श्लोक ८/११: अर्जुनाची दिव्यदृष्टी

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।

दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्‌ ॥ गीता ८:११ ॥

सतत डोळे उघडून जगाकडे बघायची तयारी कोणात आहे? ज्याप्रमाणे सकाळचा उत्साह मध्यान्ही संपल्यावर आपण कधी एकदा रात्र होते आणि विश्रांती घेतो अशा विचारात बाकीचा दिवस घालवितो त्याचप्रमाणे सत्य परिस्थिती बघण्याचा सुरुवातीचा उत्साह आपण फार लवकर गमावतो. मूळ म्हणजे सत्य जाणून घेतल्याने आपले आयुष्य अधिक सुंदर, परिपूर्ण होईल या अपेक्षेने आपण सत्याच्या शोधात असतो. जेव्हा सत्याचा उषःकाल आपल्या जीवनात होतो तेव्हा सुंदरतेचे कमळ फुलतेच पण त्याचबरोबर आत्तापर्यंत (आपणच) जमा केलेला कचऱ्याचा ढीगही दृष्टीपत्त्यास येतो. त्यामुळे सत्याच्या प्रकाशात जीवनातील सौंदर्य दिसायच्याऐवजी त्यातील नैसर्गिक भयानकता दिसायला लागते. अशावेळी जे आहे ते स्वीकारायची तयारी नसेल तर आपण स्वतःचे डोळे बंद करुन आपल्या अज्ञानातील सुखांच्या स्वप्नात रममाण व्हायला लागतो. सत्याकडे दुर्लक्ष करावयास सुरु करतो. स्वामी विवेकानंद जेव्हा पहिल्यांदा श्री रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेले तेव्हा श्री रामकृष्णांनी त्यांच्यातील दिव्यत्व बघितल्याक्षणी ओळखले. नरेंद्रनाथांबरोबर आलेल्या मित्रांना काही कारण काढून त्यांनी खोलीबाहेर पाठविले आणि स्वामींना मिठी मारुन त्यांच्या मस्तकावर हात ठेवून स्वतःच्या खऱ्या रुपाची जाणीव द्यायचा प्रयत्‍न त्यांनी केला तेव्हा स्वामी विवेकानंदांना आपले भान हरपत आहे असा भास झाला आणि ते ओरडून म्हणाले ‘काय करत आहात? माझे नाव नरेंद्रनाथ आहे आणि घरी माझे पालक माझी वाट बघत आहेत.’

आपले संकुचित अस्तित्व सोडायची जोपर्यंत आपली पूर्ण तयारी होत नाही तोपर्यंत आपणसुध्दा स्वामींसारखेच भगवंताच्या नावाने ‘मला का त्रास देतोस?’ असे ओरडत असतो. खरे म्हणजे स्वामी आपणहून रामकृष्णांना भेटायला गेलेले होते, आणि त्यांच्या मनात भगवंताला भेटायची अतिशय प्रामाणिक तळमळ होती. पण तरीसुध्दा जेव्हा आपले आत्तापर्यंतचे व्यतीत केलेले आयुष्य संपूर्णपणे सोडायची वेळ आली तेव्हा त्यांची तयारी नव्हती. स्वामी विवेकानंदांसारख्या अवतारी पुरुषाची अशी अवस्था असेल तर आपल्यासारख्यांचे काय होईल? भगवद्गीतेमध्ये महर्षी श्री व्यासमुनींनी अर्जुनाला वारंवार व्यवहारी साधकाचे रुपक म्हणून वापरले आहे. त्यामुळे वरील प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर अर्जुनाची अवस्था काय झाली हे आपण बघावे. आपणास असे दिसून येइल की अर्जुनाला भगवंतांच्या कृपेची जाणीवसुध्दा झालेली नाही!! त्याने अत्यंत तळमळीने केलेल्या विश्वरुपदर्शनाच्या मागणीची तात्काळ पूर्तता केल्यावर अर्जुनाकडे बघितल्यावर भगवान श्रीकृष्णांना काय दिसले? माउलींच्या अद्वितीय शब्दांत सांगायचे म्हणजे

एथ कां पां हा उगला । म्हणोनि श्रीकृष्णें जंव पाहिला ।

तंव आर्तीचे लेणें लेइला । तैसाचि आहे ॥ १५३:११॥

मग म्हणे उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे ।

परी दाविले तें फुडें । नाकळेचि यया ॥ १५४:११॥

हे बोलोनि देव हांसिले । हांसोनि देखणिया म्हणितलें ।

आम्ही विश्वरुप तरी दाविले । परी देखसीच ना तूं ॥ १५५:११ ॥

अर्जुनाने आपल्या ‘आर्तीचे लेणे (दागिने)’ अजून काढलेले नव्हते आणि त्याच्या भरुन आलेल्या उत्कंठेला ओहोटी लागली नव्हती! काय सुंदररीत्या माउलींनी असे सूचित केले आहे की अर्जुनाची तळमळ त्यानेच आपणहून आपल्या अंगावर चढविलेली होती आणि एवढेच नव्हे तर त्या तळमळीने अर्जुनाला एक वेगळेच, अधिक रम्य असे रुप प्राप्त झाले आहे!! माउलींच्या शब्दसामर्थ्याची शक्‍ती खरोखर अफाट आहे. असो. अर्जुनाची सत्यस्थिती बघण्याची अक्षमता बघून भगवंतांना त्याची दया आली. परमदयाळु भगवान आपल्या भक्‍ताचे सर्व वैगुण्य पूर्ण करीत असल्याने त्यांनी अर्जुनाला जीवनाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी दिली. आज प्रवचनाला घेतलेल्या श्लोकातून भगवान अर्जुनाला अशी जाणिव करुन देत आहेत की ‘तू आपल्या डोळ्यांनी माझ्या या विश्वरुपाला बघू शकणे अशक्य आहे. आता मी तुला असे दिव्यचक्षु देतो की ज्यांच्यायोगे तू माझ्या विश्वरुपाचे पूर्ण ऐश्वर्य बघण्यास पात्र होशील (गीता ८:११)’ आज आपण भगवंतांच्या या दातृत्वाबद्दल विचार करु.

गुरुकृपेचे होता दान । लाभते स्वस्वरुपाचे अनुसंधान ।

ललाटी असतेच हे ज्ञान । सद्‌गुरु आणतात लवकर भान ॥

जी गोष्ट आपल्या कुवतीबाहेरची आहे ती आपणास कशी प्राप्त होइल? तुम्ही म्हणाल की एखाद्या समर्थ माणसाचे सहाय्य घेऊन आपण ती गोष्ट मिळवू शकतो. पण अशी समर्थ व्यक्‍ती आपल्याला वश करुन घेता येत असली तर आपणांत ती वस्तू मिळविण्याची कुवत आहेच की. वस्तू वा ज्ञान आपणाजवळ येणे महत्वाचे आहे, मग आपण स्वतःच्या सामर्थ्याने मिळविलेली असो वा दुसऱ्या कुणाचा आधार घेऊन मिळविलेली असो. उदाहरणार्थ, आमराईत गेल्यावर झाडावर चढायची कुवत नसली तरी माळ्याशी दोस्ती कशी करायची हे ठाऊक असले तर तो स्वतः झाडावरुन रसाळ पिकलेले आंबे काढून देतो आणि यातून आपली आंबे हस्तगत करण्याची शक्‍तीच प्रगट होत असते! किंवा गणित विषय समजाऊन घ्यायचा आहे ही इच्छा आपण स्वतः पुस्तकावरुन अभ्यास करुन वा एखाद्या नावाजलेल्या शिक्षकाकडे जाउन पूर्ण करु शकतो. पण या दोन्ही क्रियांतून आपलीच विषय समजून घेण्याची कुवत सिध्द होते. एखादी गोष्ट आपणास मिळाली यातूनच निर्विवादपणे आपली ती वस्तू मिळविण्याची शक्‍ती निर्विवादपणे सिध्द होते. त्यामध्ये शंकेला कारण नाही. मग परमार्थामध्येच माझी कुवत नसताना सद्‌गुरुकृपेने आपणास ज्ञान प्राप्त झाले असे आपण निःसंदेहरीत्या का म्हणतो?!

जरा वरील उदाहरणाकडे नीट बघितल्यास आपणास आपल्या मनातील या श्रध्देचे कारण स्पष्ट होईल. पुस्तके वाचून जो स्वतः शिकतो त्याच्यापेक्षा लवकर प्रगती शिक्षकाकडून शिकण्याने होते. कारण पुस्तकामधील दोन ओळींमधील गर्भितार्थ शिक्षकाकडून ऐकल्यावर आपण पटापट मुद्दे समजू शकतो. तेव्हा आपल्यामध्ये एखादी गोष्ट मिळविण्याची कुवत जन्मजात असली तरी ती गोष्ट योग्य वेळेवर मिळविणे आपणास शक्य असतेच असे नाही. आपली सद्‌गुरुंबद्दलची कृतज्ञता ज्ञान प्राप्त झाले म्हणून नसते तर ती योग्यवेळी अज्ञानाचा अंधःकार निघून गेला याबद्दल असते. उदाहरणार्थ, अर्जुनाच्या मनातील स्वजनांचा मोह नष्ट होणारच होता कारण तो सशाच्या शिंगांसारखा काल्पनिक होता. भगवंतांच्या उपदेशामुळे तो युध्द सुरु होण्याआधीच समूळ नष्ट झाला आणि तो आपले कार्य योग्य रीतीने योग्य वेळी पूर्ण करु शकला.

सद्‌गुरुंनी सांगितलेली साधना प्रामाणिकपणे करुन आपण जीवनात काही अशक्य गोष्टी मिळवू असे आपण मनू नये. आपल्यामध्ये जन्मजात सर्व गुण आहेत यावर विश्वास ठेवा. गुरुंवरील श्रध्दा स्वतःच्या कमकुवतपणावर आधारित नसावी तर त्यांच्यामुळे आपल्यातील सुप्त असलेल्या गुणांना बाहेर येण्याची शक्‍ती मिळाली अशा सकारात्मक भावनेतून उद्भवलेली असावी. भगवंताचे दर्शन हवे असेल तर स्वतःवर विश्वास असणे जरुरी आहे यात संदेह नाही.

भगवंतांनी अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली म्हणजे काय केले असेल? त्याच्यामध्ये जगाकडे जसे आहे तसे बघायची जी नजर होती तीला जागृत केले. प्रत्येकामध्ये यच्चयावत गुण आणि दुर्गुण भरलेले असल्याने आपण कुणालाही एका साच्यात बध्द करु शकत नाही. परंतु व्यक्‍तींना साच्यात घालून जगायची सवय झालेली असल्याने दुसऱ्याच्या समाजमान्य साच्याला उध्वस्त केल्यावर जी एक अपराधीपणाची भावना अर्जुनाच्या मनात निर्माण झाली होती तीला महत्व न देण्याचे सामर्थ्य भगवंतांनी अर्जुनाला दिले असे आपण म्हणू शकतो. एकदा डोळ्यांवरील मोहाची झापडे नष्ट झाली की प्रत्येकाचे खरे स्वरुप दिसायला सुरुवात होते. ज्या माणसांना आपण निर्दयी म्हणत होतो त्यांच्या ह्रुदयातील ममत्व दिसू लागते आणि प्रेमळ माणसांच्या मनातील स्वार्थ स्पष्ट होतो. दररोजच्या जीवनातसुध्दा अनेकदा आपणास असे सूक्ष्म ज्ञान होत असते पण ते सहन करण्यास तयार नसल्याने आपण त्या ज्ञानापासून दूर पळून जातो. भगवंतांच्या निकट सान्निध्याने अर्जुनाच्या मनातील पळपुटेपणा निघून गेला आणि त्याला या जगामधील सर्व गोष्टींमधील भगवंताचा अंश स्पष्ट दिसू लागला. जोपर्यंत आपल्या मनाचा कमकुवतपणा समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत आपणास भगवंताच्या जवळीकीची कुबडी वापरुनच सत्यपरिस्थितीचे दर्शन होणार यात शंका नाही. कारण काही विचित्र गोष्ट बघितली तर जे दिसले ते भगवंताच्या इच्छेने दिसले असे म्हणून आपण जबाबदारीतून मुक्‍त होतो. जेव्हा जे दिसेल ते तसेच आहे असे शांतपणे स्वीकारायची तयारी होते तेव्हा भगवंत आपल्या आत्मरुपात स्थिर झाला आहे असे समजावे. अर्जुनाची ही स्थिती नसल्याने भगवंतांनी त्याला ‘मी तुला दिव्यदृष्टी दिली आहे’ या शब्दांचे बळ दिले आणि त्याक्षणी त्याच्या नजरेस दिव्य फाटा फुटला आणि जगाकडे तो नव्या नजरेने बघू लागला. आपल्यासमोर भगवंत नाहीत मग आपणास ते भाग्य कुठले असा विचार न करीता आपण आपल्यात दडलेली दिव्यदृष्टी शोधायचा प्रयत्‍न केला पाहिजे. कुठलीही शक्‍ती आपल्या क्षमतेबाहेर आपणास काहीही देऊ शकत नाही या सिध्दांतावर विश्वास ठेवून आपल्यातील सुप्त क्षमतेला बाहेर येण्यास आपणच मदत केली पाहिजे. भगवंतांच्या दिव्यदृष्टीच्या दानातून हे स्पष्ट होत आहे.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे स्थान

(बंगलोर, दिनांक २८ फेब्रुवारी २०१०)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: