ओवी (३७१ ते ३७५)/२: समजलेल्या अर्थापलिकडे सत्य आहे!

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

ऐसें कृष्णवाक्य ऐकिले । तेथ अर्जुनें मनीं म्हणितले ।

आतां आमुचिया काजां आले । उपपत्ती इया ॥ ३७१:२ ॥

जे कर्मजात आघवे । एथ निराकारिले देवे ।

तरी पारुषले म्यां जुंझावे । म्हणूनियां ॥ ३७२:२ ॥

ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धर उवायिला ।

आता प्रश्न करील भला । आशंकोनि ॥ ३७३:२ ॥

तो प्रसंग असे नागर । जो सकळ धर्मांसि आगर ।

कीं विवेकामृत सागर । प्रांतहीन ॥ ३७४:२ ॥

जो आपण सर्वज्ञनाथ । निरुपिता होईल श्रीअनंत ।

ज्ञानदेव सांगेल मात । निवृत्तिदास ॥ ३७५:२ ॥

साधक आणि सिध्द यांच्यामधील संवादामार्फत तत्वज्ञान सांगायची पध्दत पुरातन आहे. या गोष्टीचे एक उदाहरण म्हणजे कथोपनिषदामध्ये यम आणि नचिकेत यांचा संवाद होय. अशा संवादांमधील साधक बहुजनांच्या मनातील शंका मांडतो आणि त्याला मिळालेल्या उत्तरांद्वारे आपणा सर्वांना अमूर्त तत्वज्ञानाला स्वतःच्या जीवनात मूर्तरुप देण्याचा मार्ग सापडतो. मूळ तत्वज्ञान इतके गहन आणि नित्यनूतन आहे की संपूर्ण ज्ञानी मानवसुध्दा त्याचे एखादे अंगच स्वजीवनात आणू शकतो. म्हणूनच सर्वसंतांना एकाच सत्याची जाणीव झालेली असली तरी त्यांचे उपदेश त्यांनी अंगीकारीलेल्या पैलूनुसार भिन्न असतात. म्हणून कुणी संत भक्‍तीला प्राधान्य देतो तर कुणी योगसाधनेला. अनंत पैलू असलेल्या हिऱ्यावर ज्या दिशेने प्रकाश पडेल त्याप्रमाणे कवडसा उमटतो तसेच ज्या संतांचा जो स्वभाव असेल त्याप्रमाणे त्यांच्यामार्फत सत्याचा प्रकाश प्रज्वलित होतो. सांगणाऱ्याचा स्वभाव आणि त्याचे शब्दसामर्थ्य या दोन माध्यमांमधून सत्य बाहेर येत असल्याने त्यांच्या नैसर्गिक मर्यादेने एकाच अविभाज्य सत्याची अनेक वेगवेगळी रुपे भासतात. यामधील कुठल्याही एका रुपात सत्य नसते पण ती सर्व रुपे सत्यावरच आधारित असतात. भक्‍ति वा योग वा कर्मयोग इत्यादी एका रुपाचे ज्ञान होणे म्हणजे अंतिम सत्याचे दर्शन होणे नव्हे. एकाच सत्याच्या या विभिन्न रुपांमधील एकता (जी शब्दांत मांडणे अशक्य आहे) दिसायला लागली की आपली प्रगती झाली असे आपण समजावे. म्हणूनच सनातन धर्मामध्ये स्वसंवेदनांनी अपरोक्ष ज्ञान होणे या स्थितीलाच अत्युच्च पदवी दिलेली आहे. बौध्दीक ज्ञानाला नाही. असो.

भगवद्गीतेमध्येही श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून साधकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत. कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला स्वतःच्या वर्तमानकाळातील योग्य वागण्याने ‘हा गुरु आहे, हा बंधू आहे, हा सखा आहे’ इत्यादी भूतकाळावर आधारीत असलेल्या प्रतिमा नष्ट होणार या सत्याचे दर्शन झाले आणि त्याच्या मनात या सत्यावर विश्वास बसण्याऐवजी स्वतःच्या योग्य वागण्याबद्दलच संदेह उत्पन्न झाला. ज्याप्रमाणे क्षीरसागर घुसळून काढल्यावरच देवांना अमृत प्राप्त झाले, त्याचप्रमाणे स्वतःच्या जीवनात नवीन ज्ञान होण्यास आयुष्याची सद्यपरिस्थिती ढवळून निघणे अत्यावश्यक असते. ही वस्तुस्थिती दाखविण्यासाठी श्रीमद्‌भगवद्गीतेची सुरुवात अर्जुनविषादाने होते. अर्जुनाच्या जीवनातील अशा आणिबाणीच्या क्षणी भगवान श्रीकृष्ण त्याला भूतकाळातील घटनांवर उभारलेल्या नात्यांना प्राधान्य न देता वर्तमानकाळातील योग्य वर्तनाकडे लक्ष दे असा अमृतरुपी सल्ला देतात. आपला हा सल्ला स्पष्ट करताना ‘सर्व कामना सोडून आणि स्वतःच्या अहंकाराचा संपूर्ण त्याग करुन जो संपूर्णरीत्या निस्पृह असतो त्यालाच परमशांति प्राप्त होते (गीता श्लोक ७१:२)’ असे शब्द भगवान उच्चारतात.

असे बघा, कानी पडलेल्या शब्दांचा कसा अर्थ लावायचा हे प्रत्येकाच्या हातात असते. त्यामुळे ‘मनापासून काम करायचे, नाही तर ते करण्यात काय अर्थ?’ अशी (आपल्यासारखीच!) विचारसरणी असलेल्या अर्जुनाने ‘मनात इच्छा न ठेवणे’ या शब्दांचा अर्थ हातून काम न घडणे असा लावला. त्यामुळे त्याच्या मनात काम न करण्याने शांति मिळत असेल तर मला युध्दाच्या कर्मात का लोटता? असा संदेह निर्माण झाला. गीतेच्या तृतीय अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या या संदेहानेच होते. आज प्रवचनाला घेतलेल्या ओव्यांतून गुरुवाक्य ऐकून मनात संदेह निर्माण झालेल्या अर्जुनाची स्थिती माउलींनी वर्णन केलेली आहे. ओव्यांचा अर्थ असा आहे: ‘सत्यस्थितीहून कधीही न ढळणाऱ्या भगवंतांचे (‘श्रीअच्युतांचे’) असे बोलणे ऐकून अर्जुनाला वाटले की या शब्दांचा उपयोग ‘युध्द करण्यात अर्थ नाही’ असे सिध्द करण्यासाठी होइल (३७१). ‘कर्म करु नये’ असे भगवंतांनी आत्ताच सांगितले आणि मला मात्र युध्द करण्यास प्रवृत्त करीत आहेत (३७२). भगवंतांच्या बोलण्यातील या विरोधाभासाने अर्जुनाला आनंद झाला(!!) आणि त्यामुळे तो भगवंतांना आपली शंका विचारण्यास उद्युक्‍त झाला (३७३). हा सर्व प्रसंग अतिशय अर्थपूर्ण आहे. यातून (स्व)धर्म म्हणजे काय हे स्पष्ट होणार आहे आणि कुठल्याही बंधनाला न जुमानणाऱ्या विवेकामृतरुपी सागराचे आता दर्शन होणार आहे (३७४). कारण की ज्यांना सर्व काही ज्ञात आहे असा निःसीम, अमर्याद भगवंतच (‘श्रीअनंत’) स्वतःच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगणार आहेत आणि ज्याच्या मुखातून प्रत्यक्ष श्रीनिवृत्तिनाथ बोलत आहेत (‘निवृत्तिदास’) असा ज्ञानदेव यावर विवेचन करणार आहे!!! (३७५).’

कानी पडता गुरुपोदेशाचे शब्द । लावतो आपण आपला अर्थ ।

कदा न तुटे त्याने भवबंध । गुरुकृपेनेच कळतो गुरुवाक्यांचा भावार्थ ॥

माउली म्हणत आहेत ‘चित्तीं धनुर्धर उवायिला!’ अर्जुनाच्या मनात भगवंतांच्या बोलण्यातील विरोधाभास जाणवून आनंद निर्माण झाला असे माउली म्हणत आहे. हे शब्द गीतेमध्ये नाहीत. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावार्थदिपिकेमध्ये गीतेचा निव्वळ शब्दार्थ सांगितलेला नाही तर भावार्थ सांगितलेला आहे. गीतेमध्ये अर्जुनाला व्यावहारिक प्रवृत्तीच्या साधकाचे रुपक म्हणून उभे केले आहे हे माउलींना पूर्णपणे माहीत असल्याने ते अशा साधकाच्या मनात उद्भवलेल्या भावनांना अर्जुनाद्वारे प्रगट करीत आहेत. कारण आपण एखादा व्यावहारिक प्रश्न घेऊन जेव्हा गुरुंकडे जातो तेव्हा आपल्या मनात यावेळी कसे वागायला हवे याची थोडीबहुत कल्पना असतेच. आपल्या प्रश्नाचे एक उत्तर आपण अगोदर निवडलेले असल्याने गुरुमुखातून जर त्याविरुध्द सल्ला आला तर त्याप्रमाणे वागायची आपली पटकन तयारी नसते. आपण आपला मुद्दाच गुरुंना परत परत सांगतो आणि शेवटी गुरुंच्या सल्ल्यातून आपण ठरविलेल्या उपायालाच पुष्टी मिळाली की आपण आनंदीत होतो. म्हणूनच भगवंतांनी ‘युध्द कर’ असे सांगितलेले अर्जुनाला लगेच पटले नाही कारण सुरुवातीलाच त्याने मला आप्तबंधूंशी युध्द करणे योग्य वाटत नाही असे ठरविलेले होते. आणि आता त्यांच्या शब्दांतून आपलाच युध्द न करण्याचा विचार प्रदर्शित होत आहे हे कळल्यावर त्याला आनंद झाला असणार यात संदेह नाही. त्याच्या मनातील या आनंदातून त्याचा भगवंतांवरील विश्वास कमी होत नाही हे लक्षात घ्या. जशी आपली स्वतःच्या गुरुंवरील श्रध्दा त्यांच्या शब्दांचा मनपसंद अर्थ लावल्याने कमी होत नाही तशीच ही गोष्ट आहे!

परंतु मनात सद्‌गुरुंवर नुसती श्रध्दा ठेवून पारमार्थिक प्रगती होत नाही. स्वतःच्या दैनंदिन जीवनात त्या श्रध्देनुसार आपले वर्तन घडले तरच शांति मिळते. उदाहरणार्थ, नोकरीमध्ये काहीही करुन बढती मिळवायचा प्रयत्‍न करायचा आणि त्याचवेळी ‘मी बाहेर तसा वागतो, पण माझ्या मनात अशा वागण्यात अर्थ नाही हे कळलेले आहे’ असे सांगायचे अशा वर्तनाने कधीही मानसिक शांति प्राप्त होत नाही. दुट्‍टप्पी वागण्यात किती धोका आहे हे कळण्यासाठी खालील उदाहरण बघा: एकदा श्री रामकृष्ण परमहंसांना कळले की दक्षिणेश्वरातील देवळात आलेल्या एका योग्याचे एका बाईबरोबर संबंध आहेत. त्यांनी योग्याला त्याच्या बाहेख्यालीपणाबद्दल जाब विचारला. त्या योग्याने ‘हे सर्व जग मिथ्या आहे, त्यामुळे मी समाजात कसे वागतो याला काही अर्थ नाही. मग मी नैतिक बंधने का पाळू?’ असे उत्तर दिल्यावर श्री परमहंसांनी त्याची प्रचंड कान‍उघाडणी करुन बाहेर काढले. श्री रामकृष्णांच्या वर्तनामागील कारण असे आहे की सर्व जग मिथ्या आहे हे पूर्णपणे कळले, तर मनातील अनैतिक वागण्याची इच्छासुध्दा निर्बल झाली पाहिजे. ‘मी कसेही वागू शकतो’ या इच्छेमध्येसुध्दा आपण अडकलो नाही पाहिजे.

तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ‘मनात श्रध्दा आहे हो, फक्‍त दैनंदिन जीवनात ती दिसत नाही’ असे जो म्हणतो त्याची श्रध्दा परिपक्व नाही. कच्चे द्राक्ष खाल्यावर जिभेला आंबटपणाचा चटकाच बसतो त्याप्रमाणे अशा अर्धवट श्रध्देने साधकाला तडाखाच बसतो. त्याची ना व्यावहारिक प्रगती होते ना पारमार्थिक शांति मिळते. अशा साधकाने सरळ मनात श्रध्दा नाही असे कबूल करावे. कारण ‘मनात श्रध्दा आहे’ या सांगण्यामध्ये पुढील प्रगतीला मज्जाव आहे आणि ‘काय करु? मनात श्रध्दाच निर्माण होत नाही, गुरुंवर संपूर्ण विश्वास बसतच नाही’ अशा प्रांजळ कबुलीमध्ये पुढील प्रगतीचा रस्ता आहे.

या वस्तुस्थितीमुळे अर्जुन आता आपल्या मनातील भगवंतांच्या बोलण्याबद्दलची शंका स्पष्टपणे सांगणार आहे या कल्पनेनेच माउलींना भरुन आलेले स्पष्ट दिसत आहे. अर्जुनाच्या पराकोटीच्या प्रामाणिकपणामुळेच त्याच्या मनातील विवेकाला जागृती येणार आहे. सुरुवातीला एका ठराविक प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी गुरुंकडे गेलेल्या अर्जुनाची संपूर्ण जीवनशैलीच या विवेकरुपी अमृताचे प्राशन करुन पुनरुज्जीवित होणार आहे. निव्वळ ही लढाई लढू की नको या एका प्रश्नाचेच नव्हे तर त्याच्या जगण्यातील सर्व भागांना विवेकाने वेगळे वळण लागणार आहे असे माउली ‘विवेकामृत सागर, प्रांतहीन’ या शब्दांतून सूचित करीत आहेत. बाकीचे जीवन आहे तसेच ठेवून एका भागाला चांगले करण्यात परमार्थ नाही, तर आधीच्या आयुष्याला पूर्णपणे मोडीत घालून क्षणोक्षणी नवीन जन्म घेण्यातच आत्मानंद आहे हे लक्षात घ्या. आपल्या मनात विवेकामृताचा सागर एकदा जागृत झाला तर त्या प्रलयामध्ये पूर्वकर्मांचा नाश होऊन नवीन युगाचा प्रारंभ होणार आहे. त्यामुळे आपण आत्तापर्यंत ठरविलेल्या स्वधर्माला एक वेगळाच आकार मिळणार आहे. म्हणून महाराज म्हणत आहेत ‘स्वधर्मांसी आगर’.

महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. गुरुवाक्य कानी पडल्यावर जो अर्थ मनात उद्भवतो तो बरोबर असतोच असे नाही. स्वतःला कळलेल्या अर्थाची आपण कितीही पुष्टी देऊ शकत असलो तरी तो अर्थ चुकीचा असू शकेल ही शक्यता नाकारु नका. अर्जुनासारखे गुरुंना विचारा की तुमच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? आणि हा प्रश्न विचारुन झाला की स्तब्ध रहा. आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असा आग्रह न ठेवता जो गुरुंना प्रश्न विचारतो त्यालाच खरे उत्तर मिळते! खरोखर, गुरुकृपेशिवाय या जगातील एक पानसुध्दा हलत नाही, मग आपल्या जीवनात आमुलाग्र बदल आपण स्वतःच्या प्रयत्‍नांनी कसे घडवू शकू? आपल्या हातात काय आहे, तर सध्या कळलेल्या अर्थानुसार आपले वर्तन करणे आणि नवीन अर्थ कळण्याच्या शक्यतेला जागृत ठेवणे. अशा मनस्थितीत साधक प्रत्येक बाबतीत सावधान रहातो आणि त्याची प्रगती गीतेमधील अर्जुनासारखीच भरभर होते.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे स्थान

(बंगलोर, दिनांक १४ मार्च २०१०)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: