीता तो साधना करतो. कुणाला स्वतःच्या मनातील राग नष्ट करायचा असतो तर कुणाला आपली एखाद्या गोष्टीबद्दलची अभिलाषा. याशिवाय काहीजण अध्यात्म हा प्रकार आहे तरी काय या कुतुहलापोटी साधना करण्यास उद्युक्‍त होतात. अशा अनंत कारणांपैकी कुठल्यातरी कारणांमुळे साधकाला असे पटते की आपल्या मनातील इच्छांची पूर्ती करण्यासाठी व्यावहारिक नव्हे तर पारमार्थिक साधनांची गरज आहे. एकदा ही गोष्ट त्याला स्पष्ट झाली की मनपसंद साधना शोधायचा त्याचा प्रयत्‍न सुरु होतो. अचानक त्याच्या जीवनात गुरु, साधना वगैरे शब्द येतात आणि त्याचे आयुष्य एका वेगळ्याच पातळीवर जाते. अशावेळी जर साधक प्रामाणिक असेल तर साधकाला आपल्या प्राथमिक ध्येयाची पूर्तता झाली आहे असे जाणवू लागते. उदाहरणार्थ, अगदी छोट्या कारणाने मनात येणारा राग कमी व्हावा अशी ज्याची इच्छा असते त्याला स्वतःच्या रागावर ताबा यायला लागला आहे हे दिसू लागते. आता त्याच्या मनात राग आला तरी समोरील व्यक्‍तीला त्या रागाची झळ सोसावी लागत नाही.

ध्येयाची पूर्तता होण्याचे कारण असे की प्रामाणिकपणे केलेली कुठलीही साधना फार सूक्ष्म स्तरावर काम करीत असते आणि आपले ध्येय स्थूलात असते. सूक्ष्म गोष्ट केव्हाही स्थूल गोष्टीवर प्रभाव टाकतेच. आणि आपले ध्येय स्थूलात असण्याचे कारण म्हणजे साधना सुरु करण्याआधी आपले आयुष्य व्यावहारिक असल्याने आपल्या सर्व इच्छा स्थूलमय असतात. म्हणून साधनेने साधकाच्या प्राथमिक इच्छा लगेचच पुऱ्या होतात. उदाहरणार्थ, राग येऊ नये अशी इच्छा ज्याला आहे त्याला खरे म्हणजे आपल्या रागामुळे इतरांचे जीवन कठीण होऊ नये असे वाटत असते. आपल्या मनातील रागावर आपला ताबा असावा असे म्हणायच्या ऐवजी तो राग येऊ नये असे म्हणत असतो. साधनेने त्याची रागावर ताबा मिळवायची खरी इच्छा पूर्ण होते.

अशावेळी साधक काय करतो हे त्याचा विवेक ठरवितो. रागावर ताबा आला आहे, राग पूर्ण गेलेला नाही याची जाणीव ठेवणे म्हणजे विवेक जागृत असणे होय. याउलट ‘चला आता संतापावर ताबा आलेला आहे, मग आता माझी पैशाबद्दलची (वा कुठल्या एका व्यक्‍तीबद्दलची) अभिलाषा जाण्याकरीता साधना करावी’ असे जो साधक म्हणतो तो अविवेकी ठरतो. एकाच गोष्टीमध्ये आयुष्यभर मुरुन रहायची तयारी ठेवणे म्हणजे विवेक होय. एखाद्या फुलपाखराप्रमाणे निरनिराळ्या सुंदर ध्येयांच्या मागे धावणे म्हणजे अविवेक होय.

विवेकाची व्याख्या अशी करण्याचे कारण म्हणजे परमार्थाचे तत्व ‘चराचरातील सर्व गोष्टी एकाच पायावर उभ्या आहेत’ हे आहे. मग त्या पायाला कुणी भगवान म्हणू दे वा कुणी आत्मरुप. संतांनी वापरलेल्या शब्दांत न अडकता त्यांमागील अर्थ बघितला तर हीच गोष्ट सर्व संतांनी सांगितली आहे असे दिसते. हे जर खरे असेल तर कुठल्याही गोष्टीचा पाया जर आपण बघितला तर आपणास पारमार्थिक तत्व प्राप्त व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ, राग जावा अशी इच्छा असणाऱ्याने रागावर ताबा मिळविणे म्हणजे सध्या आहे त्या पातळीपेक्षा एक मजला खाली उतरण्यासारखे आहे. अशावेळी अजून बरेच मजले उतरायचे आहेत ही भावना नसेल तर परत आपण मूळपदावर जाणारच. एकदा रागावर ताबा आला की नंतर नक्की केव्हा राग येतो हे बघायला साधकाने सुरुवात केली पाहिजे. मग राग येण्याची कारणे दिसू लागली की का ही कारणे राग उत्पन्न करीत आहेत यावर नजर टाकली पाहिजे. त्यानंतर राग येण्याच्या कारणांना आपणच महत्व दिले आहे असे कळल्यावर का आपण महत्व दिले आहे यावर चिंतन केले पाहिजे. स्वतःच्या रागावर ताबा मिळवायला हवा या इच्छेचे सर्वात सूक्ष्मरुप शोधून त्याचे ज्ञान करुन घेण्याचा संयम ज्याला आहे तो खरा विवेकी आहे.

प्राथमिक ध्येय पूर्ण झाल्यानंतरचे आपले हे सूक्ष्म ज्ञान निव्वळ स्वतःकरीता असते. कारण ज्याक्षणी तुम्ही आपला राग बाहेर प्रदर्शित करणे थांबविता त्याक्षणी लोक तुम्हाला शांतच समजणार. अजून स्वतःच्या रागावर नियंत्रण करण्याचे प्रयत्‍न सुरु आहेत असे तुम्ही दुसऱ्या कुणाला सांगूच शकत नाही, फक्‍त स्वतःला, म्हणजेच आपल्या ह्रुदयात स्थित असलेल्या सद्‌गुरुंना, सांगू शकता. अशा निरंतर चाललेल्या प्रयत्‍नांचे फळ म्हणजे अचानक आपणास ज्ञान प्राप्त होणे होय. हेच ते आत्मज्ञान. जेव्हा ‘मनात येणारा राग’ या शब्दांचा संपूर्ण अर्थ तुम्हाला कळतो तेव्हा सर्वच शब्दांचा अर्थ स्पष्ट होतो कारण सर्व शब्द या एकाच पायावर उभारलेले आहेत. अशी सारासार विचार करण्याची बुध्दी श्रीनिवृत्तीनाथांच्या वर्तनामुळे आपणास मिळाली असे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. एकदा एकाच गोष्टीत मुरुन रहायचा विवेक जागृत झाला की बाकी सर्व गोष्टी सहज प्राप्त होतात आणि म्हणूनच माउलींना आपल्या सद्‌गुरुंबद्दल एवढे अतीव प्रेम वाटत आहे.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे स्थळ

(बंगलोर, दिनांक २४ जानेवारी २०१०)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: