श्लोक (३८-४०)/११: भगवंताचे कुठले रुप आपणास आवडते?

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम्‌ ।

वेत्ताऽसि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनंतरुप ॥ गीता ३८:११ ॥

वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशांकः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।

नमो नमस्तेऽतु सहस्त्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ गीता ३९:११ ॥

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत एव सर्व ।

अनंतवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ गीता ४०:११ ॥

भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आपले विश्वरुप दाखवितात असा प्रसंग आहे. खरे म्हणजे दहाव्या अध्यायात भगवंताला या जगात कसे बघायचे हे अर्जुनाला कळले. परंतु निव्वळ बौध्दीक ज्ञानाने समाधान होणाऱ्या अल्पसंतुष्टी साधकांसारखी अर्जुनाची वृत्ती नसल्याने त्याच्या मनात भगवंताच्या विराट रुपाचे अपरोक्ष ज्ञान व्हावे ही इच्छा निर्माण झाली. म्हणून त्याने अकराव्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांना विनंती केली की ‘आपले विश्वरुप मला प्रत्यक्ष बघण्याची इच्छा आहे. जर माझी हे रुप बघण्याची योग्यता असेल तर आपण मला दाखवावे आणि योग्यता नसेल तर मला योग्य करुन मग ते दाखवावे!’ (पहा श्लोक १ ते ४, अध्याय ११). खरोखर, अर्जुनासारखा जाणकार आणि सूज्ञ शिष्य अतिशय विरळा. असे म्हणण्याचे कारण असे की गीतेच्या सुरुवातीला अर्जुनाच्या मनात एक विशिष्ट प्रश्न होता त्याच्या पलीकडे जायची त्याची तयारी होती. म्हणजे कौरवांशी युध्द करणे योग्य आहे की नाही या आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळावे इतकीच अर्जुनाची दृष्टी संकुचित नाही. म्हणूनच तो भगवान श्रीकृष्णांशी तत्वज्ञानावर चर्चा करु शकतो. अर्जुन भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे ‘यातून माझे प्रश्न सुटतील का नाही’ अशा एकांगी नजरेने तो बघत नाही. भगवंतांच्या मुखातून निघालेले प्रत्येक शब्द तो सावधानतेने ऐकत आहे. इतके की आता त्याला आपल्या मूळ विवंचनेचा संपूर्णतः विसर पडलेला आहे असे दिसून येते! सद्‌गुरुंकडे भौतिक प्रश्न घेऊन जाणे चुकीचे नाही. कुठल्याही कारणाने तुम्ही सद्‌गुरुंकडे गेलात तरी ते उत्तमच आहे. परंतु, त्यांच्या प्रत्येक सल्ल्याकडे माझ्या मनातील प्रश्नांचे उत्तर मिळत आहे का नाही अशा झापड लावलेल्या नजरेने बघणे साधकाला घातक आहे! अर्जुनाला स्वतःसमोरच्या समस्यांचा इतका संपूर्ण विसर पडला की शेवटी भगवंतच त्याला अठराव्या अध्यायात विचारतात (श्लोक ७२, अध्याय १८) की तुझ्या मनातील युध्द करण्याच्या योग्यतेबद्दलचा संदेह गेला की नाही?! आपण स्वदुःखे घेऊन गुरुंकडे जातो आणि तीच दुःखे जवळ घेऊन (त्यांच्या उपायांसकट) परत घरी जातो. त्यामुळे गुरुंकडे जाण्याने आपल्यात तत्वतः काहीच फरक पडत नाही!! अर्जुनाने स्वतःमध्ये इतका आमुलाग्र बदल घडवून आणला की त्याच्या पुढील आयुष्यात परत त्याला श्रीकृष्णांना बोलावून ‘मी काय करु?’ असे विचारावे लागण्याचा प्रसंग उद्भवला नाही. आणि आपण क्षणोक्षणी आपल्या गुरुंवर अधिकाधिक अवलंबून रहायला लागतो. ‘गुरुंना विचारल्याशिवाय घरातील पानही हलत नाही’ अशा परावलंबी अवस्थेतच कृतज्ञता मानत गुरुभक्‍तीची पराकोटी पहात असतो! असो.

वरील श्लोकांमधून अर्जुन भगवान श्रीकृष्णांची स्तुती करत म्हणत आहे: ‘तुम्हीच या सर्व चराचराचे निर्माते आहात म्हणून सर्वांना तुम्ही वडीलधारे आहात. हे विश्व तुमच्यामध्येच सामाविष्ट होत आहे. जे काही जाणण्यासारखे आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि आम्हास जाणण्यास ‘तुम्ही’ ही एकच गोष्ट आहे. या सर्व विश्वात तुम्हीच भरलेले आहात (३८). वायु, यम, अग्नि, वरुण, चंद्र, ब्रह्मदेव आणि या सर्वांचा उत्पत्तीकर्ता हे सर्व तूच आहेस. तुला अनंत नमस्कार आणि परत हजारो नमस्कार आणि हे सर्व झाल्यावरसुध्दा तुला नमस्कारच नमस्कार!! (३९) तुला समोरुन, मागून आणि बाजूने नमस्कार! तुझ्या सर्व अंगांना नमस्कार!! अनंत शक्‍ती आणि उर्जा असणारा तू आहेस. तूच सर्व मिळवीत आहेस आणि म्हणून तूच सर्व काही आहेस (४०)’ श्रीकृष्णाचे खरे रुप स्वसंवेदनांनी कळल्यामुळे अर्जुनाची अवस्था किती भारावलेली होती हे या श्लोकांवरुन स्पष्ट कळत आहे.

डोळ्या समोरील वस्तूही । पडते नजरेस असे नाही ।

योग्य वेळ आल्यावरी । गूढ गोष्टीसुध्दा स्पष्ट होई ॥

जेव्हा अर्जुन अत्यंत काकुळतीने विश्वरुप दर्शनाची विनंती करु लागला तेव्हा भगवान श्रीकृष्णांना रहावले नाही. त्यांनी लगेच आपले गूढ रुप त्याला उघड करुन दाखविले. परंतु अर्जुनाला ते रुप दिसले नाही. हे पाहून भगवंतांनी त्याला दिव्य दृष्टी दिली, ज्यायोगे अर्जुन श्रीकृष्णांचे आत्मरुप बघू शकला (पहा श्लोक ५ ते ८, अध्याय ११). खरे म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांच्या सत्यरुपाचे वर्णन व्यासादिकांच्या मुखांतून वा भीष्म-विदुरादिकांच्या भक्‍तीतून कळलेले होतेच. परंतु अपरोक्ष ज्ञानाची मोहर त्या शाब्दीक माहितीला लावलेली नसल्याने तो ऐकलेल्या शब्दांचे खरे महत्व ओळखू शकला नव्हता. आता योग्य वेळ आलेली असल्याने त्याच्या मनातील अज्ञानाचा अंधकार जाऊन अपरोक्ष ज्ञानाची पहाट उगवली. म्हणून वरील श्लोकांवर विश्लेषण करीत असताना आपण हे कधी विसरु नये की हे श्लोक अर्जुन स्वतःहून म्हणत आहे. लक्षात घ्या की अर्जुन आता असे म्हणत नाही की तुम्ही (वा कुणी ऋषी-मुनींनी) सांगितल्याप्रमाणे तुम्ही आहात. त्याला आता स्पष्ट दिसत आहे की भगवान श्रीकृष्णच या जगाचे आदिपुरुष आहेत आणि त्यांनी हे सर्व विश्व व्यापलेले आहे आणि या जगातील यच्चयावत वस्तू त्यांच्याच मुखात प्रवेश करुन नष्ट होत आहे. या तीन श्लोकांमधील सर्व विशेषणे त्यानी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून उच्चारलेली आहेत ही एक फार महत्वाची घटना आहे असे वाटते. अर्जुनाची वैयक्‍तिक साधना इथेच परिपूर्ण झाली आहे असे दिसून येते. त्याने विश्वरुपदर्शनानंतर परत भगवंताचे चतुर्भुज रुपच पसंद केले हा त्याचा वैयक्‍तिक निर्णय त्याच्या पूर्वकर्मांवर आणि प्रारब्धावर अवलंबून आहे असे वाटते. त्यातून त्याच्या पारमार्थिक प्रगतीबद्दल साशंक होण्याचे अजिबात कारण नाही. असे बघा, सर्व प्रकारची चविष्ट खाद्यपदार्थे चाखल्यानंतर आपण स्वतःला पसंद असलेल्या मिष्टान्नावरच ताव मारतो तशी ही गोष्ट आहे. याचा अर्थ असा नव्हे की बाकी पदार्थांबद्दल आपणास ज्ञान नाही वा रुची नाही. त्याचप्रमाणे अकराव्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन परत भगवंताला द्वैतामध्ये आणतो यामधून त्याच्या पारमार्थिक ज्ञानाबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. तेव्हा वरील श्लोकांवरुन पहिला अर्थ असा ध्यानात येतो की अर्जुनाला परिपूर्ण अवस्था आता प्राप्त झाली आहे.

इथे काही साधक शंका घेतील की मग बाकीची गीता सांगायचे प्रयोजनच काय? याचे उत्तर असे आहे की आपण असे बघतो की जेव्हा संत स्वतःच्या ज्ञानाच्या जाणीवेत असतात तेव्हा त्यांना स्वतःबद्दल अत्यंत आत्मविश्वास असतो. परंतु जीवनातील प्रत्येक क्षणी आपणास स्वतःच्या ज्ञानाची जाणीव असतेच असे नाही. अशावेळी आपले ज्ञान लुप्त झालेले नसते तर त्यामध्ये रहाण्याच्या शक्‍तीचा ऱ्हास झालेला असतो. अशावेळी श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात की ‘पतित पतित पतित, मी त्रिवाचा पतित’ आणि श्री ज्ञानेश्वर म्हणतात ‘तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकीत’. त्याचप्रमाणे एकदा स्वतःवरील आत्मविश्वासाने अर्जुन भगवान श्रीकृष्णाना चतुर्भुज व्हा असे सांगतो खरे पण काही काळाने त्याच्या आत्मविश्वासाला तडा जाऊन तो मी घेतलेला निर्णय बरोबर आहे की नाही असे साशंकपणे विचारतो आणि त्याने बारावा अध्याय सुरु होतो. पुढे तेराव्या, चौदाव्या आणि पंधराव्या अध्यायात त्याच्या मनातील बाकीच्या शंकांचे निरसन केलेले आहे आणि सोळाव्या व सतराव्या अध्यायात आधीच्या अध्यायांतील स्पष्ट न केलेल्या गोष्टींवर विवेचन केलेले आहे. म्हणून माउली या अध्यायांना ‘गीतेची परिशिष्टे’ असे म्हणते. अठराव्या अध्यायात परत संपूर्ण गीता अर्जुनाला ऐकावी वाटते म्हणून भगवान सगळे महत्वाचे मुद्दे सांगतात. तेव्हा अकराव्या अध्यायानंतर अर्जुनाची अधिक पारमार्थिक प्रगती झाली आहे असे दिसून न येता काही कारणांनी स्पष्ट न केलेले मुद्दे विस्तृतरीत्या स्पष्ट करुन सांगितलेले आहेत असे वाटते. तेव्हा अर्जुनाच्या मुखातून निघालेल्या या तीन श्लोकांमधून अर्जुनाची साधकावस्था संपलेली दिसत आहे असे वाटते.

या निष्कर्षाला पुष्टी म्हणून अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे असा की जेव्हा आपण कुणाला चांगले म्हणतो तेव्हा ‘चांगला’ या शब्दाची एक व्याख्या आपल्या मनात असते आणि त्या व्याख्येतील अटींना उतरणारी व्यक्‍ती दिसली तरच आपण तीला ‘चांगली व्यक्‍ती’ असे विशेषण देतो. उदाहरणार्थ, कुणाला समाजोपयोगी व्यक्‍ती चांगली वाटते तर कुणाला स्वतःला योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्‍ती तर कुणाला समोर आलेल्या मानसन्मानाला नाकारणारी व्यक्‍ती. सांगायचा मुद्दा असा की जेव्हा आपण स्वतःहून एखादे विशेषण वापरतो तेव्हा त्या विशेषणाचे ज्ञान आपणास होते आणि त्यानुसार समोरील व्यक्‍ती दिसत असते. अर्जुनाने श्रीकृष्णाला ‘माझा सखा, कर्तबगार, राक्षसांचा नायनाट करणारा’ इत्यादी विशेषणे आधी वापरलेली आहेत परंतु या श्लोकांमधील विशेषणे एकदम वेगळ्याच पातळीवरील आहेत. त्याला आता कळून चुकले आहे की राक्षससुध्दा श्रीकृष्णानेच निर्माण केलेले आहेत आणि सज्जन लोकांचा मृत्यूही त्याच्या हातातून घडतो आहे. भगवंताचे सर्वव्यापी रुप तो वर्णन करीत आहे. स्वतःला या गोष्टीचे ज्ञान असल्याशिवाय तो असे कसे करु शकेल? श्रीकृष्णांच्या सत्यरुपाचे वर्णन करीत असताना तो व्यासादिक महर्षींच्या शब्दांची कुबडी वापरीत नाही तर मला हे अमुक अमुक दिसत आहे असे ठामपणे सांगत आहे. म्हणून त्याच्या या शब्दांमागे एक वेगळी ताकद आहे आणि श्रीकृष्णांच्या मनाचे इथे संपूर्ण समाधान झालेले दिसत आहे. त्यामुळेच अर्जुनाने विनंती केल्याप्रमाणे भगवान आपले चतुर्भूज रुप परत धारण करण्यास विलंब लावीत नाहीत. एकदा आईला कळले की मुलाची चॉकलेटबद्दलची तीव्र लालसा निघून गेली आहे की ती घरी चॉकलेट आणून ठेवायला कचरत नाही तशी ही गोष्ट आहे.

आता जरा विचार करा की आपण भगवंताचे कसे वर्णन करतो?!! दुसऱ्यांच्या वर्णनाचा आधार न घेता, स्वतःच्या अपरोक्ष ज्ञानाने जेव्हा भगवंत सर्वव्यापी आहे असे ठामपणे सांगता तेव्हा तुमच्या साधनेचा अंत झाला आहे असे समजण्यास हरकत नाही. मग त्यानंतर भले तुम्ही भगवंताच्या एखाद्या अवताराबद्दल ममत्व दाखवा. स्वतःच्या मनातील भगवंताचे रुप काय आहे हे बघण्यातच आपल्या साधनेची आत्तापर्यंतची प्रगती दिसून येते. म्हणूनच ज्ञानी माणसामध्ये सहिष्णुता, अहिंसा, क्षमा या गुणांचा ‘आपोआप’ उदय होतो. हे गुण जाणून-बुजून वाढविण्यामध्ये आपली प्रगती नसते तर कितीही प्रयत्‍न केला तरी हे गुण जातच नाहीत अशा अवस्थेत खरी प्रगती असते. आपण आशा करुया की अर्जुनाप्रमाणेच आपणही कधीतरी भगवंताचे वर्णन वरील तीन श्लोकांप्रमाणे करु. सद्‌गुरु आपल्या साथीला आहेत, तेव्हा हे अशक्य असूच शकणार नाही!!

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे संकेतस्थळ

(बंगलोर, दिनांक १४ फेब्रुवारी २०१०)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: