माउलींची विराणी – ३: पूर्वभेटीची आठवण

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


अवचिता परिमळु झुळकला अळुमाळू । मी म्हणे गोपाळु आलागे माये ।

चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करु ॥ १ ॥

मज करा का उपचारु अधिक ताप भारु । सखिये सारंगधरु भेटवा का ॥ ध्रु. ॥

तों सावळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ।

भरलिया दृष्टी जंव डोळा न्याहाळी । तव कोठे वनमाळी गेलागे माये ॥ २ ॥

बोधोनि ठेले मन तंव जालें अने आन । सोकोनि घेतले प्राण माझेगे माये ।

बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणें कायामनेंवाचा वेधियेलें ॥ ३ ॥

एखाद्या व्यक्‍तीपासून दूर गेल्यावरच तीच्याबद्दल आपणास किती प्रेम आहे याची खरी जाणीव होते. आपणास आवडणारे व्यक्‍तिमत्व बरोबर असले की जिवनात प्रसन्नता असते आणि सहवासाच्या आनंदाने आपले मन भरुन जाते हे जरी खरे असले तरी आपल्या मनाला सध्यापेक्षा अधिक परिपूर्ण आनंद शोधायचा एक चाळा असतोच. म्हणूनच आपण बघतो की आपल्या सद्‌गुरुंना सोडून कित्येक साधक गुरुआज्ञेविना आपणहुन तीर्थक्षेत्री जाऊन साधना करायचा प्रयत्‍न करीतात. भले भलेसुध्दा यातून सुटलेले नाहीत. जेव्हा श्री रामकृष्ण परमहंसांना घशाचा कर्करोग झाला होता तेव्हा स्वामी विवेकानंद काही काळ बुध्दगयेला साधना करण्यास गेले होते. कल्पना करा की जी शक्‍ति राम आणि कृष्ण या रुपाने भूतलावर अवतरली होती तीला सोडून स्वामी दुसरीकडे गेले होते!! श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांतही हीच गोष्ट आपणास वारंवार बघायला मिळते. मायेचा पगडा असा अगम्य आहे. त्यामुळे आपणासारखे साधक सद्‌गुरुंचा उत्सव चालू असताना मध्येच एक दिवस काढून जवळील देवस्थानांना भेट द्यायला जातात यात काय नवल?!! परंतु ज्याप्रमाणे झोपी गेलेल्या माणसाच्या तोंडावर गार पाण्याचा हबका बसला की तो खडबडून जागा होतो त्याचप्रमाणे विरहवेदना जाणविली की साधक इतर गोष्टींच्या मायापाशातून सुटून परत आपल्या सद्‌गुरुंच्या चरणापाशी येतो. अशा रीतीने विरहामध्येही सकारात्मक भावना आहेच!

या सृष्टीतील प्रत्येक वस्तूत सत्व, रज आणि तम या तिन्ही गोष्टी अस्तित्वात असतात. त्यामुळे विरहासारख्या अधिकांश तामसिक गोष्टीतही सद्‌गुरुंच्या तीव्र आठवणीची सात्विकता आहेच. त्या सत्‌स्मरणामध्ये एकाग्रतेने मग्न असताना आपले मन अतिशय ताणलेल्या तंतुवाद्यासारखे तरल होते आणि त्यामुळे अत्यंत क्षुल्लक गोष्टीही आपणास अनिवार आनंद वा दारुण दुःख देऊन जातात. याचे एक उदाहरण म्हणजे ज्या ग्रामातील मातीपासून भगवंताच्या भजनासाठी वापरणारा घट बनतो त्या गांवाचे नाव काढल्यावरच श्री रामकृष्ण परमहंस अतिउच्च भावावस्थेमध्ये विरुन जायचे. कारण त्यांच्या मनात त्या नामोच्चरणाने तो घट आणि त्याच्या अनुषंगाने भजन-कीर्तन यायचे आणि ते त्या स्मरणात समाधिस्थ व्हायचे. त्यांची मनःस्थिती कायमच अशी अत्यंत नाजूक असल्याने भोजनसमयी चुकूनसुध्दा कुणी दुरान्वयाने भगवंताची आठवण होईल असे शब्द काढले तरी ते भावावस्थेत विलीन व्हायचे आणि त्यांचे भोजन तसेच रहायचे. केवळ श्री शारदामाताच त्यांना पूर्ण भोजन करण्यास भाग पाडू शकायच्या. अशी अतिउच्च भावावस्था विरहाचाच एक भाग आहे. वरील अभंगामध्ये माउलींची अवस्था अशीच असल्याचे आपणास स्पष्टपणे दिसून येते.

माउली म्हणत आहे: ‘कुठून तरी अचानक चंदनाचा सुगंध आल्याचा मला भास झाला आहे. नक्कीच देवकीनंदन गोपाळ मला भेटायला आला असणार. त्या भेटीच्या कल्पनेनेच माझे देहभान हरपल्यासारखे झाले पण मी स्वतःला कशीबशी सांभाळत त्याला भेटायला बाहेर आले तर माझे बघणेच खुंटल्यासारखे झाले आहे. आता मी काय करु हे सुचेनासे झाले आहे (१). सख्यांनो, माझा विरहज्वर अधिक प्रज्वलित होण्याआधी यावरचा एकच उपाय जो आहे तो म्हणजे मुरलीधराची भेट ती मला लवकरात लवकर घडवा (ध्रु.) मला त्याचे पीतांबर नेसलेले लावण्यमयी मनोहर सावळे रुप दिसले आणि मला दृष्टी आहे याचे सार्थक झाले. परंतु चित्त समाधान झाल्यावर त्याला परत एकदा नीट पहावे म्हणून बघायला गेले तर तो कुठे अदृष्य झाला हे कळलेच नाही (२). त्या दर्शनाने माझे मन उन्मन झाले आहे आणि माझ्या संकुचित व्यक्तिमत्वाचा पूर्ण नाश झाला आहे. आता मला निव्वळ विठ्ठलाच्या स्मरणातच सुख लाभायला लागले आहे. त्यातच मी आता कायावाचामनाने पूर्णतः गुंतलो आहे (३).’

बघा, कुठून तरी सुगंधाचा भास होण्याचे निमित्त काय झाले आणि माउली भावावस्थेत विलीन झाल्या! परंतु या देहातीत अवस्थेतही अतिशय सुंदर शब्दांत माउलींनी फार गहन तत्व मांडले आहे. भगवंताशी भेट झाल्यावर जी अवस्था होते तीचे वर्णन करायला गेल्यास ती कुठे नाहीशी होते हे कळतच नाही असे माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणत आहे. ‘दृष्टी भरल्यावर डोळ्यांनी बघायला गेले तर तो नाहीसा झाला’ या अतिनाजूक आणि समर्पक शब्दांतून भगवंताला बुध्दीने जाणणे अशक्य आहे हे माउलींशिवाय कोण मांडू शकेल काय?! खरोखर, माउलींच्या रुपाने इतकी अफाट ज्ञानी आणि त्याबरोबर अकल्पानप्य वाक्‌कौशल्यता व अमर्याद सौंदर्यदृष्टी असलेली व्यक्‍ती या भूतलावर कधीतरी वावरली आहे या जाणीवेनेच मन भरुन येते. अशावेळी अभंग ऐकणाऱ्यांच्या नयनांतून अश्रुधारा न वाहतील तरच नवल. भगवंताबद्दल अभंगातील भावनेच्या एक लक्षांश भावना तरी आपल्या जिवनात येऊदे अशी माउलींच्या चरणी प्रार्थना!

॥ हरि ॐ ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: