श्लोक (२१-२४)/७: भगवंतांच्या इच्छेत स्वत्व हरवा!

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

यो यो यां यां तनुं भक्‍तः श्रध्दयार्चितुमच्छति ।

तस्य तस्याऽचलां श्रध्दां तामेव विदधाम्यहम्‌ ॥ गीता २१:७ ॥

स तया श्रध्दया युक्‍तस्तस्याराधनमीहते ।

लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान्‌ ॥ गीता २२:७ ॥

अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम्‌ ।

देवान्देवयजो यान्ति मद्भक्‍ता यान्ति मामपि ॥ गीता २३:७ ॥

अव्यक्‍तं व्यक्‍तिमापन्नं मन्यंन्ते मामबुध्दयः ।

परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्‌ ॥ गीता २४:७ ॥

भगवान या एकाच शब्दाचे प्रतिबिंब प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे उमटलेले दिसते. सर्वांना माहिती असणाऱ्या वैष्णव आणि शैव या दोन ढोबळ फरकांपेक्षाही अनेक सूक्ष्म फरक देवाच्या व्याख्येमध्ये दिसून येतात. उदाहरणार्थ, वैष्णवांमध्येही कुणाला लंगड्या बाळकृष्णाबद्दल प्रेम उत्पन्न होते तर कुणाला मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्राबद्दल भक्‍ती निर्माण होते तर कुणी परमभक्‍त हनुमानाच्या पूजेमध्ये जीवनाचे सार्थक बघतो. अगदी एकाच घरातील दोन व्यक्‍तींच्या मनातील देवाच्या प्रतिमा भिन्न असतात असे दिसून येते. परंतु या सर्व फरकांमध्ये एक समानता दिसून येते. ती म्हणजे प्रत्येकाने आपापला देव स्वतः निवडलेला असतो. यावर कुणी असे म्हणेल की आमचे कुलदैवत पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेले आहे, ते आम्ही निवडलेले नाही तर परंपरेने चालत आलेले आहे. परंतु सर्वच पारंपारिक गोष्टी तुम्ही पाळता असे नाही. त्यामुळे कुठल्या देवाला भजायचे याबद्दलचा निर्णय तो देव परंपरागत चालत आलेला आहे एवढेच नसून वंशपरंपरागत चालत आलेला देव मंजूर करण्यात तुमची काही हरकत नव्हती हेसुध्दा आहे. म्हणजे शेवटी तुमचाच निर्णय आहे की कुठल्या देवाची पूजा करायची. या वस्तुस्थितीमुळेच आपण बघतो की घरातील देवासमोर प्रत्येकजण वेगवेगळी स्तोत्रे म्हणून आपापल्या परीने पूजा करतो. जेव्हा सूज्ञ साधकाला या वस्तुस्थितीची जाणीव होते तेव्हा त्याच्या मनात साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की ‘कुठल्या देवावर विश्वास ठेवावा याबद्दलचा माझा निर्णय योग्य आहे का नाही?’ एकदा हा संशय उद्भवला की त्याची दृष्टी तुलना करण्याच्या उद्देशाने बाकीच्यांच्या देवाकडे जाते. मग आपला वैयक्‍तिक मार्ग दुसऱ्यांच्या मानाने कसा अधिक चांगला आहे हे बघण्याची सवय त्याच्या मनाला लागते. भगवंताच्या दोन भक्‍तांमध्ये वैमनस्क निर्माण होण्यास वरील मनोवृत्ती कारणीभूत आहे. एकाच भगवंताच्या दोन अवतारांच्या भक्‍तांमधील वैर बघून काहीजण भगवंताबद्दलच शंका निर्माण करतात की ‘हे वैर तो कसे चालवून घेतो?’ वरील विवेचनाने या प्रश्नाचे थोडेबहुत उत्तर आपणास मिळेल अशी आशा आहे.

अर्थात, प्रत्येकाच्या मनात अत्यंत वैयक्‍तिकरीत्या भिन्न अवतारांबद्दल ममत्व निर्माण कसे होते हा जो मूळ प्रश्न आहे तो रहातोच. आज प्रवचनाला घेतलेले भगवद्गीतेचे श्लोक या संदेहाचे निरसन करीत आहेत असे वाटते. आणि एवढेच नव्हे तर भगवंताबद्दल आपण कुठला निर्णय घ्यावा याबद्दल मार्गदर्शन करीत आहेत असेसुध्दा वाटते. स्वतःच्या विश्वव्यापी रुपाची जाणीव अर्जुनाला करुन दिल्यानंतर (पहा श्लोक ४-१२, अध्याय ७) भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत: ‘माझ्या ज्या कुठल्या रुपाबद्दल मनुष्याच्या मनात आस्था निर्माण होते, त्या ठराविक रुपाबद्दलच्या श्रध्देची जोपासना मीच करतो (२१). साधकाच्या इष्टदेवतेनुसार कुठली साधना करावी हे आणि त्यानुसार मिळणारे फल या दोन्ही गोष्टी माझ्यामुळेच प्राप्त होतात (२२). परंतु अशा अल्पबुध्दी साधकांना मिळणारे फल नित्य नसते तर ते काही काळापर्यंतच टिकून मग नष्ट होते. ज्या देवतांची भक्‍ती केलेली आहे त्यांचीच प्राप्ती भक्‍तांना होऊ शकते. माझे भक्‍त माझ्यात येतात (२३). अल्पबुध्दी साधकच माझ्या निर्गुण, निराकार रुपाकडे दुर्लक्ष करुन माझ्या एका ठराविक अवतारावर आपले लक्ष केंद्रित करतात (२४).’

करता देवाची परम भक्‍ती । असेल मनात एखादी मूर्ती ।

न मिळे कदा त्यातून भोगमुक्‍ती । सहज साधनेतच असे मोक्षप्राप्ती ॥

व्यावहारिक जीवनात आपल्या सर्व प्रयत्‍नांमागचा हेतू स्वतःच्या व्यक्‍तिमत्वाचा विकास करणे असा असतो. हुशार विद्यार्थ्याच्या परीक्षेमध्ये यश मिळविण्याच्या धडपडीत, कर्मचाऱ्याच्या कचेरीत बढती मिळविण्याच्या खटपटीत आणि गृहीणीच्या नवीन पाकक्रिया शिकण्याच्या खटाटोपीमागे आपले संकुचित व्यक्‍तिमत्व अधिक व्यापक व्हावे हाच विचार असतो. आयुष्यबरच्या सवयीमुळे बहुतांशी साधक आपल्या भगवंताच्या उपासनेतही हाच विचार आणतात असे दिसून येते. उदाहरणार्थ, स्वतःच्या मनातील वाईट विचारांचा वा अस्वस्थतेचा विनाश करण्यासाठीच ते एखादी उपासना करण्यास सुरुवात करतात. सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या मनात साधना केल्याने काय साध्य मिळवायचे आहे याबद्दलची एक सुनिश्चित कल्पना असते आणि त्यानुसारच साधनेला आकार मिळतो. इथे त्या फळाचे रुप व्यावहारिक आहे वा अध्यात्मिक आहे या गोष्टीचा संबंध नाही. आपण आधीच ठरविलेल्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहोत ही गोष्ट महत्वाची आहे. कारण भगवान म्हणत आहेत की ‘जो मनुष्य जे फल इच्छितो ते त्याला (त्याने निवडलेल्या मार्गाने) प्राप्त होते आणि ते माझ्यामुळेच मिळते. परंतु ही सर्व अल्पबुध्दी आहे.’

आपण कितीही व्यापक विचार करुन आपले ध्येय ठरविले तरी ते ध्येय भगवंताच्या नजरेत संकुचितच असते हे ध्यानात घ्या. समाजाचा उध्दार करण्याच्या ध्येयातही अल्पबुध्दी आहे आणि स्वतःच्या जीवनात भौतिक गोष्टींच्या जमवाजमवीतही अल्पबुध्दी आहे. ज्याक्षणी आपल्या मनात काय मिळवायचे आहे हे निश्चित होते तेव्हा आपण अल्पबुध्दी लोकांमध्ये जमा होतो असे भगवान म्हणत आहेत.

म्हणूनच जाणकार साधक भगवंताच्या अव्यक्‍त रुपाकडेच आकर्षित होतात. भगवान श्री आदीशंकराचार्य आपल्या ‘विवेकचुडामणी’ या ग्रंथामध्ये असे म्हणतात की ‘साधकाने आधी सर्व वेदांचा अभ्यास करुन त्यांच्यावर प्रभुत्व मिळवावे (इतके की वादविवादात कुणालाही आपण हार जाणार नाही) आणि मग एखाद्या ब्रह्मज्ञानी माणसाकडे जाऊन लोटांगण घालून परमार्थाबद्दल विचारावे.’ या जगातील सर्व ध्येयांची पूर्ण जाणीव झाल्यानंतर ध्येयांबद्दलची आस्थाच निघून गेली पाहिजे. भगवंताचे अनेक अवतार आहेत हे ऐकून सर्व अवतारांबद्दलचे ममत्व लोप व्हायला हवे आणि ज्या ठिकाणाहून या सर्व अवतारांचा उगम होतो त्या पवित्र स्थलाबद्दल प्रेम उत्पन्न व्हायला हवे. निर्गुण भगवंताची उपासना कोण करील? जो सगुण अवतारांमागील तत्व जाणून घेण्याचा प्रयत्‍न करील तोच. दररोजच्या जीवनात आपण एखादा सुसंस्कृत, गुणी मुलगा बघितला की त्याच्या पालकांबद्दल ममत्व ठेवतो त्याचप्रमाणे अवतारांबद्दल भक्‍ती निर्माण झाल्यावर ते जिथून आले त्या जागेचा विचार आपण करायला हवा. भगवंताचे सर्व अवतार चित्रपटगृहातील पडद्यावर उमटलेल्या चलतचित्रांसारखे आहेत. ती चित्रे पटावर उमटण्यासाठी ज्या प्रकाशझोताची आवश्यकता होती तिकडे आपण कधी लक्ष देणार?

आपले लक्ष अव्यक्‍त रुपाकडे जात नाही कारण त्या रुपाने आपल्यामध्ये बदल घडण्याची सुतराम शक्यता नसते. आपल्या दैनंदिन जीवनात बदल हवा आहे ही जाणीव जोपर्यंत आपल्या मनात जागृत आहे तोपर्यंत आपले सर्व उपाय सगुणातच होणार. स्वतःला आहे तसे स्वीकारायची जोपर्यंत आपली तयारी नाही तोपर्यंत कोण प्रकाशाची मागणी करणार? कारण त्या प्रकाशात जे दिसेल त्याचा स्वीकार करणे आपणास शक्य नाही. म्हणून आपले प्रयत्‍न असे असतात की आधी स्वतःला बदलून चांगले करु आणि मग अव्यक्‍ताच्या उजेडात निःसंकोच जाऊ! परंतु स्वतःला बदलण्यासाठी आधी आपण नक्की कसे आहोत हे कळणे अत्यावश्यक आहे आणि ते उजेडाशिवायच्या अंधूक प्रकाशात कसे दिसणार? म्हणून आपण बदलू शकत नाही आणि बदललेलो नसल्याने उजेडात जात नाही! जोपर्यंत हातात जे आहे त्याचा त्याग करायची आपली तयारी नाही तोपर्यंत या दुष्टचक्रातून सुटका नाही!!

जरा विचार करा आणि स्वसाधनेमागील सर्व कारणांचा त्याग करा. भगवंताची प्राप्ती हे ध्येयसुध्दा अल्पबुध्दीनेच निर्माण केलेले आहे कारण भगवंत म्हणजे काय याचा निर्णय कुणी घेतला? आपणच ना. अध्यात्म संपूर्णरीत्या वैयक्‍तिक आहे, त्याचा संबंध दुसऱ्या कुणाशी संबंध नाही हे आपल्या मनावर ठसवा. मग आपल्या पारमार्थिक साधना निर्हेतुक बनतील. एकदा आपली साधना निर्हेतूक झाली की अव्यक्‍त, निर्गुण, निराकार भगवंताबद्दलचे प्रेम आपल्या मनात जागृत होण्यास वेळ लागणार नाही. खरे म्हणजे आपल्यामध्ये हे प्रेम उपजतच आहे परंतु स्वतःच्या आशा-आकांक्षांच्या दडपणाखाली ते झाकले गेलेले आहे म्हणून आपण त्याचे प्राशन करु शकत नाही. एकदा हे ओझे दूर केले की ते उफाळून वर येते आणि मग साधकाला परम सुखाची अनुभूती येऊन त्याचे जीवन ‘सहज’ बनते. निव्वळ यामध्येच आपल्या अल्पबुध्दीपासून सुटका आहे. चला आणि या त्या दिव्य प्रेमाच्या प्रकाशझोतात.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे संकेतस्थळ

(बंगलोर, दिनांक ७ फेब्रुवारी २०१०)

One Response to श्लोक (२१-२४)/७: भगवंतांच्या इच्छेत स्वत्व हरवा!

  1. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

    मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: