ओव्या (२८ ते ३१)/४: गदारोळातील आत्मज्ञान

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

हे जीवींचे निज गुज । परी केवीं राखो तुज ।

जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥ २८:४ ॥

तू प्रेमाचा पुतळा । भक्‍तीचा जिव्हाळा ।

मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥ २९:४ ॥

तूं अनुसंगाचा ठावो । आता तुज काय वंचों जावो ।

जऱ्ही संग्रामारुढ आहो । जाहलो आम्ही ॥ ३०:४ ॥

तरी नावेक हे साहावे । गाजाबज्यही न धरावें ।

परी तुझे अज्ञानत्व हरावे । लागे आधी ॥ ३१:४ ॥

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाचा उलगडा गीतेच्या तृतीय अध्यायात करतात. समोर आलेले कर्म करत असताना भगवंताचे अनुसंधान न सोडणे हा कर्मयोगाचा अतिशय सूक्ष्म गूढार्थ त्यांनी अर्जुनाला स्पष्ट करुन सांगितला (पहा श्लोक ३०:३). यानंतर चतुर्थ अध्यायाच्या सुरुवातीला या उपदेशाचा संदर्भ देऊन ते म्हणतात की हाच उपदेश सुरुवातीला मी विवस्वानाला केला होता. त्याने स्वतःला झालेला बोध इक्ष्वाकूला सांगितला आणि हळूहळू सर्वांनाच तो माहित झाला. परंतु कालांतराने मनुष्यलोकात इंद्रियसुखाला महत्व दिल्याने आता तो बोध लोकांच्या मनातून नष्ट झाला आहे. परंतु पुरातन काळापासून चालत आलेले हे गूढ रहस्य मी तुला सांगितले कारण तू माझा प्रेमळ भक्‍त आणि मित्र आहेस (पहा श्लोक १ ते ३, अध्याय ४). माउलींनी यातील तिसऱ्या श्लोकावर भाष्य करीत असताना वरील ओव्या उद्‌गारलेल्या आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की: ‘माझ्या आयुष्यातील सर्वांत प्रिय असलेली ही गोष्ट मी अतिशय गुपित ठेवलेली होती. पण तुझ्यावरील प्रेमाने मला हे गुज तुझ्यापासून लपवून ठेवता आले नाही (२८). ‘माझ्यावर प्रेम करणे’ या गुणाचे मूर्त रुप म्हणजे तू आहेस. हे धनुर्धरा, ‘भक्‍ती’ या गुणाला जिवंतपण तुझ्यामुळे आलेले आहे आणि ‘मैत्री’ म्हणजे काय हे तुझ्या वर्तनानेच या जगात स्पष्ट झालेले आहे (२९). ‘विश्वासू सोबती’ या शब्दांची व्याख्याच जणू तुझ्यामुळे कळते. तुझ्यातील या गुणांमुळे तुझ्यापासून काही लपवावे असे मला अजिबात वाटत नाही. म्हणूनच युध्दासारखा आणिबाणीचा प्रसंग जरी समोर आलेला असला तरी त्यातून थोडा वेळ काढून, सगळी गडबड बाजूला सारुन तुझ्या अज्ञानाचे मी निराकरण केले (३०,३१).’

दैनंदिन जीवनाचा असे ताण । तेव्हाच स्मरावा भगवान ।

वेगळे न करावे लागे साधन । अंतर्स्फूर्तीतून होईल ज्ञान ॥

‘मला भगवंताची प्राप्ती करुन घ्यायची आहे’ ही भावना साधनेच्या सुरुवातीला साधकाच्या मनात असते. कदाचित त्याच्या मनातील भगवंताचे रुप बाकी साधकांच्या मनांतील रुपांपेक्षा वेगळे असेल (उदा. कुणाला ‘सत्याचे ज्ञान’ हवे असते तर कुणाला सगुण भगवंताची जवळीक हवी असेल) पण परमार्थात काहीतरी मिळवायचे आहे ही भावना आपणा सर्वांच्या मनात असतेच. आपल्या मनातील इच्छेच्या पूर्तीसाठी मग आपले प्रयत्‍न सुरु होतात. जाणीवपूर्वक केलेल्या या प्रयत्‍नांनी (ज्याला आपण साधना असे नाव देतो) आपणास कधी कधी ‘अनुभव’सुध्दा येतात. अचानक लाभलेल्या या दिव्य क्षणांमुळे आपण योग्य मार्गावर आहोत असा विश्वास आपल्या मनात निर्माण होतो. परंतु या सर्व घटना (साधनेचे ध्येय ठरविणे, साधना करणे आणि अनुभव येणे) परमार्थाच्या मार्गावरील प्रथमावस्था आहेत. असे म्हणण्याचे कारण असे की आपण स्वतःच्या मनाने निर्माण केलेली भगवंताची प्रतिमा मिळविण्यासाठी केलेला कुठलाही प्रयत्‍न आपणास कधीही मन आणि बुध्दी यांच्या पलिकडे घेऊन जाऊ शकत नाही. आणि स्वतःचे मन आणि बुध्दी किती संकुचित आणि मर्यादित आहेत याची जाणीव आपणां सर्वांना आहेच! अशा अत्यंत मर्यादीत उपकरणांनी भगवंत प्राप्त होईल ही भावना आपल्या प्रयत्‍नांचे मूळ असल्याने साधकाचा दृष्य प्रयत्‍नांवरील विश्वास प्राथमिक दशा आहे.

काही काळाने स्वतःच्या साधनेचा मर्यादितपणा लक्षात आल्यावर आपण गुरुकृपेचे अस्तित्व निर्माण करतो. आपण साधनेचे प्रयत्‍न करीत असावे आणि गुरुकृपेची वाट बघत रहावी असे आपले जीवन बनते. साधनेची ही द्वितीयावस्था आहे. या स्थितीमध्ये स्वतःच्या प्रयत्‍नांचे महत्व कमी झालेले असले आणि सद्‌गुरुंवरील श्रध्दा वृध्दींगत झालेली असली तरी ही अवस्थासुध्दा अंतिम अवस्था नाही. याचे कारण असे की या अवस्थेतही आपण भविष्यात काहीतरी होईल ही अपेक्षा सोडलेली नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे भूतकाळातील साधनारुपी स्वप्रयत्‍नांवर आपण पाणी सोडलेले असले तरी भविष्यात काहीतरी दिव्य घटना घडेल या आशेला आपण धरुनच आहोत. एकदा आशा मनात असली की आपले जीवन जगण्याची पध्दत नैसर्गिक रहात नाही. वर्तमानकाळातील आपल्या वर्तनाने भविष्यातील आशेला धोका तर उत्पन्न होणार नाही ही भिती आपल्या मनाला सूक्ष्मपणे भेडसावीत राहते. आणि तीच्या निराकरणासाठी आपली नजर सतत गुरुकृपेच्या दृष्य रुपासाठी आसुसलेली राहते. अशावेळी जर नजिकच्या भविष्यामध्ये मनातील गुरुकृपेच्या इच्छेची पूर्तता होण्याची लक्षणे दिसली नाहीत तर साशंकता निर्माण होते. प्रत्येक साधकाची एक उपजत सहनशक्‍ती असते. तीच्यापलिकडे वाट बघायला लागली तर साधकाचे जीवन फार अवघड होते. आणि असे होण्याची शक्यता आहे याची जाणीव आपणास असल्याने आपण आशेच्या पूर्ततेची फार उत्सुकतने वाट बघायला लागतो. म्हणून स्वतःच्या साधनेचे महत्व कमी होऊन गुरुकृपेची वाट बघणे ही साधनेची अंतिम अवस्था नाही.

काही भाग्यवान साधकांच्या जीवनामध्ये या दोन स्थितींपेक्षा पुढची तृतीय अवस्था येते. या अवस्थेमध्ये साधकाला असे जाणविते की १. आपल्या मन आणि बुध्दीने भगवंताला जाणून घेणे अशक्य आहे आणि २. जर आपल्यावर भविष्यात गुरुकृपा होणार असेल तर ती आत्तासुध्दा अस्तित्वात असायलाच हवी. म्हणजे काय तर, साधकाला संपूर्णपणे कळून चुकते की त्याच्यावर होणारी गुरुकृपा जर भविष्यात ‘उत्पन्न’ हो‍उ शकणारी असेल तर ती नष्ट हो‍उ शकणारीसुधा असणार. म्हणजे अशी पुढे कधीतरी मिळू शकणारी कृपा (वा कुठलीही गोष्ट) काळाच्या सत्तेबाहेर नाही. आणि ज्या गोष्टीवर काळ सत्ता गाजवितो तीच्यामुळे या काळाचे नियमन करणाऱ्या भगवंताचे ज्ञान होणे शक्यच नाही. एकदा साधकाला ही गोष्ट पूर्णपणे कळली की त्याची भविष्यात काहीतरी घडेल आणि आपण परिपूर्ण होऊ ही आशासुध्दा नष्ट होते. भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्हींवरील विश्वास संपूर्णपणे तुटल्यावर त्याचे लक्ष आपोआपच वर्तमानकाळावर केंद्रित होते. या अतिशय उच्च अवस्थेमध्ये जीवनातील नेहमीच्या घटनांमध्येच त्याला भगवंताची (वा सद्‌गुरुंची) कृपा दिसू लागते. आयुष्यात काहीतरी वेगळे घडेल आणि कृपेची जाणीव होईल या भावनेचे त्याच्या मनातून संपूर्ण उच्चाटन होते. जीवनातील प्रत्येक गोष्टीतूनच त्याला अध्यात्मिक बोध होऊ लागतो. नव्हे नव्हे, त्याचे जीवन निव्वळ भगवंताच्या अस्तित्वाच्या जाणीवेतच बुडून जाते.

वरील ओव्यांमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की युध्द सामोरे आलेले आहे म्हणून तुझ्या मनातील ज्ञानाची जाणीव निघून जाणे बरोबर नाही. देहाने युध्द लढत असतानादेखील मनातील ज्ञानाची ज्योत तेवत राहीली पाहिजे.

भगवंत अर्जुनाला भर युध्दामध्ये गीता सांगत आहेत याचा अर्थ असा आहे की आपल्या नेहमीच्या जीवनातील उलाढालींमध्येच आपणास परमज्ञान होणार आहे. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपल्या जीवनात वेगळे आचरण करावे लागणार आहे ही भावना आपण संपूर्णपणे सोडून द्यायला हवी. माउली म्हणत आहे की अर्जुनाने भगवंताबरोबर आयुष्यभर जे नाते जोडले होते त्याचा फायदा त्याला युध्दभूमीवर आपोआप झाला. त्याच्या मनात स्ववर्तनाबद्दल शंका उद्भवली आणि लगेच समोर भगवंताने उपदेश करायला सुरुवात केली. ‘हे युध्द होऊन जाउ दे, मग मोकळा वेळ मिळाला की तुझ्या सर्व शंका दूर करीन’ अशा पोकळ आश्वासनावर अर्जुनाला तहान भागवावी लागली नाही! प्रत्यक्ष ज्ञानगंगाच त्याच्यासमोर वाहू लागली. जेव्हा परमज्ञान म्हणजे काय इत्यादी ‘पारमर्थिक’ इच्छासुध्दा मनातून निघून जाऊन लक्ष पूर्णपणे वर्तमानकाळावर स्थिर होते तेव्हा लगेच भगवंतकृपा जाणवायला लागते. युध्दाच्या गदारोळाकडे लक्ष न देता आधी तुझे अज्ञान दूर करतो या भगवंतांच्या वचनाकडे आपण ध्यान देणे जरुरी आहे. ‘मी आत्ता गडबडीत आहे, नंतर वेळ मिळाला की भगवंताचे अनुसंधान ठेवू’ ही वृत्ती परमार्थात उपयोगी पडणारी नाही. हातात असलेल्या या क्षणामध्येच सर्व दडलेले अशी ज्याची मनोभूमिका आहे त्याला अंतर्स्फूतीरुपी भगवान मार्गदर्शन करतील यात शंका नाही.

॥ हरि ॐ ॥

प्रवचनाचे संकेतस्थल

(बंगलोर, दिनांक ४ मार्च २०१०)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: