माउलींची विराणी – १ : विरह वेदना

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

पडलें दूर देशी मज आठवे मानसीं ।

नको नको हा वियोग, कष्ट होताति जिवासी ॥ १ ॥

दिनु तैसी रजनी जालिगे माये ।

अवस्था लावूनी गेला, अझुनी का न ये ॥ २ ॥

गरुडवाहना गुणगंभिरा, येईगा दातारा ।

बापरखुमादेविवरा, श्रीविठ्ठला ॥ ३ ॥

आपण बघतो की काही माणसे वरकरणी क्षुल्लक दिसणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होतात तर काही महाभयानक आपत्तींमुळेसुध्दा विचलित होत नाहीत. एखाद्या अनुभवाने आपणास सुख झाले आहे वा दुःख होत आहे याचे ज्ञान होण्यास दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे मनाच्या पटावर घडलेल्या घटनेची प्रतिमा उमटण्यास मोकळी जागा असणे जरुरी आहे. स्वतःच्या नादात रमलेल्या माणसाच्या समोरुन लग्नाची सुंदर वरात गेली तरी त्याला त्याची जाणीव होत नाही! परंतु नुसते प्रतिबिंब उमटून चालत नाही. दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे त्या मोकळ्या जागेत जे काही उमटलेले आहे त्या चित्राची जाणीव व्हायला हवी. एखादे बालक प्रत्येक पक्ष्याला ‘काऊ’ वा ‘चिऊ’ असे संबोधिते आणि अचानक एखाद्या सुंदर पक्ष्याच्या दर्शनाचा आनंद झाला तरी त्या आनंदाचे वर्णन करु शकत नाही. तेव्हा आपल्या जवळ पूर्वानुभवांचा मुबलक साठा असणेसुध्दा भावनांना नीट ओळखण्यास जरुरी आहे.

आता या पार्श्वभूमीवर बघा की संतांच्या मनात आधीच्या सर्व जन्मांतील अनुभवांचे ज्ञान असते. उदाहरणार्थ, माउलींनी श्रीज्ञानेश्वरीत असे स्पष्टपणे म्हटले आहे की ‘माझिया सत्यवादाचे तप । वाचा केले बहुत कल्प । तया फळाचे हे महाद्वीप । पातलो प्रभु ॥ ३२:१६॥’ आणि त्याचबरोबर ते सतत वर्तमानकाळात जगत असल्याने त्यांचे मनःपटल संपूर्ण मोकळे आहे. त्यामुळे त्यांच्या मनात समोरील घटनांचे जे पडसाद उमटत असतील त्याची कल्पना आपणासारख्यांना होणे कसे शक्य आहे?!! आपल्यासारखे त्यांचे मन भौतिक पातळीवर नसते म्हणूनच ठीक आहे, नाहीतर भोवतालच्या प्रत्येक घटनेने ते हत्तीच्या चालण्याने जवळील मुंगी जशी हादरते तसे भावनांच्या वादळात सापडले असते. परंतु त्यांचे मन ज्या ठीकाणी असते तेथील सूक्ष्मातल्या सूक्ष्म हालचालीनेसुध्दा त्यांच्या जीवनात प्रचंड हेलकावे येतातच. आपले चित्त सतत भगवंताच्या चरणकमलांपाशी ठेवल्यामुळे भगवंताचा क्षणिक वियोगसुध्दा त्यांना जिवापाड वेदना देऊन जातो, जिवन उलटे-पालटे करुन जातो.

वरील अभंगामध्ये माउलींनी आपल्या आयुष्यातील अशाच एका नाजूक क्षणाचे वर्णन केले आहे. ते म्हणत आहेत: ‘तुझ्यापासून दूर गेल्याने तुझी आठवण मनात प्रकर्षाने येत आहे. हा वियोग अतिशय कष्टदायक असून मनापासून नकोसा वाटत आहे (१). हे करुणासागर माते, मला आता दिवस रात्रीसारखा वाटत आहे (माझे सर्व जिवन उध्वस्त झाले आहे), ही अवस्था झालेली असतानासुध्दा तू अजून का येत नाहीस? (भक्‍ताच्या आर्त हाकेला तात्काळ धावून येण्याच्या ब्रीदाची आठवण ठेवून माउली भगवंतांना अशी हाक देत आहे!) (२). अरे सर्वगुणसंपन्न असलेल्या गरुडा, तू भगवंतांचे वाहन आहेस तर आता तू तरी उदार हो आणि माझ्यापाशी श्रीविठ्ठलांना घेऊन ये (३).’

बघा, माउलींचे मन विरहवेदनेने किती वेडेपिसे झालेले आहे! जो गरुड भगवंतांच्या आज्ञेशिवाय आपले पाय पुढे ठेवित नाही अशा सेवकाला जबरदस्तीने भगवंताला आपणाजवळ आण अशी विनवणी करण्यास ते तयार झाले आहेत. जेव्हा मनाची अवस्था केविलवाणी झालेली असते तेव्हा ‘बुडत्याला काडीचा आधार’ या न्यायाने आपण कितीही अशक्य असलेल्या गोष्टींचा आधार घेतो तशीच अवस्था प्रत्यक्ष माउलींची झालेली आहे. श्रीसंत तुकाराम महाराजसुध्दा आपल्या ‘गरुडाचे पायी, ठेवी वेळोवेळां डोई’ या अभंगामध्ये गरुडाला, लक्ष्मीला आणि शेषाला विनवणी करतात की तुम्ही तरी भगवंताला माझ्याजवळ आणा. संतांच्या या सकृतदर्शनी विरोधाभासी वर्तनावरुन ते किती व्याकुळ झाले असतील याची थोडीफार कल्पना करण्याचा प्रयत्‍न आपण करु शकतो. आपल्या हातात एवढेच आहे कारण त्यांच्या मनःस्थितीची आपणास जाणीव होणे निव्वळ अशक्य आहे!

शेवटी या अभंगाकडे बघताना एक गोष्ट लक्षात घ्या की माउलींना झालेली विरहवेदना आपल्या दृष्टीने एक क्षणभरही टिकलेली नसणार. परंतु त्यांच्या मनाच्या पराकोटीच्या संवेदनशीलतेमुळे तो अत्यल्पकाळसुध्दा त्यांना नकोसा वाटतो. दुःखाचे मोजमाप ते कितीकाळ टिकले यावर करायचे नसते, तर त्याने मनात किती खोल जखम झाली आहे यावर करायचे असते हे आपण नजरेआड करु नये.

॥ हरि ॐ ॥

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: