ओवी (२०२ ते २०५)/४: विश्वास बसणे हीच सद्‌गुरुकृपा होय

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

हा रात्री दिवस पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं ।

तैसे संशयी असतां काहीं । मना न ये ॥ २०२:४ ॥

म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाही पाप घोर ।

हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ॥ २०३:४ ॥

येणेंकारणे तुवां त्यजावा । आधीं हाचि एक जिणावा ।

जो ज्ञानाचिया अभावा- । माजि असे ॥ २०४:४ ॥

जैं अज्ञानाचे गडद पडे । तै हा बहुवस वाढे ।

म्हणोनि सर्वथा मार्ग मोडे । विश्वासाचा ॥ २०५:४ ॥

सर्व जगावर साम्राज्य स्थापन करण्यासाठी रोमन लोकांनी ऐतिहासिक काळात जीवापाड धडपड केली. त्यामधील एक कार्य म्हणजे त्यांनी आपल्या सैन्याच्या जलद हालचालीसाठी मोठे-मोठे रस्ते बांधले. त्यांच्या या अपूर्व कार्यामुळे इंग्रजीमध्ये ‘सर्व रस्ते रोम शहरालाच जाऊन मिळतात’ अशी एक म्हणच तयार झाली आहे. अगदी त्याचप्रमाणे भगवंतानेच हे सर्व चराचर निर्मिलेले असल्याने (भगवंताला म्हणूनच ‘आदीशक्‍ती’ वा ‘आदीपुरुष’ या नावाने संबोधतात) आयुष्यातील आपल्या सर्व धडपडी त्याच्याकडेच घेऊन जातात. सूक्ष्म नजरेने पाहील्यास जीवनातील सर्व घडामोडींचे उद्दीष्ट भगवंताची प्राप्ती हेच आहे असे दिसून येते. अर्थात, प्रत्येकाच्या जीवनातील भगवंताचे रुप भिन्न असल्याने (कुणी पैशाची तर कुणी भार्याची तर कुणी विभिन्न गुरुंची पूजा करतो) आपल्या सर्वांचे मार्ग भिन्न असतात. या सर्व गदारोळामध्ये संतांच्या उपदेशाचा आश्रय घेऊन आपल्यासारखे काही साधक भगवंताशी एकरुप होण्याचा जो प्रयत्‍न करीत असतात तो भगवंताकडे पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग असतो. परंतु भगवंतप्राप्तीचा हा मार्ग जवळचा असला तरी सोपा नसतो कारण यामध्ये आपणास अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. यामधील सर्वात कठीण त्याग म्हणजे आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य गमाविणे होय. आणि जोपर्यंत साधक आपल्या मनाला सद्‌गुरुंच्या हाती गुलाम म्हणून सोपवित नाही तोपर्यंत त्याच्या मनातील संशय जागृत असतोच असतो. साधकाच्या अशा नाजूक अवस्थेत जर त्याच्या नजरेसमोर कुठलीही साधना न करणारे, अत्यंत स्वच्छंदी जीवन जगणारे आणि तरीसुध्दा आनंदी जीवन जगणारी माणसे आली तर स्वतःच्या साचेबध्द जीवन जगण्याच्या गरजेबद्दल तो साशंक होण्याची दाट शक्यता असते. मग त्याच्या मनात आपण एवढे यम-नियम पाळूनही जो आनंद प्राप्त करुन घेण्यास असमर्थ आहोत तोच आनंद सर्व नियमांना धाब्यावर बसवून अनिर्बंध जीवन जगणाऱ्यांना कसा मिळतो याबद्दल आश्चर्य वाटू लागते.

आता गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे तण माजलेल्या जमिनीत शेत वाढू शकत नाही त्याचप्रमाणे संशयग्रस्त मानवाला शांति लाभत नाही. त्यामुळे अशा साधकाच्या मनात अस्वस्थता येते. या नवीन आलेल्या अशांतीमुळे त्याचा संशय अजूनच वृध्दींगत होतो व तो ‘संशय-अशांती-संशय’ या दुष्ट्चक्रात खेचला जातो. खरोखर, सद्‌गुरुंच्या शब्दांवर ज्यांचा लगेच निःसंदेह विश्वास बसतो असे साधक अतिशय विरळा असतात. त्यांना फार साधना करावीच लागत नाही. परंतु आपणासारख्या संशयग्रस्त साधकांची ‘ना घर का ना घाटका’ अशी धोब्याच्या कुत्र्यासारखी अवस्था होऊन आपण संसाराग्नीत अधिकच होरपळू लागतो. आज समोर आलेल्या ओव्यांमधून माउली आपल्या या अवस्थेचेच वर्णन करीत आहे असे वाटते. या ओव्यांचा अर्थ असा आहे: ‘ज्याप्रमाणे जन्मांधाला रात्र आणि दिवस यातील फरक कळू शकत नाही त्याचप्रमाणे संशयग्रस्त मनात स्थिरता येऊ शकत नाही (२०२). म्हणून संशय जिथे आहे तिथे भगवंत येऊच शकत नाही (कारण भगवंत अचल, स्थिर आहे) आणि जीवनात भगवंतापासून दूर राहणे हेच एक पाप असल्याने संशयाहून थोर असे पाप नाहीच. त्यामुळे संशय हे सर्व प्राणिमात्रांना संसारात गुतवून ठेवणारे एक भयानक जाळेच आहे (२०३). म्हणून अर्जुना तू संशयाला टाकून दे. संशय मनात येण्याचे कारण ज्ञानाचा अभाव हेच आहे (२०४). जेव्हढे अज्ञान वाढते तेव्हढे या संशयाचे प्रमाण वाढते आणि संशय आपल्या मनात आहे हे जाणण्याचे लक्षण म्हणजे मनातील विश्वास निघून जाणे होय (२०५).’

बदलू पाहतो आपण जीवन । हेच अविश्वासाचे मुख्य लक्षण ।

आहे निव्वळ विश्वासाचा आधार । करण्यास सर्व घटनांचा स्वीकार ॥

खरे म्हणजे आपण सर्वजण पूर्ण विश्वासाने असे म्हणतो की आमची भगवंतावर वा सद्‌गुरुंवर पूर्ण श्रध्दा आहे, विश्वास आहे. परंतु आपण म्हणतो म्हणून आपले हे वक्तव्य सत्य होत नाही! आपले बोलणे फार ढोबळरीत्या खरे असते, आणि सूक्ष्म नजरेने पाहील्यास खोटे आहे असे दिसून येते. उदाहरणार्थ, जीवनामध्ये जेव्हा बहुतांशी आपल्या मनाप्रमाणे घडत असते तेव्हा आपण जरुर अशा गोष्टींचे श्रेय भगवंताला देऊन त्याच्या कृपेबद्दल ऋणी असतो. परंतु कुठल्याही कारणाशिवाय मनाविरुध्द घटना जेव्हा घडू लागतात तेव्हा का म्हणून आपल्या जीवनात असे घडत आहे असे आपण म्हणतोच. हे घडणेसुध्दा भगवंताची वा गुरुंची कृपा आहे असे आपल्या मनातसुध्दा येत नाही. माग आपण स्वतःची व्याधी दूर व्हावी म्हणून जिवापाड प्रयत्‍न करण्यास सुरुवात करतो. आता इथे लक्षात घ्या की प्रयत्‍न करण्यात वावगे काहीच नाही परंतु आपल्या उपायांना योग्य फल मिळत नाही तेव्हा आपण मानसिकरीत्या हतबल होतो. या धीर सोडण्यात अविश्वास दिसून येतो हे लक्षात घ्या. आणि या सर्व घटना इतक्यावेळा आपल्या जीवनात वा आपल्या नजरेसमोर इतरांच्या जीवनात घडलेल्या आहेत की यामध्ये आपणास काहीच चुकीचे दिसत नाही. परंतु शारिरीक व्याधींनि वा सांसारीक अडचणींनी मनाला दुर्बलता येणे यापेक्षा भगवंतावर अविश्वास दर्शविणारे दुसरे काही असूच शकत नाही. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की ‘शरीराला त्रास होत आहे म्हणून मनाला वाइट वाटायचे काहीच कारण नाही. आपले जे प्रारब्ध आहे ते सर्व या शरीराला लागू आहे. कुठल्याही परीस्थितीत मनात भगवंताचे नाम घेण्यास कुठलेही प्रारब्ध आड येत नाही.’ सर्व गोष्टी भगवंताच्या मनाप्रमाणे होत आहेत असे आपण म्हणतो. परंतु तरीही स्वतःच्या शरीराला वा सामाजिक स्थितीला प्रतिकूल परीस्थितीही भगवंतानेच आणलेली असल्याने ती योग्यच आहे असे आपणास वाटत नाही म्हणजे आपला भगवंताच्या शक्‍तीवर पूर्ण विश्वास बसलेला नाही असेच म्हणायला हवे.

अजून सूक्ष्म नजरेने पाहील्यास आपल्या मनातील संशयाचा प्रादुर्भाव जाणण्यासाठी फार मोठी अडचण यायची वाट बघायचीसुध्दा गरज नाही! ज्या ज्या वेळी आपण दुसऱ्या कुणाला स्वतःहून (त्याने न विचारता) सल्ला द्यायला लागतो त्या प्रत्येकवेळी आपल्या मनातील भगवंताबद्दलचा अविश्वासच दिसत असतो. का म्हणून तुम्ही कुणाला बदलण्याची जबाबदारी घ्यावी? भगवंताने तुम्हाला या कामावर नेमलेले आहे का? श्री गोंदवलेकर महाराज म्हणूनच असे म्हणायचे की ‘आपला मुलगा मोठा झाला की त्यालासुध्दा एक-दोन वेळा सल्ला सांगावा आणि नंतर त्यातून आपले मन काढून घ्यावे’. स्वामी स्वरुपानंदांनी श्रीसंत अमलानंदांना हाच सल्ला दिला होता. सर्वकाही भगवंताच्या इच्छेने होत आहे असे आपण सहजतेने म्हणतो खरे परंतु त्या विश्वासाशी सुसंगत आपले वर्तन होत नाही. आणि याचे कारण आपल्या मनातील संशय होय. मधुमेहाचा विकार जसा अतिशय बळाविल्याशिवाय कळत नाही तसाच आपल्या मनातील संशय साधकांना दिसतसुध्दा नाही. परंतु त्यांच्या अज्ञानाने सत्यस्थिती बदलत नाही! तंदुरुस्त होण्यासाठी रोगाचे निदान होणे आवश्यक आहे. निदान अचूक झाले तरच योग्य औषध मिळू शकते. तेव्हा आधी आपल्या जीवनात संशय भरुन राहीलेला आहे हे आपण जाणून घेतले पाहीजे.

आता या संशयरुपी विंचूच्या विषाला उतारा काय आहे? माउली म्हणते:

ऐसा जरी थोरावे । तरी उपाये एकें आंगवे ।

जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्‌ग ॥ २०७:४ ॥

तरी तेणें ज्ञानशस्त्रे तिखटे । निखळ हा निवटे ।

मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥ २०८:४ ॥

माउलींचा उपाय म्हणजे ज्ञानाची धारदार तलवार घेऊन संशयरुपी विंचूला कापून टाकणे! परंतु आपल्यासारख्यांच्या मनात ज्ञान कधी उपजणार? विश्वासाचा भरभक्कम पाया असल्याशिवाय ज्ञानाची मेढ उभी राहणार नाही आणि ज्ञान असल्याशिवाय विश्वास उत्पन्न होणार नाही. ही मेख कधी उलगडणार? आपल्या कुठल्याही प्रयत्‍नांनी हा गुंता सुटणे अशक्य आहे. गुरुकृपेशिवाय हे अशक्य आहे. म्हणूनच आपला गुरु कोण हे ओळखायची महत्वाची खूण म्हणजे ज्याच्या वक्तव्यामुळे संशय फिटतो ही आहे. गुरुकृपा आपल्या जीवनात हवी असेल तर आपण आधी शिष्यत्व पत्करायची तयारी दर्शविली पाहीजे!

तेव्हा सर्व विवेचनाचे सार काय आहे? मनामधील संशयाचे निराकरण करण्यासाठी आपणास आपली साधना सुरुच ठेवावी लागणार आहे. माझी निष्ठा नसताना साधना करणे म्हणजे ढोंग आहे, रामनामावर विश्वास बसेपर्यंत मी नाम घेणार नाही असे म्हणणे अतिशय घातक आहे हे लक्षात घ्या. नाम घेण्यानेच नामाबद्दलचा संशय फिटेल आणि साधना केल्यानेच तीच्याबद्दलची आत्मीयता वाढेल हे जाणून आपण आपली साधना सुरु ठेवायला हवी. अर्थातच स्वतःच्या मनात संशय आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहेच, उगाच आपला विश्वास असल्याचे ढोंग करणे चुकीचेच आहे. पण या जाणीवेमुळे साधना थांबवू नका. स्वतःची साधना संशय जावा म्हणून सुरु ठेवा. अहो, भगवंतप्राप्ती हवी असेल तर आधी संशयरहीत अवस्था येणे अत्यंत जरुरी आहे. आणि इतक्या कठोर प्रामाणिकपणे साधना चालू असेल तर कधीनाकधी सद्‌गुरु आपल्याकडे कृपादॄष्टीने बघणारच. आणि एकदा त्यांची कृपादॄष्टी प्राप्त झाली की अचानक संशय फिटेल. यात संदेह नाही!!!

॥ हरि ॐ ॥

(बंगलोर, दिनांक १ ऑगस्ट २०१०)

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s