श्लोक (७ ते ९)/४: अधर्मापासून वाचविणारे भगवान

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ गीता श्लोक ७:४ ॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ गीता श्लोक ८:४ ॥

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः ।

त्यक्त्वा देहं पुनर्जन्मं नैति मामेति सोऽर्जुन ॥ गीता श्लोक ९:४ ॥

आज निरुपणाला घेतलेले श्रीमद्भगवद्गीतेच्या तीन श्लोकांतील पहिले दोन श्लोक सर्वज्ञात आहेत. एवढेच नव्हे, तर हे श्लोक बहुतांशी साधकांच्या श्रध्देचा पाया आहेत असे दिसून येते. या श्लोकांतून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अशी ग्वाही देत आहेत की: ‘जेव्हा जेव्हा धर्माचा लोप व्हायला सुरुवात होते (आणि अधर्माची वृध्दी होते) तेव्हा हे अर्जुना, त्या अधर्माचा विनाश करण्यासाठी मी जन्म घेतो (श्लोक ७). साधूपुरुषांचे संरक्षण आणि दुष्टांचे निर्दलन करुन (ऱ्हास होणाऱ्या) धर्माचे पुनर्स्थापन करण्यास मी युगानयुगे प्रगट होत आहे (श्लोक ८). परंतु असे माझे होणारे जन्म दिव्य असून त्रिगुणात्मक प्रकृतीजन्य नाहीत असे जे ज्ञानदृष्टीने ओळखतो त्याच्या देहाचे पतन झाल्यानंतर पुनर्जन्म होत नाही तर तो माझ्यातच सामाविष्ट होतो (हे लक्षात ठेव) अर्जुना! (श्लोक ९).’

परंतु जेव्हा वरील श्लोक उध्दृत होतात तेव्हा या त्रिकुटीतील नवव्या श्लोकाकडे कुणी लक्ष दिले आहे असे फारसे दिसून येत नाही. आपणा सर्वांना ‘यदा यदा हि …’ आणि ‘परित्राणाय साधूनां …’ हे श्लोक पाठ आहेत पण भगवंतांनी स्वतःच्या अनंत जन्मांबाबत पुढे जे स्पष्टीकरण दिलेले आहे त्याची आठवणही नसल्याने पाठ असलेल्या श्लोकांतील शब्दांचे खरे महत्व कळणे अशक्य होते. म्हणूनच भगवंतांचे श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी अवतारच वरील श्लोकांमध्ये उल्लेखित आहेत असे आपण गृहीत धरतो. आणि त्या भाबड्या समजुतीवरच आपली परमार्थाबद्दलची आशा केंद्रित असते. आपणास अशी खात्री असते की योग्य वेळ आली की आपला उध्दार करण्यासाठी भगवान येतील आणि आपले कोटकल्याण होईल. या विश्वासाला दृढ करण्याचे एक कारण म्हणजे भविष्यात भगवान आपल्याला वाचविणार आहेत हा सिध्दांत कधीही चूक ठरु शकणारा नसतो कारण भविष्यात काय होणार आहे हे कुणाला माहिती आहे? ज्या सिध्दांताला चूक ठरवू शकेल असे एकही प्रमाण नाही तो सिध्दांत स्वतःचे पाय अजून पसरवित आपले जीवन बळकावून टाकतो हे लक्षात घ्या! याच्या बळावर साधक आपल्या भगवंतभक्‍तीला अविश्वासाच्या वादळापासून वाचवितात आणि कूपमंडूकासारखे स्वतःला संकुचित वातावरणात सुरक्षित ठेवतात. यामध्ये विहीरीबाहेरील सुंदर जगाकडे दुर्लक्ष होत आहे याची जाणीवही लोकांना नसते.

आपल्या या कधीही न बदलू शकणाऱ्या विश्वासाचा अजून एक दुष्परिणाम म्हणजे यामुळे ‘धर्म’ (आणि म्हणून ‘अधर्म’) या शब्दाची आपली व्याख्याच बदलते. असे बघा, जर आपणावाचून दुसरी व्यक्‍ती (मग भले ती ईश्वराचा अवतार असो) आपल्या धर्माचे संरक्षण करणार असे मान्य केले की धर्म द्वैतामध्ये अडकला जातो. याचे कारण असे की केवळ आपल्या बाह्यक्रियांनाच दुसरी व्यक्‍ती सावरु शकते, अंतर्मनातील घडामोडींना नाही. उदाहरणार्थ, मी अभ्यास केला की नाही हे माझे पालक बघू शकतात पण अभ्यासाबाबतची माझ्या मनात जर घृणा असून मी अभ्यास करीत असेन तर ते ही परिस्थिती पाहूसुध्दा शकत नाहीत, मग ती बदलणे तर दूरच राहीले. जो मनुष्य भगवंत येऊन आपले संरक्षण करणार असे मानतो तो कधीही आत्मरुपी देवाकडे बघू शकणार नाही! आत्मरुपी देव निव्वळ अंतर्गत घडामोडींकडे लक्ष देतो आणि श्रीराम-श्रीकृष्णादिक अवतार आपणास त्रास देणाऱ्या दुष्ट जनांचा नाश करतात, आतील प्रवृत्तींचा नाही. तेव्हा भगवंताच्या बाह्य अवतारांकडेच लक्ष दिल्यास आपल्या धर्मच बाह्य उपचारांनी बध्द होतो हे लक्षात घेणे जरुरी आहे. आज ‘अवतार’ आणि त्याला जोडून असणारे ‘धर्म’ व ‘अधर्म’ या शब्दांकडे लक्ष द्यावेसे वाटत आहे. आयुष्यभर डोळ्यांसमोर असलेल्या या शब्दांतून भगवंतांना काय सांगायचे असेल यावर आपण या दोन श्लोकांना जोडून असलेल्या नवव्या श्लोकाच्या आधारावर विचार करु. भगवंतांना नववा श्लोक अर्जुनाला सांगावेसे वाटले कारण त्यांना साधकांचे अवतारांवरचे (वा एखाद्या श्रेष्ठ व्यक्‍तीवरचे) परावलंबी जीवन नको होते तर स्वज्ञानाने मिळविलेले स्वातंत्र्य भक्‍तांनी उपभोगावे अशी कळकळीची सद्‍भावना त्यांच्या परम दयाळू मनात होती.

संकुचित व्यक्‍तिमत्व धरणे प्रमाण । आहे अधर्माचे मूळ कारण ।

सोडूनि अहंकाराचे भान । होते धर्माचे पुनर्स्थापन ।

अंतर्स्फूर्तीचे जे ठीकाण । तेच अवतारांचे जन्मस्थान ॥

आयुष्यात आपण एकतरी पूर्णपणे नवीन गोष्ट शिकली आहे का? आपल्या आयुष्यातील सर्व नवीन घटना जुन्या गोष्टींचे पुनरुज्जीवन असल्यासारखे आहे. आपणास काहीही माहिती नाही अशी गोष्ट समोर आली तर आपण तीला ओळखणार कसे? लहान मुलाला सर्वच गोष्टी ‘आ, आ’ सारख्या दिसतात, कानावर एक ध्वनी सतत पडून त्याचा कुठे उपयोग करायचा हे ज्ञात झाले की तो ‘काऊ, चिऊ’ बोलायला लागतो. पण अशावेळी गोल्डन ओरीयोल सारखा अतिशय सुंदर पक्षी दिसला तरी तो काऊ वा चिऊच होतो! आपल्याला जे माहिती आहे त्याच्यातर्फे जोपर्यंत आपण एखादी घटना वा वस्तू समजून घेत नाही तोपर्यंत आपणास कळले असे आपण मानत नाही. पण मग गोष्टींमध्ये नावीन्य कसे येणार? लक्षात घ्या की आपला ‘ज्ञान होणे’ या शब्दांचा अर्थच असा आहे की समोर आलेल्या गोष्टींना भूतकाळातील ज्ञानाच्या कसोटीवर उतरविणे. खऱ्या अर्थाने नावीन्याला सामोरे जाण्याची तयारी आपल्यात उरलेली नाही. लहानपणी शब्दांचा अर्थ माहिती होण्याआधी त्यांचा जो अर्थ आपले शिक्षक सांगतील त्यावर विश्वास ठेवायची आपली तयारी स्वतःच्या मोठेपणाच्या नादात आपण केव्हा हरविली हे आपल्याला कळलेच नाही. जन्माला आल्यावर उपजत नवीन गोष्टी शिकण्याचा आपला स्वभाव आता सर्व गोष्टींना मनासारखे वळण लावण्याचा झाला आहे. उपजत्या क्षणी आपोआप निर्माण झालेला आपला धर्म म्हणजे समोर आलेल्या गोष्टींना कुठल्याही बंधनांशिवाय समजून घेणे होय. ही आपली नैसर्गिक स्थिती आहे आणि म्हणूनच या स्थितीमध्ये आपणास शांति आहे, समाधान आहे किंवा वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर भगवंताचे अनुसंधान आहे. परंतु आता आपण स्वतःचे व्यक्‍तिमत्व जपत जगाला सामोरे जातो. हा आपला अधर्म आहे. जेव्हा आपण स्वतःच्या व्यक्‍तिमत्वाचे ओझे बाळगून संसारात राहतो तेव्हा आपला धर्म विसरलेलो असतो. आपल्या अशा वर्तनामुळे आपल्या मनावर एक ओझे सतत असते. याचे एक छोटेशे उदाहरण म्हणजे आयुष्य सुरळीत चाललेले असतानाही आपल्या मनातील भविष्याबद्दलची चिंता. निव्वळ आपल्या व्यक्‍तिमत्वावर आधारीत असलेली ही काळजी आपल्या अधर्मी वागण्याचेच दर्शन देते.

शाळकरी मुलगा पालकांच्या सांगण्याप्रमाणे आपली सवयीची शाळा सोडून नवीन ठीकाणी शिक्षण सुरु करायला तयार असतो. जेव्हा आपली भगवंताच्या इच्छेप्रमाणे नवीन जीवन जगण्याची तयारी त्या मुलाप्रमाणे होते तेव्हा आपण स्वधर्माचे पालन करीत असतो. आपल्या या धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि भूतकाळातील प्रगतीमध्येच जीवनाचे सर्वस्व मानून ती निरंतर टीकविण्याच्या प्रयासरुपी अधर्माचा विनाश करण्यासाठी भगवंत सतत आपल्या जीवनात आणिबाणीचे प्रसंग निर्माण करतो. मनात अचानक प्रचंड खळबळ माजणे हे आपल्या जीवनात भगवंताच्या नवीन अवताराचा जन्म झाल्याचे लक्षण आहे असे समजायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही, कारण एकदा आणिबाणीचा प्रसंग निर्माण झाला की आत्तापर्यंतच्या जीवनाचा कंटाळा येऊन काहीतरी नवीन करण्याची उमेद मनात निर्माण होते. आणि पूर्वकाळातील संकुचित जीवन सोडण्याची तयारी मनात निर्माण होणे याहून अधिक भगवंतकृपेचे दृश्य रुप असू शकेल काय?

ज्या स्थानातून आपल्या मनात जीवनाकडे बघायची अचानक नवीन नजर प्राप्त होते ते स्थान त्रिगुणी प्रकृतीच्या बंधनात अडकलेले नसते कारण त्या स्थानाला ना रंग आहे ना रुप आहे ना गंध. अंतर्स्फूर्ती हा प्रकार भगवंताच्या अस्तित्वाशिवाय अशक्य आहे. जुन्या गोष्टींमध्येच नवीन घटनांना मोडीत घालून धन्यता मानणाऱ्या आपल्या कोत्या वृत्तीतून अंतर्स्फूर्ती येणे असंभव आहे. म्हणूनच भगवान नवव्या श्लोकात असे म्हाणत आहेत की जो माझे कर्म आणि माझा जन्म या प्रकृतीपलिकडील आहे असे स्वानुभवाने जाणतो तो जन्ममरण्याच्या फेऱ्यांतून मुक्‍त होतो. या नवव्या श्लोकाने आधीच्या दोन श्लोकांना संपूर्णपणे वेगळे रुप दिले आहे असे वाटते. जर भगवंतांना आपल्या भौतिक अवतारांबद्दलच बोलायचे असते तर नंतर माझा जन्म आणि माझे कर्म भौतिक दुनियेच्या नियमांबाहेर आहे असे जाणणाऱ्या ज्ञानी माणसाबद्दल कौतुकोद्गार काढले नसते.

एकदा भगवंताचा जन्म म्हणजे आपल्याच मनात अचानक जाणविलेली अंतर्स्फूर्ती आहे हे कळल्यावर धर्म म्हणजे काय आणि अधर्म कशात आहे या मूलभूत प्रश्नांचे उत्तरही निःसंदेहरीत्या मिळते. स्वतःच्या मनात स्फुरण पावलेल्या भावनांचे आदरयुक्‍त पालन करण्यापलिकडे दुसरा धर्म असू शकेल काय? जेव्हा काहीच भावना स्फुरत नाहीत तेव्हा आपण कोऱ्या पाटीसारखे घटनांना सामोरे जायला शिकले पाहिजे. स्वजीवनात असे वागणे म्हणजे भगवंताचा हात धरुन जीवन जगण्यासारखे आहे. एकदा अशा वर्तनाची गोडी लागली की परमार्थाचे ध्येय फार दूर नाही. आणि पुनर्जन्म तर निश्चित नाही!!

॥ हरि ॐ ॥

प्रवचनाचे संकेतस्थल

(बंगलोर, दिनांक २१ फेब्रुवारी २०१०)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: