श्लोक (१ ते ३)/२: तर्काची मर्यादा

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

संजय उवाच –

तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ ।

विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ गीता १:२ ॥

श्रीभगवानुवाच –

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समपुस्थितम्‌ ।

अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकिर्तिकरमर्जुन ॥ गीता २:२ ॥

क्लैब्यं मा स्म गमः नैतत्वय्युपद्यते ।

क्षुद्रं ह्रुदयदौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप ॥ गीता ३:२ ॥

सद्‌गुरुंची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे या उपक्रमाला आकार येईल अशी खात्री असल्याने आजपासून श्रीमद्भगवद्गीतेवर सलग प्रवचने करण्याचे ठरविले आहे. आरंभीचा अर्जुन विषाद महत्वाचा असला तरी गीतेचे तत्वज्ञान द्वितीय अध्यायापासूनच सुरु होत असल्याने आपण दुसऱ्या अध्यायापासून प्रारंभ करुया.

गीतेच्या प्रथम अध्यायात कौरव आणि पांडव यांच्या सैन्यांचे निरीक्षण करण्यास गेल्यावर अर्जुनाला आपले शत्रू म्हणजे आप्तच आहेत असे दिसले. खरे म्हणजे यांच्याशीच युध्द करुन स्वतःचा हक्क मिळवायचा आहे याची पूर्ण कल्पना अर्जुनाला फार पूर्वीपासून होती. परंतु प्रत्यक्षात लढाईचा प्रसंग समोर आल्यावर त्याने परत युध्दाखेरीज दुसरे पर्याय शोधण्यास सुरुवात केली. आपल्या स्वकीयांच्या मोहाने आंधळ्या झालेल्या त्याच्या तर्कशक्‍तीला विवेकाचा राजमार्ग न दिसता संदेहाच्या अपवाटाच दिसल्या. अशा रीतीने स्वकर्माच्या योग्यतेबद्दल स्वतःला साशंक केल्यावर त्याची अवस्था अत्यंत दयनीय होऊन तो गलितगात्र झाला. अर्थात अर्जुनाचे पूर्वसुकृत प्रबळ असल्याने जीवनातील अशा मोक्याच्या वेळी त्याच्यासमोर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हजर होते. एखाद्या महत्वाच्या सामन्यात सचिन तेंडुलकर साथीला असल्यावर नवोदीत फलंदाजालासुध्दा प्रचंड मानसिक आधार मिळतो, मग जो आधीच युध्द करण्यात मुरलेला आहे अशा अर्जुनाला प्रत्यक्ष भगवंताला समोर बघून किती सहाय्य मिळाले असेल! असो.

परंतु कितीही समर्थ व्यक्‍ती बरोबर असली तरी त्या व्यक्‍तीला आपल्या मनातील व्यथा निःसंकोच सांगणे अत्यावश्यक असते. लाजेपोटी मूळ मुद्दा सोडून दुसरेच कुठलेतरी क्षुल्लक प्रश्न आपल्या गुरुंना विचारणाऱ्या साधकांसारखा अर्जुन नसल्याने त्याने आपल्या किर्तीची पर्वा न करता मनातील व्यथा श्रीकृष्णांसमोर मांडली. प्रथम अध्यायातील अर्जुनाच्या वक्‍तव्यावरुन आपणास अर्जुनाला स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची खरी तळमळ दिसून येते. त्याच्या ह्रुदयातील या आत्यंतिक तळमळीमध्येच गीतेचा पाया उभारलेला आहे. स्वतःची ‘अत्यंत निपुण, धैर्यशाली योध्दा’ ही प्रतिमा सांभाळायचा कुठलाही प्रयत्‍न न करीता त्याने आपल्या ह्रुदयातील बोच भगवंतासमोर उघडपणे मांडली ही फार महत्वाची गोष्ट आहे. गीतेच्या द्वितीय अध्यायाची सुरुवात या पार्श्वभूमीवर होते. युध्दभूमीवर घडलेल्या या अकल्पनाप्य प्रसंगाचे वर्णन धृतराष्ट्राला करताना “संजय म्हणाला की याप्रमाणे स्वकीयांना त्रास होईल या कल्पनेने व्याकुळ होऊन घळघळा अश्रूपात करीत असलेल्या अर्जुनाला पाहून ‘शत्रूचा विनाश करणारे’ (मधूसूदन) भगवान बोलू लागले (१). भगवान असे म्हणाले की सर्व सारासार विचार करुन मग युध्दाला सज्ज झाल्यावर हे असे आर्यकुलाला न शोभणारे, स्वर्गाचे दारे बंद करणारे आणि अपकीर्ती आणणारे विचार आले तरी कोठून? (२) हा नपुसंकपणा टाकून दे. तुला हे विचार अजिबात शोभत नाही. हे अर्जुना, मनाचा दुबळेपणा टाकून तू युध्दाला उठ (३).”

निर्णय आपण प्रथम घेतो । नंतर त्याचे समर्थन करतो ।

स्वतः मात्र उलटेच समजून । बुध्दीला निर्णयाचे श्रेय देतो ॥

आपले मन उघड करुन सांगताना अर्जुनाने फार तार्कीकरीत्या आपल्या मनातील संदेह भगवंतांना सांगितलेला आहे असे दिसून येते. म्हणजे, युध्द न करण्याचा आपण घेतलेला निर्णय नुसता न सांगता तो कसा योग्य आहे हे त्याने भगवंतांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला आहे असे दिसते. त्यामध्ये स्वकीयांचे संगोपन हेच क्षत्रिय धर्माचे परम कर्तव्य आहे या मुद्यावर त्याने जोर दिलेला दिसतो. परंतु भगवान त्याच्या या मूळ मुद्याचे निरसन करण्याऐवजी हे विचार तुझ्या मनात आलेच तरी कसे असे विचारीत आहेत. अर्जुनाच्या मनात अशी पूर्ण खात्री होती की ‘स्वधर्माचे पालन करणे माझे कर्तव्य आहे आणि स्वधर्म म्हणजे आप्तजनांचे संरक्षण. म्हणून मी युध्द करण्यास नकार देत आहे’. परंतु वस्तुस्थिती याच्या उलट होती. स्वजनांना बघितल्याक्षणी त्यांच्या सहवासाची ओढ मनात निर्माण होऊन हे युध्द नको ही भावना त्याच्या मनात जागृत झालेली होती. म्हणूनच अर्जुनाने प्रथम अध्यायात अठ्ठाविसाव्या श्लोकामध्ये असे म्हटलेले आहे की स्वकीयांना बघितल्याक्षणी माझ्या मनात युध्दाच्या योग्यतेबद्दल शंका निर्माण झालेली आहे.

आपण सर्वजण अगदी असेच वागत असतो. जीवनातील बहुतांशी निर्णय आपण अंतर्स्फूर्तीने घेतो आणि मग आपली बुध्दी पणाला लावून स्वतःचा निर्णय कसा योग्य आहे असे पटवून देतो. वस्तुतः जीवनातील कुठल्याही समस्येचे एकमेव उत्तर कधीच नसते. एकाचवेळी अनंत पर्याय एकसारखेच बरोबर असल्याने क्वचितच आपण ठामपणे असे म्हणू शकतो की समोर आलेल्या प्रसंगाला मी दिले असेच तोंड द्यायला हवे होते. जेव्हा अनेक तोडग्यांतून आपण एक निवडतो तेव्हा तो निर्णय आपण कसा घेतलेला असतो हे आपल्यालाच ठाऊक नसते. परंतु ‘मला वाटले म्हणून मी असा वागलो’ असे म्हणण्यास कुणीच तयार नसतो! प्रत्येकाला आपण घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करावेसे वाटतेच. अर्जुनाला आपणा सर्वांचे रुपक म्हणून गीतेमध्ये उभा केलेला असल्याने त्यानेसुध्दा भगवंतांसमोर आपल्या निर्णयाचे समर्थन करणारे वक्‍तव्य केले. म्हणून इथे भगवंतांनी त्याच्या म्हणण्याचे शब्दशः खंडन न करीता असे म्हटले आहे की हे विचार तुझ्या मनात आलेच कसे? निव्वळ ह्रुदयाच्या मृदूतेने तू असा निर्णय घेतला आहेस असे त्यांनी स्पष्टपणे अर्जुनाला सांगितलेले आहे. अर्जुनाने युध्द करण्याचा निर्णय घेतला असता तरी त्याला पुष्टीदायक कारणे बुध्दीने शोधली असती!! जो कुठला निर्णय घेतला आहे त्याचे समर्थन करणे हे बुध्दीचे काम आहे, निर्णय घेणे नाही. एखाद्या कचेरीतील कारकुनासारखी आपली बुध्दी काम करते. जे समोर येईल त्याचे समर्थन करायचे आणि निर्णय घ्यायची वेळ आली की अंतर्स्फूर्तीरुपी वरीष्ठांकडे फाईल पाठवायची! तेव्हा अर्जुनाला आपण बुध्दी वापरुन योग्य निर्णय घेतला आहे असे जे वाटत होते त्याला भगवंतांनी अजिबात महत्व दिले नाही. परंतु आपणा सर्वांना प्रत्येक गोष्टीत आपल्या बुध्दीरुपी कारकुनाची संमती घेण्याची सवय झालेली असल्याने भगवान अर्जुनाच्या बुध्दीला दुसऱ्या मार्गावर नेण्यासाठी ‘या विचारांचा परीणाम म्हणजे आत्तापर्यंत तू मिळविलेली किर्ती निघून जाईल आणि परलोकातही सुख मिळणे असंभव होईल असे’ म्हणत आहेत. परंतु कुठला कारकुन आपली चूक लगेच कबूल करतो?! तो त्याच्याजवळ असलेल्या लांबलचक नियमावलींचा (तो सोडून दुसऱ्या कुणालाही ती कळत नसते!) आधार घेऊन स्वतःच्या लाल शाई वापरण्याच्या वर्तनाचे समर्थनच करतो! त्याचप्रमाणे स्वतः घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करण्यामध्ये अर्जुनाची बुध्दी इतकी गुंतलेली आहे की त्याचे भगवंताच्या इशाऱ्यांकडे लक्ष गेले नाही. त्याची पूर्ण खात्री पटली होती की त्याने पूर्ण विचार करुनच असा पराकोटीचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून भगवंतच्या या उत्तराने त्याचे समाधान झाले नाही आणि त्याने परत आपले वक्‍तव्य सुरु केले. ही गोष्ट आपण पुढच्या वेळी बघू.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे संकेतस्थल

(बंगलोर, दिनांक १८ एप्रिल २०१०)

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s