माउलींची विराणी – २: पुनर्भेटीची उत्कंठा

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकूनगे माये सांगताहे ॥ १ ॥

उडरे उडरे काऊ, तुझे सोन्याने मढविन पाहु ।

पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥ २ ॥

दहिभाताची उंडी लाविन तुझ्या तोंडी ।

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥ ३ ॥

दुधे भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।

सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥ ४ ॥

आंबयां डाहाळी फळे चुंबी रसाळी ।

आजिचेरे काळीं शकुन सांगे ॥ ५ ॥

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे ।

भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥ ६ ॥


संतांचे भगवंताशी तादात्म्य झालेले असते. तरीसुध्दा जगाच्या उध्दारासाठी ते स्वतःला भौतिक पातळीवर ठेवतात. भगवंताने त्यांना तशी आज्ञाच केलेली असते. उदाहरणार्थ, श्री रामकृष्ण परमहंस जेव्हा निर्विकल्प समाधिचा आनंद लुटत होते तेव्हा काही काळ गेल्यावर त्यांना काली मातेने आज्ञा केली की ‘तू आता भावमुखी अवस्थेत रहा. तुझे शिष्य होणार आहेत त्यांना शिकविण्यासाठी तुला निर्विकल्प समाधीचा त्याग करायला हवा.’ नंतर श्री स्वामी विवेकानंदांनाही श्री रामकृष्ण परमहंसांनी असेच सांगितले की ‘समाधी लावून स्वतःच्या आनंदात मग्न रहाणे म्हणजे संकुचित वृत्ती आहे. तुला जगभर हिंडयचे आहे हे विसरु नकोस.’ संतांच्या जिवनाकडे बघताना आपण ही गोष्ट सतत लक्षात ठेवली पाहीजे. या दृष्टिकोनातून बघितल्यास जेव्हा संत समाजात वावरत असतात तेव्हा ते मानसिकरीत्या विरहावस्थेमध्येच असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचेच एक उदाहरण बघा: हिमालयामध्ये श्री स्वामी रामा म्हणून एक थोर योगी नुकतेच होऊन गेले त्यांची प्रसिध्दी जगभर पसरलेली आहे. त्यांचे गुरु म्हणजे श्री बंगाली बाबा एकदा हिमालयात एका गुहेत ध्यान करीत असताना त्यांना भेटायला एक राजा आला आणि त्याने विचारले इथे बसून तुम्हाला एकटेपणाची भावना येत नाही का? तेव्हा ते लगेच म्हणाले की ‘तू नव्हतास तेव्हा मी एकटा नव्हतो आणि तू बोलायला लागल्यावर एकटेपणा वाटू लागला आहे.’ त्यातून त्यांना असे सांगायचे होते की ज्या भगवंताबरोबर माझे सान्निध्य होते तो आता तुझ्याशी बोलत असल्याने निघून गेला आहे. अर्थात, इथे काही सुजाण वाचक असा संदेह निर्माण करतील की सर्वभूतांमध्ये त्यांना भगवान दिसत असल्यास ते असे कसे म्हणू शकतात? त्यांच्यात विरहावस्था कशी निर्माण होणार? यावर उत्तर असे आहे की सर्व भूतांमध्ये भगवान आहेच पण त्यांच्या उपजत स्वभावांमुळे त्यांच्यामधील भगवंताचे रुप झाकले गेलेले आहे. उदाहरणार्थ, पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीमधील भगवान अगदी उघडपणे डोळ्यासमोर दिसतो तितका शेजारच्या कुटुंबातील पाळलेल्या श्वानातील दिसत नाही. त्यामुळे संतांना भगवंताचे निर्मल, आवरणाहीन रुप बघण्याची उत्सुकता कायम असतेच. तीच त्यांची विरहावस्था होय.

एकदा अशाच अवस्थेत श्री ज्ञानेश्वर माउली असताना त्यांना पलिकडून एका कावळ्याचे ओरडणे ऐकू आले. त्याच्या वरकरणी कर्कश्य वाटणाऱ्या कावकावीतून त्यांना काय वाटले याचे वर्णन त्यांनी वरील अभंगात केले आहे. ते म्हणत आहेत की: ‘(माझ्या मनाची व्याकुळता बघून) पलीकडील कावळा मला ओरडून सांगत आहे की मी तुला शुभ वार्ता सांगायलाच इथे आलो आहे (१). अरे कावळ्या, आता तुझा शकुन पूर्ण करण्यासाठी जरुरी असलेले उडून जाणे लवकर कर. तू असे केलेस तर ज्याप्रमाणे एखादा राजा शुभवार्ता आणणाऱ्याला गळ्यातील मोल्यवान हार काढून देत असे, त्याचप्रमाणे मी तुला संपूर्ण सोन्याने मढवून टाकीन कारण तू पंढरीराणे विठोबा घरात केव्हा येणार आहेत याची वार्ता सांगितली आहेस! (२) पण उडून जायच्या आधी जरा थांब, तू ‘त्यांच्याकडून’ आलेला असल्याने उडायच्या आधी मला विठोबारायांबद्दल जरा सांग बघू. ते कसे आहेत, केव्हा येणार आहेत वगैरे गोष्टी मला सांगितल्यास तर तुला आवडणारा दहि-भात मी तुला प्रेमाने भरवीन (३) आणि ही घे दूधाने भरलेली वाटी पण मला खरं सांग रे! माझा विठोबा येणार ना रे?!! (४) आज तू दारच्या आंब्याच्या झाडावर असल्यापैकी सर्वात रसाळ फळांना खाल्लेस तरी मी तुला काहीही बोलणार नाही पण शकुन पूर्ण करण्यात आता दिरंगाई करु नकोस आणि आत्ताच तो पूर्ण कर. (५) ओ हो! मला आत्ता कळले की कावळ्याचा शकुन पूर्ण झाला आहे आणि त्याने माझा पंढरीराया मला आजच भेटणार आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री झालेली आहे!! (६)’

विठोबाशी तादात्म्य साधण्यासाठी माउली इतकी उत्सुक आहे की त्यामुळे कावळ्यासारख्या अतिसामान्य जीवालासुध्दा अत्यंत आदराने संबिधिले जात आहे. कारण सेवक कितीही छोटा असला तरी तो ज्या मालकाची सेवा करीत आहे त्यानुसार श्रेष्ठ होतो!! आणि आलेला कावळा प्रत्यक्ष विठोबांच्या आज्ञेने आलेला असल्यामुळे ते अत्यंत प्रेमाने त्याला ‘काउ’ असे संबोधून त्याचा मानसन्मान करीत आहेत! यावरुन आपण असा बोध घ्यायला हवा की जर आपणास माउलींचे प्रेम पूर्णरुपाने हवे असेल तर आपल्या मनात विठोबाबद्दलची भक्‍ती जागृत असायला हवी. जिथे वैष्णवांच्या मेळा असतो तिथे माउली येणारच येणार. वारीतील प्रत्येक वारकऱ्याला या सत्याची प्रचीति आलेली आहे!!!

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: