श्लोक (४ ते ८)/२: संदेह निरसनाची आवश्यकता

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

अर्जुन उवाच –

कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।

इषुभि: प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ गीता ४:२ ॥

गुरुनहत्वा हि महानुभावान्‌ श्रेयो भोक्तुं भैक्षमपीहिलोके ।

ह्त्वार्थकामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान्‌ रुधिरप्रदिग्धान्‌ ॥ गीता ५:२ ॥

न चैतद्विद्‍मः करतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।

यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्रा ॥ गीता ६:२ ॥

कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।

यच्छ्रेयःस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वाम प्रपन्नम्‌

॥ गीता ७:२ ॥

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम्‌ ।

अवाप्य भूमावसपत्‍नमृध्दं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्‌ ॥ गीता ८:२ ॥

प्रथम अध्यायातील अर्जुनविषाद ऐकून भगवान श्रीकृष्णांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी अर्जुनाला सांगितले की असे नैराश्यवादी विचार तुझ्यासारख्या धैर्यशाली क्षत्रियाच्या मनात आलेच कसे? या विचारांनुसार वर्तन करशील तर ऐहिक आणि पारमार्थिक नुकसानच तुझ्यासमोर ठेवलेले आहे. तेव्हा तू युध्द करणेच श्रेयस्कर आहे. परंतु भगवंतांचे हे बोलणे ऐकून अर्जुनाच्या मनाचे समाधान झाले नाही. त्याने विचार केला की युध्द न करण्याने माझे नुकसान होईल आणि ते होऊ नये म्हणून भगवान मला युध्द करण्याचा सल्ला देत आहेत. भगवंतांच्या बोलण्याचा उद्देश्य असा होता की युध्द न करणे व्यावहारीक आणि पारमार्थिक या दोन्ही बाजूंनी चुकीचे आहे. अर्जुनाने आपल्या मनाची व्यावहारीक तोट्याबद्दल तयारी केली असल्याने त्याला भगवंतांना असे सांगावे वाटले की मला भौतिक सुखाची पर्वा नाही. युध्द न करण्याचा माझा निर्णय मी सहजासहजी घेतलेला नाही, तुम्ही त्या निर्णयाला इतक्या सहजपणे झिडकारु नका!

आपण गुरुंकडे एखाद्या विवंचनेचे निवारण करण्यास जातो तेव्हा स्वतःसमोरील समस्यावर आपण विचार करुन तोडगा शोधलेला असतोच. परंतु स्वतःवर पूर्ण विश्वास नसल्याने आपण दुसरे मत घ्यायला उत्सुक असतो. अशावेळी कानी पडलेला उपदेश आपल्या तोडग्याशी सुसंगत नसेल तर आपणास अस्वस्थ वाटते आणि आपण स्वतः शोधलेला उपाय कसा बरोबर आहे असे सांगण्यास प्रवृत्त होतो. अर्जुनाने अगदी असेच भगवंतांना सांगायला सुरुवात केली आहे असे दिसून येते. याठिकाणी आपण ‘प्रत्यक्ष भगवंतांनी युध्द कर असे निःसंदेहपणे सांगितलेले असूनही अर्जुनाची पुढे वाद घालायची हिंमत कशी झाली?’ असे आपण विचारणे योग्य नाही. याचे कारण असे की ज्याप्रमाणे वैद्याकडे गेल्यावर जितक्या सविस्तरपणे आपण स्वतःच्या रोगाचे वर्णन करु शकू तितके अचूक निदान हो‍उन योग्य औषध आपणास मिळते, त्याचप्रमाणे स्वतःचा अहंकार पुढे न आणता अत्यंत प्रामाणिकपणे मनातील शंका गुरुंना सांगितल्याशिवाय आपणास योग्य दिशा मिळत नाही. याचे एक सुंदर उदाहरण बघा. भगवान श्री रामकृष्ण परमहंसांच्या एका शिष्याच्या मनात एकाच भगवंताचे सगुण आणि निर्गुण अशी दोन परस्परविरोधी रुपे कशी असू शकतील ही शंका आली. या शंकेमुळे तो इतका बेजार झाला की त्याला काही सुचेना. परंतु त्याचे आपल्या गुरुंना हा प्रश्न विचारण्याचे धैर्य होत नव्हते म्हणून त्याने श्री गिरीशचंद्र घोष या दुसऱ्या शिष्याला आपल्यासमोर हा प्रश्न रामकृष्ण परमहंसांना विचारण्यास सांगितला. गिरीशचंद्रांच्या मुखातून हा प्रश्न बाहेर निघताच रामकृष्णांनी त्यांना उत्तर दिले. त्या उत्तराने गिरीशचंद्रांचे पूर्ण समाधान झाले आणि त्यांनी आपल्या मित्राकडे ‘किती छान उत्तर दिले आहे’ असा भाव असणारी नजर टाकली तर त्याच्या चेहऱ्यावरील असमाधान तसेच असल्याचे त्यांना दिसले! तेव्हा त्यांनी आपल्या मित्राला जबरदस्तीने तो प्रश्न स्वतः रामकृष्णांना विचारण्यास पाडले. तेव्हा लगेच श्री रामकृष्ण म्हणाले की ‘असे बघ, उत्तर ध्रुवाजवळ आकारहीन पसरलेल्या समुद्रामध्ये काही पाणी थंडीने थिजून घट्‍ट हिमनग तयार होतोना त्याचप्रमाणे निर्गुण भगवंताला भक्‍ताच्या मनातील भक्‍तीच्या थंडाव्याने आकार येतो आणि निर्गुणाचे सगुणात रुपांतर होते. पण म्हणून मूळ भगवंतामध्ये काहीच फरक होत नाही’. या शिष्याला लहानपणापासून रसायनशास्त्राची ओढ असल्याने त्याला हे उत्तर अगदी मनापासून पटले आणि त्याचे चित्त निर्मळ झाले. तेव्हा आपल्या मनातील प्रश्न आपणच सद्‌गुरुंना विचारणे साधनेमध्ये अत्यावश्यक आहे. अर्जुनाच्या परत परत प्रश्न विचारण्यातून आपणास ही गोष्ट स्पष्ट झाली पाहीजे.

आता आपण अर्जुनाच्या आक्षेपांकडे बघू. अर्जुनाचा मूळ मुद्दा असा आहे. द्रोणादिकांचे आमच्यावर खूप उपकार आहेत आणि त्यांचा घात मी केला तर त्यातून मिळणारे सुख मला विषासमान त्याज्य असायला हवे. परंतु या मुद्याला अत्यंत प्रभावीपणे मांडल्यावरसुध्दा भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी सहमत व्हायला तयार नाहीत हे कळल्यावर त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. इथे त्याचा सूज्ञपणा प्रगट होतो तो गीतेतील आठव्या श्लोकातून. तो म्हणत आहे ‘या भूलोकाचे साम्राज्य वा स्वर्गातील इंद्रपद मला प्राप्त झाले तरी माझ्या मनातील हा संशय जाणार नाही. या संशयाचे निराकरण निव्वळ तुझ्या उपदेशाने होणार आहे (गीता ८:२).’ काय मार्मिक विचार आहे बघा. आपल्या मनातील संदेह बाह्य वस्तूंच्या प्राप्तीने कधीही नाहीसा होत नाही. तो केवळ स्वतःच्या मनात नूतन विचार निर्माण झाल्यावरच नाहीसा होतो. आपण आपले सर्व आयुष्य भौतिक गोष्टींची जमवाजमव करण्यात व्यतीत करतो आणि त्यातून आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्‍न करतो. स्वतःची जखम मनात असताना देहाला मलम लावण्यात जीवनाचे सार्थक मानतो! अर्जुनाला भगवंतांकडून भौतिक सुखाची अपेक्षा नव्हती, तर बोधरुपी वचनांच्या खाणीचे द्वार उघडून हवे होते!

एकदा आपल्या लौकीकाची पर्वा सोडून मनातील संदेहांना स्पष्ट शब्दांत भगवंतासमोर मांडून स्वतःला संपूर्ण उघडे केल्यावर अर्जुन आता परमज्ञान प्राप्त करुन घेण्यास प्राप्त झाला आहे. जोपर्यंत आपण स्वतःचे व्यक्‍तिमत्व सांभाळित आणि आपली जगातील प्रतिमाला धक्का न लावता साधना करत असतो तोपर्यंत आपली या भवलोकातून सुटका नाही हे लक्षात घ्या. मग तुम्ही कितीही मन लावून प्रामाणिकपणे अपली गुरुपोनिर्दिष्ट साधना करा. काही साधकांना असा प्रश्न पडतो की आपण इतकी व्यवस्थित साधना करुनही आपली म्हणावी तशी प्रगती का होत नाही? याला उत्तर म्हणजे त्यांची या जगाला सोडायची कितपत तयारी आहे हे त्यांनी बघायला हवे. आपल्या मुमुक्षू अवस्थेत श्री. यु.जी.कृष्णमूर्ती भगवान रमण महर्षींना भेटायला गेले आणि त्यांनी ‘तुम्ही मला मोक्ष द्याल का?’ असा प्रश्न विचारला तेव्हा रमण महर्षींनी त्यांना ‘मी द्यायला तयार आहे पण तू घ्यायला तयार आहेस का?’ असा प्रतिप्रश्न केला! आणि गंमत म्हणजे यु.जी.ंकडे त्याचे उत्तर नव्हते!! तेव्हा भगवंतांनी इतकी महत्वाची गीता फक्‍त अर्जुनालाच का सांगितली असा प्रश्न विचारणाऱ्यांनी कुरुक्षेत्रातील कुणाची गीता ऐकायची खरी तयारी होती याचा विचार केला पाहिजे. अर्जुनाची विषादपूर्वक वक्तव्यांना गीतेत अंतर्भूत करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपले स्वव्यक्‍तिमत्वाला जपण्याचे कर्तृत्व परमार्थात किती हानीकारक आहे हे दाखवून देणे आहे. आपण भगवंतांचा उपदेश पुढच्यावेळी बघू.

॥ हरि ॐ ॥

प्रवचन ऐकण्याचे स्थल

(बंगलोर दिनांक २५ एप्रिल २०१०)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: