माउलींची विराणी – ४: विरहाग्नीचा दाह

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥


घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ।

भवतारकु हा कान्हा । वेगी भेटवा कां ॥ १ ॥

चांदवो वो चांदणे । चापेवो चंदनु ।

देवकी नंदनु । विण नावडे वो ॥ २ ॥

चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।

कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा गा ॥ ३ ॥

सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।

पोळी आगीसारिखी । वेगीं विझवा गा ॥ ४ ॥

तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्यावी उत्तरे ।

कोकिळें वर्जावें । तुम्ही बाइयांनो ॥ ५ ॥

दर्पणी पाहातां । रुप न दिसे वो आपुलें ।

बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसे केलें ॥ ६ ॥


कलकत्ता शहरानजीक असलेल्या दक्षिणेश्वर येथील श्री कालीमातेच्या देवळात साधना करीत असताना श्री रामकृष्ण परमहंसांना एक विचित्र आजार झाला. त्यांनी स्वतः त्यांच्या प्रिय शिष्यांना या आजाराचे वर्णन करीताना असे सांगितले की ‘त्यावेळी सर्व शरीर आगीने पोळल्यासारखे उष्ण होऊन अतिशय वेदना जाणवायच्या. त्या वेदना दररोज सूर्य उगवायच्या सुमारास दाह सुरू होऊन माध्यान्हीपर्यंत पेलवण्यास अशक्यप्राय होतील इतक्या वाढायच्या. अशावेळी गंगेच्या पाण्यात शरीर बुडविल्याशिवाय काहीच गत्यंतर नसायचे. परंतु फारकाळ पाण्यात राहील्याने दुसरे आजार बळावतील या भितीने त्यांना बाहेर यावे लागावयाचे. मग एका संगमरवरी फरश्या असलेल्या खोलीत सर्व दारे खिडक्या बंद करुन व ती जमिन फडक्याने ओली करुन ते त्यावर गडबडा लोळायचे. तरीसुध्दा अंगाचा दाह कमी व्हायचा नाही!’ त्यांचे त्याकाळचे परमभक्‍त म्हणजे श्री माथुरबाबू. दक्षिणेश्वर मंदिराची मालकीण श्री राणी रासमणी यांचे ते जावई. त्यांनी ठाकुरांचा ‘रोग’ बरा व्हावा म्हणून बरेच प्रयत्‍न केले. त्याकाळचे प्रख्यात वैद्य बोलावून नाना तऱ्हेची दुर्मिळ औषधे आणली तरी हा रोग बरा होईना. नेमक्या याच सुमारास दक्षिणेश्वरामध्ये एक संन्यासिनी आली. भैरवी ब्राह्मणी नाव असलेल्या या संन्यासिनीने पुढे श्री रामकृष्णांना तांत्रिक विद्या पूर्ण शिकविली. श्री रामकृष्णांना बघितल्यावर तिने सांगितले की ‘ही अवस्था कुठल्याही रोगाने झालेली नसून भगवंताच्या विरहाने झालेली आहे. साधकाच्या भगवंताबद्दलच्या प्रेमाची पराकोटी झाली की अशी स्थिती होते आणि श्री राधा व भगवान श्री चैतन्यप्रभू यांच्या जीवनात ही वारंवार आल्याचे उल्लेख आहेत. हा ‘रोग’ बरा करण्याचा उपाय म्हणजे साधकाला गोड सुवासिक फुलांच्या माळा घालाव्या आणि शरीराला चंदनाच्या लेप लावावा.’ भैरवीच्या या बोलण्यावर अर्थात कुणाचाच विश्वास बसला नाही. इतके नामांकित वैद्य जे निदान करु शकले नाहीत त्याबद्दल ही संन्यासिनी कशी बोलू शकते असेच त्यांना वाटले. परंतु इतक्या उपायांमध्ये हा उपायसुध्दा करुन बघण्यात काय हरकत आहे असा विचार करुन त्यांनी सूचनेची अंमलबजावणी केली. गंमत म्हणजे फक्‍त तीन दिवसात श्री रामकृष्ण परमहंसांच्या देहाचा दाह संपूर्ण नाहीसा झाला! तरीसुध्दा लोकांनी आधी केलेल्या उपचारांचाच हा वेळाने झालेला परीणाम असणार, ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गांठ पडली’ असे म्हणून भैरवीवर विश्वास ठेवला नाहीच! अजूनही आपण बघतोच की आपल्या नेहमीच्या माहितीत असलेल्या आणि सहजतेने जवळ असलेल्या व्यक्‍तीमध्ये साधनेची इतकी पराकोटी झालेली आहे हे कोण मान्य करतो?!! असो.

वरील अभंगातही माउली विरहाग्नीच्या दाहाचे वर्णन करीत म्हणत आहे: ‘ढगांचा गडगडाट आणि त्याच्या बरोबर थंडगार वाऱ्याची झुळूक जाणविली, (आणि ज्याप्रमाणे अशा वातावरणात मयूराला मयूरीची तीव्र ओढ वाटते त्याचप्रमाणे मला वाटून) आता मला या जगाचे सर्वदुःख हरण करणारा कान्हा लवकर भेटवा (१). या देवकीनंदन गोपाळाविण मला ना रात्रीचे चांदणे शीतल वाटत आहे ना चंदनाचा लेप (२). चंदनाची चोळी करुन मला घातली तरी माझे सर्व अंग जळल्यासारखे होत आहे. तो दाह आता सहवेनासा होऊन यावर जो एकच उपाय आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन ते मला घडवा (३). अगदी गोड सुवासिक फुलांच्या शय्येवर जरी मी झोपले तरी मला विस्तवावर पडल्यासारखे होत आहे. आता हा विरहाग्नी त्वरीत विझवा (४). मैत्रिणींनो, तुम्ही आपल्याच जीवनगाण्यात मग्न आहात परंतु माझे करुणास्वर ऐकून माझ्यासाठी काहीतरी करा. सख्यांनो, आता माझ्यासाठी तरी तुम्ही ऐहीक सुखाला त्यागा (म्हणजे भगवान तुम्हांकडे येईल आणि मग त्याला तुम्ही माझ्याकडे आणू शकाल!) (५). श्री विठ्ठलकृपेने मी कोण आहे, कुठे आहे, कशी आहे याचे सर्व भान सुटलेले आहे. स्वतःचे रुप पहायचा प्रयत्‍न केला तरी त्यात मला यश मिळत नाही (तेव्हा आता माझ्याकडून भगवंतप्राप्तीचे प्रयत्‍न होतील ही आशाच नाही. म्हणून सख्यांनो आता मला फक्‍त तुमचाच आधार आहे.) (६).

सांगायची गोष्ट अशी की माउलींनी आपल्या या विरहीणीमध्ये श्री रामकृष्ण परमहंसांच्या अवस्थेपेक्षाही दारुण अवस्था वर्णन केली आहे. भैरवी ब्राह्मणीने ठाकुरांच्या विरहज्वरावर जे यशस्वी उपाय केले होते, त्यांचाच उल्लेख करुन आता त्यांचासुध्दा काही उपयोग होत नाही असे माउली म्हणत आहे हे लक्षात घ्या. याचे कारण असे आहे की माउलींची विरहावस्था इतरांच्या भौतिक पातळीवरील अस्तित्वातच सुख शोधण्याच्या प्रयत्‍नांनी अधिकच वृध्दींगत झालेली आहे. परमदयाळू माउलींच्या कृपामय स्वभावामुळे आता आपल्या जीवनातील दुःखही त्यांचे झाले आहे. त्यामुळे निव्वळ त्यांच्या देहावर उपचार करुन त्यांची मनःशांति होत नाही तर जेव्हा आपण आपल्या जीवनात खरा आनंद निर्माण करु तेव्हाच त्यांचे खरे समाधान होणार आहे. सख्यांच्या रुपकाद्वारे माउली आपणा सर्वांना स्वतःचे जीवनगाणे बदलायला सांगत आहे. चला, आपण स्वतःच्या भगवंताजवळ जाण्याच्या साधनेला जोमाने सुरु करुन ‘भजिजो आदिपुरुखी अखंडित ॥’ अशा अवस्थेत राहण्याचा प्रयत्‍न करु. माउलींच्या विरहाचे निरसन करण्याचा आपल्यापरीने प्रयत्‍न करु!!

॥ हरि ॐ ॥

Advertisements

लेखक: Shreedhar

I finished Ph.D. in mathematics in 1991. since 1996, I am making sincere efforts to see the relevance of the ancient Indian teachings in the modern world.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s