श्लोक (९ ते ११)/२: भिन्न पातळींवरील विवाद

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

संजय उवाच –

एवमुक्त्वा ह्रुषीकेशं गुडाकेशः परंतप ।

न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ गीता ९:२ ॥

तमुवाच ह्रुषीकेशः प्रहसन्निव भारत ।

सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः ॥ गीता १०:२ ॥

श्रीभगवानुवाच –

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।

गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः ॥ गीता ११:२ ॥

वाद घालत असताना स्वतःचा मुद्दा दुसऱ्याच्या मनात ठसविण्याकरीता आपण प्रयत्‍न करीत असतो. बरेच वेळा स्वसमर्थन करण्याच्या नादात नकळत फसवाफसवीसुध्दा करायला लागतो. आपला मुद्दा बरोबर आहे याची पूर्ण खात्री आपणास असल्याने त्याच्या समर्थनाकरीता ‘सफेद झूट’ बोलावे लागले तरी आपणास चुकीचे वाटत नाही. याचे एक उदाहरण म्हणजे वादात स्वतःची पातळी क्षणोक्षणी बदलणे होय. आपण स्वतःचे जीवन कायिक, मानसिक, पारमार्थिक इत्यादी अनेक पातळींवर एकाचवेळी जगत असल्याने यापैकी जी पातळी स्वतःच्या मुद्याचे समर्थन करण्यास योग्य वाटेल ती आपण घेतो. त्यामुळे व्यावहारीक दृष्टीकोनातून आपले वर्तन कसे योग्य आहे हे सांगण्यास सुरुवात केल्यावर समोरच्याने त्याचे पूर्णतः खंडन केले की आपण तात्विक पातळींवर जातो आणि ‘निव्वळ व्यवहारात तोटा होतो म्हणून तत्वांविरुध्द कसा जाऊ?’ असे विचारतो. आणि आपल्या तत्वांपेक्षा उच्च तत्वे ऐकायला मिळाली की ‘तुमच्या सारख्या ज्ञानेश्वरीवर प्रवचन देणाऱ्यांसारखी आमची योग्यता नाही हो, त्यामुळे तुमचे म्हणणे योग्य असले तरी आमच्या आवाक्याबाहेर आहे!’ असे म्हणतो. थोडक्यात आपण स्वतःचे मत फारच कमीवेळा पूर्णपणे बदलतो. एकदा पूर्वदिशेला जायचे ठरविले की आपल्या मनाची पश्चिमेकडे बघण्याची तयारीच नसते!

भगवान श्रीकृष्णांबद्दल अत्यंत आदरयुक्‍त प्रेम मनात असूनही अर्जुनाने नकळत भगवद्गीतेच्या सुरुवातीला असाच पावित्रा घेतलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, प्रथम अध्यायातील युध्द करण्याबाबतचे त्याचे सर्व आक्षेप व्यावहारीक पातळीवर आहेत (आमच्या कुटुंबाचा विनाश होईल, आमच्याशी संबंध ठेवणाऱ्यांनाही पाप लागेल, पितरांचा उध्दार होणार नाहीत इत्यादी). परंतु भगवान श्रीकृष्णांनी त्याला अशा षंढ विचारांनी तुझी अपकिर्ती होऊन स्वर्गाचे द्वार बंद होईल असे सांगून ‘तू युध्द करणेच योग्य आहे’ असा अगदी उलटा सल्ला दिला तेव्हा त्याने आपल्या अस्तित्वाची पातळी बदलली. “भीष्म आणि द्रोणाचार्यांचे आमच्यावर उपकार आहेत त्यामुळे ते कसेही वागले तरी त्यांच्या रक्‍तात भीजलेले राज्य उपभोगावेसे मला योग्य वाटत नाही” असे तात्विक विचार त्याने स्वसमर्थनासाठी भगवंतांना सांगितले.

भगवान श्रीकृष्ण केवळ परमार्थ जाणत होते असे नसून व्यावहारीक जगाचीसुध्दा त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्व पैलू पूर्णतः विकसित झालेले होते. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणजे भगवंतांचा ‘पूर्णावतार’ मानतात. म्हणून युध्द न करण्याच्या समर्थनासाठी अर्जुनाने सांगितलेले तात्विक विचार ऐकून त्यांना अर्जुनाच्या मनाची लवचिकता नष्ट होऊन स्वतःच्या निर्णयाचे कुठल्याही परीस्थितीत समर्थन करण्याची धारणा झालेली आहे हे त्यांच्या लगेच लक्षात आले. याच्या मनाचे दृढ भांडे फोडूनच नवा आकार द्यावा लागणार आहे याची जाणीव होताच प्रथमतः उपरोधाने बोलून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. ज्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आहे त्यांनी सरोष बोलणे सुरु केल्यावर आपण अत्यंत सावधानतेने त्यांचे वचन ऐकतो. स्वतःच्या मनातील विचारांना झटकून टाकायला जी शक्‍ती लागते ती समोरच्या व्यक्‍तीबद्दल आपल्या मनात असलेल्या आदरातून आपणास मिळते. त्यामुळे जेव्हा भगवान ‘ज्या गोष्टीचा शोक करायचा नसतो त्याचा शोक तू करतोस आणि आम्हाला शहाणपणा शिकवितोस याला काय म्हणावे’ असे म्हणू लागले तेव्हा अर्जुनाच्या मनातील जळमटे निघून गेली आणि भगवंतकृपेच्या प्रकाशाने त्याला वस्तुस्थितीचे ज्ञान होऊ लागले. अशा तऱ्हेने त्याच्या मनाची तयारी झाल्यावर भगवंतांनी त्याला ‘सूज्ञ माणसे मेलेल्यांच्या आणि आत्ता जिवंत असलेल्यांचा (म्हणजेच पुढे मरणाऱ्यांचा) या दोघांबद्दलही शोक करीत नाहीत’ असे सांगितले. आता यापुढे ते शहाणी माणसे का शोक करीत नाहीत याचे कारण सांगतील. ते आपण नंतर बघू.

या श्लोकांवरुन आपणास वाद घालून काही शिकावयाची इच्छा असल्यास आपला प्रामाणिकपणा किती कठोरपणे सांभाळावा लागतो हे कळले तरी पुरेसे आहे.

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक ९ मे २०१०)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: